भृगु महर्षींच्या आज्ञेने विजयादशमीच्या शुभदिनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर अभिमंत्रित सुवर्णाभिषेक !

सनातन संस्थेच्या इतिहासातील सुवर्णक्षण !

रामनाथी (गोवा) – दसरा या सणाचे एक वेगळे महत्त्व आहे ! हा सण सीमोल्लंघनाचा आहे, सुवर्णाचे आदान-प्रदान करण्याचा आहे, विजयाचा आहे अन् त्यामुळेच तो आनंदाचाही आहे. अशा या दिनी शिष्याला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून खर्‍या अर्थाने सीमोल्लंघन करायला शिकवणारे अन् केवळ कृपादृष्टीने त्याच्या जिवाचेच सोने करणारे श्रीविष्णुस्वरूप श्रीगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सुवर्णाभिषेक करण्याचे भाग्य सनातन संस्थेच्या साधकांना लाभले. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ८ ऑक्टोबर या दसर्‍याच्या शुभदिनी भृगु महर्षींच्या आज्ञेने हा सोहळा पार पडला अन् सनातनच्या इतिहासात हा दिन खर्‍या अर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मस्तकावर सुवर्ण बिल्वपत्र अर्पण करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

या सोहळ्यात महर्षि भृगु यांनी चेन्नई (तमिळनाडू) येथील भृगु जीवनाडीवाचक श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून केलेल्या आज्ञेनुसार सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वेदमंत्रांच्या घोषात परात्पर गुरु डॉक्टरांच्या मस्तकावर ९ सुवर्ण बिल्वपत्रे अर्पण केली. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांवर अभिमंत्रित जलाने अभिषेकरूपी प्रोक्षण करण्यात आले. अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले महर्षींच्या आज्ञेनुसार या सोहळ्याला उपस्थित राहिले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अभिमंत्रित जल प्रोक्षण करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक तथा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी सोहळ्याच्या वेळी भावपूर्ण मंत्रपठण केले आणि ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग यांनी ओघवत्या वाणीत सोहळ्याचे भावपूर्ण सूत्रसंचालन केले. या मंगलमय सोहळ्याला सनातन संस्थेचे संत आणि साधक उपस्थित होते. सद्गुरूंच्या आरतीने या सोहळ्याची सांगता झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment