आनंद, चैतन्य अन् निर्गुणतत्त्वाची अनुभूती देणारा रामनाथी येथील सनातन आश्रमातील अद्वितीय संत सन्मानसोहळा !

Article also available in :

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे माता-पिता संतपदी विराजमान !

ज्यांच्या गर्भातून जन्मल्या सद्गुरुद्वयी।
आज विराजिल्या संतपदी त्या मातृद्वयी ॥
सद्गुरुद्वयींचे पिताही आज संत जाहले ।
हे सुवर्णक्षण साधकांनी हृदयमंदिरी कोरले ॥
कृतज्ञ असे सनातन परिवार या संत माता-पित्यांच्या ठायी ।
ज्यांनी दिल्या आम्हा दोन्ही सद्गुरुमाई ॥

 

डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. सदाशिव परांजपे, पू. (सौ.) शैलजा परांजपे, पू. (श्रीमती) हिरा मळ्ये आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी (गोवा) – सनातनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जावी, अशी अद्वितीय घटना येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात वैशाख शुक्ल पक्ष नवमीला म्हणजे १३ मे २०१९ या दिवशी घडली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातनच्या साधकांना परमवंदनीय आणि गुरुस्वरूप असणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे माता-पिता संतपदी विराजमान झाल्याची शुभवार्ता आश्रमातील एका भावसोहळ्यातून मिळाली. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वडील पू. सदाशिव परांजपे (वय ७६ वर्षे) हे सनातनचे ८९ वे आणि आई पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७१ वर्षे) या ९० व्या, तसेच सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आई श्रीमती हिरा मळये (वय ८२ वर्षे) या ९१ व्या व्यष्टी संत अन् वडील कै. वसंत मळये हे ९२ वे संत झाल्याचे या वेळी घोषित करण्यात आले.

पू. सदाशिव परांजपे (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

या मंगल प्रसंगी या सर्वांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सद्गुरुपद प्राप्त केल्याचे वर्ष २०१६ मध्ये एकाच दिवशी घोषित करण्यात आले होते. आता दोघींचे माता-पिता संतपदी आरूढ झाल्याचे एकाच दिवशी घोषित करण्यात आले. माघ मासात सद्गुरुद्वयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ असल्याचे घोषित झाल्यानंतर वैशाख मासात हा संस्मरणीय सोहळा झाल्याने साधकांचा आनंद द्विगुणित झाला.

पू. (सौ.) शैलजा परांजपे (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

एकाच दिवशी ४ संत देऊन गुरुमाऊलीने साधकांवर भरभरून कृपावर्षाव केला. असे अमूल्य क्षण अनुभवायला देणारी गुरुमाऊली, सद्गुरुद्वयी आणि त्यांचे संत माता-पिता यांच्या चरणी अक्षय आनंद देणार्‍या या सोहळ्याचा वृत्तांत कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहोत. ‘या शब्दरत्नांच्या माध्यमातून सर्वत्रच्या साधकांना ‘हा सोहळा जणू प्रत्यक्षच अनुभवत आहोत’, याची अनुभूती घेता यावी अन् त्यांनाही सोहळ्यातील निर्गुणतत्त्वाचा लाभ व्हावा’, हीच कृपाळू गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना आहे !

पू. (श्रीमती) हिरा मळये (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

या संतसन्मान सोहळ्याला पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचे जावई पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, कन्या सौ. कल्पना सहस्रबुद्धे, धाकटी कन्या सौ. शीतल गोगटे, नात सौ. सायली करंदीकर (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची कन्या), नातजावई श्री. सिद्धेश करंदीकर, नात कु. निधी गोगटे यांसह त्यांचे व्याही, सनातनच्या गोवा येथील येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. माधव गाडगीळ अन् ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. माधुरी गाडगीळ आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. पू. (श्रीमती) हिरा मळये यांचा नातू श्री. सोहम् सिंगबाळ (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा पुत्र) हेही या वेळी उपस्थित होते. सोहळ्याला सनातनचे संत पू. महेंद्र क्षत्रिय, पू. सीताराम देसाई आणि पू. (सौ.) मालिनी देसाई यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सनातनचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी सोहळ्याचे भावपूर्ण, उत्स्फूर्त, सहज अन् सुंदर असे सूत्रसंचालन केले.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी पू. सदाशिव परांजपे यांचा, तर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा हार घालून सन्मान केला. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. (श्रीमती) हिरा मळयेे यांचा हार घालून सन्मान केला.

 

अशी झाली संतपदाची घोषणा

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या शुभदिनी साधकांना श्रीगुरूंचे श्रीसत्यनारायण रूपात दर्शन लाभले. या संस्मरणीय भावसोहळ्यात आलेल्या अनुभूती १३ मे २०१९ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या आरंभी साधकांनी सांगितल्या.

२. सौ. परांजपेआजी या मधुरवाणीतून त्यांना आलेल्या अनुभूती कथन करत असतांना ‘त्या ऐकतच रहाव्यात’, असे साधकांना वाटत होते.

३. यानंतर श्री. परांजपेआजोबा यांनीही त्यांना जन्मोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती सांगितल्या. श्री. विनायक शानभाग यांनी आजोबांना व्यासपिठावर येऊन आणखी अनुभूती सांगण्याची विनंती केली.

४. व्यासपिठावर सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू, त्यांचे आई-वडील श्री. आणि सौ. परांजपे आजीआजोबा अन् सद्गुरु (सौ.) बिंदाताई आसंदीत बसले होते. एक आसंदी रिकामी होती. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी ‘या सोहळ्याला सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या आई उपस्थित असून त्यांना पहायला मिळणे, हा एक सुवर्णक्षणच आहे’, असे सांगितले अन् त्यांनाही व्यासपिठावर येण्याची विनंती केली.

५. श्री. विनायक शानभाग यांनी ‘व्यासपिठावर आसनस्थ सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, त्यांचे आई-वडील आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् त्यांच्या आई यांच्याकडे पाहून काय जाणवते ?’ असे विचारले. एक एक साधक ‘व्यासपिठाकडे पाहून काय जाणवते ?’ याविषयीच्या अनुभूतींचे विश्‍व उलगडत होता. या वेळी सनातनच्या सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी सोहळ्याच्या ठिकाणचे वातावरण जनलोकातील वातावरणाप्रमाणे असल्याचे सांगून परांजपे आजीआजोबा आणि श्रीमती मळयेेआजी यांच्या संतत्वाचे गुपित नकळतपणे उलगडले.

६. यानंतर सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांची आई श्रीमती मळयेेआजी आणि वडील कै. वसंत मळयेे यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवत ते संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले.

७. यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा एक शब्द ऐकण्यासाठी आपण आतुर असतो ना ! गुरूंचे एक एक वाक्य आपल्यासाठी ब्रह्मवाक्य असते’, या भावयुक्त शब्दांनी आरंभ करून परांजपे आजी आणि आजोबा यांच्याविषयीचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवला आणि त्यांनी संतपद प्राप्त केल्याची शुभवार्ता दिली.

 

पू. परांजपेआजोबा आणि आजी यांच्यातील संतत्व
उलगडणारी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी सांगितलेली सूत्रे

संतआई पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना नमस्कार करतांना त्यांची पुत्री म्हणजेच सद्गुरुमाई सौ. अंजली गाडगीळ

अ. पू. परांजपेआजोबा आणि पू. आजी यांनी एकमेकांसमवेत विविध नाती अनुभवणे

आई जेव्हा बाबांना ‘नामजपाला बसूया’, असे म्हणते, तेव्हा बाबा लहान बाळाप्रमाणे तिचे आज्ञापालन करतात. कधी आई ही बाबांची आई होते, तर कधी दोघे एकमेकांचे बहिण-भाऊ होतात. अशा प्रकारे आई आणि बाबा एकमेकांसमवेत विविध  नाती अनुभवत असतात.

आ. सातत्याने समष्टीचा विचार करणारे पू. परांजपेआजोबा आणि पू. आजी !

आई आणि बाबा यांच्यातील बोलणे अन् त्यांच्या कृती या समष्टीसाठीच असतात. दोघे सतत साधकांचा विचार करतात. त्यांच्यासाठी नामजप करतात.

इ. शिक्षेतही गोडवा अनुभवणारे परांजपे कुटुंबीय !

लहानपणी आमचे काही चुकल्यास आम्हा तिघी बहिणींना आई उन्हात उभे रहाण्याची शिक्षा करायची. तेव्हा आम्हाला वाटायचे, ‘बाबा केव्हा येतील ? म्हणजे आम्ही त्यांच्या पाठोपाठ हळूच घरात जाऊ.’ बाबा आल्यावर आम्हाला म्हणायचे, ‘‘थांबा. हळूहळू ती शांत होईल. लगेच येऊ नका.’’ कधी आई रागावली असल्यास बाबा आम्हाला सांगत, ‘‘आज वातावरण गरम आहे. ‘राम राम’, असे म्हणा.’’ आम्हाला मिळत असलेल्या शिक्षेतही असा गोडवा होता. शिक्षेतही सुंदर समन्वय होता.

 

सहजता, निर्मळता, भाव आणि तळमळ या गुणांनी
अध्यात्मातील सप्तपदी चालतांना सनातनच्या ८९ व्या आणि
९० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झालेले सांगलीतील पू. (श्री.)
सदाशिव परांजपे (वय ७६ वर्षे) आणि सौ. शैलजा परांजपे (वय ७१ वर्षे) !

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वडील सांगलीतील श्री. सदाशिव परांजपे (वय ७६ वर्षे) आणि त्यांच्या मातोश्री सौ. शैलजा परांजपे (वय ७१ वर्षे) हे दोघेही पहिल्यापासून धार्मिक वृत्तीचे आहेत. त्यांनी उतारवयात साधनेला आरंभ केला आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे या वयात संगणक शिकून ते तळमळीने संगणकीय सेवाही करू लागले. ते दोघेही एकमेकांना साधनेत साहाय्य करतात. ते परस्परांशी एवढे एकरूप झाले आहेत की, ‘पती-पत्नी’ या नात्याच्या पुढे जाऊन त्यांच्यात एक सुंदर आध्यात्मिक नाते निर्माण झाले आहे.

व्यावहारिक कर्तव्ये उत्कृष्टपणे पार पाडतांना ‘आध्यात्मिक जीवन कसे जगायचे ?’, याचा त्यांनी वस्तूनिष्ठ आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. या उभयतांमधील भाव, निर्मळता आणि धर्माचरण यांमुळे त्यांच्या घरातही चैतन्य निर्माण होऊन त्यांच्या घराचा जणू आश्रमच बनला आहे.

परांजपेकाकांमध्ये अव्यक्त भाव आहे, तर काकूंमध्ये व्यक्त भाव आहे. खरेतर दोघांची प्रकृती भिन्न असूनही त्यांच्यातील भाव, तळमळ आदी गुणांमुळे ती साधनेला पूरक बनली आहे. त्यामुळे उभयतांनी आध्यात्मिक सप्तपदी चालतांना संतपदापर्यंत स्वतःची प्रगती करून घेतली. श्री. सदाशिव परांजपे सनातनच्या ८९ व्या आणि सौ. शैलजा परांजपे या सनातनच्या ९० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्या आहेत. या उभयतांच्या संतपद प्राप्तीमुळे सनातनच्या इतिहासात आज आणखी एक विलक्षण घटना घडली, ती म्हणजे एकाच परिवारातील ४ जण संतपदावर आरूढ झाले आहेत. पू. परांजपे दांपत्याची कन्या सद्गुरु (सौ.) अंजली या सद्गुरु पदावर, तर त्यांचे जावई पू. मुकुल गाडगीळ हे संत पदावर विराजमान आहेत.

‘पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

निर्मळता, निरपेक्षता आणि भगवद्भक्ती या
गुणांद्वारे सनातनच्या ९१ व्या व्यष्टी संतपदावर आरूढ झालेल्या
श्रीमती हिरा मळये (वय ८२ वर्षे), तर निरासक्त कर्मयोग्याप्रमाणे अवघे आयुष्य व्यतीत
करणारे मडगाव, गोवा येथील कै. वसंत मळये सनातनच्या ९२ व्या संतपदावर विराजमान !

‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मातोश्री गोव्यातील श्रीमती हिरा वसंत मळये यांची वृत्ती मुळातच सात्त्विक असून बालपणापासूनच त्यांच्यावर दत्तभक्तीचा संस्कार झाला आहे. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’, अशी भगवंतावर दृढ श्रद्धा असल्यामुळे त्या कोणत्याही कठीण प्रसंगाला धिराने आणि आनंदाने सामोर्‍या जातात अन् त्यांना पदोपदी देवाच्या अनुभूतीही येतात.

भगवद्गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।’ या उक्तीप्रमाणे फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी कौटुंबिक कर्तव्ये निरपेक्षपणे पार पाडली. ऐहिक कर्तव्ये पार पाडतांना भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहून त्यांनी कोणत्याही बाह्य मार्गदर्शनाविना एकलव्याप्रमाणे साधना केली.

वर्ष २०१५ मध्ये आजी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या. निर्मळता, निरपेक्ष प्रीती, ईश्‍वरावरील दृढ श्रद्धा, अल्प अहं आदींमुळे अवघ्या साडेचार वर्षांतच ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या सनातनच्या ९१ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या आहेत. आजींच्या तोंडवळ्यावरील सात्त्विकतेचे तेज आणि त्यांची आनंदावस्था पाहून काही साधकांनाही त्यांच्यातील संतत्वाची प्रचीती येत होती.

त्यांचे यजमान कै. वसंत मळये, म्हणजे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वडील यांनी वर्ष २०१३ मध्ये देहत्याग केला. अन्यायाविरुद्धची चीड त्यांच्या रक्तातच भिनली होती. ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून निरपेक्षपणे आणि क्षात्रभावाने कर्तव्य बजावतांना त्यांना प्रसंगी कारागृहातही जावे लागले. देशसेवा करता करता ते इतरांच्या साहाय्यालाही तत्परतेने धावून जात. ‘त्याग’ हा स्थायीभाव असलेले आणि सर्वांचा आधारस्तंभ बनलेले कै. वसंत मळये यांनी एखाद्या निरासक्त कर्मयोग्याप्रमाणेच आपले अवघे आयुष्य व्यतीत केले. आता त्यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली असून ते सनातनच्या ९२ व्या संतपदावर विराजमान झाले आहेत.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. नीलेश सिंगबाळ हे दोघेही संतपदी विराजमान असल्याने ‘एकाच परिवारातील चौघे जण संतपदावर आरूढ असणे’, ही सनातनच्या इतिहासात आणखी एक अद्वितीय घटना घडली आहे. त्यांचा नातू श्री. सोहम् सिंगबाळ (वय २२ वर्षे) हाही सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे.

‘अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेल्या पू. (श्रीमती) हिरा मळये आणि पू. वसंत मळये यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

पू. परांजपेआजोबा आणि पू. आजी यांच्यातील
सहजभाव उकलणारे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली सूत्रे

१. पू. परांजपेआजोबा आणि आजी यांच्यामध्ये पुष्कळ सहजता अन् मोकळेपणा आहे. एरव्ही रामनाथी आश्रमात काही दिवसांसाठी येणार्‍यांचे नियोजन करावे लागते. पू. परांजपेआजोबा आणि आजी यांच्यासंदर्भात मात्र निराळेपण अनुभवता येते. ‘काही हवे असल्यास किंवा विचारायचे असल्यास ते स्वत:हून विचारतील’, असे वाटते.

२. पू. परांजपेआजी यांच्यातील नम्रता आणि नेतृत्व या गुणांचे वर्णन करतांना सद्गुरु (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘पू. परांजपेआजी यांनी त्यांच्या सांगली येथील भजनीमंडळातील महिलांचे रामनाथी आश्रमाला भेट देण्याचे नियोजन केले होते. त्या वेळी पू. परांजपेआजी यांच्यातील नेतृत्वगुणाचे दर्शन घडले. भजनीमंडळातील महिलांना त्या ‘आश्रमात कसे रहायचे’, याविषयी त्यांना समजेल, अशा पद्धतीने आणि नम्रतेने सांगत होत्या.’’

 

सोहळ्यातील क्षणचित्रे

१. सोहळ्याच्या वेळी सद्गुरुद्वयी या साधकांना अनुभूतीकथन करण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या. सद्गुरुद्वयींनी ‘प्रत्येक विचार आणि अनुभूती ही भगवंताने दिलेली असते. ती केवळ स्वत:साठी नसून समष्टीसाठी असते. त्यामुळे सर्वांनी उत्स्फूर्तपणे अनुभूती सांगावी. ताणमुक्त करणारी अध्यात्मातील ही एक परीक्षाच आहे आणि वेळोवेळी या परीक्षेचा ‘पेपर’ पालटतो. साधनेत मार्गक्रमण करतांना एक एक क्षणमोती वेचत आपल्याला पुढे जायचे असते. असे मार्गक्रमण करतांना भगवंत आपल्या जवळ येतो’, असे अमूल्य मार्गदर्शन केले. मधेमधे सद्गुरुद्वयी ‘सर्वांना वातावरणातील भावतरंग अनुभवता येतात ना ?’ असे विचारून प्रत्येक साधकाला भावविश्‍वात नेत होत्या. गुरुसमान असलेल्या ‘सद्गुरुद्वयींचे प्रत्यक्ष शिकवणे’ अनुभवण्याचे भाग्य या वेळी सोहळ्याला उपस्थित असणार्‍या साधकांना लाभले.

२. सोहळ्याच्या ठिकाणी सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांचे दिवंगत वडील सूक्ष्मातून उपस्थित आहेत, असे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना जाणवले. ‘सद्गुरु (सौ.) बिंदाताई त्यांच्या वडिलांविषयी सांगत असलेली भावपूर्ण सूत्रे ते (वडील) ऐकत असून परात्पर गुरूंविषयी त्यांना कृतज्ञता वाटत आहे’, असे श्री. निषाद देशमुख यांना या वेळी जाणवले.

३. श्री. सोहम् सिंगबाळ यांनी ओघवत्या वाणीत, संथ लयीत त्यांचे आजोबा पू. वसंत मळयेे आणि आजी पू. (श्रीमती) हिरा मळयेे यांच्याविषयी अनुभवकथन केले. या वेळी साक्षात दत्तगुरूंचे अस्तित्व असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या एका साधिकेला जाणवले.

४. सोहळ्यात अधिक प्रमाणात निर्गुण तत्त्व कार्यरत होते. सोहळ्यातील घटनाक्रम ठरवून नव्हे, तर आपोआप घडत होता. साधकांना जन्मोत्सवातील अनुभूतींचे स्मरण सहजपणे होत होते. ‘सहजपणे सुचणे, हीच निर्गुणातील अनुभूती आहे’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी सांगितले.

५. सद्गुरु आणि संत यांच्यातील अत्युच्च लीनभावाचे दर्शन घडवणारे सोहळ्यातील अविस्मरणीय क्षण ! : सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. (सौ.) परांजपेआजी यांचा सन्मान केल्यानंतर पू. (सौ.) परांजपेआजी यांनी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू, सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि पू. (श्रीमती) मळयेआजी यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. तसेच पू. परांजपेआजोबा यांनीही सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू, सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि पू. (श्रीमती) मळयेआजी यांच्या चरणांना स्पर्श करून हात जोडून वंदन केले. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनीही पू. परांजपे आजीआजोबा अन् पू. मळयेआजी यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. एकमेकांना वंदन करणारे वंदनीय सद्गुरु आणि संत यांच्यातील अत्युच्च लीनभावाचे दर्शनच या अविस्मरणीय क्षणातून घडले.

६. पू. परांजपेआजी यांनी सोहळ्यामध्ये ‘कुठे गुंतलासी योगियाचे ध्यानी’ हे भजन भावपूर्णरित्या म्हटले.

७. सोहळ्यामध्ये श्रीमती विमल आगावणे यांनी ‘टाळ बोले चिपळीला’ हे भजन म्हटले.

८. श्री. सोहम् सिंगबाळ सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या कानात काहीतरी सांगत असतांना श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना ‘तो जणू ‘निर्गुणातून सगुणात या’, असे तर सांगत नाही ना !’, असे जाणवले.

९. ‘व्यासपिठाकडे पाहून सूक्ष्मातून काय जाणवते ?’ याविषयी प्रयोग घेतला असतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना सूक्ष्मातून एक अरण्य दिसले. तेथे २ झोपड्या होत्या. त्यातील एका झोपडीमध्ये परांजपे कुटुंबीय आणि दुसर्‍या झोपडीमध्ये मळये कुटुंबीय होते. तेव्हाही दोन कुटुंबीय एकत्र असल्याचे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना जाणवले.

१०. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी पू. परांजपेआजी यांचा सत्कार केल्यानंतर दोघींनी एकमेकींना आलिंगन दिले. या वेळी ‘दोघी एकमेकींशी, तसेच जगन्मातेशी एकरूप झाल्या आहेत’, असे श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना जाणवले.

११. ‘हिंदु राष्ट्रासाठी परांजपे आणि मळये ही दोन्ही कुटुंबे ‘आदर्श कुटुंबे’ असून त्यांच्याप्रमाणे जगलो, तर आध्यात्मिक उन्नती होईल’, असे साधिका कु. कल्याणी गांगण यांनी सांगितले.

१२. सोहळ्यामध्ये श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांनी ‘सद्गुरु (सौ.) अंजलीताई या माझ्या बहीण आहेत’, असे मला ईश्‍वराकडून ज्ञात झाले’, अशा शब्दांत त्यांच्या अंतरीचा भाव प्रकट केला. यावर पू. (सौ.) परांजपेआजी म्हणाल्या, ‘‘मला तिन्ही मुलीच आहेत. पहिल्यांदा एक मुलगा झाला होता; परंतु तो निवर्तला. अंजलीसह (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह) झालेली दुसरी जुळी मुलगीही निवर्तली. आता भगवंताने मला मुलगा आणि सून (श्री. श्रीरामप्रसाद आणि सौ. रूपाली कुष्टे) अन् ही मुलगी (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ) दिली. देवाने कोणतीही कमतरता ठेवली नाही.’’

 

पू. परांजपेआजोबा आणि पू. आजी यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत


डावीकडून बसलेले पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. सदाशिव परांजपे, पू. (सौ.) शैलजा परांजपे, सौ. कल्पना सहस्रबुद्धे, सौ. शीतल गोगटे, डावीकडून उभे असलेले श्री. सिद्धेश करंदीकर, सौ. सायली करंदीकर, कु. निधी गोगटे

१. सौ. शीतल गोगटे (धाकटी कन्या)

आई-बाबा संतपदी विराजमान झाले, हे ऐकून कृतज्ञता वाटली. पूर्वी आई-बाबा मायेतील बोलायचे. आता मात्र त्यांची केवळ आध्यात्मिक चर्चाच असते.

२. कु. निधी गोगटे (नात)

आजी-आजोबा संत झाले, हे ऐकून पुष्कळ आनंद झाला. आजोबा शिस्तप्रिय आहेत. माझ्याकडून खोलीतील दिवे बंद करायचे रहातात, तेव्हा ते जाणीव करून देतात. आजी कडक आहे; पण ‘ती जे शिकवते, त्याचा मला भविष्यात उपयोग होईल’, असे वाटते.

३. सौ. सायली सिद्धेश करंदीकर (नात)

‘असे आजी-आजोबा सर्वांना मिळावेत’, असे मला वाटायचे. आजीमध्ये प्रेमभाव तर आहेच, यासह तत्त्वनिष्ठताही आहे. माझे काही चुकल्यास आजी मला लगेच चुकीची जाणीव करून देते. ती माझ्यावरील प्रेमापोटीच मला चुका सांगत असल्याने मला तिचा कधीही राग येत नाही. आजी नेहमी ‘आधी देवाचा विचार करावा’, असे सांगते. ती सकाळी घरातील इतर कामांपेक्षा देवघरातील सेवांना प्राधान्य देते. देवपूजा करतांना आजोबा देवांना थंड पाण्याने स्नान घालायचे. तेव्हा आजीने सांगितले, ‘‘आपण गरम पाण्याने अंघोळ करतो, मग देवांना थंड पाणी का वापरायचे ?’’ यातून आजीमधील भक्ती मला शिकायला मिळाली. आजी जे सांगते ते आजोबा लहान बाळाप्रमाणे ऐकतात. अशा कुटुंबात मला जन्म मिळाला, याविषयी कृतज्ञता व्यक्त करते.

४. श्री. सिद्धेश करंदीकर (नातजावई)

४ अ. पू. परांजपे आजी-आजोबा यांनी शुद्ध संस्कारांनी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांना घडवणे ! : पू. परांजपे आजी-आजोबांना पाहून मला ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ ही पंक्ती आठवते. त्यांनी केलेल्या शुद्ध संस्कारांमुळे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू घडल्या.

४ आ. प्रेमाने आदरातिथ्य करणारे पू. परांजपे आजी – आजोबा ! : मी सांगली येथील त्यांच्या घरी गेल्यावर आजी-आजोबा पुष्कळ प्रेमाने आदरातिथ्य करतात. ‘घरी आलेल्यांना काही अल्प पडायला नको’, असा त्यांचा विचार असतो.

४ इ. नम्रभाव : मी आजोबांपेक्षा वयाने पुष्कळ लहान असूनही ते मला आदरार्थी संबोधतात, यातून त्यांच्यातील ‘नम्रता’ हा गुण शिकायला मिळतो.

४ ई. टाकाऊतून टिकाऊ आणि उपयोगी वस्तू बनवणारे परांजपे आजोबा ! : रामनाथी आश्रमात कमळपिठावर दीपस्थापना करण्यात आली आहे. त्या दीपासाठी आजोबांनी स्वत:हून आच्छादन बनवले आहे. त्यांच्यामध्ये विविध कौशल्ये असून त्यांनी खर्च टाळता येईल, अशा टाकाऊपासून अनेक टिकाऊ गोष्टी बनवल्या आहेत. त्यांनी आजींसाठी विळीचे स्टॅण्ड बनवले आहेत.

४ उ. पू. आजी-आजोबा यांच्यातील उच्च भक्तीमुळे भगवंताने त्यांना दिलेली अनुभूती : एकदा आजी-आजोबा बाहेरगावी गेले होते. त्यांनी आल्यानंतर पाहिले असता देवघरातील वाटीत ठेवलेला लाडू त्यात नव्हता. ‘प्रत्यक्ष भगवंतानेच तो लाडू ग्रहण केला’, असा आजी-आजोबांचा भगवंताप्रती उच्च कोटीचा भाव होता.

४ ऊ. आजी-आजोबा संत होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ५ मे या दिवसापासून आश्रमात विविध धार्मिक विधी करण्यात आले. त्या वेळी एका विधीविषयी सांण्यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे गेलो होतो. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सायलीचे आजी-आजोबा आले आहेत ना ? ते सतत आनंदी असतात ना ?’’ यावरून मला आजी-आजोबा संत असल्याचे जाणवले.

५. कु. मोक्षदा कोनेकर (नातजावई श्री. सिद्धेश करंदीकर यांची भाची)

‘आजी-आजोबा सर्वकाही व्यवस्थित आणि प्रेमाने समजावून सांगतात. ते कधीच रागावून बोलत नाहीत. त्यांच्याप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटते’, असे मनोगत कु. मोक्षदा कोनेकर हिने व्यक्त केले. या वेळी कु. मोक्षदा हिची पुष्कळ भावजागृती होत होती.

‘कु. मोक्षदा ही महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आली असल्याने तिच्यातील भाव आणि प्रगल्भता यांचा तिच्या बोलण्यातून प्रत्यय येतो’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी सांगितले.

 

पू. परांजपेआजोबा आणि पू. आजी संतपदी
विराजमान होण्याच्या संदर्भात साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना

१. आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी यांना
पू. परांजपे आजी-आजोबा संत होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना !

‘मार्च २०१९ मध्ये सौ. परांजपेआजी सांगली येथील त्यांच्या भजनीमंडळातील महिलांना घेऊन रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्यांनी रामनाथी आश्रमात भजने सादर केली होती. सौ. परांजपेआजी राम आणि विठ्ठल यांचे भजन म्हणत असतांना मला पू. परांजपेआजी यांच्या मागे सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले उभे असल्याचे दिसले. जन्मोत्सवाच्या निमित्ताने आश्रमात विविध धार्मिक विधी चालू असतांना यज्ञकुंडांच्या परिसरात संत ज्या रांगेत बसतात, त्याच रांगेत श्री. परांजपेआजोबा आणि आजी हे बसले होते. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर आता लवकरच ते दोघे संत असल्याचे घोषित करतील’, असे जाणवले. आजींची त्वचा आणि गाल बाळाप्रमाणे भासतात अन् त्यांचे पुष्कळ लाड करावेसे वाटतात. आजोबांची दृष्टी शून्यात असल्याचे जाणवते, तसेच त्यांच्याकडून वातावरणात सूक्ष्मातून पांढर्‍या रंगाचे किरण प्रक्षेपित होत असल्याचे दिसते.’

–  आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी

२. ‘काही दिवसांपूर्वी पू. परांजपे आजी-आजोबा घरी आले होते. त्या वेळी
त्यांच्याकडे पाहून ‘ते लवकरच संत होतील’, असे जाणवले.’ – श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे

३. ‘पू. (सौ.) परांजपेआजी यांना मी कुंकू लावतांना त्यांच्या आज्ञाचक्रातून पुष्कळ
चैतन्य मिळत आहे’, असे जाणवले. कुंकू लावतांना माझे बोट थरथरत होते.’ – सौ. रूपाली कुष्टे

संदर्भ : सनातन प्रभात

Leave a Comment