केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात अर्पण केले जाणारे सहस्र वर्षांपेक्षा जुनी परंपरा असलेले ‘ओणविल्लू’ (देवतांची चित्रे असलेले धनुष्य) !

‘श्री महालक्ष्मीदेवी सहित असलेल्या आणि शेषनागावर पहुडलेल्या भगवान श्रीविष्णू’चे चित्र असलेले ‘ओणविल्लू’ !
ओणविल्लू बनवण्याची परंपरा लाभलेल्या कुटुंबातील श्री. आर्. बिनकुमार (डावीकडून दुसरे) आणि त्यांचे सहकारी

 

१. ‘ओणविल्लू’ म्हणजे काय ?

‘ओणविल्लू’ हा मल्ल्याळम् भाषेतील शब्द ‘ओणम्’ आणि ‘विल्ल’ या दोन शब्दांचा संधी होऊन बनला आहे. भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील द्वादशीला ‘वामन द्वादशी’ किंवा ‘वामन जयंती’ असे म्हणतात. या दिवशी केरळमध्ये ‘ओणम्’ हा सण साजरा केला जातो. ‘विल्ल’ शब्दाचा अर्थ ‘धनुष्य’ असा होतो. अवतार आणि देवता यांची चित्रे काढलेली धनुष्ये (विल्ल) ओणम्च्या दिवशी केरळमधील, थिरूवनंतपूरम् येथील सुप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात अर्पण केली जातात. या धनुष्यांना ‘ओणविल्लू’, असे म्हणतात.

 

२. ‘ओणविल्लू’चा इतिहास

ओणविल्लू बनवण्याची परंपरा सहस्र वर्षांहूनही अधिक जुनी आहे. एका आख्यायिकेनुसार बळीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडले. बळीराजाने भगवान श्रीविष्णूला प्रार्थना केली, ‘प्रतिवर्षी मला पृथ्वीवर तुझे दर्शन व्हावे.’ यावर श्रीविष्णूने आशीर्वाद दिला, ‘प्रतिवर्षी तुला पृथ्वीवर माझ्या अवतारांचे चित्ररूपात दर्शन होईल.’ बळीराजाला दर्शन घेता यावे, यासाठी श्री विश्‍वकर्म्याने कदंब वृक्षाच्या लाकडावर श्रीविष्णूच्या अवतारांची चित्रे काढली. हेच ते ‘ओणविल्लू’ ! त्यानंतर प्रतिवर्षी ओणम्च्या दिवशी याच प्रकारे ओणविल्लू तयार करून ते श्री पद्मनाभस्वामी मंदिरात ठेवण्याची परंपरा आरंभ झाली. (टीप) विश्‍वकर्म्याचे वंशज असलेले केरळ राज्यातील थिरूवनंतपूरम् येथील श्री. आर्. बिनकुमार आणि त्यांचे कुटुंबीय या प्राचीन परंपरेचे पालन करत आहेत.

टीप – (संदर्भ : ‘ओणविल्लू’ माहितीपत्रक)

 

३. ‘ओणविल्लू’ बनवणारे श्री. आर्. बिनकुमार आणि त्यांचे कुटुंबीय यांची माहिती

‘वर्ष १७२९ मध्ये मार्तंड वर्मा हा त्रावणकोरचा राजा झाल्यावर त्याने श्री पद्मनाभस्वामी मंदिराचा जीर्णोद्धार केला.’ (टीप) त्या वेळी मंदिरातील लाकडी कोरीवकाम करण्यासाठी तमिळनाडूतील थिरूवट्टार येथून श्री. आर्. बिनकुमार यांचे पूर्वज त्रावणकोर येथे येऊन स्थायिक झाले. तेव्हापासून श्री पद्मनाभस्वामी मंदिरात द्यायचे ‘ओणविल्लू’ बनवण्याची सेवा श्री. आर्. बिनकुमार यांच्या कुटुंबाकडे आहे.

टीप – (संदर्भ : http://spst.in/temple-history/ )

 

४. ‘ओणविल्लू’ बनवण्याची प्रक्रिया

ओणविल्लू बनवणे, ही एक पारंपरिक कला आहे. या सेवेतील ‘लाकूड कापणे, त्याला रंग देणे, त्यावर चित्रे काढणे आदी विविध टप्पे, त्यांचा क्रम’ आदींविषयी परंपरागत आचारांचे काटेकोरपणे पालन केले जाते. ओणविल्लू बनवण्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.

४ अ. धनुष्याच्या आकाराचे लाकूड कापून ते लाल रंगाने रंगवणे

कदंब वृक्षाचे सुकवलेले लाकूड धनुष्याच्या आकारात कापतात. धनुष्याची लांबी एक ते सव्वा मीटर आणि रूंदी १० ते १५ सें.मी. असते. धनुष्याच्या आकारातील या लाकडाला लाल रंग दिला जातो.

४ आ. देवतेच्या चित्राचे रेखांकन करून ते रंगवणे

लाल रंगाने रंगवलेल्या लाकडी धनुष्यावर लेखणीने देवतेच्या चित्राचे रेखांकन करण्यात येते. त्यानंतर ते चित्र रंगवले जाते.

४ इ. देवतांच्या मुखावरील भाव दाखवणे

चित्रातील देवता, त्यांची वाहने आदी विविध घटकांच्या रेखाकृती काळ्या रंगाने काढतात. शेवटी देवतांच्या मुखमंडलावरील नेत्र, मुख, नाक आदींद्वारे त्यांचे भाव दाखवले जातात.

४ ई. गोंड्यांनी सजवणे

चित्रकाम पूर्ण झाल्यानंतर ओणविल्लूच्या दोन्ही टोकांना लाल रंगाच्या दोर्‍यांपासून बनवलेले गोंडे बांधले जातात.

 

५. ‘ओणविल्लू’ची आणि ते बनवण्याच्या प्रक्रियेतील काही वैशिष्ट्ये

५ अ. नैसर्गिक रंगांचा वापर करणे आणि रंगांना विशिष्ट अर्थ असणे

ओणविल्लूसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. लाल, पिवळा, हिरवा, निळा, काळा आणि पांढरा हे रंग प्रामुख्याने वापरले जातात. चित्रांत वापरले जाणारे रंग आणि त्यांच्याशी संबंधित भाव पुढीलप्रमाणे आहेत.

रंग भाव
१. लाल धैर्यआणि स्नेह
२. पिवळा ज्ञान
३. हिरवा विशालता
४. निळा इच्छाशक्ती
५. काळा कठोरता
६. पांढरा पवित्रता

५ आ. ‘ओणविल्लू’चा प्रकार आणि भाविकांची कामना

परंपरेनुसार ६ प्रकारची चित्रे असलेले ओणविल्लू बनवतात. ओणम्च्या दिवशी श्री पद्मनाभस्वामी मंदिर परिसरातील त्या त्या देवतेशी संबंधित मंदिरात हे ओणविल्लू ठेवले जातात, उदा. श्री अनंतशयनम् चित्र असलेले ओणविल्लू श्री पद्मनाभस्वामींच्या मुख्य मंदिरात, श्री विनायकाचे चित्र असलेला ओणविल्लू श्री गणेशाच्या मंदिरात इत्यादी. हे ओणविल्लू विक्रीसाठीही उपलब्ध असतात. सर्वसाधारणपणे भाविक त्यांच्या कामनापूर्तीसाठी पूरक असलेला ओणविल्लू विकत घेतात. ओणविल्लू, त्यावरील देवतेचे चित्र आणि त्याच्याशी संबंधित भाविकांच्या कामना पुढील सारणीत दिल्या आहेत.

‘ओणविल्लू’चा प्रकार देवतेचे चित्र भाविकांची कामना
१. अनंतशयनम्विल्लु श्री पद्मनाभस्वामी सर्वप्रकारची समृद्धी आणि ईश्‍वरी कृपा
२. दशावतारम्विल्लु श्रीविष्णूचे दहा अवतार शत्रूंपासून रक्षण
३. श्रीकृष्ण लीला विल्लु श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध लीला निःसंतान दांपत्याला संतानप्राप्ती
४. श्रीरामपट्टाभिषेकम्विल्लु सीतेसह सिंहासनाधिष्ठित श्रीराम वैवाहिक सौख्याची प्राप्ती
५. श्री धर्मशास्था विल्लु श्री अय्यप्पन् शनि ग्रहपीडादोषाचेनिवारण
६. विनायकन्विल्लु श्री गणपति सर्वसंकटांपासून मुक्ती

५ इ. ओणविल्लूच्या दोन्ही टोकांना बांधायचे गोंडे
कारागृहातील कैद्यांनी पापक्षालनासाठी ‘सेवा’ म्हणून बनवलेले असणे

ओणविल्लूच्या दोन्ही टोकांना लाल रंगाच्या दोर्‍यांपासून बनवलेले गोंडे कारागृहातील कैद्यांनी ‘सेवा’ म्हणून बनवलेले असतात. ज्या कैद्यांना पापक्षालनासाठी ओणविल्लूचे गोंडे बनवण्याची इच्छा असते, त्यांना या सेवेसाठी आवश्यक आचरणाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. कैदी नियमांचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत भावपूर्णरित्या ही सेवा करतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.

५ ई. ‘ओणविल्लूवरील देवतेच्या चित्रात मुखमंडालावरील
भाव कोणते असावे ?’, हे चित्रकाराला स्वप्नदृष्टांताद्वारे कळणे

ओणविल्लू बनवण्याच्या प्रक्रियेत देवतेच्या मुखमंडलावरील भाव सर्वांत शेवटी रेखाटले जातात. ही सेवा श्री. आर्. बिनकुमार यांचे भाऊ श्री. सुदर्शन करतात. ओणविल्लूवर हाताने चित्रकाम केलेले असल्याने कोणतेही दोन ओणविल्लू तंतोतंत एकसारखे नसतात. त्यांतील देवतांच्या मुखावरील भाव आदींमध्ये अल्पसा तरी भेद असतोच. देवतांच्या मुखावर कोणते भाव दाखवायचे, ते श्री. सुदर्शन यांना रात्री स्वप्नदृष्टांताद्वारे कळते. त्यानुसार ते दुसर्‍या दिवशी सकाळी देवतेच्या मुखमंडलाचे चित्रकाम पूर्ण करतात.

५ उ. ओणविल्लू बनवणे, हे एक कठोर व्रत असणे आणि ही सेवा देवच करवून घेत असणे

श्री. आर्. बिनकुमार, त्यांचे भाऊ आणि कुटुंबातील अन्य सदस्य ओणविल्लू बनवण्याची सेवा करतांना व्रतस्थ राहून परंपरागत नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. ते सर्व सेवा त्यांच्या घराजवळील मंदिरात बसून करतात. या सेवेते संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असतो. ओणविल्लू बनवण्याच्या सेवेत त्रुटी राहिल्यास देव विविध माध्यमांतून त्यांची जाणीव करून देतो, तसेच ‘पुढे काय करायचे ?’ याविषयीही संकेत मिळतात. अशा अनेक अनुभूती या कुटुंबाला आल्या आहेत. त्यांपैकी काही अनुभूती पुढे दिल्या आहेत.

५ उ १. व्रताचरण भंग पावल्याची जाणीव देवाने काळ्या नागाच्या माध्यमातून करून देणे

श्री. बिनकुमार यांना त्यांच्या वडिलांनी ओणविल्लू बनवण्याची सेवा नुकतीच शिकवली होती. ती सेवा करत असतांना एक दिवस एका विवाहसोहळ्यात त्यांनी अनावधानाने मांसाहारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी जेव्हा ते चित्रकाम करत होते, तेव्हा कौलांवरून काळ्या नागाचे पिल्लू त्यांच्या हातावर पडले आणि त्याने त्यांच्या हातातील ओणविल्लूला विळखा घालून फणा काढला. श्री. बिनकुमार यांना त्यांच्या निष्काळजीपणामुळे व्रतभंग झाल्याची जाणीव झाली. त्यांनी मनोमन श्री पद्मनाभस्वामींची क्षमा मागताच ते नागाचे पिल्लू ओणविल्लूवरून खाली उतरून निघून गेले.

५ उ २. सर्व भाविकांना परवडेल असा छोट्या आकाराचा ओणविल्लू बनवण्याचा संकेत मिळणे

एकदा श्री. बिनकुमार नित्याप्रमाणे श्री पद्मनाभस्वामींचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर येत होते. त्या वेळी ते ‘ओणविल्लू सर्व थरांतील भाविकांपर्यंत कसे पोचतील ?’, या चिंतनात होते. तेव्हा चालतांना एका साधूचा त्यांना धक्का लागला. त्यांनी थांबून साधूची क्षमा मागितली. तो साधू त्यांना ‘छातीएवढा ओणविल्लू बनवा’, असे म्हणून निघून गेला. नंतर तो साधू त्यांना कधीच दिसला नाही; पण साधूने सुचवल्यानुसार त्यांनी साधारण ३० सें.मी. लांबीचा ओणविल्लू बनवणे चालू केले. त्याची किंमतही नेहमीच्या ओणविल्लूपेक्षा पुष्कळ अल्प होती. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यापूर्वी ते बनवत असलेला नेहमीचा ओणविल्लू एक ते सव्वा मीटर लांब आणि १० ते १५ सें.मी. रुंद होता. त्याची किंमत २,५०० रुपये किंवा त्याहून थोडी अधिक होती. सर्वच भाविकांना तो परवडत नसे.

५ उ ३. श्री. बिनकुमार यांच्याकडील सेवा अन्य व्यावसायिक चित्रकारांना दिली जाणे; पण त्यांनी बनवलेल्या ओणविल्लूमधील त्रुटी भाविकांनी मंदिर व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ओणविल्लू बनवण्याची सेवा पुनश्‍च श्री. बिनकुमार यांच्या परिवाराकडे येणे

ओणविल्लू बनवण्याच्या प्रक्रियेतील व्रतस्थपणा आणि अन्य नियम यांमुळे वर्षाला ठराविक संख्येतच ओणविल्लू बनवता येतात. ओणविल्लूला भाविकांकडून असणारी मागणी पहाता ‘अधिक संख्येने ओणविल्लू बनवायला हवे’, असे मंदिराच्या व्यवस्थापकांपैकी काहींना वाटू लागले; पण परंपरेने चालत आलेल्या नियमांना मुरड घालून व्यावसायिक पद्धतीने ओणविल्लू बनवण्यास श्री. बिनकुमार यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्या परिवाराकडील ओणविल्लू बनवण्याची सेवा अन्य व्यावसायिक कलाकारांना दिली गेली. या व्यावसायिक कलाकारांनी बनवलेल्या ओणविल्लूंमध्ये अनेक त्रुटी रहात असत. या त्रुटी ओणविल्लू विकत घेणारे भाविक व्यवस्थापनाच्या लक्षात आणून देत. भाविकांच्या पुष्कळ तक्रारी येऊ लागल्यावर मंदिर व्यवस्थापनातील संबंधित अधिकार्‍यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर ओणविल्लू बनवण्याची सेवा पूर्ववत श्री. बिनकुमार यांच्या परिवाराकडे आली. अशा प्रकारे देवाने श्री. बिनकुमार यांना सेवेपासून वंचित होऊ दिले नाही.

– कु. प्रियांका विजय लोटलीकर आणि श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२.९.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात