साधनेची तीव्र तळमळ असणार्‍या आणि प्रतिकूल परिस्थितीत श्रद्धा ढळू न देणार्‍या सोलापूर येथील श्रीमती इंदिरा नगरकरआजी संतपदी विराजमान !

संतरत्नाच्या प्राप्तीने साधकांचा जीव आनंदला । अंत:करणात कृतज्ञतेचा भाव दाटून आला ॥

चरणी अभिषेक घालू श्रीगुरूंना भावाश्रूंनी । करू कृतज्ञता गुरुचरणी नतमस्तक होऊनी ॥

‘श्रीगुरूंची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे’,
हा ध्यास मनी बाळगा !  – पू. (श्रीमती) इंदिरा नगरकरआजी

पू. आजींना नमस्कार करतांना नम्र भावातील सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर – ‘रात्रंदिवस श्रीगुरूंचा धावा करा. येता-जाता नामजप करा. ‘श्रीगुरूंची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे’, हा ध्यास मनी बाळगा. अनुसंधान सुटता कामा नये’, असा संदेश पू. (श्रीमती) इंदिरा नगरकरआजी (वय ८३ वर्षे) यांनी दिला. ६ मे या दिवशी सोलापूर येथील सुशील रसिक सभागृहात झालेल्या भावसोहळ्यात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी नगरकरआजी संत झाल्याची आनंदवार्ता दिली. त्यानंतर मनोगत व्यक्त करतांना पू. आजी बोलत होत्या. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पू. श्रीमती इंदिरा नगरकरआजी यांच्या संदर्भातील संदेश वाचून दाखवला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नागरिक सोन्याची खरेदी करतात; मात्र श्रीगुरूंनी आदल्या दिवशीच सोलापूरच्या साधकांना सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी संतरत्नरूपी भेट देऊन कृतार्थ केले.

 

असा झाला भावसोहळा !

१. ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी सांगितलेल्या भावार्चनेत सर्व साधक कृतज्ञतेच्या भावसागरात डुंबून गेले.

२. विविध साधकांनी परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने करत असलेले विविध प्रयत्न, हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेसाठी केलेले विशेष प्रयत्न यांसह अन्य प्रयत्न विशद केले.

३. एकेक साधक प्रयत्नांविषयी सांगत होता आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये त्यांचे विश्‍लेषण करून सांगत होत्या. अचानक सर्वांना आनंदवार्ता देत ‘श्रीकृष्णाने आज आपल्याला संतरूपी अनमोल भेट दिली आहे’, असे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितले. ज्या क्षणाची सर्व साधक आतुरतेने वाट पहात होते, त्याची घोषणा झाल्यावर सर्व साधकांच्या मनातही एकच उद्घोष झाला, ‘कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता !’

४. साधकांनी पू. नगरकरआजींची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली.

 

आध्यात्मिक प्रगतीत शिक्षण आड येत नाही, याचे मूर्तीमंत
उदाहरण म्हणजे पू. नगरकरआजी होय ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

‘संकटांची मालिका चालू असतांना श्रीगुरूंवरील ठाम श्रद्धा आणि साधना करण्याची तीव्र तळमळ यांमुळे आजी संत होऊ शकल्या. अनेक जण पुष्कळ शिकलेले असल्याने आध्यात्मिक प्रगतीत अनेकांची बुद्धी आड येते; पण पू. आजींचा भावच पुष्कळ असल्याने त्यांना तो अडथळा कधी आला नाही. आध्यात्मिक प्रगतीत शिक्षण आड येत नाही, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पू. नगरकरआजी होय !’

सोहळ्यात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितलेली काही अनमोल वचने !

१. ‘व्यष्टी साधना चांगली असेल, तरच आपण समष्टी साधना चांगली करू शकतो. व्यष्टी आणि समष्टी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’

२. ‘कार्याची गती वाढत आहे. समाजातून प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे साधकांनीही प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे.’

श्रीमती नगरकरआजी सभागृहात आल्यापासूनच त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचा भाव दाटून आला होता. संतपदाची घोषणा झाल्यापासून ते सोहळा संपेपर्यंत त्यांना भावाश्रू अनावर झाले होते. ‘त्यांचा तोंडवळा कृतज्ञतेच्या अथांग सागरात डुंबत आहे’, असे जाणवत होते. भेटायला आलेल्या प्रत्येकाच्या तोंडवळ्यावरून त्या अत्यंत प्रेमाने हात फिरवून त्यांना आलिंगन देत होत्या. हे आलिंगन म्हणजे जणू ‘श्रीकृष्ण-सुदामा’ यांची भेट असेच जाणवत होते.

आनंदवार्ता धावूनी आली सद्गुरूंच्या वाणी ।

सोहळा सजला गुरुचरणी, ही तर कृतज्ञतेची पर्वणी ।

सोलापुरी चालूनी आला आनंदाचा क्षण ।

संतरत्न ते प्राप्त झाले, आज तर सोनियाचा दिन ॥

 

स्थिरता, सेवेची तळमळ आणि देवावरील दृढ श्रद्धा या
गुणांद्वारे  ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करून सनातनच्या ८८ व्या व्यष्टी
संतपदावर आरूढ झालेल्या सोलापूर येथील पू. (श्रीमती) नगरकरआजी (वय ८३ वर्षे) !

भावावस्थेतील पू. (श्रीमती) नगरकरआजी

‘सोलापूर येथील श्रीमती इंदिरा चंदुलाल नगरकर यांची शिकण्याची तळमळ अत्यंत कौतुकास्पद आहे. त्या वयाच्या ७३ व्या वर्षी लिहायला आणि वाचायला शिकल्या. ‘दैनिक सनातन प्रभात’, तसेच सनातनचे ग्रंथ वाचता यावेत, या ओढीने त्यांनी अक्षरओळख करून घेतली. त्यांना सेवेची तीव्र तळमळ असल्याने वयाच्या ७५ व्या वर्षीही त्या प्रतिदिन ७ ते ८ कि.मी. चालत जाऊन प्रसाराची सेवाही करत. आता वृद्धापकाळामुळे घराबाहेर जाऊन प्रसार करणे त्यांना शक्य होत नाही. आजींना अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले; पण देवावर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे त्या प्रत्येक प्रसंगाला स्थिरतेने सामोर्‍या गेल्या. कठीण प्रसंगांकडेही साक्षीभावाने पाहून त्यांनी स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेतली. आजींनी केलेल्या साधनेमुळे त्यांच्या देहात आता दैवी पालट झाले आहेत.

आजींमधील स्थिरता, सेवाभावी वृत्ती आणि देवावरील दृढ श्रद्धा हे गुण सर्वच साधकांसाठी अनुकरणीय असून या गुणांद्वारेच आजींनी संतपद प्राप्त केले आहे. श्रीमती इंदिरा नगरकरआजी यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली असून त्या आता सनातनच्या ८८ व्या व्यष्टी संतपदावर आरूढ झाल्या आहेत.

 ‘पू. नगरकरआजी यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

Leave a Comment