लहानपणापासूनच देवाच्या अनुसंधानात असणारे संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) !

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

 

१. उत्साही आणि आनंदी

‘श्री. कुलकर्णीकाका दुपारी किंवा रात्री उशिरा भेटले, तरी ते नेहमी उत्साही आणि आनंदी दिसतात. ते तेजस्वी दिसतात. मला निराशा आली असतांना मी कधी त्यांना भेटायला गेल्यास त्यांच्याशी बोलल्यावर मी उत्साही होते.

 

२. देवाशी अनुसंधान

अ. त्यांना लहानपणापासूनच देवाशी बोलण्याची आवड आहे. ते लहान असतांना सर्वकाही देवाला सांगायचे. आताही ते देवाशी बोलतात.

आ. ते तरुणपणी प्रत्येक शनिवारी भद्रा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी (संभाजीनगरपासून अनुमाने २५ कि.मी. अंतर) चालत जायचे. त्यानंतरही ते नियमितपणे प्रत्येक शनिवारी गाडीने जायचे. सेवेचा कालावधी वाढल्यावर मारुतीच्या दर्शनाला जाणे न्यून झाले.

इ. त्यांना सेवेसाठी सकाळी लवकर बाहेर जायचे असल्यास ते लवकर उठून देवपूजा करतात.

ई. त्यांनी त्यांच्या कार्यालयातील एक खोली शेणाने सारवून तिथे ध्यानमंदिर केले आहे. काका त्या ठिकाणी बसून नामजप करतात.

उ. एकदा मी धुळे येथील अधिवेशन झाल्यानंतर काकांसमवेत चारचाकीने संभाजीनगर येथे आले. तेव्हा काका पूर्ण प्रवासात मोठ्याने नामजप करत होते.

 

३. आध्यात्मिक उपाय करण्याचे महत्त्व जाणणे

काका नामजप करतांना कधीच भ्रमणभाषवर बोलत नाहीत. त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’पासून टोपी बनवली आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्य मिळावे, यासाठी ते प्रवासात असतांनाही ही टोपी घालतात.

 

४. गुरुकार्याचा ध्यास

कु. चैताली डुबे

अ. ते कितीही व्यस्त असले, तरी जिल्ह्यात राष्ट्रीय हिंदू आंदोलन किंवा निषेध मोर्चा असल्यास ते आवर्जून उपस्थित असतात. तेथे आल्यावरही ते स्वत:चे वेगळेपण न जपता सर्व साधकांप्रमाणे हातात ध्वज धरतात. ते स्वतःहून साधकांकडे हातात घेण्यासाठी फलक मागतात.

आ. त्यांना कुठे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा किंवा राष्ट्रीय हिंदू आंदोलन आहे’, असे समजल्यास ते यशस्वी होण्यासाठी स्वत:हून प्रार्थना करतात.

इ. ते दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करतात. काका दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून झाल्यावर त्यांच्या भावाकडे देतात आणि त्याला ते अजून एके ठिकाणी द्यायला सांगतात.

 

५. अल्प अहं

अ. ते कधीच स्वत:चे कौतुक सांगत नाहीत. परात्पर गुरुदेवांनी काकांचे कौतुक केले असल्यासही काका त्याचा कधीच उल्लेख करत नाहीत; मात्र गुरुदेव चपळगावकर काकांविषयी काही म्हणाले असल्यास काका ते आवर्जून कौतुकाने सांगतात.

आ. ‘मी काही करत नाही. तुम्ही सर्व जण पुष्कळ करता’, असे म्हणून ते नेहमी इतरांचे कौतुक करतात.

 

६. सूक्ष्मातील जाणणे

एकदा काका अधिवेशनासाठी आले होते. त्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करताक्षणी त्यांना त्रास जाणवला. त्यांनी लगेच त्याविषयी सांगितले.

 

७. भाव

अ. काकांच्या कार्यालयात गेल्यावर पुष्कळ चैतन्य जाणवते. काकांमधील भावामुळे तेथे गेल्यावर ‘मंदिरात गेलो आहोत’, असे जाणवते.

आ. त्यांच्या कार्यालयात संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आहे. काकांमधील भावामुळे ते छायाचित्र सजीव झाल्याचे भासते.

 

८. गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा

‘गुरुदेवांची माझ्यावर कृपा आहे. त्यामुळे मला कसला त्रास नाही किंवा कशाचे भय नाही’, असे ते म्हणतात. ‘वेगवेगळ्या प्रकारच्या ‘केसेस’ हाताळतांना मला काही होणार नाही’, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.’

– कु. चैताली डुबे, संभाजीनगर (२८.५.२०१९)