सोलापूर येथील सनातन संस्थेच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

वैविध्यपूर्ण सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले सातत्याने समवेत असल्याची अनुभूती घेणार्‍या सनातनच्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर

पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर

 

१. बालपण

घरातील वातावरण धार्मिक असल्याने धार्मिक गोष्टींची आवड निर्माण होणे

‘माझ्या आईची देवावर पुष्कळ श्रद्धा होती. त्यामुळे मलाही धार्मिक गोष्टींची आवड निर्माण झाली. आमच्या घरात पुष्कळ सोवळे-ओवळे, पूजा, प्रार्थना करणे आदी होते; पण ‘अनेक देव आणि स्वामी यांमध्ये मी कुणाची भक्ती करावी ?’, हे मला त्या वेळी कळत नव्हते.

 

२. सनातन संस्थेशी संपर्क

२ अ. एके दिवशी दुकान उघडल्यावर यजमानांच्या जवळ अकस्मात संत
भक्तराज महाराज यांचे छायाचित्र येऊन पडणे आणि त्यावरील ‘अन्यायाविरुद्ध लढा !’,
असे लिहिलेले वाचल्यावर या संस्थेचे कार्य चांगले असून त्यात सहभागी व्हावे’, असे यजमानांना वाटणे

माझ्या यजमानांना अन्यायाविरुद्ध पुष्कळ चीड होती. आमचे एक दुकान होते. आम्ही दोघे (मी आणि माझे पती) मिळून ते दुकान चालवत होतो. वर्ष १९९४ मध्ये एके दिवशी दुकानाचे दार उघडल्यानंतर अकस्मात माझ्या यजमानांच्या जवळ संत भक्तराज महाराज यांचे एक छायाचित्र येऊन पडले. ‘ते छायाचित्र कुठून आले ?’, हे आम्हाला ठाऊक नाही. त्यावर ‘अन्यायाविरुद्ध लढा !’ असा मथळा होता. तेव्हा माझ्या यजमानांना वाटले, ‘या संस्थेचे कार्य चांगले आहे. आपण या संस्थेच्या कार्यात सहभागी होऊया.’

२ आ. वर्तमानपत्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेली कुलदेवतेचा
नामजप करण्याविषयीची माहिती वाचून कुलदेवतेचा नामजप करण्यास आरंभ करणे

वर्ष १९९५ मध्ये एकदा मला घरी असलेल्या दैनिक ‘समाचार’ या वर्तमानपत्रामध्ये ‘नाम कसे घ्यावे ?’ ही चौकट दिसली. ही चौकट परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेली होती. त्यामध्ये कुलदेवतेचा नामजप करण्याविषयी सांगितलेे होते. तेव्हापासून मी आणि माझे पती कुलदेवीचा नामजप करू लागलो.

 

३. साधनेची वाटचाल

३ अ. आतापर्यंत केलेल्या वैविध्यपूर्ण सेवा

३ अ १. सत्संगाला गेल्यावर सनातन संस्थेची माहिती कळणे आणि त्यानंतर मिळेल ती सेवा करणे

सोलापूर येथे आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत साप्ताहिक सत्संग घ्यायच्या. वर्ष १९९६ पासून आम्ही सत्संगाला जाऊ लागलो. सत्संगात आम्हाला सनातन संस्थेची माहिती समजली आणि साधना करण्याविषयी मार्गदर्शन मिळाले अन् आम्हा दोघांच्या साधनेला आरंभ झाला. त्यानंतर आम्ही जी मिळेल ती सेवा करू लागलो.

३ अ २. भाग्यनगर येथे प्रतिकूल परिस्थितीतही १५ दिवस प्रसाराची सेवा करणे

वर्ष १९९७ मध्ये मी आणि माझे पती प्रसाराच्या सेवेसाठी भाग्यनगरला गेलो होतो. आम्ही दोघांनी तिथे १५ दिवस सेवा केली. आमच्या समवेत मंदार नावाचा एक साधक होता. भाग्यनगरमध्ये तेलगू भाषिक लोक अधिक रहात असल्याने आम्ही लोकांना हिंदी आणि इंग्रजी या भाषांत सोप्या पद्धतीने अन् सहजतेने अध्यात्माची माहिती सांगू लागलो. तेथे आम्ही एका जुन्या मातीच्या खोलीत रहात होतो. ती खोली अर्धी पडकी होती आणि एका बाजूला मातीचे ढिग होते. रात्री झोपतांना आम्हाला भीती वाटायची. मी माझ्या यजमानांना पलंगावर झोपायला सांगायचे आणि मी खाली सतरंजीवर झोपायचे. माझ्या यजमानांना भात चालत नसे. ‘मी माझ्या वाटणीच्या पोळ्या त्यांना द्यायचे अन् मी २ वाटी (प्लेट) भात खायचे’, असे आम्ही १५ दिवस काढले. या प्रसारसेवेमुळे आम्हाला पुष्कळ आनंद मिळाला.

३ अ ३. यजमानांनी प्रोत्साहन दिल्याने सत्संग घेण्यास आरंभ करणे आणि सत्संगात आलेल्या तेलगू भाषिक लोकांना विषय कळलेला नसतांनाही सत्संग आवडणे

आरंभी माझे पतीच सत्संग घ्यायचे. नंतर त्यांनी मलाही सत्संग घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे मीसुद्धा सत्संग घेऊ लागले. मी सोलापूरमधील मारुति मंदिर, काही उपाहारगृहे आणि स्टेट बँक वसाहत (कॉलनी) येथे सत्संग घेतले. काही तेलगू भाषिक लोकही सत्संगात यायचे. त्यांना विषय तेवढा कळत नसे; पण सत्संग आवडत असे.

३ अ ४. सत्संगासाठी घरी आलेल्या साधकांसाठी स्वयंपाक बनवणे

पूर्वी आमच्या घरातील सभागृह (हॉल) मोठे होते. त्यामुळे आमच्या घरी सत्संग व्हायचे. त्या वेळी काही साधकांना घरी जाण्यास रात्र होत असे. तेव्हा त्यांना मी आमच्या घरीच स्वयंपाक बनवून द्यायचे.

३ आ. प्रारंभी कुलदेव व्यंकटेश्‍वराची भक्ती करणे, नंतर सोवळे-ओवळे न्यून
होऊन नामजपावरील श्रद्धा वाढत जाणे आणि सनातन संस्थेशी जवळीक वाढणे

माझ्या सासूबाईंनी श्री भवानीदेवीची पुष्कळ भक्ती केली. एकदा त्या दंडवत घालत तुळजापूरपर्यंत गेल्या होत्या. आम्ही कुलदेव व्यंकटेश्‍वराची भक्ती करायचो. ‘रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत व्यंकटेश स्तोत्र म्हणून केवळ १ पेला दूध प्यायचे आणि दिवसभर काही खायचे नाही’, हा दिनक्रम आम्ही ८ दिवस पाळत होतो. नंतर नंतर माझे सोवळे-ओवळे न्यून होत गेले. माझी नामजपावरील श्रद्धा वाढत गेली आणि मी नामाला अधिक महत्त्व देऊ लागले. हळूहळू माझी सनातन संस्थेशी जवळीक वाढत गेली.

३ इ. मुलांनीही साधनेस प्रारंभ करणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत असल्याची अनुभूती घेेणे

माझ्या समवेत माझी दोन मुलेही सनातन संस्थेशी जोडली गेली. वर्ष २००५ मध्ये माझा मुलगा श्री. राजेश प्रथमच रामनाथी आश्रमाच्या दर्शनासाठी गोव्याला जाणार होता. त्या वेळी तो ‘कोल्हापूरजवळ फोंडा म्हणून एक गाव आहे. तिकडेच सनातन संस्थेचा आश्रम आहे’, असे समजून त्या गावी गेेला. नंतर त्याला साधकांकडून समजले, ‘गोव्यातील फोंडा येथे सनातनचा आश्रम आहे.’

दुसर्‍या दिवशी दुपारी १ वाजता आपण रामनाथी आश्रमात पोचणार’, असे त्याला वाटले. त्याला गुरुदेवांना भेटण्याची तळमळ लागली होती. त्याच रात्री त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याला दिसले, ‘परात्पर गुरुदेव स्वतः त्याला रामनाथी आश्रमाचा मार्ग दाखवत आहेत.’ प्रत्यक्षात राजेश ज्या वेळी रामनाथी आश्रमात गेला, त्या वेळी ‘स्वप्नात पाहिल्याप्रमाणे सर्व आहे’, हे त्याच्या लक्षात आले. स्वप्नात दिसलेले परात्पर गुरुदेवांचे रूप जसे तेजस्वी होते, तसेच प्रत्यक्ष भेटीतही परात्पर गुरुदेव तेजस्वी दिसत होते. परात्पर गुरुदेवांनी अगोदरच स्वप्नात येऊन त्याला प्रत्यक्ष दर्शन दिल्याने त्याची गुरुदेवांवर श्रद्धा वाढली. तो कॉन्ट्रॅक्टर आहे. तो कुठलेही काम चालू करण्यापूर्वी प.पू. गुरुदेवांची पूजा करतो. बर्‍याच वेळी त्याला परात्पर गुरुदेव त्याच्या समवेत असल्याचे जाणवते.

३ ई. मला परात्पर गुरुदेवांशी संबंधित पुष्कळ अनुभूती आल्या. मला जेव्हा
गोड खाण्याची इच्छा होते, तेव्हा मला परात्पर गुरुदेव गोड खाऊ पाठवतात.

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट

वर्ष २००२ मध्ये मी मिरज आश्रमात गेले होते. तेव्हा परात्पर गुरुदेवांशी माझी प्रथम भेट झाली.

 

५. यजमान आणि दोन मुले यांचे निधन अन् परात्पर
गुरु डॉ. आठवले यांनी सांत्वन केल्याने त्यातून बाहेर पडणे

५ अ. पती रुग्णाईत असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करणे आणि
परात्पर गुरुदेवांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत पूर्ण ऐकून त्यांनी प्राण सोडणे

माझे पती शेवटच्या दिवसांत पुष्कळ रुग्णाईत असल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले होते. माझ्या यजमानांनी मला परात्पर गुरुदेवांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत (कॅसेट) लावायला सांगितली. त्यांनी ‘साधना – भाग १’ आणि ‘साधना – भाग २’ या ध्वनीफितींमधील परात्पर गुरुदेवांचे मार्गदर्शन संपूर्ण ऐकले आणि त्यानंतर त्यांनी प्राण सोडला.

५ आ. परात्पर गुरुदेव आपल्या घरी येतील; म्हणून यजमानांनी
पुष्कळ सिद्धता करणे; पण ते घरी येण्यापूर्वीच यजमानांचे निधन होणे

परात्पर गुरुदेव आमच्या घरी येतील; म्हणून माझ्या यजमानांनी पुष्कळ सिद्धता केली होती. परात्पर गुरुदेवांनी पिवळ्या रंगाचे महत्त्व सांगितले होते; म्हणून माझ्या यजमानांनी पिवळ्या रंगाची चादर इत्यादी साहित्य घरी आणले होते; पण परात्पर गुरुदेव आमच्या घरी येण्याअगोदरच माझ्या यजमानांचे निधन झाले.

५ इ. यजमान आणि दोन मुले यांच्या निधनामुळे अतीव दुःख होऊन रडणे,
त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी घरी येऊन सांत्वन करणे आणि त्यानंतर त्या दुःखातून सावरणे

माझ्या यजमानांचे निधन झाले आणि लागोपाठ माझी दोन मुलेही देवाघरी गेली. हे आघात मला सहन झाले नाहीत. मी पुष्कळ दुःखी होऊन सतत रडत होते. वर्ष २००४ मध्ये एके दिवशी परात्पर गुरुदेव माझ्या घरी प्रत्यक्ष आले होते. त्या वेळी माझ्या मुलाने फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. ‘परात्पर गुरुदेव माझ्या यजमानांचा हात धरून येत आहेत’, असे काही जणांना दिसले. त्या वेळी मला झालेल्या दुःखामुळे मी ढसढसा रडत होते. परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्ही अशा किती दिवस रडत बसणार ? ज्याला जायचे आहे, तो जाणारच आहे. आता तुम्ही या दुःखातून बाहेर पडायला हवे. हे बघा, मी दरवाजा उघडला आहे. आज असलेल्या सत्संगाला तुम्ही यायला हवे.’’ त्यानंतर मी त्या सत्संगाला गेले आणि हळूहळू दुःखातून सावरले.

 

६. परात्पर गुरुदेवांचे स्मरण करणे

सध्या मी दिवसभर परात्पर गुरुदेवांचे स्मरण आणि त्यांचाच नामजप करते. माझी श्री गणेशावरही श्रद्धा आहे; म्हणून मी प्रतिदिन २ माळा श्री गणेशाचा नामजप करते.’

– (पू.) श्रीमती नंदिनी मंगळवेढेकर, सोलापूर (जून २०१८)

Leave a Comment