सतत आनंदावस्थेत असणारे आणि ‘ईश्‍वरी राज्य यावे’, ही तळमळ असलेले श्री. बन्सीधर तावडेआजोबा !

संतपदी विराजमान झालेले पू. बन्सीधर तावडे यांची आनंदीमुद्रा

१. सतत आनंदी असणे

१ अ. शारीरिक आजारपण आणि वृद्धापकाळ यांमुळे परावलंबी स्थिती असूनही सतत आनंदी असणे

‘गेल्या दीड वर्षांपासून पक्षाघात (पॅरालिसीस), वृद्धापकाळ आणि गुडघेदुखी यांमुळे श्री. बन्सीधर तावडेआजोबा सतत एका जागी बसून असतात. घरातल्या घरात फिरण्यासाठी ते चाकांच्या आसंदीचा (व्हील चेअरचा) वापर करतात. अशी परावलंबी स्थिती असूनही ते सतत आनंदी असतात. ‘अशा स्थितीत मी सतत आनंदी रहाणे, ही केवळ देवाचीच कृपा !’ असे ते सांगतात. गुरुदेवांच्या कृपेने ‘वृद्धापकाळातील या स्थितीत आपला मुलगा सर्वतोपरी काळजी घेत आहे’, यासाठी त्यांच्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. – श्री. राजेंद्र पाटील, सिंधुदुर्ग

१ आ. प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मकतेने पहाणे

‘आजारपणामुळे त्यांना कुठेही बाहेर जाता येत नाही, तरी स्वतःच्या आजारपणाविषयी ते कधीही नकारात्मक बोलत नाहीत. प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मकतेने पहाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सतत आनंदी असतात.’ – श्री. गजानन मुंज

 

२. आदरातिथ्य

‘त्यांना भेटायला कोणी आल्यास ते त्यांच्या आदरातिथ्याकडे कटाक्षाने लक्ष देतात.

 

३. स्मरणशक्ती चांगली असणे

तावडेआजोबांमधील सात्त्विकतेमुळे त्यांना कित्येक वर्षांपूर्वीचे लहान लहान प्रसंगही आठवतात. त्या आठवणी ते वस्तूनिष्ठपणे सांगतात. ते जीवनातील प्रत्येक प्रसंग ईश्‍वराशी जोडतात.

 

४. अभ्यासूवृत्ती

तावडेआजोबांनी अनेक संप्रदाय आणि संघटना यांचा अभ्यास केला आहे.

 

५. सतत ईश्‍वरी राज्याच्या विचारांत मग्न असणे

तावडेआजोबा सतत ईश्‍वरी राज्याच्या विचारांत मग्न असतात. त्यांना भेटायला कोणीही आले की, ते ईश्‍वरी राज्याविषयी उत्स्फूर्तपणे बोलतात. ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजातील सर्व दुष्प्रवृत्ती नष्ट होणे आवश्यक आहे’, असे त्यांना प्रकर्षाने वाटते. वर्तमानपत्रातील एखादी घटना वाचतांना अथवा दूरचित्रवाणीवरील प्रसंग पहातांना ‘ईश्‍वरी राज्यात या संदर्भात कसे असेल ?’, असा विचार ते करतात. ‘ईश्‍वरी राज्य यावे’, यासाठी ते सतत प्रार्थना करतात. ‘पूर्वी त्यांच्या मनात आपण ‘ईश्‍वरी राज्य पहायला हवे’, असे विचार असायचे. आता ‘सर्व काही ईश्‍वरेच्छेने होईल’, असा भाव असतोे.

 

६. सेवेची तीव्र तळमळ

६ अ. सतत प्रार्थना करणे

त्यांना गुरुसेवा करण्याची पुष्कळ इच्छा आहे; परंतु शारीरिक मर्यादांमुळे ते सेवा करू शकत नाहीत. ते समष्टीसाठी आणि ईश्‍वरी राज्यासाठी सतत प्रार्थना करतात. गत वर्षी पायाचे दुखणे तीव्र असूनही ते गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला नातवंडांना घेऊन आले होते.’ – श्री. राजेंद्र पाटील, सिंधुदुर्ग

६ आ. गुरुसेवेची तळमळ

‘आजोबांची गुरुसेवेची तळमळ बघून ‘ते अखंड सेवारत आहेत’, असेच वाटते.

 

७. श्रद्धा

परात्पर गुरु डॉक्टरांंप्रती असलेली त्यांच्या मनातील असीम श्रद्धा त्यांच्या बोलण्यातून जाणवते.’ – श्री. गजानन मुंज

 

८. कृतज्ञताभाव

८ अ. साधकांप्रती कृतज्ञताभाव

‘ज्या साधकांच्या माध्यमातून साधना समजली, त्यांच्याप्रती आजोबांच्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. ही कृतज्ञता ते सतत व्यक्त करतात.

८ आ. सद्गुरु सत्यवानदादांच्या प्रती भाव

सद्गुरु सत्यवानदादा आजोबांना भेटायला आले की, त्यांना पुष्कळ आनंद होतो. ते सद्गुरु सत्यवानदादांशी मोकळेपणाने आणि आनंदाने बोलून स्वतःचे मन मोकळे करतात. त्यांना ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे सद्गुरु दादा भेटायला आले’, असे वाटून पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘सद्गुरूंच्या भेटीतून पुष्कळ चैतन्य आणि उत्साह मिळाला’, असे ते आवर्जून सांगतात.

 

९. आजोबांच्या भेटीतून चैतन्य आणि आनंद मिळणे

अ. आजोबांच्या बोलण्यात एवढे चैतन्य असते की, आम्ही सर्वजण त्यांचे बोेलणे ऐकतच रहातो. त्या वेळी ‘एक-दीड घंटा कसा निघून जातो’, ते कळतच नाही.’ – श्री. राजेंद्र पाटील

आ. ‘आजोबांना भेटल्यावर मन आनंदी होते.’ – श्री. गजानन मुंज

(हे लिखाण पू. तावडेआजोबा संत होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख ‘श्री. तावडेआजोबा’ असा आला आहे. – संकलक)

 

सद्गुरु सत्यवान कदम यांना श्री. बन्सीधर तावडेआजोबांची जाणवलेली वैशिष्ट्ये

१. श्री. बन्सीधर तावडेआजोबांना चालता येत नाही; पण त्यांनी ही परिस्थिती स्वीकारली असून ते आनंदी आहेत.

२. आजोबांची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा आहे. ‘ईश्‍वरी राज्य येणारच आहे आणि ते परात्पर गुरुदेवांमुळेच शक्य होणार आहे’, असे ते सांगतात.

. आजोबांना पाहून आनंद जाणवतो. त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. ‘त्यांची आध्यात्मिक पातळी ७० टक्के झाली आहे’, असे वाटते.’ – (सद्गुरु) श्री. सत्यवान कदम, सिंधुदुर्ग