संतांप्रती भाव असलेले आणि संतत्वाचे मोल खर्‍या अर्थाने जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले । उद्धरावया आले दीन जगा ॥’ – संत नामदेव

‘दीनांच्या उद्धारासाठी साक्षात् ब्रह्मस्वरूप असलेले संत जगी अवतरले आहेत’, असे संत नामदेव या ओवीतून सांगतात. संत हे ईश्‍वराचे सगुण रूप असतात. सध्याच्या कलियुगात संतच चैतन्याचा स्रोत आहेत. मायेत गुरफटलेल्या आणि ईश्‍वरप्राप्तीच्या मूळ ध्येयापासून भरकटलेल्या जिवाला पुन्हा ईश्‍वराच्या दिशेने मार्गस्थ करणारे संतच असतात. आता अशा खर्‍या संतांचे दर्शन आणि मार्गदर्शन दुर्मिळ झाले आहे, तरीही जे खरे संत आहेत, त्यांच्याप्रती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा भाव कसा असतो, याची काही प्रातिनिधिक उदाहरणे या लेखातून आपण पहाणार आहोत. शब्दशः सांगायचे झाले, तर संतांचे मोल जेवढे परात्पर गुरुदेवांनी जाणले आहे, तेवढे आतापर्यंत खचितच कुणाला कळले असेल. परात्पर गुरूंचा शब्दातीत भाव शब्दबद्ध करण्यास मर्यादा आहेत. ‘संतांप्रती स्वतःचा भाव वाढवून त्यांचे मार्गदर्शन कृतीत आणणे’, हेच खरे परात्पर गुरुदेवांना जाणणे आहे !

 

१. साधकांच्या प्रगतीने आनंद होणे

परात्पर गुरुदेवांसाठी साधकच सर्वस्व आहेत. ‘मला सर्व फुलांत ‘साधक फूल’ सर्वांत प्रिय आहे’, असे त्यांनी एकदा म्हटले होते. खरेच, ‘साधकांसाठी किती करू नी काय काय करू’, असे त्यांना वाटत असते.

आताच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये वर्ष २०१३ मध्ये संतपदी विराजमान झाल्या. देवद येथील सनातन आश्रमात होत असलेला सोहळा परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी येथील आश्रमात संगणकीय प्रणालीद्वारे पहात होते. त्याच वेळी त्यांची अल्पाहाराची वेळ झाली; म्हणून स्वयंपाकघरातील साधिका त्यांच्यासाठी अल्पाहार घेऊन आली असता परात्पर गुरु डॉ. म्हणाले, ‘‘हे सर्व पाहून पोट भरत नाही का ? वेगळा अल्पाहार कशाला हवा ?’’ परात्पर गुरुदेवांचे हे बोल प्रत्येक साधकासाठी प्रेरणादायी आहेत. साधकांची आध्यात्मिक उन्नती झाल्यावर त्या साधकाला स्वतःलाही जेवढा आनंद होत नसेल, तेवढा आनंद गुरुदेवांना होतो. ‘शिष्याची प्रगती झाल्याचा गुरूंनाच सर्वाधिक आनंद होतो’, असे गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे एक वचन आहे.साधकांची अध्यात्मातील प्रगती पाहून त्यांची भावजागृतीही होते.

 

२. संतांच्या भेटीची आतुरतेने वाट पहाणे

गेली काही वर्षे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांत धर्मप्रसाराची सेवा करणारे संत रामनाथी येथील आश्रमात येतात. परात्पर गुरु डॉक्टर सर्व संतांची आतुरतेने वाट पहात असतात. सद्गुरु आणि संत आश्रमात आल्यानंतर त्यांना आश्रमातील विविध आध्यात्मिक पालट दाखवणे, स्वतःच्या निवासकक्षातील आध्यात्मिक पालट दाखवणे, संतांच्या देहात झालेले वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक पालट टिपून पुढील पिढ्यांसाठी त्यांचे चित्रीकरण करणे आदींचे नियोजन करण्यास ते सांगतात.

 

३. संतांनी वापरलेल्या चैतन्यमय वस्तू संग्रहित करणे

संतांचा अमूल्य सहवास लाभलेल्या वस्तू चैतन्याने भारित झालेल्या असतात. सध्याच्या रज-तम वातावरणाच्या काळात या वस्तू चैतन्याचा ठेवाच आहेत. साधकांना हे चैतन्य निरंतर लाभावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर संतांनी वापरलेल्या चैतन्यमय वस्तू जतन करतात. त्याची काही उदाहरणे-

३ अ. ‘सनातनचे पहिले परात्पर गुरु’ असलेले परात्पर गुरु कालिदास देशपांडे हे एकदा परात्पर गुरु डॉक्टरांशी संवाद साधत असतांना त्यांना भावाश्रू आले. ते भावाश्रूही समष्टीसाठी अमूल्य असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी ते भावाश्रूही जतन करण्यास सांगितले होते.

३ आ. सनातनच्या सद्गुरु प.पू. (श्रीमती) शकुंतला पेठेआजी, परात्पर गुरु देशपांडेकाका आदी संतांच्या देहत्यागानंतर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी त्यांच्या वापरातील वस्तू चांगल्या प्रकारे जतन केल्या आहेत.

३ इ. ११.१२.२००२ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर वाहिलेली शेवंतीची फुले सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी प.पू. फडके आजींना दिली होती. आजींनी ती फुले जतन केली. त्यांच्या देहत्यागानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनीही ती फुले जतन करण्यास सांगितली. त्या फुलांना आता १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातील एका फुलाच्या पाकळ्या काही प्रमाणात निघाल्या आहेत; परंतु अजूनही त्या फुलांना सूक्ष्म गंध येतो.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर वर्ष २००२ मध्ये वाहिलेली शेवंतीची फुले अद्यापही ताजी राहिली आहेत. (वर्ष २०१६)

३ ई. सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या वापरातील ‘पाऊच’ला दैवी सुगंध येत होता. तो ‘पाऊच’, तसेच त्यांनी महाविद्यालयीन काळात कलेचे शिक्षण घेत असतांना काढलेली चित्रेही परात्पर गुरु डॉक्टरांनी अमूल्य ठेवा म्हणून जतन केली आहेत.

अनेक संतांच्या आश्रमात त्यांच्या वापरातील वस्तू शिष्यांनी संग्रहित केलेल्या दिसून येतात. शिष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करून त्यावर आध्यात्मिक संशोधन करणारे परात्पर गुरु डॉक्टर एकमेव आहेत.

 

४. संतांच्या देहातील वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक पालटांचा अभ्यास करणे

सद्गुरु (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या गळ्याला ज्योतीसारखा आकार निर्माण झाला होता.

व्यक्तीच्या साधनेचा तिचा देह, तिच्या वापरातील वस्तू आणि भोवतालचे वातावरण यांवर परिणाम होत असतो. अनेकदा साधना वाढल्यानंतर देहावर चकाकी येणे, केस आणि त्वचा मऊ होणे, अशा प्रकारचे पालट दिसून येतात.

देहातील तत्त्वाप्रमाणे भाव-भक्तीची निळसर, चैतन्याची पिवळी, प्रीतीची गुलाबी छटा काही भागांवर दिसून येते. साधकाचे कपडे, वापरातील अन्य वस्तू यांवर त्याचे दृश्य परिणाम होत असतात. हे दृश्य परिणाम ही संतत्वाची एक प्रचीती असते. सनातनच्या संतांच्या साध्या आणि सहज राहणीमुळे सामान्य व्यक्ती त्यांना संत म्हणून ओळखू शकत नाही. त्यांचा सहवास लाभलेल्या साधकांच्या अनुभूतींतून साधकांना संतांचे श्रेष्ठत्व ध्यानी येते, तर देहातील शुभसूचक पालटांतून समाजाला संतांचे संतत्व उमगते. परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनच्या संतांच्या देहात झालेल्या पालटांचे चित्रीकरण केले आहे. पुढील पिढ्यांसाठी सनातनचा हा अनमोल ठेवा आहे. संतांच्या जन्मपत्रिकांचा अभ्यास करून त्याद्वारे अनोखे संशोधनकार्य परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०१९)

 

५. संतांचा साधनाप्रवास जाणून घेऊन तो समाजासाठी उपलब्ध करून देणे

पू. जयराम जोशी यांच्या साधनाप्रवासाविषयी जाणून घेतांना कु. प्रियांका लोटलीकर (वर्ष २०१४)

परात्पर गुरुदेवांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनामार्गाचे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हे प्रमुख तत्त्व आहे. त्यानुसार प्रत्येक साधकाच्या साधनेच्या प्रयत्नांत एक प्रकारचे नाविन्य असते. ते सर्वांना कळावे आणि अन्य साधकांनाही तसे प्रयत्न करता यावेत, याकरता परात्पर गुरु डॉक्टर साधनेचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न करणारे साधक अन् संत यांच्या साधनाप्रवासाविषयी नियतकालिकांतून लेख प्रकाशित करतात. मुलाखतीचे चित्रीकरण करून तो साधनाप्रवास पुढील अनेक पिढ्यांसाठी उपलब्ध करून देतात.

 

संत झालेल्या शिष्यांचे चरित्रग्रंथ संकलित
करणारे जगातील एकमेव गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सर्वसाधारणतः शिष्य गुरूंचे चरित्र लिहितात. गुरूंनी शिष्यांचे चरित्र लिहिलेले आढळत नाही. सनातनचे अनेक साधक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून संत बनले आहेत. अशा संतांचे, उदा. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे जीवनचरित्र (संतांचा साधनाप्रवास, कार्य, शिकवण इत्यादी) परात्पर गुरु डॉक्टर स्वतः संकलित करत आहेत. ते पूर्ण झाल्यावर सनातनच्या इतर संतांचेही जीवनचरित्र ते लिहिणार आहेत. त्याचप्रमाणे जन्मतःच संत असलेले २ वर्षांचे पू. भार्गवराम यांचे चरित्रग्रंथही प्रकाशित झाले आहेत.

एखादा साधक संत बनल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना जेवढा आनंद होतो, तेवढाच आनंद त्यांना संतांचे चरित्र संकलित करतांनाही होतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी शिष्यांना गुरुत्व (संतत्व) देऊन स्वतःकडे मात्र शिष्यत्व (संतांचे चरित्र सेवाभावाने संकलित करणे) ठेवण्याचा नवा आदर्श केवळ सनातनच्याच नव्हे, तर जगभरातील संतांपुढे ठेवला आहे !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (२६.३.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात