अंतरीच्या भावदृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांना जाणणार्‍या आणि जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ गुरुदेवांनाच अनुभवणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

अनुक्रमणिका

१. प्रथम भेटीतच पू. (सौ.) संगीता पाटीलकाकू
यांच्याप्रती जवळीक वाटून ‘त्यांचे भावबोल ऐकत रहावे’, असे वाटणे

‘पुण्यातील पू. (सौ.) संगीता पाटीलकाकू रामनाथी आश्रमात आल्या असतांना माझी त्यांच्याशी भेट झाली. काकूंना मी प्रथमच भेटले; पण ‘आम्ही अनेक वर्षांपासून परिचित आहोत’, असे मला वाटले. ‘त्यांचे भावबोल ऐकत रहावे’, असे मला वाटत होते. प्रथम भेटीतच मला त्यांच्याविषयी जवळीक वाटली. पू. (सौ.) काकूंमध्ये असलेला ‘प्रेमभाव’ आणि त्यांचा ‘भोळा भाव’ यांमुळे मला असे जाणवले असावे. काकूंच्या या गुणांमुळे त्यांनी प्रसारात सेवा करतांना अनेक वाचक आणि हितचिंतक यांनाही आपलेसे केले आहे. बरेच दिवस काकू दिसल्या नाहीत, तर ते त्यांची आपुलकीने चौकशी करतात.

 

२. सतत सकारात्मक रहाणार्‍या पू. पाटीलकाकू !

पू. पाटीलकाकू म्हणतात, ‘जीवनात १०० धागे जरी दुःखाचे असले, तरी १ धागा सुखाचा असतो. जो सुखाचा धागा असतो, तो केवळ रेशमाचा नव्हे, तर कोशामधून काढलेल्या रेशमाचा असतो.’ यावरून ‘त्या प्रत्येक परिस्थितीत कसा सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात ?’, ते लक्षात आले.

 

३. सनातनचे साहित्य घरोघरी पोचून त्यातील चैतन्याचा लाभ सर्वांना व्हावा, या
निरपेक्ष हेतूने पू. (सौ.) पाटीलकाकूंनी स्वदेहाचा विचार न करता पायी चालत जाणे

काकूंना दृष्टीदोष निर्माण झाल्याने त्यांना अंधूक दिसते; पण प्रसारातील कोणतीही सेवा करण्यास त्या सिद्ध असतात. त्यांचा सेवेचा उत्साह तरुणांनाही लाजवेल, असा आहे. सनातनचे साहित्य घरोघरी पोचून सर्वांना त्यातील चैतन्याचा लाभ व्हावा, या निरपेक्ष हेतूने त्या स्वतःचा विचार न करता दूरदूरच्या ठिकाणी पायी चालत जातात, तसेच इमारतीचे ४ – ५ मजले चढून जिज्ञासूंकडे साहित्य पोचवतात. साहित्यातील चैतन्यापासून कोणी वंचित राहू नये, या ओढीने त्यांची सेवेची धडपड चालू असते.

 

४. परात्पर गुरुदेवांचे कार्य सर्वत्र पोचवण्याच्या ओढीने देवाचे
पावलोपावली साहाय्य घेऊन एकटीने प्रसाराला जाणार्‍या पू. (सौ.) पाटीलकाकू !

खरेतर अशा स्थितीत प्रसारकार्य करणे, वर्गणीदार बनवणे किंवा विज्ञापने घेणे, हे अत्यंत कठीण आहे; पण परात्पर गुरुदेवांचे कार्य सर्वत्र पोचवण्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. या तळमळीपोटी त्या देवाला साहाय्यासाठी हाक मारतात आणि एकट्याच प्रसाराला जातात. देव भावाचाच भुकेला आहे ना ? तो त्यांच्या भावपूर्ण हाकेला तात्काळ धावून येतो आणि स्थुलातून घेणार नाही, एवढी त्यांची काळजी घेतो.

 

५. बालपणीच पू. (सौ.) पाटीलकाकू यांचे मातृ-पितृ
छत्र हरपल्याने भगवंतच बनला त्यांचा माता-पिता अन् सखा !

बालपणीच त्यांचे मातृ-पितृ छत्र हरपल्याने भगवंतच त्यांचा माता-पिता आणि सखा बनला आहे. भगवंतच त्यांचे सर्वस्व असून त्या केवळ भगवंताच्या प्रेमामुळे, भगवंतावरील भक्तीमुळे आणि भगवंतावर असलेल्या अतूट निष्ठेमुळे जीवनातील दुःखद प्रसंगांना सामोरे जाऊ शकल्या. ‘आतापर्यंतचा प्रवास दुःखदायी होता खरा; पण त्यामुळेच मला देव मिळाला ना !’, असे त्या कृतज्ञतापूर्वक सांगतात. त्या प्रत्येक गोष्ट, म्हणजे त्यांची दैनंदिन कृतीही देवाला विचारूनच करतात. त्यांचे अवघे आयुष्य केवळ भगवंतानेच व्यापून टाकले असून ‘सर्वस्वाने भगवंताचे होऊन रहाणे’, ही अत्यंत कठीण अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतली आहे.

दृष्टीदोष असूनही भावदृष्टीने प्रतिदिन घरासमोर रांगोळी काढणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील

 

६. परात्पर गुरु डॉक्टरांना विष्णुस्वरूपात पहाणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटीलकाकू !

पू. (सौ.) संगीता पाटीलकाकू यांची परात्पर गुरुदेवांवर अनन्य भक्ती आहे. त्यांना बालपणीच दृष्टांत झाला होता की, पुढे तुला ‘मोठी माऊली’ (परात्पर गुरुमाऊली) भेटणार आहे. त्यांनी बाह्य दृष्टीने नाही, तर आंतरदृष्टीने प.पू. डॉक्टरांना पाहिले होते. त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ गुरुदेवच दिसतात. ‘गुरुदेव सदैव समवेत आहेत’, अशी त्यांना पदोपदी अनुभूतीही येते. त्या प.पू. डॉक्टरांना विष्णुस्वरूपात पहातात. पू. संगीता पाटीलकाकूंची भावस्थिती एवढी उच्च कोटीची आहे की, ‘प्रतिदिन घरी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर येतात, तर त्यांना चांगले वाटले पाहिजे’, असे वाटून त्या प्रतिदिन सकाळी तिसर्‍या माळ्याच्या पायर्‍यांपासून त्यांच्या चौथ्या माळ्यावरील सदनिकेच्या दारापर्यंत रांगोळी काढतात.

 

७. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. (सौ.)
संगीता पाटील यांना ‘संतपदा’ची दिली अनमोल भावभेट !

पू. काकूंच्या उदाहरणावरून ‘देवाला अन्य कोणतीच गोष्ट प्रिय नसून तो केवळ सर्वस्वाने त्याचे झालेल्या भक्तावर कृपेची उधळण करतो अन् त्याला आपल्या चरणांशी स्थान देतो’, हे लक्षात येते. परात्पर गुरु डॉक्टरांनी सौ. पाटीलकाकू यांची भाव-भक्ती आणि त्यांची तीव्र तळमळ पाहून त्यांना ‘संतपदा’ची अनमोल अशी भावभेट दिली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पू. पाटीलकाकूंची भेट होऊन सध्याच्या काळातही उच्च भक्ती करणार्‍या आणि भक्तीयुक्त कर्म करणार्‍या जिवाची ओळख झाली.

सौ. संगीता पाटीलकाकू यांच्यासारखे आगळेवेगळे संतरत्न घडवणार्‍या परात्पर गुरुमाऊलीप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.४.२०१९)

Leave a Comment