शेतकर्‍यांनो, साधना म्हणून शेती करा आणि समृद्ध व्हा !

साधनेची कास धरल्यावर देव कसे साहाय्य करतो, याच्या या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती… !

प्राचीन काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता, असे म्हणतात. ‘कृषी’ हाच भारताचा आत्मा आहे. साधना करणारे शेतकरी असल्यामुळे भारताची कृषी परंपरा समृद्ध आणि विकसित होती. सध्याच्या शेतकर्‍यांच्या अनेकविध समस्यांवर साधना करणे, हाच कसा पर्याय आहे, हे या अनुभूती वाचून लक्षात येईल !

 

नामजप करीत शेतीची कामे केल्याने रोपांमध्ये आश्‍चर्यकारक वाढ

नामजप करत लावणी केलेल्या कांद्याच्या रोपांना काही दिवसांनंतर
पाणी उपलब्ध नसूनही कांद्याच्या प्रत्येक पातीला ४५० ते ५०० ग्रॅम वजनाचे ४-५ कांदे लागणे

श्री. तुकाराम लोंढे

‘जानेवारी २०१४ च्या पहिल्या आठवड्यात मी बीड जिल्ह्यातील केकतसारणी या माझ्या गावी गेलो होतो. तेव्हा पांढरा कांदा महाग असल्याने आईने मला सांगितले, ‘‘आपल्याला पुरेल इतका तरी कांदा आपल्या शेतात लाव. त्याला खतही घाल.’’,  नंतर मी नामजप करत कांद्याची रोपे वाफ्यामध्ये लावली; परंतु मी त्यांना खत घातले नाही. लागवड केल्यापासून आरंभीचे केवळ १५ दिवसच या रोपांना पाणी मिळाले आणि पुढे एक मास आमच्या शेतातील पंप बिघडल्याने रोपांना पाणी उपलब्ध झाले नाही. मार्च मासाच्या शेवटच्या सप्ताहात कांद्याच्या रोपांची पात साधारण ३ फूट इतकी उंच झाली होती, तसेच एका पातीला ४-५ कांदे लागले होते. (नेहमी कांद्याच्या एका पातीला अधिकाधिक २ कांदे लागू शकतात.) त्या कांद्यांचा आकारही पुष्कळ मोठा होता. मी त्या कांद्यांचे वजन केले असता प्रत्येक कांद्याचे वजन ४५० ते ५०० ग्रॅम होतेे.

कांद्यांचा आकार पाहून सर्वांनी आश्‍चर्याने मला त्याविषयी विचारले; पण मी काय उत्तर देणार ? तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण झाली. पूर्वी एकदा ते म्हणाले होते, ‘‘नामस्मरणाने सर्व काही होते.’’ नामाचा हा महिमा मी अनुभवला ! शेतात काम करतांना त्यांना पुष्कळ आनंद मिळतो.

– श्री. तुकाराम लोंढे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

नामजप करत मिरचीच्या रोपांची लागवड करणे, त्यानंतर पाण्याच्या
टंचाईमुळे रोपे वाळून गेल्याने बर्‍याच शेतकर्‍यांनी ती काढून टाकणे; पण देवावर
विश्‍वास ठेवून साधकाने रोपे न काढल्याने मिरचीच्या रोपांस नवीन पालवी फुटून अधिक पीक येणे

‘प्रतिवर्षीप्रमाणे मार्च मासात आम्ही मिरचीची लागवड चालू केली. मिरचीचे प्रत्येक रोप लावतांना ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप करून रोप लावणे आम्ही चालू केले. तेव्हा जवळजवळ ४ – ५ घंटे माझा नामजप चालू होता. लागवड झाल्यानंतर एक मासाने पाणी न्यून झाले; म्हणून आम्ही ‘ठिबक सिंचन’ पद्धतीने दोन दिवसाआड रोपांना पाणी देणे चालू केले. उन्हाळा पुष्कळ असल्याने पाण्याची टंचाई भासू लागली. बर्‍याच शेतकर्‍यांनी लावलेली मिरचीची रोपे वाळून गेली; म्हणून त्यांनी शेतातील भूमी नांगरून रोपे काढून टाकली. आम्ही मात्र मिरचीची रोपे न काढता देवावर विश्‍वास ठेवून शांत राहिलो. नंतर दीड मासांनी पाऊस पडायला लागल्यावर वरुणराजाला प्रार्थना केली. थोड्याच काळात मिरचीच्या रोपांना नवीन पालवी फुटून पुष्कळ पीक आले. त्या वेळी आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक मिरचीचे पीक आल्यामुळेे आम्हाला लाभ झाला. वरील अनुभवामुळे ‘भगवंताच्या नामाचे महत्त्व किती आहे’, हे दिसून आले.

– श्री. उत्तम कल्लप्पा गुरव, नंदीहळ्ळी, बेळगाव.

भाताची लागवड (पेरणी) करण्यास दोन दिवस लागणार होते. सर्वांनी नामजप
करत पेरणी केल्याने एकच दिवस लागला. – श्री. ज्ञानेश्‍वर आपाना गावडे, गवेगाळी, खानापूर, बेळगाव.

 

साधना करायला प्रारंभ केल्यावर देवाने शेतकर्‍यांना दिलेल्या अनुभूती 

१. सेवेला जाऊ लागल्यापासून शेतात अधिक पिक येणे !

‘मी साधना आणि सेवा करू लागल्यावर आमच्या शेतामध्ये ८ क्विंटल ज्वारी पिकली. शेती करणार्‍याला ४ क्विंटल ज्वारी दिली आणि देवाने मला ४ क्विंटल ज्वारी दिली. माझ्या भावाच्या तेवढ्याच शेतीत केवळ ५ क्विंटल ज्वारी पिकली. सेवेसाठी केवळ २५ ते ३० मिनिटे दिली; तर देवाने मला किती भरभरून दिले ! माझे चंचल मन एकाग्र केले. याविषयी श्रीकृष्णाच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– श्री. सुभाष पाटील, नंदीहळ्ळी, बेळगाव. (२८.५.२०१४)

२. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णच भेटले आहेत’, असे वाटून
सत्सेवा चालू करणे आणि अल्प पावसामुळे बागेला अत्यल्प पाणी मिळूनही द्राक्षाचे पीक चांगले येणे

मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मला ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णच भेटले आहेत’, असे वाटले. तसेच मी सत्सेवा चालू केली आणि परिस्थिती पूर्ण पालटत गेली. पूर्वी आमची लहान झोपडी होती; पण आता आमचा बंगला आहे. सध्या पाऊस पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे द्राक्षाच्या बागेला अत्यल्प पाणी मिळत आहे, तरीही ते पाणी बागेला पुरते आणि द्राक्षाचे पीक चांगले आल्यामुळे बागही अतिशय सुंदर दिसते. हे केवळ आणि केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच शक्य झाले आहे. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !’

– सौ. पाटील

( वरील अनुभूतीतून शेतकर्‍यांसह सर्वांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. सौ. पाटील यांनी साधना चालू केल्याने देवाने त्यांचे प्रारब्ध सुसह्य करून शेतीतील अडचणी दूर केल्या. त्यामुळे ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर कर्जमाफीसारखे वरवरचे उपाय योजण्यापेक्षा प्रत्येक शेतकर्‍याला ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायला शिकवावी’, असे सनातन संस्था सांगते. – एक संत )

१. जळगाव येथील सौ. जानकी हिरामण वाघ यांच्यातील भावामुळे त्यांना ‘भावजागृतीचे प्रयत्न करत असतांना सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज, प.पू. डॉक्टर, श्रीकृष्ण आणि सर्व संत शेतात येत असल्याचे दिसलेे.

२. नागपूर येथील सौ. आसावरी प्रसाद आर्वेन्ला यांना श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवते. ‘सगळी झाडे नामजपाच्या तालावर डोलत आहेत’, असे वाटते आणि पुष्कळ प्रसन्नता जाणवते. तिथे सतत श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवते.

३. ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले देवद येथील श्री. तुकाराम लोंढे यांच्या शेतात सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनाही पुष्कळ चैतन्य जाणवले आणि चांगले वाटले. ‘शेतातील झाडे त्यांच्याशी बोलायला लागली आहेत’, असे त्यांना जाणवले.

 

शेतीची कामे साधना म्हणून केल्याने शेतकर्‍याला असा लाभ होतो !

श्रीकृष्णाला प्रार्थना केल्याने अल्प मनुष्यबळ असतांनाही अर्ध्या दिवसात भाताची कापणी होणे

‘भात कापणीच्या वेळी एरव्ही १६ लोकांना एक दिवस लागतो. या वेळी केवळ १० लोकांनी अर्ध्या दिवसात भाताची कापणी केली. मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘तूच शेतात सेवा करत आहेस. ही सेवा तूच आमच्याकडून करवून घे.’ तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या शेताची अगोदरच कापणी केल्याचे जाणवले. आम्ही केवळ निमित्तमात्र होतो. आम्ही जेवायला बसल्यावर श्रीकृष्णाला विचारले असता त्याने मला कौरव-पांडवांच्या युद्धाची आठवण करवून दिली. त्या युद्धात श्रीकृष्णाने कौरवांना आधीच मारले होते; पण पांडवांना निमित्त केले. त्याप्रमाणेच या प्रसंगात जाणवले.’

– श्री. ज्ञानेश्‍वर आपाना गावडे, गवेगाळी, खानापूर, बेळगाव.

श्रीकृष्णाने पिकाच्या रक्षणाविषयी आश्‍वस्त करणे, पाऊस आल्यावर
भाताच्या गंजीभोवती सूक्ष्मातून सुदर्शनचक्र धरल्याने पावसाचे पाणी शेताबाहेर पडणे
आणि मळणी केल्यावर संपूर्ण भात कोरडे असल्याचे पाहून लोकांनी चमत्कार झाल्याचे सांगणे

शेतामध्ये कापलेले भात बांधून झाल्यावर थोडे भात अल्प पडले आणि अर्धी गंजी उरली. दुसर्‍या दिवशी पाऊस आला. पाऊस येण्याच्या अगोदर ५ मिनिटे (रात्री ९ वाजता) मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर दोन उदबत्त्या लावल्या आणि सांगितले, ‘भगवंता, हे तुझेच शेत आहे. सेवा असल्याचा भाव ठेवून सर्व कृती केल्या आहेत. भगवंता, पाऊस पडत आहे.’ त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, ‘भाताचे पीक माझे असून मीच त्याचे रक्षण करणार आहे. तू काळजी करू नकोस.’, असे जाणवले. ‘पाऊस आल्यावर भाताच्या गंजीभोवती श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र धरले’, असे जाणवले. पाऊस सुदर्शनचक्रावर पडत होता; मात्र पिकावर एकही थेंब पडला नाही. ४ दिवसांनी मळणी केल्यावर काही लोकांनी गंजी उघडून पाहिली, तर सर्व भात कोरडे असल्याचे लक्षात आले. सर्वांच्या अगोदर भात कापल्याने सर्वांनी मला मूर्ख ठरवले होते; पण देवाच्या कृपेने काहीच अडथळा आला नाही. मळणी झाल्यावर सर्व लोक चमत्कार झाल्याचे सांगत होते.

मळणी झाल्यावर भाताची मोजणी केली. आम्हाला प्रतिवर्षी १३ – १४ पोती भात मिळतेे; पण या वर्षी साडे एकोणीस पोती भात झाले. श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. लोकांनी ऐकल्यावर त्यांनाही आश्‍चर्य वाटले. ते आम्हाला म्हणाले, ‘सर्वांत शेवटी भात लावणी केली आणि भाताची कापणी सर्वांत अगोदर केली, तरीही भात जास्त झाले.’ कुणालाही भात जास्त होण्याविषयी विश्‍वास वाटत नव्हता.

– श्री. ज्ञानेश्‍वर आपाना गावडे, गवेगाळी, खानापूर, बेळगाव.

 

आध्यात्मिक उपायांमुळे पिकांचे संरक्षण आणि वाढ

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपायांमुळे शेत सुरक्षित राहून पीकही चांगले येणे

श्री. रामचंद्र दगडू पांगुळ

‘मी शेतकरी असल्याने परात्पर गुरु पांडे महाराज (परात्पर गुरु बाबा) मला नेहमीच बोलावून शेतीविषयी आणि देवद आश्रमाच्या परिसरातील झाडांविषयी सूत्रे सांगत. त्यांचा त्याविषयीचा अभ्यास आणि त्यांची प्रायोगिक बुद्धी यांमुळे ते मला विविध प्रयोग करण्यास सांगत. त्याप्रमाणे मी आमच्या गावी (मु.पो. वेळवंड, ता. भोर, जि. पुणे येथे) शेतात प्रयोग करत असतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी वर्ष २०१८ मध्ये आमच्या एकूण भातशेतीत पीकवृद्धीसाठी यंत्र आणि मंत्र लावले होते.

परात्पर गुरु बाबांनी शिकवल्याप्रमाणे आम्ही या पिकांवर कोणतीही कीटकनाशक फवारणी केली नाही. शेणखत आणि अगदी थोड्या प्रमाणात युरीया या खताचा वापर केला आहे. या सर्व उपायांमुळे आमच्या भातशेतातील पिकावर अद्भुत असा चांगला परिणाम झाल्याचे आमच्या लक्षात आले. आमच्या गावी असलेल्या ‘खरोबाचे शेत’ असलेल्या ठिकाणाच्या बांधाला लागून अन्य एका शेतकर्‍याचे शेत आहे. शेजारच्या शेतकर्‍याच्या भातपिकावर रोग पडला. त्यामुळे त्याने त्यावर कीटकनाशक फवारणी केली; परंतु तो रोग आटोक्यात न आल्याने त्याचे अंदाजे ८० टक्के पीक वाया गेले. बाजूलाच असलेले आमचे शेत सुरक्षित राहून पीकही चांगले आले. ‘प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदा १ मण भात अधिक येईल’, असा सर्वांचा अंदाज आहे.

‘पीकवृद्धीकर यंत्र लावल्याने आणि शेतात काम करतांना प्रार्थना अन् जयघोष केल्याने, तसेच प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी शेत पहाण्यास गेलो, त्या त्या वेळी प्रार्थना केल्यामुळेे पिकांमध्ये वाढ झाली’, हे आमच्या लक्षात आले.

– श्री. रामचंद्र दगडू पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.११.२०१८)

परात्पर गुरु पांडे महाराजांनी दिलेली विभूती शेतात
घातल्यावर कोथिंबिरीच्या आणि तुरीच्या रोपांची उंची वाढणे

परात्पर गुरु पांडे महाराजांनी दिलेली विभूती शेतात घातल्यावर पुढील पालट झाले. कोथिंबिरीचे बी पेरण्यापूर्वी मी त्यामध्ये कोणतेही खत न घालता विभूती घातली. तेव्हा कोथिंबिरीच्या रोपांची उंची ३ फूट वाढली. तुरीच्या झाडांची उंची नेहमी ३-४ फूट असते. या वेळी त्यांची उंची ८ फुटांपर्यंत वाढली होती. तुरडाळीचे पीक इतर शेतकर्‍यांना पुष्कळ अल्प मिळालेे; पण आमच्या शेतात तुरडाळीचे पीक पुष्कळ चांगले आलेे. तुरीच्या वजनाने रोपे अक्षरशः वाकली होती. हे बघून इतर शेतकरी आश्‍चर्यचकीत झाले.

– श्री. तुकाराम लोंढे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

मंत्राच्या साहाय्याने कृषी प्रगती

‘५० फूट बाय ५० फूट दक्षिणोत्तर भूखंडामध्ये टोमॅटोच्या साठ साठ रोपांचे आरोपण केले. एका भूखंडास ३०० ग्रॅम सुपरफॉस्फेट, १५० ग्रॅम अमोनियम सल्फेट, ७५ ग्रॅम सोडियम नायट्रेट आणि ३ किलो शेणखत दिले गेले. दुसर्‍या भूखंडास कुठल्याही तर्‍हेचे खत न देता केवळ अभिमंत्रित पाणी दिले गेले. साडेतीन मासानंतर दोन्ही भूखंडातील उत्पन्नांची तुलना केली. त्यात रासायनिक अन् शेणखत दिल्या गेलेल्या भूखंडामधून २२.५ किलो टोमॅटो मिळाले. दुसर्‍या भूखंडामधून ज्यास कोणत्याही तर्‍हेचे खत दिलेले नव्हते, केवळ अभिमंत्रित पाणी दिलेले होते, त्यातून ४८ किलो टोमॅटो मिळाले. याच पद्धतीने काकडी, वांगी आणि चवळी यांच्यावर प्रयोग केले गेले.

रासायनिक खत आणि अभिमंत्रित पाणी यांचा वनस्पतींवर झालेला परिणाम

इस्रायलमध्ये सर्व प्रकारचे रासायनिक खत देऊन एका एकरातून १३-१४ सहस्र किलो टोमॅटो मिळवतात. जगातील इतर देशांपेक्षा इस्रायल हा देश अधिकाधिक टोमॅटो पिकवणारा देश आहे. इतर देशांचे एकरी उत्पादन यापेक्षा पुष्कळ अल्प आहे. मंत्रांच्या अनुकूल वातावरणातील प्रयोगामुळे एका एकरात कुठल्याही प्रकारचे खत न वापरता २५-३० सहस्र किलो उत्पादन घेता येईल, असे वाटते.

– मंत्रमहर्षी, वैद्य श्री. भाऊसाहेब देशपांडे (दै. नवशक्ती, २५.१.१९७६)

कोरडवाहू शेतीत परिसरातील १२ कूपनलिकांना पाणी नसणे,
१५० फूट खोदूनही पाणी न लागणे आणि प्रार्थना केल्यावर पाणी लागणे

‘आमची कोरडवाहू भागात शेती आहे. त्या भागात पाणी अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही ‘कूपनलिका खोदायची’, असा निर्णय घेतला; पण सभोवतीच्या सर्व लोकांनी ‘इथे पाणी लागणार नाही’, असे वारंवार सांगितले; कारण या आधी सरकारी खात्याकडून त्या भागात एकूण १२ कूपनलिका खणल्या होत्या; पण एकाही कूपनलिकेला पाणी लागले नव्हते, तरीही आम्ही ‘भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांना स्मरून कूपनलिका करायचीच’, असे ठरवले. कूपनलिका खणण्याच्या दिवशी मी त्या ठिकाणी श्रीकृष्णाला प्रार्थना करून सनातन गोअर्क आणि विभूतीचे पाणी शिंपडले अन् उदबत्ती लावून प्रार्थना केली. दोन घंट्यांनी कूपनलिका खणण्याचेे काम चालू झाले. दीडशे फुटांपर्यंत खणूनही नुसतेच दगड आणि माती बाहेर येत होती. तेव्हा कूपनलिका खणणारे लोकही म्हणाले, ‘‘इथे पाणी लागणार नाही.’’ या वेळी भगवान श्रीकृष्णाला आणि प.पू. डॉक्टरांना पुष्कळ प्रार्थना होऊ लागल्या. मी प.पू. डॉक्टरांना मनातून सांगितले, ‘मला विषमुक्त शेती करायची आहे. मला पर्यावरणाची होणारी हानी न्यून करायची आहे. इथे पाणी लागले नाही, तर मी शेती करू शकणार नाही. हे गुरुदेवा, तुम्हीच काहीतरी करा. आता सगळे तुमच्यावर सोडले आहे.’ मी अशी प्रार्थना केल्यावर कूपनलिकेमधून एक मोठा पाण्याचा झरा आला आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले. ते पाणी पाहून कृतज्ञतेने मन भरून गेले.’

– सौ. आसावरी प्रसाद अर्वेन्ला, नागपूर (२५.५.२०१६)

 

विविध आध्यात्मिक उपायांमुळे झाले पिकांचे संरक्षण

शेतात आध्यात्मिक उपाय केल्याने पिकांना कीड न लागणे

आम्ही शेतातील खोलीत देवघर केले आहे. त्यात अष्टदेवतांची पट्टी ठेवली आहे. तिथे मी कापूर आणि उदबत्ती लावते. मी शेतात उदबत्तीची विभूती फुंकरते नाणि सतत गोमूत्राचा शिडकावाही करते. त्यामुळे ‘शेतातली झाडे नेहमीच प्रसन्न वाटतात आणि झाडांना अन् पिकांना कीड लागत नाही’, असे अनुभवायला आले.

– सौ. आसावरी प्रसाद अर्वेन्ला, नागपूर (२५.५.२०१६)

आध्यात्मिक उपाय केल्यामुळे गारांचा पाऊस होऊनही हानी न होता चांगले पीक येणे

आम्ही केळीला खत टाकत असतांना त्यात विभूती आणि कापूर घालतो. सर्व शेतावर विभूती फुंकरतो आणि उदबत्ती लावतो. सर्व झाडांवर आम्ही सूक्ष्मातून ‘श्रीकृष्ण, श्रीकृष्ण’ असे लिहितो. त्यामुळे ज्या वेळी गारांचा पाऊस पडला, वादळ झाले, त्या वेळी ईश्‍वरकृपेने आमच्या शेतातील पिकांची काहीही हानी झाली नाही. ‘भगवान श्रीकृष्ण शेतात आहे आणि त्याने वादळ अन् गारांचा पाऊस यांपासून शेताचे रक्षण होण्यासाठी शेतावर गोवर्धन पर्वत धरला आहे’, असे दिसले. त्या वेळी आजूबाजूच्या शेतांतील पिकांची बरीच हानी झाली. त्या वर्षी पीकही पुष्कळ चांगले झाले. त्या वेळी ‘श्रीकृष्ण आपल्यासमवेतच आहे’, असे जाणवले. वरील अनुभूती एका संतांना सांगितली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘बघ ! तुझ्या भावामुळे तुमच्या शेतात अधिक पीक आले !’’ त्या वेळी लक्षात आले की, भावामुळे काहीही होऊ शकते.’

– सौ. जानकी हिरामण वाघ, नांद्रा (बुद्रुक), जळगाव. (२६.६.२०१५)

 

सनातन संस्थेच्या उदबत्तीच्या विभूतीच्या वापराने पीक वाढणे

सनातन संस्थेच्या उदबत्तीची विभूती भाताच्या बियाण्याला लावून पेरल्याने भरघोस पीक येणे

‘गेल्या १ वर्षापासून सौ. सविता कंग्राळकर धर्मशिक्षणवर्गात येतात. त्यांची भातशेती आहे. पूर्वी त्यांच्या शेतात जराही पीक येत नव्हते. धर्मशिक्षणवर्ग घेणार्‍या आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. ज्योती दाभोळकर यांनी त्यांना ‘बियाण्याला सनातन संस्थेच्या उदबत्तीची विभूती लावून पेरणी करा’, असे सांगितले. सौ. कंग्राळकर यांनी तसे केल्यावर पुष्कळ पीक आले. विशेष म्हणजे त्याला जराही कीड लागली नाही. त्यामुळे ‘केवळ विभूती लावल्यामुळेच एवढे पीक आले’, असे त्यांना वाटते.

गोमूत्र आणि विभूती लावून बी पेरल्यानंतर उत्पन्न वाढणे

‘मी एक वर्षापासून सनातन संस्थेच्या संपर्कात आहे. माझी शेती पुष्कळ आहे; पण त्यातून उत्पन्न पुष्कळ अल्प येते. उत्पन्न वाढवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले, दोन कूपनलिका खोदल्या, खतात तसेच मशागतीत पालट केले; पण उत्पन्नात समाधानकारक फरक दिसला नाही. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मला सनातन-निर्मित उदबत्तीचे महत्त्व लक्षात आले. आध्यात्मिक उपाय म्हणून आम्ही उदबत्तीच्या विभूतीचा आणि विभूतीच्या पाण्याचा वापर करतच होतो. एके दिवशी मला वाटले, ‘शेतात विभूती वापरून पहावी.’ त्यानुसार या वर्षी गोमूत्र आणि विभूती लावूनच शेतात बी पेरले. या वर्षी शेतीच्या उत्पन्नात मोठा फरक जाणवला. या वर्षी शेतातून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.’

– श्री. गो.वा. कुलकर्णी, निवृत्त शिक्षक, अचलेर, जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद). (मे २००६)

बियाण्याला सनातन-निर्मित उदबत्तीची विभूती
लावल्यामुळे नामजप करत पेरणी केल्यामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होणे

‘माझी शेतजमीन अल्प दर्जाची (अल्प सुपीक) आहे. शेतातून पुष्कळ अल्प उत्पन्न येते. आजपर्यंत आमच्या शेतातून दोन पोत्यांहून अधिक धान्याचे उत्पन्न कधीच मिळालेले नव्हते. मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मला साधनेचे महत्त्व समजले. मला सनातन संस्थेच्या सत्संगात सनातन-निर्मित उदबत्तीचे महत्त्वही पटले. एक प्रयोग म्हणून मी शेतात पेरणीसाठी आणलेल्या बियाण्याला सनातन-निर्मित उदबत्तीची विभूती लावली आणि नामजप करत पेरणी केली. या वर्षी मला शेतातून २५ पोती धान्य उत्पन्न मिळाले. हे केवळ ईश्‍वरी कृपेमुळेच शक्य झाले.

– श्री. गणेश दत्तात्रय देशपांडे, भानूनगर, जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद). (मे २००६)
यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment