मुलीला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

पू. (सौ.) संगीता जाधव

‘अशी आई आणि अशी मुलगी असू शकते’, हे कोणाला खरेच वाटणार नाही; पण या आईने आणि मुलीने हे सिद्ध करून दाखवले आहे. हे लेखात लिहिलेल्या अनेक उदाहरणांतून लक्षात येईल. ‘मातृदेवो भव ।’ हे शब्द वापरता येतील, अशा आहेत सौ. संगीता जाधव ! ‘आदर्श आई’ची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अगदी लहानपणापासून आईने कसे घडवले आणि स्वतः कशी शिकली, याचे वैष्णवी इतके सुंदर वर्णन आतापर्यंत कुणीच केलेले नाही. तिच्यावर साधनेचे योग्य संस्कार करणारे आई-वडील तिला भेटले, ही तिची पूर्वजन्मीची पुण्याई आहे.

यामुळेच ‘लहानपणापासून मुलांना (कु. वैष्णवी आणि श्री. प्रतीक यांना) पूर्णवेळ साधनेला लावणारे आणि फार अल्प वेळ एकत्र येत असूनही दुरावा नसणारे अन् एकमेकांच्यात न अडकलेले हे एक आदर्श कुटुंबही आहे.

आई संत लवकर कशी बनू शकली आणि मुलगीही साधनेत लवकरच पुढे कशी जाणार आहे, याची कल्पना या लेखावरून येईल. ‘त्यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

 

आदर्श आई !

१. ‘लहानपणापासून मुलीवर साधनेचे संस्कार कसे करावेत ?’, याचा आदर्श घालून देणारी आदर्श आई !

२. मनाच्या मोठ्या संघर्षाच्या स्थितीतही मुलीला स्वतःच मार्ग काढायला शिकवणारी आणि आयुष्यातील खर्‍या अर्थाने प्रथम गुरु असणारी आई !

३. ‘पूर्णवेळ साधक म्हणजे काय ?’ याचे मुलीला चिंतन करायला लावून मनात साधनेची तीव्र तळमळ निर्माण करणारी जगावेगळी आई !

४. करत असलेली प्रत्येक कृती योग्य कि अयोग्य ते देवाला विचारायला सांगून प्रसंगा-प्रसंगातून मुलीला देवाशी जोडणारी आणि त्यातून स्वावलंबनातील आनंद मिळवून देणारी आई !

५. ‘देवच सांभाळणार आहे’, या श्रद्धेच्या बळावर सर्वांमध्ये असूनही एकांतात भगवंतासमवेत असणारी आई !

६. परात्पर गुरुदेवांप्रती असलेल्या दृढ श्रद्धेमुळे अत्यंत कठीण प्रसंगांतही अगदी सहजतेने स्थिर रहाणारी आई !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. वैष्णवी जाधव

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी कु. वैष्णवी जाधव आहे आता २१ वर्षांची ! म्हणजे लहानपणीचा अल्लडपणा संपून बाहेरचे जग निरखू शकणारी, थोडा फार स्वतः त्यावर विचार करू शकणारी ! बाहेरच्या जगातील या वयातील मुलांचे वागणे-बोलणे, आचार-विचार पहाता गुरुकृपेच्या छत्रछायेखालील मुले विचाराने कशी प्रगल्भ होतात, हे तिने लिहिलेल्या या लेखावरून लक्षात येते. ‘लहानग्या वैष्णवीवर लहानपणापासून पू. (सौ.) जाधवकाकूंनी कसे संस्कार केले ? तिच्या नकळत तिला साधनेची गोडी कशी लावली ? आता युवास्थितीत असणार्‍या वैष्णवीला मायेची झळ लागू नये; म्हणून कसे मार्गदर्शन केले ? तिच्या मनाचा संघर्ष होत असतांना ‘त्यावर विचार कसा करायचा ?’ हे शिकवून साधनेतही मुलीने स्वावलंबी रहावे, यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले ?’ असे हे अनुकरणीय भावबंध कु. वैष्णवीने अगदी हळूवारपणे उलगडून दाखवले आहेत !  मुलांवर असे संस्कार करणारे पालक घडवणार्‍या आमच्या गुरुमाऊलीच्या चरणी कोटी कोटी नमन ! पुढची पिढी अशी घडली, तर गुरुदेवांचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय सहज साध्य होईल.

 

१. लहान वयातच मुलीवर घरातील प्रत्येक कृती
चांगली, नीटनेटकी आणि योग्य प्रकारे करण्याचा संस्कार करणे

‘लहानपणापासून माझा आणि आई-बाबांचा सहवास अल्पच होता. मी वयाच्या ५ व्या – ६ व्या वर्षापर्यंतच घरी राहिले. त्यानंतर शिक्षणासाठी पुण्याला एक वर्ष आणि नंतर मिरज आश्रमात ४ वर्षे राहिले. माझी आणि आई-बाबांची भेट वर्षातून २ वेळा १० – १५ दिवसांसाठीच व्हायची, अन्यथा केवळ भ्रमणभाषवरून संभाषण ! एवढा अल्प सहवास असूनही आई-बाबांनी माझ्यावर जे संस्कार केले, त्यामुळे मी साधनेत आले आणि आताही साधना करू शकत आहे. आईने मला लहानपणापासूनच ‘चादर व्यवस्थित कशी घालायची ? अक्षर कसे व्यवस्थित काढायचे ? दारासमोरील परिसर स्वच्छ कसा ठेवायचा ?’ अशा सगळ्या लहान-मोठ्या गोष्टी कटाक्षाने शिकवल्या. आई प्रसारात जात असली, तरी जेवढा वेळ आम्ही समवेत असायचो, तेवढ्या वेळात तिने माझ्यावर अनेक संस्कार केले. भांडी घासतांना त्यामध्ये काचेचे पेले अथवा कप इत्यादी असतील, तर ते सर्वप्रथम घासायला हवेत, म्हणजे ते फुटणार नाहीत इत्यादी बारकावेही ती मला भ्रमणभाषवर साधकांशी बोलता बोलता सांगायची. तिचे एकाच वेळी साधकांकडे आणि माझ्याकडे लक्ष असायचे. आईने तिच्या साड्याही एवढ्या चांगल्या प्रकारे ठेवल्या आणि वापरल्या आहेत की, अजूनही तिच्या २० – २५ वर्षांपूर्वीच्या साड्या चांगल्या आहेत. घरामध्ये कुठेही थोडीही अस्वच्छता असेल, तर आईला ते आवडत नाही. ती स्वत:च्या स्थितीचा विचार न करता सगळे आवरून आणि स्वच्छ करून ठेवते. साधनेत आल्यानंतर घरातील प्रत्येक सेवेला ती भावाचे आणि साधनेचे दृष्टीकोन जोडायला आम्हाला शिकवायची.

 

२. सर्वांवर मनापासून प्रेम करूनही सर्वांपासून अलिप्त राहू
शकणारी आणि गुरुमाऊलीविषयी न थकता बोलत रहाणारी माझी आई !

लहानपणापासून घरी आई-बाबांशी बोलायला साधकांचा मेळा जमलेला असायचा. नंतरही आई सोलापूर जिल्हा सोडून अन्यत्र प्रसाराला जायला लागली, तरी सुट्टीत आई घरी आल्यानंतर प्रतिदिन सगळ्या साधकांचा सत्संग असायचाच. सर्व साधकांना परात्पर गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्याविषयी) आणि साधनेविषयी कितीही सांगायला आई कधीच थकत नाही. तिला त्यामध्ये एवढा आनंद मिळतो की, ‘मी साधकांना किती देऊ नि किती सांगू ?’, असे तिला होत असते. ती प्रत्येकाला आवर्जून खाऊ घालते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आईशी मनमोकळेपणाने बोलू शकतात आणि तिच्याशी बोलून ते साधनेत पुढेही जातात. आता पूर्णवेळ साधना करणारेे साधक मला भेटले की, आवर्जून सांगतात, ‘तुझ्या आईमुळे आम्ही पूर्णवेळ साधक झालो.’ काहीजण मला म्हणायचे, ‘‘वैष्णवी, आम्हाला तुझा हेवा वाटतो. काकू आमच्या आई असत्या, तर…….!’’ खरे सांगायचे, तर ती माझी अल्प, साधकांचीच आई अधिक आहे; कारण तिला प्रत्येक साधकावर आईसारखेच प्रेम करतांना मी पाहिले आहे. आम्ही कधी खरेदीला गेलो, तरी आई तिच्या समवेत सेवेला असणार्‍या मुलींसाठी पर्स, कपडे, कानातले इत्यादी गोष्टी त्या सगळ्यांना आवडतील अशा घेते. आई सर्वांवर प्रेमही तितकेच करते आणि चुका झाल्या, तर सर्वांना तेवढ्याच हक्काने सांगते. आईच्या चुका सांगण्याचे वैशिष्ट्य असे आहे की, ‘ती कितीही ओरडली, तरी कोणीही दुखावले जात नाही. काही वेळा ती मला ओरडली, तर मला राग यायचा; पण साधकांना तिचा राग येत नाही ! त्यांना आईविषयी प्रेमच वाटते ! परात्पर गुरु डॉक्टर जे सांगतात, ‘अवघे सनातन एक कुटुंब आहे’, याची प्रचीती मी अनेक वेळा घेतली आहे.

आईचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की, ‘सर्वांवर एवढे प्रेम करून, सर्वांशी जवळीकता असूनही ती कुणातही अडकलेली नाही. ती प्रत्येकाकडे तत्त्वनिष्ठतेने आणि साक्षीभावाने पहाते. समोरच्याच्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आलेला असला, तरी आई त्यामुळे विचलित होत नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना सर्वकाही ठाऊक आहे. देवच सांभाळणार आहे’, या श्रद्धेच्या बळावर आई सर्वांमध्ये असूनही एकांतात भगवंतासमवेत असते.

 

३. गुरुमाऊलीच्या भक्तीरसात स्वतः न्हाऊन मुलीलाही भक्तीरसात डुंबवणे

‘आई’ म्हटले की, ‘डोळ्यांसमोर येते, ते परात्पर गुरुदेवांचे स्मरण, भाव-भक्ती !’ आम्ही जितक्या वेळा भेटलो किंवा संभाषण केले असेल, तितक्या वेळा आईने कधीच ‘तुला माझी आठवण येते का ? मला भेटणार का ?’, असे विचारले नाही. नेहमी तिचा सर्वप्रथम प्रश्‍न असतो, ‘तुला कृष्ण काय म्हणतो ? परात्पर गुरुदेवांच्या काय अनुभूती आल्या ? तुझ्याशी बोलतांना मला इकडे रामनाथीचे चैतन्य मिळत आहे.’ तिच्याशी बोलणे म्हणजे एक सत्संग असतो. लहानपणापासून आईने मला तिच्याशी मानसिक स्तरावर जोडण्यापेक्षा नेहमी देवाशीच जोडले. मी वयाच्या ८ व्या वर्षी मिरज आश्रमात गेले. तिथे मी ४ वर्षे होते. त्या कालावधीत कधी मी तिला ‘आठवण येते’; म्हणून संपर्क केला, तरी ती मला सांगायची, ‘‘वैष्णवी, मी तुला काय देणार ? अगं, तुझ्यावर पुष्कळ प्रेम करणारा भगवंत तुझ्यापाशीच आहे. परात्पर गुरुदेव साक्षात नारायण आहेत. तू साक्षात वैकुंठातच आहेस. आम्ही तिथे (आश्रमात) येण्यासाठी तळमळत असतो. मग सांग बरं ‘देवाच्या अगदी जवळ कोण आहे ?’’ तिच्या या आणि अशा बोलण्यानेच मला आपोआप गुरुदेवांशी बोलण्याची, त्यांना आत्मनिवेदन करायची सवय लागली.

 

४. लहानपणीच्या त्या निर्मळ भावविश्‍वात गुरुमाऊलीप्रतीच्या
भक्तीचे बीज रोवल्यामुळे गुरुमाऊलीप्रती कृतज्ञताभाव निर्माण होणे

मी शाळेत असतांना एके दिवशी आई मिरज आश्रमात आली होती. ती मला घेऊन बसली आणि म्हणाली, ‘‘वैष्णवी, चिरंतन आनंद हे साधनेचे आणि मनुष्य जन्माचेही ध्येय आहे. तू कितीही शिकलीस, तरी हा आनंद अन्य कोणीच तुला देऊ शकत नाही. केवळ गुरुदेवच देऊ शकतात. ‘गुरुचरणांतच सर्वकाही आहे’, हे नेहमीच लक्षात ठेव.’’ त्या वेळी मी अवघी १० वर्षांची असल्याने ‘ती काय म्हणाली’, याचा मला फारसा अर्थबोध झाला नाही; पण देवानेच तिचे ते शब्द माझ्या अंतर्मनावर कायमस्वरूपी कोरले. खरे सांगायचे, तर ‘साधनेत आल्यावरच गुरु काळजी घेतात. आपल्यावर संस्कार करतात’, असे अजिबात नाही. लहानपणापासून आई-बाबांच्या माध्यमातून भगवंताने माझ्यावर अनेक प्रकारे साधनेचे संस्कार करून मला साधनेत आणले. साधनेचा पाया परात्पर गुरुदेव माझ्या जीवनात कधीपासून निर्माण करत होते ? याचे स्मरण केले, तरी माझे मन कृतज्ञतेने भरून येते.’

 

५. मायेतील कृती असली, तरी ती साधनेच्याच
दृष्टीकोनातून पहाणे आणि अखंड गुरुस्मरणात रममाण असणे

साधनेविषयीची सतर्कता, तळमळ आणि ध्यास हे आईचे मुख्य गुण आहेत. ती घरी असो, आश्रमात असो, नातेवाइकांमध्ये असो किंवा साधकांमध्ये असो, तिच्या मनामध्ये नेहमी साधनेचेच विचार असतात. समोरची प्रत्येक गोष्ट ती साधनेशीच, म्हणजे देवाशीच जोडते. नातेवाईक मायेतल्या गोष्टी सांगत असले, तरी ‘देव कशी काळजी घेतो ? तो काय दाखवतो आहे ?’ हे सांगून ती सगळ्यांना साधनेला जोडायचा प्रयत्न करते. ती घरात किंवा कुठेही असली, तरी अखंड सेवा, नामजप, परात्पर गुरुदेवांचे स्मरण, अनुभूती आणि साधकांवर करत असलेले प्रेम, हे सोडून अन्य काही करतांना मी इतक्या वर्षांत पाहिले नाही. आम्ही कोणत्याही नातेवाइकांना भेटून घरी परतत असतांना आई विचारायची, ‘‘काय शिकलात ? स्वत:हून त्यांच्या घरी साधना म्हणून काय कृती केली ? भगवंताची आठवण किती होती ? नातेवाईक जे काही बोलले, त्यातून देवाने काय शिकवले ?’’ असे ती नेहमी विचारत असल्यामुळे आपोआपच अंतर्मुखता निर्माण होऊन नातेवाइकांकडे गेल्यावरही मजा म्हणून न जाता साधनेची जाणीव निर्माण व्हायची.

 

६. ‘पूर्णवेळ साधक म्हणजे काय ?’ याचे चिंतन करायला लावून मनात
साधनेची तीव्र तळमळ निर्माण करणारी जगावेगळी माझी भावुक आई!

मी पूर्णवेळ साधना करू लागल्यानंतर एकदा घरी कार्यक्रम होता. त्या वेळी ‘मी घरी जाणे’ एवढे आवश्यक नव्हते; परंतु मी घरी जाण्यासाठी आईकडे पुष्कळ हट्ट केला. आई मला समजावत होती, तरीही मी शेवटी रडत रडत चिडून आईला म्हटले, ‘‘तू अशीच करतेस. तुला मला समजूनच घ्यायचे नाही.’’ आईने तेवढ्याच स्थिरतेने मला सांगितले, ‘‘वैष्णवी, तुला वाईट वाटेल; पण लक्षात घे, तुझ्या साधनेचा हा गेलेला वेळ पुन्हा येणार नाही. मला तुला ‘घरी ये’, म्हणायला काहीच अडचण नाही; पण ‘यामुळे काय हानी होत आहे ?’ ते माझ्याशिवाय तुला कोणीच सांगणार नाही. तुला क्षणासाठी वाईट वाटेल; पण ‘यामुळे किती साधना खर्च होईल ?’ याचा तू विचार केला आहेस का ? ‘पूर्णवेळ साधक’ म्हणजे काय ? याचे चिंतन कधी केले आहेस का ? कार्यक्रम आज होईल आणि काही घंट्यात संपेल; पण त्यातून तू काय मिळवणार ? ‘साधनेसाठी संपूर्ण आयुष्य आहे’, असे नाही. जेवढी तळमळ असेल, तेवढ्या वेगात देव धावून येतो. तळमळ नसेल, तर साधनेतील दिवस वर्षानुवर्षे असेच जातील. देवाकडे सारखा धावा करायला पाहिजे. तू ठरवलेल्या ध्येयाचा तूच विचार कर आणि ठरव.’’ असे सांगून तिने मलाच निर्णय घेण्यास सांगितले. त्या वेळी वाटले, ‘अशी आई कोठे मिळेल, जी आपल्या मुलांच्या केवळ साधनेचा विचार करत असेल आणि त्यासाठी ती कितीही वाईटपणा घ्यायला सिद्ध आहे !’

 

७. परात्पर गुरुदेवांप्रती असलेल्या दृढ श्रद्धेमुळे
अत्यंत कठीण प्रसंगांतही अगदी सहजतेने स्थिर रहाणे

७ अ. मुलाच्या मेंदूला मार लागला, तरी गुरुदेवांवरील अढळ श्रद्धेच्या बळावर स्थिर रहाणे

पूर्वी आईचा स्वभाव फार काळजी करणारा होता. बाबांना घरी यायला उशीर झाला की, तिचा रक्तदाब वाढायचा; परंतु ‘साधनेत आल्यानंतर देव कसा पालट घडवतो नि स्थिर करतो’, याचे फार जवळचे उदाहरण म्हणजे आई आहे. एकदा प्रतीकदादाचा अपघात झाला होता. त्याच्या मेंदूला मार लागला होता. त्या वेळी मी मिरजेला शिकत होते आणि आई प्रसारात सेवेला होती. दादाचा अपघात झाल्याचे कळल्यावरही ती स्थिर होती आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर काळजी घेतील’, अशी तिची दृढ श्रद्धा होती.

७ आ. आईच्या मोठ्या बहिणीचा मृत्यू झाल्यावरही सकारात्मक राहून
देवाला अनुभवणे आणि स्वतः भावाच्या स्थितीत राहून इतरांनाही भावाच्या स्थितीत नेणे

आईच्या सख्ख्या मोठ्या बहिणीचा मृत्यू झाल्यावरही आई पुष्कळ स्थिरतेने प्रसंगाला सामोरी गेली. ‘आईला मावशीची आठवण आली, तरी ती भावनिक स्तरावर न जाता किंवा आठवण न काढता परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करणे, आत्मनिवेदन करणे’, असे करत होती. त्या वेळी मावशीकडे गेल्यावरही तिने त्या घरचे वातावरणच पालटून टाकले. अखंड नामजप लावून ठेवला. सर्व नातेवाईकांना ती आध्यात्मिक स्तरावर धीर देत होती. घरातल्या त्या सर्वांना ‘मावशीचा मृत्यू झाल्यानंतरही देवाने कशाप्रकारे तिला गती दिली आहे ? योग्य प्रकारे तिचे अंतिम संस्कार देवानेच कसे करवून घेतले ? पदोपदी देव त्याची अनुभूतीही देत आहे’, याची ती वेळोवेळी सर्वांना जाणीव करून देत होती. त्यामुळे ते १३ दिवस नातेवाईकांना सत्संगच मिळाला आणि त्यांची श्रद्धाही वाढल्याचे जाणवले. मावशीच्या मृत्यूनंतरही १३ दिवस आई ज्या कोणाशी बोलेल, त्यांच्याशी मावशीच्या आठवणींविषयी, भूतकाळातल्या प्रसंगांविषयी न बोलता केवळ देवाने किती आणि कशा अनुभूती दिल्या ? बहीण मायेत असली, तरी ‘देवाने तिची कशी काळजी घेतली ?’ हेच सर्वांना सांगायची. तिला अखंड कृतज्ञताच वाटत होती. आईचे हे वैशिष्ट्य आहे की, ‘ती स्वत: मायेत न अडकता भावाच्या स्तरावर रहाते आणि इतरांनाही भावाच्या स्थितीत घेऊन जाते.’

 

८. घरातील कोणत्याही प्रसंगात किंवा अडचणीत अडकू न देणे

मी आश्रमात पूर्णवेळ सेवा करत असल्याने आई मला कधीच घरच्या गोष्टी, अडचणी अथवा प्रसंग याविषयी काहीच सांगत नाही. कधी मला कळलेच, तरी ती मला हेच सांगते, ‘‘वैष्णवी हे मायेतील विषय न संपणारे आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष न देता तू तुझ्या साधनेकडे बघ.’’ कुटुंबातील विषय असले, तरी ती सांगते, ‘‘प्रत्येक जण ज्याचे त्याचे प्रारब्ध भोगून संपवतो आहे. मग काळजी कशाला करायची ? आपण देवाकडेच पहायला हवे.’’

 

९. करत असलेली प्रत्येक कृती योग्य
कि अयोग्य ते देवाला विचारायला सांगून प्रसंगा-प्रसंगातून देवाशी
जोडणारी आणि त्यातून स्वावलंबनातील आनंद मिळवून देणारी माझी आई !

खरे सांगायचे, तर मला हव्या त्या वस्तू किंवा मायेतील कोणतीही गोष्ट द्यायला आई-बाबांनी कधीच ‘नाही’ म्हटले नाही; पण ‘प्रत्येक गोष्टीतून मिळालेल्या सुखापेक्षा त्यागातला नि साधनेतला आनंद मोठा आहे’, हे त्यांनी मला वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यांनी कधी ‘मी साधना करते; म्हणून तू असेच रहायला हवे’, अशी सक्ती केली नाही; पण ‘तुझ्या अंतर्मनातल्या देवाचा आवाज तुला ‘काय योग्य आहे, हे सांगतो’, असे सांगून ‘देवाला काय आवडेल ?’ याचे मलाच चिंतन करायला लावले आहे. आई-बाबांनी आपल्यावर कोणती सक्ती केली, तर आपण ते अजिबात स्वीकारत नाही किंवा ऐकली, तरी ते मनापासून असत नाही; पण आपल्या आतील भगवंत ‘हे योग्य आहे’, असे सांगतो आहे, तेव्हा आपण ते पूर्ण आनंदाने स्वीकारून त्यानुसार कृती करतो. आई मला नेहमी असे करायला लावते. ती मला देवाला विचारायला लावते आणि मग ‘उत्तर बरोबर आहे का ? देवाने सांगितलेले कसे योग्य आहे ?’ हे ती पटवून देत असल्यामुळे मनाला समाधान तर मिळतेच; पण ‘देवाने सांगितलेले उत्तर आपल्याला कळले’ याचा आनंद होतो, तो वेगळाच !

 

१०. पूर्णवेळ साधनारत असूनही गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये पार पाडणे

आई मायेपासून कितीही विरक्त असली आणि ती प्रसारात सतत सेवारत असली, तरी आजी-आजोबांना एक-दिवसा-आड संपर्क करून त्यांना आधार देणे, नातेवाइकांच्या संपर्कात रहाणे, गृहस्थजीवनात जी काही कर्तव्ये करणे अपेक्षित आहेत, ते ती सर्व करते. सुट्टीत काही दिवसांसाठी घरी एकत्र आलो की, बाबांना जे आवडते ते किंवा आम्हा सर्वांना जे आवडते, ते करून खाऊ घालणे, आम्हा सर्वांना काय हवे-नको ते पहाणे, हे सगळे ती करते. लहानपणापासून आम्ही फार अल्प वेळ एकत्र असलो, तरी आमच्यात दुरावाही नाही आणि आम्ही एकमेकांच्यात अडकलेलोही नाही.

 

११. मनाच्या मोठ्या संघर्षाच्या स्थितीतही स्वतःच मार्ग काढायला
शिकवणारी आणि आयुष्यातील खर्‍या अर्थाने प्रथम गुरु असणारी माझी आई !

‘आई’ म्हटले की, स्वाभाविकपणे भावनिक, काळजी करणारी आई डोळ्यांसमोर दिसते; पण माझ्या आयुष्यात आतापर्यंत आई एका मार्गदर्शकाच्या रूपात, गुरुरूपातच राहिली आहे. कधी मी संघर्षात असले किंवा माझ्या मनाची स्थिती चांगली नसेल, तेव्हाही तिने कधी तिच्या आधाराच्या कुबड्या घ्यायला मला शिकवले नाही. काहीही प्रसंग झाला किंवा संघर्ष झाला की, ‘आईला संपर्क करायला हवा’, असे तिने शिकवले नाही. ‘स्वतःच्या पायावर उभी रहा. संघर्षातून मार्ग काढायला शिक. मनाचा पुष्कळ संघर्ष होत असेल, तेव्हा ‘घरी जाणे’ हा पर्याय नाही. ती पळवाट आहे आणि पळवाट काढणारा कधीच जिंकू शकत नाही’, असेच ती नेहमी शिकवत आली आहे. मी इतर मुलांच्या आईंना पहाते, तेव्हा लक्षात येते, ‘त्यांनी मुलांना लढायला, संघर्ष करायला, संघर्षावर मात करायला न शिकवल्यामुळे त्यांच्या प्रगतीचा मार्ग खुंटून गेला आहे. आई-बाबांनी मला ‘पदोपदी संघर्ष झाला, तरी ध्येयावरून मागे हटायचे नाही’, हे शिकवले आहे आणि हीच देवाने माझ्यावर सर्वांत मोठी कृपा केली आहे.

 

१२. सतत प्रत्येक प्रसंग सकारात्मकतेने घेतल्यामुळे कृतज्ञताभाव वाढणे

एकदा मी आईला विचारले, ‘‘आई तुझ्या मनाचा कधी संघर्ष होत नाही का ?’’ तेव्हा आईने उत्तर दिले, ‘‘संघर्षाचे प्रसंग आले, तेव्हा देवाने त्यातही भावाची स्थिती निर्माण करून माझी कृतज्ञताच वाढवली आहे.’’ कोणताही अप्रिय प्रसंग घडला, तरी ती त्याविषयी कधी नकारात्मक विचार करत नाही. ‘देवाने कशी कृपा केली आहे ?’, असाच विचार असल्यामुळे साहजिकच तिच्या मनात देवाविषयी कृतज्ञताच निर्माण होते.

 

१३. गुरुमाऊलीविषयी दृढ श्रद्धा निर्माण करणारे
आईचे सत्यदर्शी बोल ऐकून स्वतःला भाग्यवान समजणे

एकदा आई मला म्हणाली, ‘‘वैष्णवी, गुरूंनी आपल्याला तळहातावर घेतले आहे. असे अनेक जीव आहेत, जे त्यांचे प्रारब्ध रडत-खडत, अगदी पार मेटाकुटीला येऊन, रक्तबंबाळ होऊन भोगून संपवतात. संघर्ष करण्यात आयुष्यातला मोठा काळ घालवतात आणि भोग भोगले, तरी त्याविषयीचे दु:ख काही त्यांच्या मनातून जात नाही; पण ज्यांच्यावर गुरुकृपा असते, त्यांना गुरूंनी त्यांच्या तळहातावर घेतलेले असते. तेही प्रारब्ध भोगतात; पण ते गुरूंच्या तळहातावर बसलेले असतात आणि गुरु वरून केवळ दाखवतात, ‘हे बघ तुझे असे प्रारब्ध आहे.’ तुझ्या जीवनात कोणताही प्रसंग घडला अथवा संघर्ष झाला, तरी तू गुरूंच्या तळहातावर आहेस. प्रारब्धाची ती केवळ झलक आहे. ‘गुरूंनी तुला कशा परिस्थितीतून वाचवले आहे, याची तुला कल्पना नाही’, हे नेहमी लक्षात ठेव.’’ आईचे हे बोल ऐकल्यावर माझ्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी येऊन गेल्या, ‘खरेच आपण संघर्ष म्हणतो, तो खरेच संघर्ष आहे का ? आपल्यापेक्षा कैक पटींनी भोगलेले जीव आहेत. मी सर्वांत भाग्यवान आहे, ‘मला असे गुरु लाभले !’ मग ‘कोणत्या विचारांमध्ये आपण अडकत आहोत’, याची आपोआपच जाणीव मनात निर्माण होते.

 

१४. गुरुमाऊलीने आई-बाबांचे केलेले कौतुक

परात्पर गुरुदेव मला अनेक वेळा म्हणाले आहेत, ‘‘वैष्णवी, तू फार भाग्यवान आहेस; कारण तुला असे आई-बाबा मिळाले. इतरांचे आई-वडील त्यांना मायेत खेचत असतात. तुझे आई-बाबा मात्र तुझ्या आणि मायेमध्ये उभे असतात. त्यामुळेच तू साधनेत आहेस. तुझ्यावर साधनेचे संस्कार आहेत.’’

 

१५. असे आई-बाबा मिळाल्यामुळे गुरुमाऊलीविषयी
दाटून आलेली कृतज्ञता आणि गुरुचरणी केलेली भावपूर्ण प्रार्थना

‘गुरुदेवा, मी आईविषयी लेख लिहित होते, तरी मनामध्ये आईपेक्षा तुमचेच स्मरण अधिक होत होते. त्याचे कारण ‘माझी आई ही माझी आई नाहीच, ती सगळ्या साधकांची आई आहे आणि तिच्यात ही सारी गुणवैशिष्ट्ये निर्माण करणारे तुम्हीच आहात ! मला अशा संतांच्या पोटी जन्माला घालणारा देव, तूच आहेस. आई-बाबांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करीनच; पण भगवंता, तुझ्या चरणी मी कशी कृतज्ञता व्यक्त करू ? किती जन्म मी या मायेत अडकले असेन ठाऊक नाही; पण या जन्मी प्रत्यक्ष गुरुरूपात येऊन मला तुझ्या सगुण रूपाच्या पोटीच जन्माला घातले आहेस ! प्रत्येक पावलाला या भवसागरातही माझ्या जीवनाची नाव हे प्रभु, तूच वल्हवत आहेस. हे गुरुदेवा, माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे मी तुमची प्रीती, निरपेक्षता अनुभवायला न्यून पडते. तुम्ही मला दिलेल्या या सर्वांचा माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी लाभ करून घेण्यास मी न्यून पडते. हे गुरुमाऊली, तुझी कृपा माझ्या लक्षात येऊ दे. अहंचा कोष तोडून तुझ्या कृपेच्या जलाने माझा रोम रोम भगवंताच्या नामाने व्यापला जाऊ दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

– कु. वैष्णवी विष्णुपंत जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment