धुळे येथे ‘वैवाहिक समस्यांवर चर्चा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग !

मार्गदर्शन करतांना सौ. क्षिप्रा जुवेकर

धुळे – येथे ‘अग्रवाल समाज बायोडाटा बँक समिती’च्या वतीने ‘वैवाहिक समस्यांवर चर्चा’ या विषयावर ३१ मार्च या दिवशी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘युवक-युवती : अपेक्षा आणि वास्तव’ या विषयावर सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात ‘वैवाहिक समस्या कारणे आणि उपाय’ या विषयावर श्री. जी.बी. मोदी यांनी, तर तिसर्‍या सत्रात ‘विवाह, घटस्फोट – कारणे आणि उपाय’ या विषयावर अधिवक्ता श्री. राजेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.

‘युवक-युवती : अपेक्षा आणि वास्तव’ या विषयावर बोलतांना सौ. जुवेकर म्हणाल्या, ‘‘पूर्वीप्रमाणे वडीलधारी मंडळी घरी आल्यानंतर आजची मुले ही आस्थेने त्यांची विचारपूस करत नाहीत. लहान मुले पालकांच्या जवळ जातात ती केवळ भ्रमणभाष घेण्यापुरती. प्रत्येक घरातील सदस्य भ्रमणभाषमुळे व्यस्त असतात. एकमेकांशी मोकळेपणाने ‘संवाद’ घडून येतांना दिसत नाही. अमेरिकेसारख्या देशात प्रत्येक ५ व्यक्तींमागे एका व्यक्तीला मानसोपचाराची आवश्यकता असल्याचे लक्षात येत आहे. ७ वीच्या विद्यार्थिनीलाही ताण यायला लागला आहे. उच्चशिक्षण घेतलेले तरुण क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करत आहेत. काही व्यसनाधीन होत आहेत. विवाह हा धर्मशास्त्रात सांगितलेल्या १६ संस्कारांपैकी एक संस्कार असून तो धर्मशास्त्रानुसार काटेकोरपणे होत नाही. विवाहप्रसंगी मुहूर्ताकडे दुर्लक्ष करणे, अक्षता मारणे, वरमाला घालतांना वधूला उचलून घेणे, फटाके फोडणे, डी.जे.च्या तालवर हिडीस अंगविक्षेप करणे, भोजनाकडे लक्ष यांसारखे दिखाऊ प्रकार सर्रास घडतांना दिसतात. परिणामी देवतांचे आशीर्वाद मिळत नाहीत. विवाहसंस्कार योग्य पद्धतीने होणे हेही सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आवश्यक असते.’’

वैवाहिक समस्यांवरील उपाययोजना सांगतांना त्या पुढे म्हणाल्या, ‘‘घटस्फोटामागे अनेक कारणे आहेत, त्यांपैकी एक म्हणजे पितृदोष. तो दूर करण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ , तसेच कुलदेवतेचा नामजप करावा. आज प्रत्येकाने धर्माचरण करण्याची आवश्यकता आहे. तरच ही संस्कृती टिकून राहील.’’

या वेळी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष श्री. विनोदजी मित्तल, सौ. मीना मित्तल, शहा अग्रवाल, दिनेश अग्रवाल, शशी अग्रवाल, श्रीकांत अग्रवाल, सीताराम अग्रवाल, गोवर्धन मोदी आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment