योगा म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अनुभव ! – श्रीमती वासंती लावंघरे, सनातन संस्था

व्यासपिठावर उपस्थित (डावीकडून) नगरसेविका सौ. सिद्धीताई पवार, श्री. काशिनाथ केसकर आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्रीमती वासंती लावंघरे

सातारा – योगाकडे केवळ एक व्यायामाचा प्रकार म्हणून पाहिले जाते; मात्र प्रत्यक्ष तसे नसून योगा हा व्यायामाच्याही फार पुढचा टप्पा आहे. योगा म्हणजे प्रत्यक्ष आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आहे, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती वासंती लावंघरे यांनी काढले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील ‘स्नेहमंच’च्या वतीने योगासनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या. व्यासपिठावर प्रभागातील विद्यमान नगरसेविका सौ. सिद्धीताई पवार आणि स्नेहमंचचे कार्यवाह श्री. काशिनाथ केसकर उपस्थित होते.

श्रीमती लावंघरे पुढे म्हणाल्या की, योगाविषयी आपल्या वेदोपनिषदे आणि धर्मग्रंथ यांंमध्ये विशेष उल्लेख आढळतात. अनुमाने २ सहस्र ७०० वर्षांपूर्वी महर्षी पतंजलि यांनी योगाविषयी सहज आणि सोप्या भाषेतील सूत्रांमध्ये योगा सांगितला. पुढे अनेकांनी त्याचा प्रचार-प्रसार केला. यामध्ये विशेषत: योगमहर्षि रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, परमहंस योगानंद यांची नावे घेता येतील. अलीकडील काळात श्रीकृष्णम्माचार्य, महर्षि महेश योगी, योगगुरु अय्यंगार, योगऋषि बाबा रामदेव यांनीही योगाविषयी उल्लेखनीय कार्य केले आहे. योगाची क्रिया म्हणजे केवळ हठयोग नसून योगा शरिरापासून प्रारंभ होऊन अंतर्मनापर्यंत घेऊन जातो. योगा हा कुणा विशिष्ट जात, धर्म, पंथ, समुदाय यापुरता सीमित नाही. योग हा सर्वांचा आहे. तो आंतरिक शुद्धीचा मार्ग आहे. योगामुळे आपल्यात आणि ब्रह्मांडात नाळ जोडली जाते अन् आपल्याला आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते.

कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि सरस्वतीमातेच्या प्रतिमापूजनाने झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. काशिनाथ केसकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आराधना जाधव यांनी, तर आभारप्रदर्शन सौ. सुमित्रा यादव यांनी केले. या वेळी परिसरातील ४० योगाप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि ‘स्नेहमंच’चे संस्थापक अध्यक्ष श्री. अरविंद दामले (सर) यांनी विशेष परिश्रम घेतले.

श्रीमती वासंती लावंघरे यांंनी जिज्ञासूंना सनातन प्रभातविषयी माहिती सांगितल्यानंतर ३ जिज्ञासूंनी सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्याची इच्छा व्यक्त केली. काहींनी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ विकत घेण्याची सिद्धता दर्शवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment