प्रेमभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अनन्य भाव हे गुण असलेल्या पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) !

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी

श्रीमती शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) मागील २७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. सध्या त्या त्यांची कन्या सौ. मेधा विलास जोशी यांच्यासह नंदनगद्दा, कारवार, कर्नाटक येथे रहातात. त्या गुरुचरित्राचे पठण करणे, दत्तमाला मंत्राचे पठण करणे, तसेच प्रार्थना आणि समष्टीसाठी दिवसभर नामजप करणे, अशी साधना करतात. आजींची आनंदावस्था, तसेच त्यांच्या घरी जाणवत असलेले पालट यांविषयी साधक आणि आजींचे कुटुंबीय यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहोत.

 

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. सतत आनंदी असणे

‘आजी प्रत्येक क्षणी शांत आणि आनंदी असतात. आजींना मूळव्याधीचा आणि गुडघेदुखीचा त्रास आहे; पण त्या सतत आनंदी असतात.

१ आ. ९२ व्या वर्षीही दृष्टी चांगली असणे

आजींचे वय ९२ वर्षे आहे, त्यांना चष्मा आहे, तरीही त्या गुरुचरित्र पठण, तसेच इतर कृती करतांना उपनेत्राचा (चष्म्याचा) वापर करत नाहीत.’

– श्री. नगाराम चौधरी (साधक), कारवार, कर्नाटक.

१ इ. प्रेमभाव

१. ‘आजीमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ती मला खाऊ देते आणि माझ्याशी प्रेमाने बोलते.’ – कु. अनन्या राधेश जोशी (पणती, आजींच्या मुलीची नात) (वय १४ वर्षे) कारवार, कर्नाटक.

२. ‘या वेळी मी आजींना भेटायला गेलो आणि मला ‘आजींशी बोलतच रहावे’, असे वाटले. त्यांच्या बोलण्यात पुष्कळ प्रेम आहे. त्यांच्या घरी ‘वेळ कसा जातो’, हेही कळत नाही. ‘आजींच्या सत्संगात रहावे’, असे मला वाटत होते.’

– श्री. काशिनाथ प्रभु, कर्नाटक.

३. ‘एकदा मी ३ वर्षांनंतर आजींना भेटायला गेलो होतो, तरीही आजींना माझे नाव लगेच आठवले. मला पाहिल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आमचा राम आला आहे.’’ त्यांना भेटायला गेल्यावर त्या प्रत्येक वेळी अन्य साधकांविषयी विचारतात. साधकांची नावे घेऊन त्यांची विचारपूस आणि काळजी करतात.

१ ई. अनासक्त स्वभाव

आजींमध्ये आसक्ती अत्यंत अल्प आहे. ‘स्वतःसाठी काही घ्यावे’, असे त्यांना कधीच वाटत नाही.

१ उ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव

१. मी जेव्हा आजींना भेटायला जातो, तेव्हा त्या मला नेहमी विचारतात, ‘‘प.पू. गुरुदेव कसे आहेत ? ते बरे आहेत ना ? आता तू रामनाथी आश्रमात गेलास, तर त्यांना माझ्याविषयी सांग की, मी आता म्हातारी झाले आहे.’’ त्या सतत गुरुदेवांच्याच स्मरणात असतात.

२. आजींना ‘परात्पर गुरु डॉक्टरच त्यांचे आई-वडील आहेत’, असे वाटते. ‘तेच माझे सर्वस्व आहेत. तेच देव आहेत’, असे त्या म्हणतात.

३. मी आजींना सांगितले, ‘‘आजी, तुमचे छायाचित्र काढायचे आहे. तुम्ही दुसरी साडी नेसा.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘राहू दे रे. प.पू. गुरुदेवांना सर्व ठाऊकच आहे.’’

– श्री. नगाराम चौधरी (साधक), कारवार, कर्नाटक.

 

२. आजींच्या निवासस्थानी जाणवत असलेले पालट

२ अ. सर्वत्र उष्ण वातावरण असूनही घरात शीतलता,
तसेच आनंद आणि शांती जाणवून इतरांनाही त्याची अनुभूती येणे

‘कारवारमध्ये पुष्कळ ऊन आणि उष्ण वातावरण आहे, तरीही आम्हाला आमच्या घरी खूप शीतल वाटते. तसेच घरात आनंद आणि शांती जाणवते. माझी सून (सौ. दिव्या राधेश जोशी) आणि नात (कु. अनन्या राधेश जोशी) या दोघींनाही असेच वाटते. घरी आलेल्या नातेवाईकांनाही ‘इथे आल्यावर शांत आणि शीतल वाटते’, असे ते सांगतात. एकदा आमच्या घरी नेहमी येणारे एक व्यापारी आले होते. त्यांना घरात पालट जाणवला. त्यामुळे त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही घरात काही पालट केले आहेत का ? पूर्वीच्या तुलनेत घरात आता शांत आणि शीतल वाटत आहे.’’

– सौ. मेधा विलास जोशी (आजींची मुलगी), कारवार, कर्नाटक.

२ आ. आजींच्या सान्निध्यात उपाय होणे

‘मी या मासात २ वेळा आजींना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा मला ‘त्यांच्या घरातील वातावरण शांत, शीतल आणि आनंदी आहे’, असे वाटत होते. आजी शांत आणि आनंदी होत्या. तेथील बैठक कक्षात बसल्यावर माझ्यावर उपाय होत होते. नंतर मी घरी परत आलो. तेव्हा माझी भावजागृती होत होती आणि माझ्यावर उपाय होत होते.’

– श्री. नगाराम चौधरी

२ इ. आजींच्या अस्तित्वामुळे घरात आणि कुटुंबियांत सकारात्मक पालट होणे,
आजींची वाट पहात असतांना ध्यानावस्था अनुभवणे अन् आजी बाहेर आल्यावर सुगंध येणे

‘मी आजींच्या घरी साधारण १ वर्षापूर्वी पहिल्यांदा गेलो होतो आणि आता या वेळी पुन्हा गेलोे. या वेळी मला ‘आजींच्या घरी पुष्कळ पालट झाले आहेत’, असे जाणवले. घरातील वातावरण सकारात्मक वाटत होते आणि ‘घरातील व्यक्तींमध्येही सकारात्मक पालट झाले आहेत’, असे माझ्या लक्षात आले. ‘आजींच्या अस्तित्वामुळेच हा पालट झाला आहे’, असे मला जाणवले. मी आजींची वाट पहात बसलो असता मला ध्यान लागल्यासारखे झाले. आजी बाहेर आल्या. तेव्हा मला सुगंधाची अनुभूती आली.’

– श्री. काशिनाथ प्रभु, प्रसारसेवक

२ ई. आजींच्या घरी पुष्कळ चैतन्य जाणवत होते आणि ‘त्या सतत आनंदावस्थेत आहेत’, असे जाणवले.’

– श्री. सोमेश गुरव आणि श्री. सागर कुर्डेकर (साधक), कारवार, उत्तर कन्नडा, कर्नाटक.

२ उ. आजींना पाहून प.पू. गुरुदेवांची पुष्कळ आठवण आली. त्यांच्या घरी खूप शांत वाटत होते.’

– सौ. उषा शशिधर, उत्तर कन्नडा जिल्हासेवक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment