‘गंधशास्त्र’ आणि ‘संगीत’ या क्षेत्रांत अभ्यास अन् महत्त्वपूर्ण संशोधन

‘डिसेंबर २०१८ मध्ये मला पुणे येथील श्री. आनंद जोग यांच्याकडे जाण्याचा योग आला.श्री. आनंद जोग यांनी ‘नॉटीकल सायन्स’मध्ये शिक्षण घेऊन ‘नेव्ही’त काम केले आहे. कालांतराने अत्तरांची निर्मिती करणे, याकडे त्यांचे लक्ष केंद्रित झाल्याने आणि त्यांना मनापासून या गोष्टींची आवड असल्याने त्यांनी ‘पर्फ्युमरी’चे विविध कोर्स केले अन् नोकरीला विराम देऊन अत्तर निर्मितीचे क्षेत्र व्यवसायासाठी निवडले. त्यांना लहानपणापासून संगीताची आवड असल्याने त्यांनी गायनाचे शिक्षणही घेतले आहे. मागील ४ वर्षांपासून ते व्हायोलीन शिकत आहेत. त्यांना बासरी आणि पेटीही वाजवता येते. त्यांच्याकडे वर्ष १९०२ पासूनच्या शास्त्रीय संगीताचा सर्व प्रकारचा संग्रह आहे. त्यांनी हा ठेवा अतिशय चांगल्या प्रकारे जपून ठेवला आहे.

श्री. आनंद जोग

२० वर्षांपासून ते अत्तर आणि संगीत यांविषयीचा अभ्यास अन् संशोधन या संदर्भात कार्य करत आहेत. त्यांच्याशी झालेल्या भेटीत आमची संगीत आणि अत्तरे या विषयांवर चर्चा झाली. त्या वेळी श्री. आनंद जोग यांनी खालील अभ्यासपूर्ण माहिती दिली. ती त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहे.’ – कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

 

१. लहानपणापासून अत्तराची आवड असल्याने
इयत्ता नववीत असतांना अत्तरे बनवण्यास आरंभ करणे
आणि अन्य देशांत गेल्यावर तेथील गंधसंस्कृतीचाही अभ्यास करू लागणे

‘लहानपणापासून मला निसर्गाची आवड आहे. गंधशास्त्र किंवा सुगंध यांच्याशीही माझा लहानपणापासून संबंध आला. माझे आजोबा अत्तर वापरायचे. तेे पाहून मलाही लहानपणापासून अत्तर वापरणे आवडू लागले. मी अत्तरांच्या ठिकाणांचा बराच शोध घेतला. एका वाचनालयातील शिक्षिकेने दिलेल्या पत्त्यानुसार मी पुण्यातील ‘ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी’मध्ये (‘बी.सी.एल्.’मध्ये) गेलो. तेथे मी ‘पाओचर्स कॉस्मेटोलॉजी’ (poachers cosmetology) या सौंदर्यशास्त्राच्या (‘कॉस्मेटोलॉजी’च्या) संचातील गंधद्रव्य बनवण्याची (पर्फ्युमरीची) सगळी माहिती (फॉर्म्युलेशन्स) घेतली. मुंबईला एके ठिकाणी अत्तराची दुकाने होती. तेथून मी अत्तर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल घेतला. साधारण नववीत असतांना मी अत्तरे बनवायला लागलो. नंतर नोकरीच्या निमित्ताने अन्य देशांत गेल्यावर तेथील गंधसंस्कृतीचा मी अभ्यास करू लागलो. अशा प्रकारे माझा गंधशास्त्राचा अभ्यास चालू झाला.

 

२. नोकरी करून अत्तरनिर्मिती करतांना धावपळ होऊ लागल्याने
कालांतराने नोकरीला विराम देऊन ‘अत्तर बनवणे’ हा व्यवसाय चालू ठेवणे

मला नोकरीनिमित्त अन्य देशांत जावे लागायचे. मी अत्तर बनवण्यासाठी तेथे उपयोगात आणला जाणारा कच्चा माल आणून अत्तरे बनवणे चालू केले. नोकरी करून उरलेल्या वेळेत अत्तर बनवणे, असे माझे चालू होते; परंतु हे करतांना माझी धावपळ होऊ लागल्याने कालांतराने मी नोकरीला विराम देऊन ‘अत्तराचा व्यवसाय’ हे एकच ध्येय ठेवले.

 

३. गंधशास्त्र आणि संगीतशास्त्र यांचा
एकमेकांशी घनिष्ठ संबंध असल्याचे दर्शवणारे प्रसंग

३ अ. कपड्यांना लावलेले अत्तर आणि ऐकत असलेले संगीत परस्पर विसंगत असल्याने मन अस्वस्थ होणे

लहानपणापासून मला शास्त्रीय संगीताचीसुद्धा आवड आहे. कामासाठी बाहेर जातांना मी शास्त्रीय संगीत ऐकायचो. एक दिवस बाहेर जात असतांना मी अत्तर लावले होते आणि एक रागही ऐकत होतो. त्या वेळी माझे मन अस्वस्थ झाले. तेव्हा ‘कपड्यांना लावलेले अत्तर आणि मी ऐकत असलेले संगीत हे एकमेकांशी जुळत नाही’, असे माझ्या लक्षात आले. मी घरी येऊन कपडे पालटले. तेव्हा मला बरे वाटले.

३ आ. कपड्यांना लावलेले अत्तर आणि ऐकत असलेले
शास्त्रीय संगीत यांचा परिणाम परस्परपूरक होऊन मन एकाग्र होणे

एकदा कामासाठी बाहेर जातांना मी बनवलेले नवीन अत्तर लावून एक राग ऐकत जात होतो. हा राग ऐकण्यात मी इतका गुंग झालो की, मला ज्या ठिकाणी जायचे होते, तेथे न जाता मी बराच पुढे गेलो. बर्‍याच वेळानंतर मला त्याची जाणीव झाली. त्या वेळी मी लावलेले अत्तर आणि मी ऐकत असलेले शास्त्रीय संगीत यांच्या परिणामांमुळे मी भान विसरलो होतो.

अशा प्रकारे पहिल्या प्रसंगात मी लावलेले अत्तर आणि मी ऐकत असलेला (एरवी मला ऐकायला चांगला वाटणारा) राग हे एकमेकांशी विसंगत झाले. दुसर्‍या प्रसंगात मी लावलेले अत्तर आणि ऐकत असलेला राग या दोघांची चांगली सांगड होऊन त्याचा चांगला परिणाम दिसून आला. यावरून ‘गंधशास्त्र आणि संगीतशास्त्र यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असून वरील परिणाम त्याचेच असावेत’, हे माझ्या लक्षात आले.

 

४. संगीत आणि गंधशास्त्र यांचा सखोल अभ्यास करतांना
‘संगीतशास्त्राप्रमाणे गंधशास्त्रसुद्धा अनादी आहे आणि विविध
दैनंदिन कृतींमध्ये स्वर अन् गंध यांचा अंतर्भाव आहे’, असे लक्षात येणे

त्या वेळी ‘संगीत आणि गंधशास्त्र यांचा एकमेकांशी खरोखर काही संबंध आहे का ?’, असा विचार माझ्या मनात आला. याचा अभ्यास करतांना किंवा या दोघांची समानता जोडण्याचा प्रयत्न करतांना ‘संगीतशास्त्र जसे अनादी आणि अनंत आहे, तसेच गंधशास्त्रसुद्धा अनादी आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘पृथ्वी ही पृथ्वी, आप (जल), तेज, वायु आणि आकाश या पाच तत्त्वांनी बनली आहे. पृथ्वीला ‘गंधवती’ म्हटले जाते. पृथ्वीतत्त्व ते आकाशतत्त्व (अंतिम तत्त्व) या प्रवासात शेवटपर्यंत एकेक मात्रा (तत्त्व) न्यून होत जाते. जलतत्त्वापर्यंत गेल्यावर पृथ्वीतत्त्व न्यून होते, तर तेजतत्त्वापर्यंत गेल्यावर जलतत्त्वाची मात्रा न्यून होते. असे आकाशतत्त्वापर्यंत जातांना एकेक मात्रा (तत्त्व) गळून शेवटी ज्याला स्पर्श आणि रूप नाही अन् केवळ शब्द आहेत, ते आकाशतत्त्व शेष रहाते. त्याच्याही पलीकडे गेल्यास आपण परमात्म्यापर्यंत पोचतो’, या शास्त्रानुसार लक्षात घेतले, तर बर्‍याच ठिकाणी गंध आणि स्वर यांचा संबंध असल्याचे आपल्याला दिसून येते.

आपण पूजादी विधी करतो. तेव्हा धूप आणि उदबत्ती दाखवतो, तसेच घंटनाद करतो. ‘नैवेद्य दाखवल्यावर देवता तो गंधरूपात सेवन करतात’, असे शास्त्र आहे. या सगळ्या एकत्रित क्रियांत स्वर (नाद) आणि गंध यांचा अंतर्भाव असतो. आपल्या आध्यात्मिक कृती श्रुतीप्रधान आहेत. आपल्याकडे मौखिक परंपरा आणि श्रुतीप्रधानता पारंपरिकरित्या चालत आली आहे. त्यामुळे स्वर आणि गंध यांचा संबंध मला प्रत्येक कृतीतच जाणवला. हा संबंध पौराणिक दृष्टिकोनातून जाणवला, तसेच वैशेषिक दर्शनातील प्रकृती आणि पुरुष यांच्या लक्षणांमध्येही पंचतत्त्वांचा उल्लेख आढळतो.

 

५. व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा अनुभव किंवा
अनुभूती २ किंवा ३ इंद्रियांद्वारे घेत असल्याने ‘गंध आणि स्वर
या माध्यमांतूनही अनुभूती घेता येईल’, असे अभ्यासाअंती लक्षात येणे

कुठल्याही गोष्टीचा अनुभव किंवा अनुभूती आपण २ किंवा ३ इंद्रियांद्वारे घेतो, उदा. एखादा पदार्थ सेवन करतांना आपण नाकाने त्याचा सुगंध घेतो, जिभेने चव घेतो आणि ‘तो कसा सजवला आहे’, ते डोळ्यांनी पहातो. म्हणजे ३ इंद्रियांद्वारे त्या पदार्थाची अनुभूती घेतो. एखादे नाटक बघतो. तेव्हा कान आणि डोळे या इंद्रियांद्वारे आपण तो अनुभव घेतो. ‘जर आपल्याला डोळे आणि कान, तसेच नाक आणि जीभ यांद्वारे, म्हणजे २ किंवा ३ इंद्रियांनी अनुभव किंवा अनुभूती घेता येते, तर गंध आणि स्वर या माध्यमांतूनही आपण अनुभूती घेऊ शकतो’, असे अभ्यासाअंती माझ्या लक्षात आले. शास्त्रीय संगीतातील काही राग ऐकून मला ही प्रेरणा मिळाली.

 

६. संगीत अथवा राग यांतून व्यक्त होणार्‍या
भावाचा विचार करून अत्तरनिर्मिती केली जाणे

संगीत, कंठसंगीत किंवा शास्त्रीय संगीत हे पूर्णपणे भावाधिष्ठित आहे. यात भाव महत्त्वाचा आहे. पदार्थ बनवतांना साधनसामग्री असली, तरी चव शेवटी बनवणार्‍याच्या हातात असते. त्याचप्रमाणे राग, त्याचे वादी आणि संवादी स्वर (टीप), तसेच राग गायनाचा समय ही संगीतातील साधनसामग्री झाली. गाणे म्हणणार्‍याच्या मनात जो भाव आहे, तो भाव या रागातून प्रगट होतो. त्याचप्रकारे एखादे अत्तर बनवायचे असल्यास ‘कुठल्या सामग्रीचा उपयोग केल्यावर त्याची परिणामकारकता वाढेल ?’, हा विचार आधी करावा लागतो, उदा. गुलाबाचे अत्तर बनवायचे आहे, तर ‘गुलाब कसा आहे ?’ (तो झाडावरील आहे कि गुलदस्त्यातील आहे ? फुलदाणीतील आहे ?, एखाद्या स्त्रीने केसांत माळलेला आहे कि देवाला वाहिलेला आहे ?), याचा विचार करावा लागतो. या सगळ्या गुलाबांचा सुगंध एकच आहे; पण गुलाबाचा उपयोग करतांना प्रत्येकाचा भाव मात्र वेगळा आहे.

टीप

१. वादी स्वर : रागातील प्रमुख स्वरांस ‘वादी स्वर’ असे म्हणतात. वादी स्वरांचा उपयोग रागात प्रामुख्याने आणि अधिक प्रमाणात केला जातो.

२. संवादी स्वर : रागातील दुसर्‍या प्रमुख स्वरांस ‘संवादी स्वर’ असे म्हणतात. हे स्वर वादी स्वरांच्या खालोखाल महत्त्वाचे असतात.

६ अ. ‘ललत’ या भक्तीरसप्रधान आणि आर्तभाव निर्माण करणार्‍या
रागासाठी गुलाब अन् चंदन या दोन्हींच्या मिश्रणातून अत्तर सिद्ध करणे

ज्याच्यासाठी गंध बनवायचा आहे, त्यानुसार ‘कोणत्या गुलाबाच्या फुलाचा उपयोग करायचा ?’, हे ठरवावे लागते,  उदा. राग ‘ललत’ हा भक्तीरसप्रधान राग आहे. त्यामुळे देवाला वाहिलेल्या गुलाबाचा मी त्यात उपयोग केला. हा राग भक्तीरसप्रधान असून तो आर्तभाव निर्माण करणाराही असल्याने भक्तीरस ज्या गंधातून व्यक्त होतो, त्या चंदनाचा उपयोगही मी त्यात केला. म्हणजे गुलाब आणि चंदन या दोघांचे मिश्रण करून ललत रागाचे अत्तर सिद्ध केले.

६ आ. देस रागाचे अत्तर सिद्ध करतांना उद आणि गुलाब या दोन्हींचे मिश्रण करणे

राग ‘देस’ म्हटल्यावर हिमाचल प्रदेश, हिमालयातील बर्फांचे डोंगर आणि तिथला निसर्ग आदी दृश्ये डोळ्यांसमोर येतात. खमाज किंवा पहाडी राग म्हटल्यावर काश्मीरचे सौंदर्य डोळ्यांसमोर उभे रहाते. उद हा डोंगराळ भागात येणार्‍या गंधाशी संबंधित असून देस हा राग गोड असल्याने त्यात गुलाबाचाही अंतर्भाव केला आहे. म्हणजे उद आणि गुलाब या दोन्हींचे मिश्रण करून देस रागाचे अत्तर सिद्ध केले.

म्हणजे एखाद्या रागाचे अत्तर बनवतांना त्यात २ – ३ सुगंधांचे मिश्रण घेतले आहे. दोन गोष्टी आपल्याला एकच अनुभूती देऊ शकतात.

 

७. प्रत्येक इंद्रीय एकच अनुभूती देत असून एका मर्यादेनंतर
त्या अनुभूतीला अव्यक्त स्वरूप प्राप्त होऊन शेवटी एकच भाव मनात जागृत रहाणे

संत ज्ञानेश्‍वरांची एक ओवी आहे,

ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥

– ज्ञानेश्‍वरी, अध्याय ६, ओवी १६

अर्थ : त्याचप्रमाणे हेही लक्षात ठेवा की, भाषेच्या रसाळपणाच्या लोभाने श्रवणेंद्रियांच्या ठिकाणी रसनेंद्रिये येतील आणि या भाषेने इंद्रियांत परस्पर भांडणे चालू होतील.

स्पष्टीकरण : गीतेचे इतके सुंदर निरूपण चालू आहे की, गीतेचा रस ग्रहण करण्यासाठी या रसाळयुक्त लोभासाठी जीभ कान होऊ पहात आहे. सगळी इंद्रीयेच कान होऊ पहात आहेत.

ही ओवी आपल्याला पुष्कळ काही सांगून जाते.

प्रत्येक इंद्रीय आपल्याला शेवटी एकच अनुभूती देते. ही अनुभूती तुम्ही डोळ्यांतून घ्या, दृष्टीक्षेपातून तिचा रस ग्रहण करा किंवा कान, नासिका आणि स्पर्श यांद्वारे घ्या, शेवटी एका मर्यादेनंतर ती अनुभूती अव्यक्त होऊन शेवटी एकच भाव आपल्या मनामध्ये जागृत करते. ती आपल्याला मनाच्या एका स्थितीत घेऊन जाते. त्या वस्तूचे ते अंतिम लक्ष्य आहे. गंधाचेही तसेच आहे. ‘गंध घेतल्यावर आपल्या मनाला काय वाटते ?’, ते महत्त्वाचे आहे.

 

८. गंधशास्त्राचा अभ्यास

८ अ. सर्व प्रकारच्या गंधांशी संबंधित अभ्यास असलेले ‘गंधशास्त्रा’चे एक हस्तलिखित मिळणे

मी भरतमुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र, ज्ञानेश्‍वरी, वैशेषिक दर्शन, सांख्ययोग, गीता आणि इतर धार्मिक ग्रंथ वाचले. या सर्व ग्रंथांत गंधशास्त्राचा अभ्यास दिला आहे. ‘गंधशास्त्रा’चे एक हस्तलिखितही (मॅन्युअल स्क्रिप्ट) उपलब्ध असून त्यामध्ये पूर्वीपासून असलेल्या सगळ्या प्रकारच्या गंधांशी संबंधित अभ्यास आहे. थोडक्यात त्या अभ्यासाला ‘त्या त्या काळातील सूत्र (फॉर्म्युला)’ असे म्हणता येईल. ते वाचल्यावर अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या. इंद्रिये आपल्याला एक अनुभूती देतात. एखादा राग ऐकल्यानंतर जी अनुभूती किंवा अनुभव येतो, तो मनातून आलेला  असतोे. मग तो प्रसन्नता, आर्तता, व्याकुळता किंवा शृंगारिकता काहीही असू शकते. हेच गंधातूनही जाणवू शकतेे, म्हणजे ‘सुगंध आणि संगीत या दोन्हींत वरील गोष्टी आहेत’, हे मला जाणवू लागले. त्यामुळे मी गंध आणि स्वर यांना एकत्र करण्याचा प्रयत्न चालू केला.

८ आ. सुगंध आणि संगीत यांचा परस्परसंबंध पडताळतांना ध्वनी अन् गंध ही
दोन्ही तत्त्वे वायूशी संबंधित असून ‘ती सगळ्यांत लवकर मनाच्या आत जाणारी आहेत’, हे ध्यानी येणे

‘सुगंध आणि संगीत यांचा एकमेकांशी संबंध आहे, हे खरे आहे का ?’, हे अभ्यासण्यासाठी मी गंधशास्त्र, इतिहास किंवा धार्मिक ग्रंथ यांतील काही संदर्भ शोधले. मला त्यांचा एकत्रित संदर्भ कुठेही न आढळता विखुरलेले संदर्भ सापडले, उदा. पूजा करतांना घंटानाद केला जातो, म्हणजे नाद आला. उदबत्ती लावली जाते किंवा कापूर लावला जातो, म्हणजे तिथे अग्नी आला, वायू आला, तसेच नाद, म्हणजे तिथे आकाशतत्त्वही आले. सगळ्यांत लवकर मनाच्या आत जाणारे तत्त्व आहे, ध्वनी आणि गंध ! याचे कारण ही दोन्ही तत्त्वे वायूशी संबंधित आहेत. ध्वनी वायूद्वारे पुढे जातो आणि गंधसुद्धा हवेच्या, म्हणजे श्‍वासाद्वारेच पुढे जातो. त्यामुळे हा सगळा कंपनसंख्येशी (‘फ्रिक्वेन्सी’शी) संबंधित खेळ आहे. हा सगळा वैज्ञानिक दृष्टीकोन असून प्रत्यक्षात धर्मामध्येही याविषयीचे अनेक संदर्भ दिले आहेत.

८ इ. विशिष्ट देवतेला विशिष्ट सुगंधी फुले वाहिली जाण्यामागे ‘संबंधित देवता आणि
त्या फुलाचा रंग, गंध, तसेच अन्य गोष्टी यांचा अभ्यास असून ते एक शास्त्र आहे’, असे लक्षात येणे

गंधशास्त्रामध्ये गंधनिर्मिती करतांना भक्तीरसाचे गंधसुद्धा आपल्याकडे दिले आहेत. त्यातून भाव आपोआप जागृत होतोे. आपण देवाला डेलिया, ऑरकेड इत्यादी फुले वाहत नाही; कारण ती कृत्रिम वाटतात आणि त्यांना गंधही नसतो. अपवादात्मक एखादे फूल वगळता देवाला सुगंध असणारी फुले वाहिली जातात. त्यातही विशिष्ट देवतेला विशिष्ट सुगंधी फुलेच वाहिली जातात, उदा. कमळ श्री लक्ष्मीदेवीला वाहिले जाणे, यामागे पुष्कळ सखोल अभ्यास आहे. यात ‘ती संबंधित देवता आणि त्या फुलाचा रंग, गंध, तसेच अन्य गोष्टी यांचा अभ्यास असून ते एक शास्त्र आहे’, असे माझ्या लक्षात आले.

८ ई. एका रागातील भजन किंवा गाणे म्हणतांना रागाचे स्वर तेच असले, तरी त्यातील भाव
पालटत असल्याने प्रत्येक गीतातून अपेक्षित भाव व्यक्त होण्यासाठी गीत योग्य प्रकारे म्हणणे आवश्यक !

गंधशास्त्राचा अभ्यास करतांना मला दोन महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे एकाच रागातील विविध भाव असलेले गाणे म्हणतांना अथवा वाजवतांना त्या स्वरांतून ते आकृतीबंध निर्माण होतात. मी ‘व्हायोलीन’ शिकतांना ते शिकवणार्‍या ताईंनी मला सांगितले, ‘आपण एखादे भजन म्हणत असतांना त्या भजनातून ईश्‍वराप्रतीचा भाव जाणवला पाहिजे.’ ‘तो भाव कसा आणायचा ? त्यातील हरकती, मुरक्या (टीप) कशा घ्यायच्या ?’, हे त्यांनी मला शिकवले. एका रागातील भजन किंवा गाणे शिकतांना त्या रागाचे स्वर तेच असतात; मात्र भाव पालटतात, उदा. यमन रागात भक्तीगीते, नाट्यगीते, चित्रपटातील गाणी, तसेच मराठी गाणीही आहेत. राग एकच आहे; पण त्यातून प्रकट होणारा भाव मात्र निरनिराळा आहे. प्रत्येक गीतातून अपेक्षित तो भाव व्यक्त होण्यासाठी ‘त्यातील जागा कशा घ्यायला हव्यात ?’, हे पहायला हवे. आपण भजन म्हणत असल्यास ते एखाद्या चित्रपटातील गीताच्या भावाप्रमाणे म्हणून चालणार नाही.

टीप – १. हरकती : गायन करतांना विविध स्वरसंगती करून गायनात रंगत आणणे

२. मुरकी : गायन आणि वादन करतांना एका स्वरावरून दुसर्‍या स्वराकडे झटकन वळणे

८ उ. चित्रकाराला अपेक्षित असलेल्या भावानुसार
चित्रातील रंगसंगतीत पालट होऊन चित्राची निर्मिती केली जाणे

दुसरे सूत्र म्हणजे एखाद्या चित्रकाराला सूर्यास्ताचे चित्र रेखाटायचे असेल, तर त्या चित्रात तो ‘सूर्य’ हा केंद्रबिंदू ठेवतो आणि ‘त्या चित्रात सूर्य कशा प्रकारे दाखवायचा ?’, हे ठरवतो. म्हणजे तो सूर्य डोंगरामधील असू शकेल, समुद्र किनार्‍यावरून दिसणारा असेल, एखाद्या माडातील असेल किंवा शहरातील इमारतींमधून दिसणारा असेल ! सूर्य तोच आहे. अस्तही तोच आहे. केवळ भाव वेगळा आहे. त्या भावानुसार चित्रातील रंगसंगती पालटते आणि चित्र निर्माण होते.

८ ऊ. संगीतातील दिग्गजांची त्या त्या रागाशी होणारी एकरूपता आणि
अभिव्यक्ती अभ्यासल्यावर ‘गंधाची अभिव्यक्तीही कशातून तरी व्हायला हवी’, असे वाटणे

चित्र हे संगीतातूनही निर्माण होते. संगीतातील अनेक दिग्गज सांगतात की, त्यांना राग दिसतो, उदा. पंडित कुमार गंधर्व म्हणायचे, ‘‘मला राग दिसतो. त्याची आकृती दिसते.’’ पं. भीमसेन जोशी आणि किशोरीताई आमोणकर म्हणायच्या, ‘‘आम्ही ज्या रागात जातो तो राग जणू आमच्याशी बोलतो. राग जर प्रसन्न असेल, तर रागाचे सादरीकरण छान होते आणि तो प्रसन्न नसेल, तर चांगल्या प्रकारे सादर होत नाही.’’ त्या त्या भावाची ही तरलता, हेच त्या रागाचे वैशिष्ट्य आहे. रागाला जशी अभिव्यक्ती आहे, रूप आहे, स्वर आहे, त्याचे एक ‘कॅरेक्टर’ आहे, तसेच गंधालाही अभिव्यक्ती आहे, उदा. गुलाब इत्यादी. ‘जर रागाची अभिव्यक्ती सुरांमधून व्यक्त होते, तर गंधाचीसुद्धा कशातून तरी व्हायला हवी’, असे मला वाटले. रागाची चित्रे आहेत. तोडी रागामध्ये हरिण आलेले चित्र आहे. मेघमल्हारच्या रागिणीचे चित्र आहे.

जेव्हा मी हा सगळा अभ्यास केला, तेव्हा मी गंधशास्त्राच्या अधिक जवळ आलो आणि ‘मला काहीतरी मिळाले आहे’, असे मला जाणवले. एखादा चित्रकार सागर तिरावरच्या सूर्यास्ताचे चित्र काढायचे ठरवतो, त्या वेळी ते चित्र साकार होते आणि त्यात चित्राच्या अनुषंगाने समुद्रकिनारा आणि तिरावरील इतर गोष्टीही येतात. रागाचेसुद्धा तसेच आहे. मी व्हायोलीनवर एखादा राग वाजवतांना त्या रागातून तो भाव व्यक्त करण्यासाठी त्या स्वरांतून तशा प्रकारचे आकृतीबंध निर्माण करतो आणि ती अभिव्यक्ती साकार करतो. त्याचप्रमाणे एक विशिष्ट प्रकारचा गंध बनवतांनाही तीच प्रक्रिया होत असते.

 

९. संगीताचे अत्तर सिद्ध करण्याची प्रक्रिया

९ अ. ‘स्वराला अभिव्यक्त करण्यासाठी गंधही वापरता येईल’, या अत्तर
बनवण्याच्या संकल्पनेला गंधशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी दुजोरा देणे

जेव्हा माझे संगीताचे अत्तर सिद्ध झाले, तेव्हा मी वार्ताहर परिषद घेतली होती. त्या वेळी मला गंधशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले काही विद्यार्थी भेटले. ‘मी काय केले आहे ?’, हे पहायला त्यांनी माझ्या अत्तरांचा पूर्ण संच मागितला. मी त्यांना ‘ती अत्तरे कशी बनवली आहेत’, हे सांगून ‘प्रत्येक रागात तांत्रिकदृष्ट्या काही गोष्टी कशा जुळवल्या आहेत’, हेसुद्धा दाखवले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी जे शिकवले आहे, ते हेच आहे.’ मी त्यांना सांगितले, ‘‘समजा, तुम्हाला लिलीचा सुगंध बनवायचा असल्यास ‘तुमच्यासाठी लिली काय आहे ? लिलीचा सुगंध घेतल्यावर कोणते गाणे आठवते ? लिली तुम्ही कशाशी संबंधित कराल ?’, आदी गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या उत्तरांनुसार त्यात आवश्यक ते घटक (ingredients) घालावे लागतात. एखादा पदार्थ बनवतांना आपण त्यात चवीनुसार पदार्थ घालतो आणि ‘त्यात अजून काय घातले ?, तर तो आणखी चांगला होईल ?’, हे पहातो. गंधाचेही असेच असून स्वरांचे आणि स्वरगंधाचेसुद्धा तसेच आहे. ‘जसे स्वराला अभिव्यक्त करण्यासाठी शब्द वापरले जातात, तसे स्वराला अभिव्यक्त करण्यासाठी गंधही वापरता येऊ शकते. ‘गंध कसा वापरता येईल ?’ या विचारांतून ही सर्व प्रक्रिया निर्माण झाली.’’

९ आ. एखाद्या व्यक्तीमत्त्वावरून एखादे गंधद्रव्य (परफ्यूम) बनवले
जाते, त्याप्रमाणे रागाचा विविध अंगांनी अभ्यास करून अत्तर बनवले जाणे

दुकानात जी विदेशी गंधद्रव्ये (परफ्यूम्स) मिळतात, ती एखाद्या व्यक्तीला डोळ्यांसमोर ठेवून बनवलेेली असतात आणि त्या व्यक्तीचेच नाव त्या गंधद्रव्याला दिलेले असते, उदा. Rasasi, Amuvaj, Jivanchi, Marcoplo, Parasilton, इत्यादी. ही सगळी गंधद्रव्यांची (सेंटची) नावे असून ही सगळी व्यक्तींचीही नावे आहेत आणि ते गंधद्रव्य त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावरून बनवले आहे. भारतात श्री. अमिताभ बच्चन यांच्या नावाचे एक गंधद्रव्य उपलब्ध आहे. ते कसे बनवले ? तर श्री. अमिताभ बच्चन यांचे व्यक्तीमत्त्व पहाता ‘त्यांच्या गंधद्रव्याचा (परफ्यूमचा) वास कसा असेल ? त्यांच्याशी कोणता गंध जुळेल ?’, याचा विचार करून त्यानुसार अत्तर बनवण्याचे साहित्य घेऊन ते बनवले जाते. त्याचप्रमाणे ‘रागाची अभिव्यक्ती काय आहे ? रागाचे पात्र काय आहे ? रागातून कशाचा बोध (perception) होतो ? स्वतःच्या मनाला राग कसा भावला आहे ? तो ऐकल्यावर माझ्या मनाला काय वाटते आहे ?’, आदी विचार करून जी आकृती बनते, त्या आकृतीला साजेसा गंध देण्याचा प्रयत्न केला आहे.

९ इ. विविध राग ऐकत अत्तर बनवून ती संगीत क्षेत्रातील
परिचितांना देणे आणि त्यांना प्रश्‍न विचारून अभ्यास करणे

यासाठी मी अत्तरांचे बरेच प्रयोग केले. सगळ्यांत प्रथम मी माझ्या संगीत विषयातील एका मित्राला त्याला ठाऊक असलेल्या रागाचे अत्तर दिले. ते बनवतांना मी पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व आणि श्रीमती किशोरीताई आमोणकर यांचे विशिष्ट ध्वनीमुद्रण (रेकॉर्डींग) घेतले. प्रयोग करता करता माझे ते ते राग ऐकणे सतत चालू होते. संगीत क्षेत्रातील माझ्या परिचितांना मी ही अत्तरे चाचणीसाठी दिली आणि ‘तो राग ऐकतांना त्यांना तो गंध चांगला वाटतो का ? कोणत्या वेळी चांगला वाटतो ?’ असे विविध प्रश्‍न विचारले.

९ ई. विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर यांनी रागांमध्ये थाटांचा
समावेश करण्यास सांगणे आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार विशिष्ट
राग घेऊन त्या रागाची वैशिष्ट्ये त्या संबंधित गंधातून मांडण्याचा प्रयत्न करणे

याचे उद्घाटन विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. श्री. शंकर अभ्यंकरांना ही संकल्पना पुष्कळ आवडली. त्यांनी आम्हाला ‘यामध्ये थाटांचा समावेश करा; कारण जे थाट राग आहेत, तसे मूळ गंध आहेत. जे मूळ आहे, त्यांना जोडण्याचा प्रयत्न करा’, असे मार्गदर्शन आम्हाला केले. (टीप : राग निर्माण करणार्‍या स्वररचनेस ‘थाट’ म्हटले आहे.) गंधशास्त्राच्या मूळ संहितेतून प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी आम्हाला ती वाचण्यासही सांगितली. आम्ही तिचा अभ्यास केला. माझी पत्नी सौ. योगिता आणि मी आम्ही दोघांनी वरील सूत्रांवर विचारविनिमय केला आणि विशिष्ट राग घेऊन त्या रागाची वैशिष्ट्ये त्या गंधातून मांडण्याचा प्रयत्न केला, उदा. राग ललत. ललत या रागाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘भक्तीरस’ हा त्याचा भाव आहे. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या रागामध्ये ‘शुद्ध’ आणि ‘तीव्र’ असे २ ‘मध्यम’ सलग लागतात. अन्य कोणत्याच रागात दोन मध्यम सलग लागत नाहीत. एकतर आरोहात लागतो किंवा अवरोहात लागतो किंवा मध्ये ‘प’ तरी असतो किंवा त्याला वक्र पद्धतीने लावले जाते.

ललत रागाचे अत्तर साकार करतांना ठरवले की, यातून दोन गंध सलग आले पाहिजेत. सुगंध घेतांना दोन गंध आले पाहिजेत आणि ते दोन्ही भक्तीरसाचे हवेत. त्यासाठी गुलाब आणि चंदन हे दोन गंध निवडले. रागात जसे इतर स्वर असतात, उदा. वादी-संवादी, अनुवादी, विवादी इत्यादी, तसे त्याला पारंपारिक अष्टगंध, केशर आणि कस्तुरी यांचे संयोजन करून सर्व गंधांचे मिश्रण करून तो ललत सिद्ध केला.

टीप – १. शुद्ध स्वर : जेव्हा सातही स्वर आपल्या मूळ जागेवरच असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’ असे म्हणतात.

२. तीव्र स्वर : जो स्वर आपली मूळ जागा सोडून अधिक उंचीवर जातो; परंतु पुढील स्वरापेक्षा अल्प उंचीवर असतो, त्याला ‘तीव्र स्वर’ असे म्हणतात. सात स्वरांत केवळ ‘म’ हा स्वर तीव्र होतो.

३. आरोह : स्वर क्रमाक्रमाने चढवत जाण्याच्या क्रियेला ‘आरोह’ असे म्हणतात. सा रे ग म प ध नी सां ।

४. अवरोह : स्वर क्रमाक्रमाने उतरवत येण्याच्या क्रियेला ‘अवरोह’ असे म्हणतात.

५. अनुवादी स्वर : वादी आणि संवादी स्वर सोडून रागात येणार्‍या अन्य स्वरांना ‘अनुवादी स्वर’ असे म्हणतात.

६. वर्ज्य स्वर (विवादी स्वर) : जे स्वर रागात येत नाहीत, त्यांना ‘वर्ज्य स्वर अथवा विवादी स्वर’ असे म्हणतात.

 

१०. रागांनुसार केलेली गंधनिर्मिती ही मनातून आलेल्या भावांचा आविष्कार !

आतापर्यंत आमचे १८ – १९ रागांवर काम झाले आहे. ‘या रागाचे हेच अत्तर’, असे म्हणता येऊ शकत नाही; कारण ती तशी समज आहे, कल्पना आहे. ते माझ्या मनातले भाव आहेत. मी त्या रागातल्या भावांचा गंधातून केलेला आविष्कार आहे. या सगळ्या गोष्टी पुष्कळ अमूर्त आहेत, म्हणजे ‘हा याचा गंध, हा याचा वास’, असे काही याचे मूर्त प्रमाण नाही. आपल्याला जसे भक्ती म्हटले की, चंदन भावते किंवा चंदनाचा वास आठवतो आणि भक्तीरसाकडेच नेणार्‍या आध्यात्मिक गोष्टी आठवतात, तसे विदेशी लोकांना होत नाही. त्यामुळे आम्ही बाहेरच्या वातावरणात उपयोगी असणारी काही ‘सॉनेट’, ‘बॅले’ या नावांची विदेशी अत्तरेही बनवली आहेत.’

 

११. गंधशास्त्र आणि संगीत यांत असलेले साधर्म्य

११ अ. संगीतातील स्वरांप्रमाणे सुगंधातही वेगवेगळ्या
स्तरांचे गंध असून गंधशास्त्रात त्यांना ‘नोट’ असे म्हटले जाणे

अभ्यास करतांना मला संगीत आणि गंधशास्त्र यांत साधर्म्य जाणवले. संगीतात स्वर असतात. त्यांना ‘म्युझिकल नोट्स’ (स्वर) असे म्हणतात. त्याचप्रमाणे सुगंधांतही वेगवेगळ्या स्तरांचे गंध असतात. गंधशास्त्रामध्ये त्यालाच ढोबळपणे ‘नोट’ असे नाव दिले आहे. भारतीय संगीतामध्ये ‘आलाप’, ‘जोड’ आणि ‘झाला’ हे तीन प्रकार आहेत. ते अनुक्रमे ‘विलंबित’, ‘मध्य’ आणि ‘दृत’ या लयींत वाजवले जातात. गंधशास्त्रातही ‘टॉप नोट’, ‘मिडल नोट’ आणि ‘बेस नोट’ अशा तीन नोट आहेत.

११ अ १. टॉप नोट

अत्तराची कुपी उघडल्याक्षणी तिच्यातून वातावरणात गंध पसरतो आणि तो आपल्याला जाणवतो; परंतु कुपी बंद केल्यावर तो गंध येणे बंद होते, म्हणजे या अत्तराच्या गंधाच्या हलक्या; परंतु लगेच पसरणार्‍या लहरी असतात. त्यांना ‘टॉप नोट’ असे म्हटले जाते. ‘टॉप नोट’चा गंध फार काळ टिकणारा नसतो.

११ अ २. मिडल नोट

‘टॉप नोट’चा गंध गेल्यावर नंतर येणार्‍या गंधलहरींना ‘मिडल नोट’ असे म्हटले जाते. ‘मिडल नोट’ हा अत्तराच्या गंधाचा एक प्रकारे गाभा आहे.

११ अ ३. बेस नोट

तिसरा गंध, जो नंतर दीर्घकाळ रेंगाळत रहातो, त्याला ‘बेस नोट’ म्हणतात.

गंध एकच असला, तरी ‘त्याचे प्रकटीकरण कसे होते ?’, याचे हे एक प्रकारे विश्‍लेषण आहे. म्हणजेच संगीतातील मंद्र, मध्य आणि तार सप्तक अशी उंची गाठणार्‍या स्वर लहरींसारखेच हे गंधाचे वर्गीकरण केले आहे.

(टीप : मंद्र, मध्य आणि तार सप्तक : सा, रे, ग, म, प, ध, नी या सात स्वरांच्या समूहास ‘सप्तक’ असे म्हणतात. संगीतातील सप्तक पुरे होण्यास त्यात पहिल्या स्वरांचे दुसरे रूप मिळवावे लागते. सा, रे, ग, म, प, ध, नी आणि सा असे सप्तक होते. अशी ३ सप्तके आहेत, ती म्हणजे मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक.)

११ आ. संगीतातील रागाचे स्वरूप दाखवणार्‍या ‘आलाप’, ‘जोड’ आणि ‘झाला’ यांच्याप्रमाणेच गंधाचे
स्वरूप त्याच्या विविध स्तरांद्वारे, म्हणजे ‘टॉप नोट’, ‘मिडल नोट’ अन् ‘बेस नोट’ यांद्वारे दर्शवले जात असणे

गंधाची उत्पत्ती होते आणि काही काळ तो गंध परिपूर्ण स्थितीत असतो, म्हणजे त्याच्या स्थितीमध्ये पूर्ण परिपक्व होतोे अन् त्यानंतर काही काळाने तो लय पावतो. त्यामुळे या गंधलहरींना उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी जोडता येते. गंधाच्या या तीन नोट आणि संगीतातील (सतारीवर वाजवले जाणारे) ‘आलाप’, ‘जोड’ अन् ‘झाला’ यांच्यामध्येही पुष्कळ साम्य आहे. आलापातून रागाचे स्वरूप मांडले जाते. पूर्ण विलंबित लयीत त्या रागाचा आविष्कार होतो आणि द्रुत (शीघ्र) लयीमध्ये त्याची सांगता होेते. रागाचे एखादे रूप आलापातून दाखवले जाते. त्याचप्रमाणे गंधशास्त्रामध्ये गंधाचे स्वरूप ‘टॉप नोट’मधून संबोधित केले जाते. त्यानंतर त्या अत्तराची १ – २ – ४ किंवा ८ घंटे जेवढी अंतिम क्षमता आहे, तेवढ्या वेळेत पूर्ण गंधाची एक नोट, म्हणजे ‘मिडल नोट’ जिला आपण ‘हार्ट ऑफ द पर्फ्यूम’ म्हणतो, ती बाहेर येते आणि शेवटी ज्याच्यावर ते अत्तर सिद्ध केले आहे, तो त्या अत्तराचा पाया (बेस नोट) बाहेर येतो. त्यामुळे मला संगीत आणि गंध या दोन्हींत सारखेपणा सापडला. ‘संगीत आणि गंध हे जसे कलात्मक आहेत, तसे ते शास्त्रही आहे’, असे माझ्या लक्षात आले.

(विलंबित : अतिशय सावकाश गतीत गायन किंवा वादन करणे

मध्यलय : विलंबितपेक्षा जरा जलद गतीत गायन किंवा वादन करणे द्रुतलय : जलद गतीत गायन किंवा वादन करणे

आलाप : विलंबित गतीत रागाचा स्वरविस्तार करून गायन किंवा वादन करणे

जोड : सतारीवरील मध्य लयीतील राग वादनाचा एक प्रकार

झाला : सतारीवरील द्रुत गतीतील राग वादनाचा एक प्रकार)

 

१२. संगीत चिकित्सेतील रागांप्रमाणे गंधशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास
चालू केल्यावर त्यातून विविध रागांनुसार अत्तर सिद्ध करण्याची प्रेरणा मिळणे

यानंतर मी अत्तर बनवण्यासाठी शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करणे चालू केले. ‘अरोमा चिकित्सा’ आणि ‘संगीत चिकित्सा’ या दोन स्वतंत्र चिकित्सा असून समाजात त्यांचा वापर पुष्कळ मोठ्या प्रमाणात केला जात आहे अन् त्यांचा परिणामही पुष्कळ सकारात्मक आहे. पुष्कळ लोकांनी यावर अभ्यास करून शोधनिबंध सादर केले आहेत. आपल्याकडे पुष्कळ वर्षांपासून ‘अरोमा चिकित्सा’, ‘गंधशास्त्र’ आदी चिकित्सा प्रचलित आहेत. आपल्याकडे संगीत चिकित्सेमध्ये स्वरनाद, म्हणजे विशिष्ट मंत्र, विशिष्ट उच्चारण हे त्या त्या स्वरांनी केले जाते. वेद पठणाला एक विशिष्ट प्रकारचा स्वरनाद आहे आणि संगीत चिकित्सेमध्येही विशिष्ट राग गायले जातात. या रागांमध्ये विशिष्ट प्रकारचे रोग बरे होण्याची क्षमता आहे. एखादा राग, उदा. दरबारी कानडा हा राग घेतला, तर ‘त्या रागाचे वैशिष्ट्य काय ?’ ‘तो ऐकल्याने काय होते ?’ असा अभ्यास चालू झाला. हा अभ्यास केल्यावर ‘रागामुळे अशांतता आणि चिंता न्यून होते. मन शांत होते, तसेच झोप लागायला साहाय्य होते’, असे परिणाम लक्षात आले. दरबारी कानडा हा राग जर सतारीवर ऐकला, तर पुष्कळ लवकर झोप लागते.

१२ अ. निद्रानाशावर उपयुक्त असलेल्या ‘दरबारी कानडा’ या रागावरील अत्तर बनवणे

‘दरबारी कानडा’ हा राग निद्रानाशावर उपयुक्त आहे. या संदर्भातील एक प्रसंग म्हणजे आम्ही एका सहलीवरून परतत होतो. त्या वेळी एक मैत्रीण आमच्या गाडीत होती. खरेतर तिला गाडीत कधीच झोप लागत नाही. मी रात्री गाडीत पं. भीमसेन जोशी यांचा ‘दरबारी कानडा’ राग लावला आणि पुण्याला आमचे ठिकाण येईपर्यंत ती गाढ झोपली. ‘स्वतःला गाढ झोप केव्हा लागली ?’, हे तिला कळलेच नाही. उठल्यावर ती म्हणाली, ‘‘आतापर्यंतच्या माझ्या एवढ्या प्रवासात ‘मी पहिल्यांदा गाडीत झोपले.’’ हा संगीताचाच परिणाम म्हणता येईल !

या प्रसंगाचा अभ्यास करून ‘दरबारी कानडा’ या रागाचे अत्तर बनवतांना ‘मी मनातील चिंता आणि अस्वस्थता न्यून करण्यासाठी काय वापरू शकतो ?’ ‘अरोमा चिकित्सेमध्ये यासाठी कोणती तेले वापरली जातात ?’, असा अभ्यास करून त्यांचे मिश्रण केले. त्यानंतर माझ्या अभ्यासानुसार ‘ते आणखी चांगले बनवण्यासाठी काय घालता येईल ?’, असा विचार करून मी ‘दरबारी कानडा’ या रागाचे अत्तर बनवले. पहिल्या वर्षी आमचे ८ – ९ च रागांवर अत्तर सिद्ध झाले.

१२ आ. ‘बहार’ या रागावरील अत्तर सिद्ध करण्याच्या वेळी झालेला विचार !

‘बहार’ या रागाचे अत्तर बनवतांना माझा पुढील विचार झाला, ‘हा राग वसंत ऋतूमध्ये गायला जातो; म्हणून हे अत्तर वसंत ऋतूमध्ये फुलणार्‍या सगळ्या फुलांचे मिश्रण आहे. वसंत ऋतूत वेगवेगळी फुले फुललेली असतात. आपण बागेत चालत असतांना तेथे येणारा गंध थोड्या थोड्या वेळाने पालटतो. वसंत ऋतूशी संबंधित ‘केतकी, जाई, चंपक बन फुले’ ही बंदिशही प्रसिद्ध आहे. त्यामुळे ‘बहार’ या रागाचे अत्तर बनवतांना ‘पूर्ण बागेला किंवा सृष्टीला बहर आला आहे’, असा विचार करून त्या सर्व फुलांचे मिश्रण करून अत्तर बनवले आहे.

१२ इ. ‘मेघमल्हार’ रागावरील अत्तर बनवतांना झालेला विचार !

‘मेघमल्हार’ नावाच्या अर्थावरून त्याचे अत्तर बनवण्याचा विचार आला. मेघ म्हणजे पावसाळी ढग आणि पाऊस म्हणजे मातीचा सुगंध ! त्यामुळे ‘मेघमल्हार’ रागाचे अत्तर बनवतांना मी मुख्य पाया म्हणून ‘मातीचा सुगंध’ घेतला. जंगलातून जात असतांना झाडांची ओली पाने, मुळे, फळे-फुले आणि माती या सगळ्यांना येणारा सुगंध हा ‘मेघ’ आहे; कारण ‘मेघमल्हार’ हा पावसाळ्यात कधीही गायला किंवा वाजवला जातो आणि कधीही ऐकला, तरी डोळ्यांसमोर पावसाचे तेच वातावरण उभे करतो.

त्यामुळे ‘मेघमल्हार’ बनवतांना फुले तीच (बहार रागातील) आहेत, केवळ ती मातीत भिजलेली आहेत. ‘मेघमल्हार’ रागात ती फुले मातीचा सुगंध घेऊन आली आहेत, तर ‘बहार’ रागात तीच फुले ताज्या फुलांचा सुगंध घेऊन आली आहेत.

१२ ई. कोणतेही अत्तर बनवतांना पंचतत्त्वांशी संबंधित घटकांचा अभ्यास करणे

अशा प्रकारे एकेका रागाचे अत्तर बनवून आतापर्यंत आम्ही १७ रागांची अत्तरे बनवली आहेत. अजूनही काही प्रकारची अत्तरे बनवली जात आहेत; पण जेव्हा वाटते की, अमूक एक अत्तर चांगले झाले नाही, तेव्हा आम्ही थांबतो. तो राग ऐकतांना ‘त्याच्याशी संबंधित गंध कसा असेल ?’, हे मला जाणवते आणि ‘हा घटक अत्तरात वापरावा’, हे माझ्याकडून आपसूक केले जाते. कुठलेही अत्तर म्हटले, तर त्यात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही घटक असतात. आपण ‘आग’ हा शब्द उच्चारला, तर त्याच्याशी संबंधित शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण उभे रहातात. एखाद्या व्यक्तीचे नाव घेतले, तरी त्या नावामुळे ती व्यक्ती पूर्ण उभी रहाते. त्याचप्रमाणे हे गंधशास्त्र आहे.

 

१३. संगीत आराधनेचा निसर्गावर अनुभवलेला परिणाम

१३ अ. घरासभोवतालच्या फळझाडांना मोठ्या आकाराची फळे आल्यावर ‘घरात २० वर्षे
सातत्याने चालू असलेले शास्त्रीय संगीत आणि त्याच्या संगीत लहरी यांचा हा परिणाम आहे’, असे लक्षात येणे

आमच्या घरातील सगळ्यांना निसर्गाची पुष्कळ आवड असून घराच्या सभोवताली आंबा, फणस, चिकू, जांभूळ, नारळ, लिंबू आणि शेवगा यांचे प्रत्येकी एकेक झाड आहे. आमच्या घरातील नारळ, आंबा, चिकू, जांभूळ, आवळा या झाडांच्या फळांचा आकार बाजारातील अथवा अन्य कुठल्याही ठिकाणच्या फळांपेक्षा दुप्पट आहे. गेली २० वर्षे घरात सातत्याने शास्त्रीय संगीत चालू असल्याने घरात सर्वत्र संगीताच्या लहरी पसरलेल्या आहेत. तेव्हा मला लक्षात आले की, हा संगीताचा परिणाम असू शकतो; कारण आमच्या बागेत झाडांसाठी आवश्यक अशी पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात नाहीत. आमचे घर रस्त्याला लागून असल्याने वाहनांचे प्रदूषणही पुष्कळ आहे. सगळे जे खत घालतात, तेच आम्ही घालतो. मी कधी झाडांवर किटकनाशकांची फवारणी केली नाही. त्यामुळे ‘हा कशाचा परिणाम असावा ?’, असा विचार केल्यावर ‘हा संगीत लहरींचा परिणाम आहे’, असे माझ्या लक्षात आले.

१३ आ. घराच्या आवारातील आवळ्याच्या झाडाची फांदी
उन्हाच्या दिशेने न जाता संगीताच्या दिशेने घराच्या सावलीत येणे

मी घरातील माझ्या छोट्या कक्षात पुष्कळ गाणी ऐकायचो. त्या वेळी माझे संगीताचे ध्वनीमुद्रण करण्याचे काम अविरत चालू असायचे. हा माझा कक्ष घरात पूर्वेला आहे आणि तिथेच मागे घराच्या आवारात एक आवळ्याचे झाड आहे. सूर्योदयाचे ऊन नेहमी माझ्या कक्षात यायचे; पण काही काळानंतर कक्षात अंधार पडू लागला आणि अगदी सकाळच्या वेळीसुद्धा मला दिवा लावावा लागू लागला. त्या वेळी ‘एवढ्या सकाळी  ८ – ९ वाजता दिवा का लावावा लागतो ?’, असा मला प्रश्‍न पडला. तेव्हा लक्षात आले की, आवळ्याची संपूर्ण फांदी घरात आली आहे. निसर्गाचा साधारण नियम आहे की, सावलीत कुठेही झाड लावा, ते उन्हाच्या दिशेने मार्ग काढते; परंतु या झाडाची फांदी उन्हाच्या दिशेने न जाता उलट आमच्या कक्षात शिरली होती.

१३ इ. फणसाच्या झाडाचे मोठे मूळ पाण्याच्या दिशेने खाली न जाता घराच्या दिशेने येणे

एकदा आम्हाला काही कारणास्तव घरी खोदकाम करायचे होते. झाडाची मुळे पाण्याच्या शोधात भूमीत खाली जातात. खोदकाम करतांना एका फणसाच्या झाडाचे मोठे मूळ पाण्याच्या दिशेने खाली न जाता आमच्या घराच्या दिशेने आलेले दिसले; मात्र तेथे पाण्याचा कुठलाच उगम नव्हता.

या उदाहरणांवरून ‘संगीताचा परिणाम किती मोठ्या प्रमाणात होतो’, हे आमच्या लक्षात आले. मनोविज्ञानावरसुद्धा संगीताचा पुष्कळ परिणाम होतो. यासारखेच गंधाचेसुद्धा आहे.

 

१४. गंधाचे सगळ्यांत मोठे नाते आठवणींशी असून ‘एकदा घेतलेला
गंध अनेक वर्षांनंतरही ८० टक्के स्मरणात रहाणे’, हे गंधाचे सामर्थ्य असणे

आपल्या नासिकेतून दोन गंधवाहिका (ओलफॅक्टरी नर्व्हस्) आपल्या छोट्या मेंदूच्या प्रमस्तिष्क (सेरेब्रम) या भागात जातात. नाकाने घेतलेला गंध प्रमस्तिष्कात जातो आणि तेथे साठवला जातो. नंतर तेथे आपल्याला त्या गंधाचे (तो कशाचा गंध आहे, याचे) ज्ञान होते. मेंदूच्या ज्या भागात आपल्या भावना आणि आठवणी निर्माण होतात, त्या भागाशी गंध जोडलेला आहे. त्यामुळे गंधाचे सगळ्यांत मोठे नाते आठवणींशी आहे. हा सर्व वैज्ञानिक अभ्यास आहे. माझ्या असे लक्षात आले की, गंध,दृष्टी, स्वर किंवा ऐकणे, तसेच स्पर्श आणि चव यांमध्ये चव हा भाग वेगळा आहे; कारण चव पालटत असते.

‘सेन्स् ऑफ साईट’नुसार ‘आपण पाहिलेले एखादे दृश्य एक वर्षानंतर किंवा सहा मासांनंतर आपल्याला ४० टक्के, ऐकलेली एखादी गोष्ट ६ मासांनंतर ६० टक्के आणि एखादा गंध अनेक वर्षांनंतर ८० टक्के या प्रमाणात आठवू शकतो’, इतके गंधाचे सामर्थ्य आहे. शब्द आणि गंध किंवा स्वर अन् गंध हे एकमेकांना पूरक असतात. ऐकलेले लक्षात रहाते; म्हणून आपल्याकडे समज नसली, तरी पाठांतराला महत्त्व दिले आहे. याचसाठी पूजा किंवा पठण यांसारखी नित्यनैमित्तिक कर्मेही पूर्वीपासून करण्यास सांगितली आहेत.

 

१५. गंधाचा व्यावसायिकपणे उपयोग केल्यावर त्याचा
सकारात्मक परिणाम होणे; कारण विशिष्ट नाद आणि गंध
विशिष्ट वातावरणाची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरत असणे

गंधाचा वापर मी व्यावसायिक दृष्ट्याही करतो, उदा. काही पथिकाश्रम (हॉटेल्स), उपाहारगृह (रेस्टॉरंट्स), तसेच काही ‘स्पा’ज् (मसाज करण्याची केंद्रे) आहेत. त्यांचा जो विषय (थीम) आहे, त्याला अनुसरून मी सुगंध बनवतो. याचा मोठा सकारात्मक परिणाम होत आहे. आमच्या महाविद्यालयाजवळ कॉफीचे एक दुकान होते. आम्ही तिथे कॉफी प्यायला जायचो; परंतु हे दुकान आतील बाजूला असल्यामुळे ‘तेथे दुकान आहे’, हे कोणाच्या लक्षात यायचे नाही. मी त्या दुकानदाराला सांगितले, ‘मी कॉफीचा गंध बनवून देतो. तो तुम्ही दाराला लावा आणि त्याचा काय परिणाम होतो ?’, ते मला सांगा.’’ त्याने काही दिवसांनंतर मला सांगितले, ‘‘आता धंदा दुपटीने वाढला असून दाराला लावलेल्या कॉफीच्या गंधामुळे अनेक जण दुकानाकडे खेचले जात आहेत.’’ या गंधामुळेच कॉफीच्या दुकानात गेलो की, आपण तेथे अधिक वेळ रेंगाळतो. एखाद्या ठिकाणी जर अधिक चांगला गंध येत असेल, तर तिथेही आपण जास्त वेळ बसतो. मंदिरांत धूप, अगरबत्ती किंवा कापूर या गोष्टी सतत लावलेल्या असतात. त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्यासाठी सुगंध ही सगळ्यांत पूरक गोष्ट असते. ज्या ठिकाणी घंटा असते, तिथे आपण ड्रम वाजवत नाही; कारण घंटेशी संबंधित मृदुंगाचा नाद आहे. विशिष्ट नाद आणि विशिष्ट गंधच ते वातावरण निर्माण करायला कारणीभूत ठरतात.

श्री. आनंद जोग यांनी सिद्ध केलेली विविध गंधांची अत्तरे

 

१६. गानसमयानुसार अत्तरे बनवणे आणि त्या अत्तरांचे रंग
त्या गानसमयाच्या वातावरणाशी (आकाशाच्या रंगाशी) तंतोतंत जुळणे

मी पहिली ९ अत्तरे बनवली आणि त्यानंतर रागांच्या गानसमयानुसारही अत्तरे बनवली. मी सकाळचा ललत, सूर्योदयानंतरचा बिलावल, दुपारचा सारंग, मध्यान्हीनंतरचा मुलतानी, मारुबिहाग, बहार, चंद्रकंस, रात्रीचा दरबारी कानडा आणि हंसध्वनी हे राग निवडले आणि या रागांची अत्तरे सिद्ध केली. त्या अत्तरांची छायाचित्रे काढण्यासाठी आम्ही पहाटेचा ललत, सूर्योदयानंतरचा बिलावल, दुपारचा सारंग, मध्यान्हीनंतरचा मुलतानी, रात्रीचा मारूबिहाग आणि मध्यरात्रीचा दरबारी कानडा असे सकाळपासून रात्रीपर्यंतच्या रागांचे अत्तर क्रमाने ठेवले. माझ्या छायाचित्रकार मित्राने जेव्हा त्यांचेे छायाचित्र काढले, तेव्हा ‘त्या त्या अत्तराच्या कुपीत त्या त्या रागांच्या परिणामांचे अत्तर सिद्ध झाले आहे’, असे लक्षात आले.

अ. पहाटेचा राग ललत आहे आणि पहाटे सूर्योदयाच्या वेळी आकाशात तांबुस छटा असते. ललत रागाच्या अत्तराला तसाच रंग आला होता.

आ. त्यानंतर आकाशात सकाळच्या उन्हाचा पिवळा (टंगस्टन पिवळा) रंग असतो, बिलावल रागाच्या अत्तराचा रंग तसाच सिद्ध झाला होता.

इ. मध्यान्हीला आकाशाचा रंग गर्द पिवळा असतो, सारंग रागाच्या अत्तराचा रंग तसा होता.

ई. संध्याकाळी आकाशाचा रंग जसा केशरी असतो, तसा मुलतानी रागाच्या अत्तराचा रंग झाला होता.

उ. मारूबिहाग रात्रीचा राग आहे. त्याच्या अत्तराचा रंग लालसर काळा झाला होता.

ऊ. मध्यरात्रीच्या राग दरबारीचे अत्तर काळसर रंगाचे झाले होते.

याचा अर्थ त्या त्या ठिकाणी गंधासमवेत तेजतत्त्वही आले होते. यावरून गंध आणि राग यांच्यात समरसता असल्याचे लक्षात आले. हे सर्व आम्ही विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे होणारच आहे. सगळ्या नद्या जशा शेवटी सागरालाच जाऊन मिळतात, कोणत्याही देवाला केलेला नमस्कार केशवापर्यंत पोचतो; कारण शेवटी सगळे एकच आहे. तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, शेवटी तुम्हाला एकच अनुभूती येणार आहे.’’

– श्री. आनंद जोग, पुणे