तुळजापूर (जि. धाराशिव) येथील पू. (श्रीमती) पुतळाबाई देशमुख (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१. घरची श्रीमंती असूनही नातलगांनी आर्थिक साहाय्य न
केल्याने कुटुंबासहित २ वर्षे बहिणीकडे आणि नंतर काही
दिवस वडिलांच्या घरी रहावे लागणे आणि त्यानंतर स्वतःचे घर घेणे

‘आमचे मूळ गाव देवळाली (जि. धाराशिव) होते. यजमान आणि ३ मुले यांसह आम्ही तुळजापूरला आलो. त्या वेळी आमच्याजवळ फार काही साहित्य नव्हते. घरची श्रीमंती होती; पण नातलगांनी आम्हाला काही आर्थिक साहाय्य केले नाही. त्यामुळे आम्हाला पूर्ण कुटुंबासहित २ वर्षे बहिणीकडे रहावे लागले. नंतर काही दिवस वडिलांच्या घरी रहावे लागले. त्यानंतर आम्ही स्वतःचे घर घेतले. कुटुंबात यजमान, ३ मुले आणि स्वतः, असे ५ जण होतो.

 

२. आवड

मला स्वच्छतेची आवड आहे. मी सर्व कामे घरी करत होते. मी ‘वाडा सारवणे, भिंती सारवणे, नवरात्रात सगळे घर धुणे, म्हशींच्या धारा काढणे’, अशी कामे करायचे.

 

३. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी करत असलेली साधना

अ. कुटुंबात गोशा पद्धत होती. त्यामुळे घरातील स्त्री अधिक बाहेर पडत नसे. केवळ हळदी-कुंकू किंवा लग्न समारंभ असेल, त्याच वेळी स्त्रिया बाहेर पडत असत.

आ. मी देवपूजा करत असे. देवपूजा नियमित करत असल्याने माझा त्यात पुष्कळ वेळ जात होता.

इ . मी ११ वर्षे श्रावण मासात ४०, ३५ किंवा २८ दिवसांचे ग्रंथाचे पारायण करण्याचे आयोजन करत असे. शेजारी-पाजारी यांना ७ दिवस बोलावून ते ऐकत असे. नंतर उद्यापनाच्या दिवशी १ सहस्र माणसे जेवण्यासाठी बोलावून त्यांना जेवू घालायचे आणि घरातील सगळ्यांना अन् पारायण करणाऱ्या सगळ्यांना तीर्थक्षेत्री घेऊन जायचे. या सगळ्याचा मला पुष्कळ ताण यायचा, तरीही मी हे सतत करत होते.

ई. एकादशी आदी दिवशी मी भजनाला जात असे.

उ. मी प्रतिदिन सकाळी चालत श्री भवानीदेवीच्या दर्शनाला जात असे.

ऊ. मी मधे-मधे तुळजापूरच्या देवीसाठी श्रीखंडाचे सिंहासन करत असे.

ए. मी गरीब लोकांना जेवण देत असे.

ऐ. मी गायीचे पूजन करत असे आणि संध्याकाळी देवाजवळ दिवा लावत असे.

हे सर्व मी साधना म्हणून करत असे.

 

४. सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर

४ अ. वर्ष २००२ मध्ये मी साधनेत आले. सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी गोष्टी आचरणात आणत असे.

४ आ. आमच्याकडे असलेले पिशवी भरून देव मी इंद्रायणीमध्ये विसर्जित केले. त्यांत चांदीचे देव होते. ‘त्यांचे काय करायचे ?’, हे विचारून ती चांदी वितळवून त्यांच्या वस्तू बनवून घेतल्या.

४ इ. गोशा पद्धतीवर मात करून प्रसारासाठी घराबाहेर पडणे : गोशा पद्धतीवर मात करून मी समाजात जाऊन प्रसार केला. त्या वेळी तुळजापूरमध्ये बरेच नातेवाईक होते. ‘त्यांना काय वाटेल ?’, असा विचार माझ्या मनात आला नाही. त्या वेळी ‘सेवा करूया’, असा विचार तीव्र असल्याने मी प्रसारात जाऊ शकले. काही जण मागे बोलायचे; पण ‘मी सेवा काय करते ?’, हे कळल्यावर तेही सकारात्मक झाले.

४ ई. अनेक वर्षांपासून करत असलेली पारायणे बंद करून नामजपाला आरंभ करणे : पूर्वी पुष्कळ पारायणे केली; पण ती करतांना आणि त्यांचे नियोजन करतांना माझा जीव त्रासून जायचा. सनातन संस्थेत आल्यावर आम्ही पारायण करणार होतो. त्या वेळी आम्हाला सत्संगात सांगितले, ‘‘पारायण करण्यासाठी, त्याच्या सिद्धतेसाठी आणि त्याच्या नियोजनासाठी तुमचा पुष्कळ वेळ जातो. त्या वेळेत तुम्ही नामजप केल्यास ते अधिक चांगले होईल.’’ त्या दिवसापासून पारायण करणे बंद केले. त्यामुळे आजूबाजूचे लोक म्हणायचे, ‘‘देशमुखमाई किती दिवसांपासूनचे चालू असलेले पारायण कोणाच्या तरी सांगण्यावरून बंद करत आहेत.’’ मी त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि नामजप केला.

४ उ. ‘ज्ञानदान श्रेष्ठ दान आहे’, हे कळल्यावर ज्ञानदान (अध्यात्मप्रसार) करणे : पूर्वी अन्नदान श्रेष्ठ वाटून नातेवाईक आणि पाहुणे यांना मी जेवायला बोलावत असे. दारात गोर-गरीब आले, तर मी त्यांना जेवण देत असे. घरात काहीतरी विधी किंवा पूजा करून अन्नदान केले जायचे. त्यानंतर अन्नदानापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ असल्याचे समजले आणि अन्नदानाऐवजी ज्ञानदान (प्रसार) करण्यास आरंभ केला.

 

५. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी ‘माई’ असे नामकरण करणे

सगळे मला ‘देशमुख मम्मी’ असे म्हणत. नंतर पू. (सौ.) संगीता जाधव यांनी एका गुरुपौर्णिमेला माझे ‘माई’ असे नामकरण केले. तेव्हापासून सर्व साधक मला ‘माई’ म्हणतात; पण काही जुने ओळखीचे लोक अजूनही ‘मम्मी’ म्हणतात.

 

६. सध्या करत असलेल्या सेवा

अ. अर्पण गोळा करणे, प्रसार करणे, साप्ताहिक सनातन प्रभातचे वितरण करणे, वैयक्तिक संपर्क करणे

आ. नवरात्र आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा यांसाठी मोठे अर्पण मिळवणे, तसेच जेवण, अल्पाहार, खाऊ आणि धान्य यांसाठी प्रायोजक मिळवणे

इ. घरी सत्संग असतील, तेव्हा साधकांच्या जेवणाची सोय करणे

ई. घरातील सुनांना सेवा करायला मिळावी आणि सत्संग मिळावा; म्हणून स्वतः नातवंडांना सांभाळणे.

उ. बालसंस्कार वर्गाची सिद्धता करणे, मुलांना बोलावणे, पालकांना संपर्क करणे इत्यादी.

 

७. स्वभावदोष-निर्मूलनासाठी करत असलेले प्रयत्न

अ. मला लिहिता येत नाही. त्यामुळे स्वतःच्या लक्षात येणारे स्वभावदोष घालवण्यासाठी मी प्रयत्न करते.

आ. प्रसाराला गेल्यावर मी साधकांना माझ्या चुका विचारते.

इ. एकदा मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना विचारले, ‘‘माझ्या चुका तर होतातच; पण मला माझे काहीच समजत नाही. मी काय प्रयत्न करू ?’’ त्यावर सद्गुरु दादा म्हणाले, ‘‘स्वयंसूचना द्या; पण तुम्हाला त्याची काही आवश्यकताच नाही. स्वयंसूचना कशाला द्यायची ? तुम्ही संपूर्ण आज्ञापालन करता’’, तरी मी फार धास्तीने स्वयंसूचना सत्र करायचे. पहिल्यांदा १५ सत्रे करायला सांगितली होती. नंतर परत ‘१२ सत्रे तरी करा’, असे सांगितले. मग मी १२ सत्रे करत होते.

 

८. परात्पर गुरुदेव आले असतांना त्यांनी अंघोळीसाठी केवळ
अर्धी बालदीच पाणी घेणे, तेव्हापासून अधिक पाणी न वापरणे

‘काटकसरीपणा’ हा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. पाणी अधिक वापरलेले मला आवडत नाही. सनातन संस्थेचे संत पू. पात्रीकरकाका यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही घरी अंघोळीसाठी १ बालदी पाणी घेत असाल, तर आश्रमात निदान अर्धी बालदी तरी घेत जा.’’

परात्पर गुरुदेव डॉ. आठवले तुळजापूरला आल्यानंतर त्यांनी अंघोळीसाठी केवळ अर्धी बालदीच पाणी घेतले होते. ते देवच आहेत ! त्यांना कशाला पाणी लागते ? त्यांनी स्वतःच कपडे धुऊन-पिळून वाळत घातले. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाका त्यांच्या समवेत होते. त्यांनी किती अल्प पाणी घेतले होते ! तेव्हापासून आम्हीही अधिक पाणी वापरत नाही. ही गोष्ट मी साधकांना सांगते. तेव्हा ते म्हणतात, ‘‘तुम्ही सांगितल्यापासून आम्हीही अल्प पाणी वापरतो.’’

९. आपल्या एकेका साधकाचे गुण घेण्यासारखे
असतात. ‘ते शिकून सगळ्यांनीच त्याप्रमाणे आचरण करावे’, असे मला वाटते.

१०. करत असलेल्या विविध प्रार्थना

१० अ. वास्तूदेवतेला प्रार्थना करणे

मी सकाळी वास्तूदेवतेला प्रार्थना करते. आमचेे पाप-पुण्य पोटात घेऊन रात्रभर ती आम्हा सर्वांचे रक्षण करते; म्हणून तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

१० आ. सर्व देवता, निसर्ग आणि सजीव-निर्जीव वस्तू यांना प्रार्थना करणे

आकाशदेव, भूमाता, आठही दिशांच्या देवता, स्थानदेवता, पंचमहाभूते, ग्रामदेवता, रामनाथी, देवद आणि मिरज येथील आश्रम अन् सर्वत्रच्या आश्रमदेवता, निसर्गदेवता, सजीव-निर्जीव वस्तू, जीव-जंतू, कीडा-मुंगी, पशू-पक्षी, वेली, वनस्पती, फुले, मोठ-मोठे वृक्ष या सर्वांना मी नमस्कार करते. ‘माझा नमस्कार तुमच्या चरणी पोचू द्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि कृतज्ञता व्यक्त करते.

१० इ. परात्पर गुरुदेवांसाठी प्रार्थना करणे

परात्पर गुरुदेवांसाठी प्रार्थना करते. दैनिक सनातन प्रभातमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काही छापून आले, तर तशी प्रार्थना करते, उदा. मधे त्यांना उष्णतेचा त्रास होत होता, तेव्हा ‘परात्पर गुरुदेवांच्या शरिरात वाढलेली उष्णता न्यून होऊ दे’, अशी प्रार्थना करते, तसेच श्री दुर्गादेवीलाही पुढीलप्रमाणे प्रार्थना करते,

१० ई. श्री दुर्गादेवीला प्रार्थना करणे

‘हे श्री दुर्गादेवी, गुरुदेवांचे आरोग्य चांगले ठेव. त्यांना दीर्घायुष्य दे. त्यांची प्राणशक्ती वाढू दे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर कर. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या या कार्यामध्ये आम्हा सर्व साधकांचा सहभाग असू दे. या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्हाला शक्ती दे. लवकरात लवकर हिंदु राष्ट्र येऊ दे. आम्हा सगळ्या साधकांचे त्रास दूर कर. सूक्ष्मातील सर्व अडथळे दूर होऊ दे. तुझ्या चैतन्याचे संरक्षक कवच आम्हा सर्व साधकांभोवती निर्माण कर. सनातनवरील बंदीचे संकट दूर कर. सर्व साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांचे मन आणि बुद्धी यांवरील आवरण दूर कर. आमच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेतील अडथळे दूर कर. आपत्काळात योग्य साधना होऊन सर्वांचे रक्षण होऊ दे. ‘हिंदु राष्ट्रा’साठी तुझा आशीर्वाद असू दे. सनातनचे धर्मकार्य निर्विघ्नपणे पार पडू दे.’

१० उ. सूर्यदेवालाही संपूर्ण शरण जाऊन वरील प्रार्थना करते.

११. भावजागृतीसाठी करत असलेला प्रयत्न

मी श्रीमत् नारायणाचे पुढील रूप अनुभवते आणि तेच रूप हृदयात साठवते, ‘श्रीमत् नारायण शेषशय्येवर बसले असून त्यांनी त्यांचे चरण चौरंगावर ठेवले आहेत. त्यांच्या पायांत तोडे असून ते पितांबर नेसले आहेत. त्यांनी त्यांचे दोन्ही हात लोडावर ठेवलेले आहेत. त्यांच्या हाताच्या बोटांत अंगठ्या आहेत. त्यांनी महर्षींनी सांगितल्यानुसार गळ्यात मोत्याची माळ घातली आहे. त्यांच्या कपाळावर लाल गंध दिसते आहे. शेषनागाचा फणा दिसत आहे.’

१२. आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१२ अ. एकदा मी ‘मिक्सर’वर काम करत होते. तेव्हा माझ्याकडून ‘मिक्सर’चे खालचे बटण चालू राहिले आणि त्याच वेळी मी मुख्य बटण (मेन स्वीच) चालू केले. त्यामुळे ‘मिक्सर’ चालू झाला आणि माझे बोट ‘मिक्सर’मध्ये सापडले. तेव्हा तेथे कोणीच नसल्याने मीच मुख्य बटण बंद केले. माझ्या बोटातून रक्त वहात होते. मी हात बांधला आणि साडी पालटून सूनेसह आधुनिक वैद्यांकडे गेले. त्या वेळीही माझे मन स्थिर होते.

१२ आ. माझ्या मुलाला नागीण झाली होती. मुलाला अनेक औषधे देऊनही तो बरा होत नव्हता. तेव्हा आमच्या घरी यजमानांचे निधन झाल्यामुळे पू. भाऊ परब आम्हाला भेटण्यासाठी घरी आले होते. त्यांच्या समवेत पुष्कळ साधकही होते. त्यांच्या सहवासात असतांना मुलाच्या अंगाला पुष्कळ कंड येत होती. त्याच्या अंगाची लाही-लाही होत होती. पू. भाऊ परब परत जाण्यास निघाले. तेव्हा त्यांना सोडायला मी आणि माझा मुलगा दारापर्यंत गेलो. त्या वेळी त्याची नागीण पूर्ण बरी झाली असल्याचे जाणवले. त्याला थंड वाटत होते. पू. भाऊ परब यांच्या २ – ३ घंट्यांच्या सत्संगाने तो पूर्ण बरा झाला, असे मला जाणवले.

१२ इ. मला स्वप्नात पुढील दृश्य दिसले, ‘मी पडले आणि माझ्या हातातील बांगड्या फुटल्या. तेव्हा ‘मला कोणीतरी मागून आधार देत आहे’, असे जाणवले आणि मी तोल सावरला. त्या वेळी ‘देवानेच मला आधार देऊन माझा तोल सावरला आहे’, असे वाटले.

१२ ई. रामनाथी आश्रमात येतांना आणि आल्यावर आलेल्या अनुभूती

१२ ई १. माझी मान आणि कंबर येथील मणक्याची हाडे झिजल्याने मी दिवसभर झोपून असते. तुळजापूर ते रामनाथी आश्रम हा १२ घंट्यांचा प्रवास करणे मला अशक्यच होते. हा प्रवास चारचाकी गाडीने असल्याने मला सलग बसून रहावे लागले. त्या वेळी पूर्ण प्रवासात मला कुठलाच त्रास झाला नाही. प्रवासात मी मानेचा आणि नंतर कमरेचा पट्टाही (बेल्ट) काढून ठेवला होता. ‘गोव्याला जातांना पुष्कळ घाट आणि वळण असल्याने मला त्रास होईल’, असे माझ्या मुलांना वाटले; पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.

१२ ई २. आम्ही रामनाथी आश्रमाच्या प्रवेशद्वारातून आत आलो. हात-पाय धुतले आणि चूळ भरली. तेव्हा माझा मुलगा म्हणाला, ‘‘येथील पाणी किती गोड आहे !’’ नंतर मी चूळ भरली. तेव्हा मला ते पाणी नारळाच्या पाण्यासारखे गोड वाटले.’

– (पू.) श्रीमती पुतळाबाई देशमुख, तुळजापूर (२३.३.२०१९)