दृष्टीहीन असूनही भोळ्या भावाच्या आधारे पू. (सौ.) संगीता पाटील झाल्या सनातनच्या ८५ व्या संत !

भोसरी (पुणे) – येथे ३० मार्च या दिवशी झालेल्या भावसोहळ्यात भोसरी येथील सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाल्या. त्या सनातनच्या ८५ व्या संत झाल्या आहेत. याच भावसोहळ्यात ४ साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते पू. (सौ.) संगीता पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

 

सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ८५ वे पुष्प गुंफले !

गुरुचरणी अर्पण केले तन, मन आणि धन । संतपदाची भेट देऊनी श्रीगुरूंनी केली चैतन्य आणि आनंद यांची उधळण ।

‘स्वतंत्र जीव हा, पारतंत्र्यातून । निशीदिनी पदी रमला, मजसि हा पुरुषोत्तम दिसला ॥’ या संत भक्तराज महाराज यांच्या भजनातील पंक्ती आहेत. ‘शरीर, मन आणि बुद्धी यांच्या बंधनांमुळे पारतंत्र्यात अडकलेला हा जीव रात्रंदिवस नामस्मरण करण्यात रमला आणि त्यातूनच त्याला पुरुषोत्तम म्हणजे भगवंत दिसला’, असा याचा अर्थ आहे. या भजनपंक्ती प्रत्यक्ष जीवनात अनुभवणार्‍या आणि खडतर प्रारब्धातही देवावरील भक्ती तसूभरही न्यून होऊ न देता भोळ्या भावाने अखंड नामस्मरण करत भगवंताला अनुभवणार्‍या सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) या सनातनच्या ८५ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. भोसरी येथे ३० मार्चला झालेल्या भावसोहळ्यात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘सौ. संगीता पाटील या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदाला पोचल्या आहेत’, अशी घोषणा केली अन् उपस्थित सर्वच साधक चैतन्य, भाव यांच्या वर्षावात न्हाऊन निघाले ! पू. (सौ.) संगीता पाटील यांनाही भावाश्रू अनावर झाले. याच भावसोहळ्यात पू. (सौ.) संगीता पाटील यांना पदोपदी साथ देणारे त्यांचे यजमान श्री. महादेव पाटील (वय ६५ वर्षे) यांनीही  ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.

‘आजारपणात आलेली दृष्टीहीनता, हालाखीची आर्थिक परिस्थिती, अल्प शिक्षण, शारीरिक आजार, यजमानांचे आजारपण, अशा परिस्थितीतही न डगमगता पू. (सौ.) संगीता पाटील भोळ्या भावाने आनंदाने साधनारत आहेत’, अशी त्यांची गुणवैशिष्ट्ये सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी उलगडून दाखवली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) संगीता पाटील यांना पुष्पहार अर्पण करून, तसेच शाल, श्रीफळ अन् भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. पू. (सौ.) संगीता पाटील यांचा सन्मान झाल्यानंतर त्यांनीही गुलाबाचे फूल आणि भेटवस्तू देऊन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा सन्मान केला. ‘गुरूंनी पुष्कळ प्रेम दिले. शेवटच्या श्‍वासापर्यंत अखंड सेवा करीन. शेवटपर्यंत गुरुदेवांची कृपादृष्टी अशीच रहावी’, अशी कृतज्ञतापूर्ण प्रार्थना पू. (सौ.) संगीता पाटील यांनी या वेळी केली. पू. (सौ.) संगीता पाटील रामनाथी आश्रमात गेेल्या असतांना त्यांच्या साधनाप्रवासाविषयी घेतलेली मुलाखत, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह त्यांचा झालेला वार्तालाप यांविषयीच्या ध्वनीचित्रचकतीही या प्रसंगी दाखवण्यात आल्या.

 

भक्तीयोगाचे मूर्तीमंत स्वरूप पू. पाटीलकाकू !

‘आतापर्यंत मी अनेक भक्तीयोगी पाहिले; पण भक्तीयोगाशी अद्वैत झालेल्या, भगवंताशी अखंड अनुसंधान असलेल्या पू. पाटीलकाकू एकमेव आहेत ! भक्तीयोगी असूनही त्या व्यष्टीसह समष्टी साधनाही करत आहेत. शारीरिक, आर्थिक इत्यादी सर्व तर्‍हेच्या अनेक अडचणी असूनही पू. पाटीलकाकू त्यासंदर्भात कधी कोणाशी तक्रारीच्या स्वरूपात एक शब्द बोललेल्या नाहीत आणि त्यांच्यावर अडचणींचा कधीही परिणाम झालेला नाही. अशा काकू सनातन संस्थेला दिल्याबद्दल मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

भक्तीमार्गातील पुणे येथील आदर्श संत पू. (सौ.) संगीता पाटीलकाकू !

‘पू. (सौ.) संगीता पाटीलकाकूंच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलावे तेवढे थोडे आहे. त्यांची आणि माझी रामनाथी आश्रमात जी पहिली भेट झाली, ती ‘पहिली भेट आहे’, असे मला वाटले नाही, तर ‘अनेक वर्षांची आमची जवळीक आहे’, असे वाटले. त्यांच्याशी बोलतांना मला त्यांची पुढील वैशिष्ट्ये जाणवली आणि त्यांच्याकडून शिकताही आली.

१. माझ्याशी बोलत असतांनाही पू. काकूंचे बोलणे पूर्ण झाल्यावर आणि मी बोलत असतांना त्या लगेच तोंडात पुटपुटत नामजप करत होत्या. मी असे आजपर्यंत एकदाही बघितलेले नाही. ‘सगुण-निर्गुण भावस्थिती कशी असते ?’, हे त्यांच्यामुळे मला कळले.

२. पू. काकूंना भेटवस्तू म्हणून मी साडी दिली. ‘मी साडी देणार’, हे त्यांना आधीच कळले होते. ‘अखंड भावावस्थेमुळे सूक्ष्मातील कळण्याची क्षमता निर्माण होते’, याचे प्रत्यक्ष उदाहरण मी अनुभवले.

३. एरव्ही मी साधक आणि संत यांना भेटलो की, त्यांच्याशी बोलतो. पू. काकूंच्या भेटीत मला ‘काही बोलावे’, असे वाटत नव्हते; कारण ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटत होते. आतापर्यंत मला भक्तीमार्गातील संतांची केवळ तात्त्विक माहिती होती. पू. काकूंचे बोलणे ऐकल्यामुळे मला ‘भक्तीमार्गातील संत कसे असतात ?’, हे अनुभवता आले.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

साधकांनो, निदान भक्तीमार्गी संतांना ओळखायला शिका !

केवळ ‘गुरुकृपायोगा’चे ज्ञान असल्याने पुणे येथील साधकांना सौ. संगीता पाटीलकाकू संत असल्याचे ओळखता आले नाही. यापुढे साधकांना ‘विविध योगमार्गांतील उन्नतांना कसे ओळखायचे ?’, हे कळले नाही, तरी भक्तीमार्गातील भगवंताच्या अखंड अनुसंधानात असलेले, अखंड नामजप करणारे, अखंड भावस्थितीत असलेले ओळखता आले पाहिजेत. ते ओळखता आले, तर साधकांना त्यांच्या सत्संगाचा लाभ घेऊन प्रगती करणे सुलभ जाईल. भक्तीयोगातील संत बहुदा व्यष्टी साधना करणारे असतात. त्यामुळे ते समाजाला ओळखता येत नाहीत; पण काही वर्षे साधना केलेल्या सनातनच्या साधकांना त्यांना ओळखता आले पाहिजे, तरच ‘त्यांची साधना ठीक आहे’, असे समजता येईल. रामनाथी आश्रमातील काही साधकांना सौ. संगीता पाटीलकाकू संत असल्याचे पहिल्या भेटीतच ओळखता आले, हे साधकांनी लक्षात घेतले पाहिजे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

‘पुण्यातील सौ. संगीता महादेव पाटील यांनी बालपणापासून अत्यंत खडतर आयुष्य जगतांना देवावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. त्यांच्या भोळ्या भावामुळे देवही त्यांच्या प्रत्येक हाकेला जणू धावून येत होता. आजारपणामुळे त्यांना अंधत्व आले आणि साधना करू लागल्यानंतर त्यांना मोठी अनुभूती आली, ती म्हणजे त्यांना थोडे थोडे दिसू लागले. आपण संत जनाबाई, संत सखूबाई यांच्या गोष्टींमध्ये ऐकतो ना की, प्रत्यक्ष देवच त्यांच्या साहाय्याला येत होता. तसेच सौ. पाटीलकाकूंच्या संदर्भातही घडले आहेे.

त्यांचे कौतुक म्हणजे बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी सेवेची तीव्र तळमळ आणि सनातनचे कार्य समाजापर्यंत पोचवण्याचा ध्यास यांमुळे डोळे अधू असूनही त्या प्रसारसेवा करतात. त्या देवाचीच सोबत घेतात आणि गर्दीच्या रस्त्यावरून एकट्याच चालत जाऊन घरोघरी प्रसार करतात. अंधुक दिसत असल्याने त्यांना वाचन इत्यादी करता येत नाही. असे असले, तरी त्यांना शास्त्रीय भाषेत सूत्रांचे विश्‍लेषण करता येते.

आतापर्यंत मी अनेक भक्तीयोगी पाहिले; पण भक्तीयोगाशी अद्वैत झालेल्या, भगवंताशी अखंड अनुसंधान असलेल्या पाटीलकाकू एकमेव आहेत ! भक्तीयोगी असूनही त्या व्यष्टीसह समष्टी साधनाही करत आहेत. शारीरिक, आर्थिक इत्यादी सर्व प्रकारच्या अडचणी असूनही त्या यासंदर्भात कधी कोणाशी तक्रारीच्या स्वरूपात बोलल्या नाहीत आणि त्यांच्यावर अडचणींचा कधी परिणामही झाला नाही. त्या स्थितीतही त्यांची भगवंतावरील श्रद्धा अतूट राहिली.

अखंड भावस्थिती आणि सेवेची तीव्र तळमळ यांमुळे सौ. संगीता महादेव पाटील ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८५ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या आहेत.

अशा पू. काकू सनातन संस्थेला दिल्याविषयी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती व्हावी’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

पू. काकूंच्या यजमानांमध्येही साधकत्वाचे अनेक गुण आहेत. पू. काकूंच्या संतपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मोलाची साथ दिली. यामुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्याविषयी मी त्यांचे अभिनंदन करतो.

‘पू. काकू आणि त्यांचे पती यांनी रामनाथी आश्रमात कायमचे रहाण्यासाठी लवकरात लवकर यावे’, अशी मी त्यांना विनंती करतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘ही धारिका वाचतांना अतिथी कक्षात पुष्कळ सुगंध दरवळत होता आणि भावजागृती होत होती. अशी अनुभूती प्रथमच आली.’

– सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (३०.३.२०१९)

 

पू. (सौ.) संगीता पाटील यांचे सर्वसामान्यांपेक्षाही १० टक्के अधिक असलेले खडतर प्रारब्ध !

पू. (सौ.) संगीता पाटील यांचा जन्म झाल्यानंतर त्या ४ दिवसांच्या असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले आणि लहानपणीच वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे मातृ-पितृसुख त्यांना लाभलेच नाही. एका ब्राह्मण कुटुंबाने त्यांचा सांभाळ केला. पुढे त्यांचा विवाह झाला; पण त्यांचे अपत्य लहानपणीच गेले. पू. (सौ.) संगीता पाटील यांना एकदा विषमज्वर (टायफॉईड) झाला होता. त्या आजारपणात त्यांची दृष्टी गेली. पुढे यजमानांचाही नोकरीच्या ठिकाणी अपघात होऊन त्यांच्या हाताची चार बोटे कापली गेली. त्याच दिवशी कामाच्या ठिकाणी अजून एक अपघात होऊन यजमानांच्या पायालाही गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांची नोकरी गेली. नंतर यजमानांची एका डोळ्याची दृष्टी गेली. आर्थिक परिस्थितीही बिकट असल्याने पाटीलकाकूंनी काही काळ धुणी-भांडी आणि फरशी पुसण्याची कामे केली. एवढी हालाखीची परिस्थिती असतांनाही त्यांनी परिस्थितीला कधीच दोष दिला नाही कि त्यांच्या मनात देवाविषयी विकल्प आला नाही. उलट त्या झोकून देऊन प्रसारसेवा करत होत्या. ‘गुरुदेव समवेत आहेत’, असा भाव ठेवून त्या सेवा-साधना करत राहिल्या. कित्येकदा प्रसारासाठी किंवा कामासाठी बसने प्रवास करतांना त्यांना पैशांची अडचण असायची; पण बसमध्ये कधी बसवाहकाकडून (कंडक्टरकडून) किंवा सहप्रवाशांकडून न्यून पडलेल्या पैशांची सोय व्हायची.

त्या रामनाथीला गेलेल्या असतांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याशी झालेल्या वार्तालापाचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी सूक्ष्म परीक्षण केले. त्यात त्यांनी सांगितले, ‘‘सौ. संगीता यांचे प्रारब्ध ७५ टक्के आहे; पण भक्तीभावाने त्यांनी त्याच्यावर मात केली. (कलियुगातील सध्याच्या काळात सर्वसाधारण व्यक्तीचे प्रारब्ध ६५ टक्के असते आणि सर्वसामान्य व्यक्ती अडचणींमुळे खचून जाऊन दु:खी होते.) काकूंशी सहज बोलले, तरी चैतन्य जाणवते. त्यांचे मन अनुसंधानात असल्याचे आणि त्या संतपदाकडे वाटचाल करत असल्याचे जाणवते.’’

 

उत्कट भाव असणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील म्हणजे जणू कलियुगातील शबरीच !

पू. (सौ.) संगीता पाटील यांच्या उत्कट भावाचे एक उदाहरण सांगतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘पू. (सौ.) संगीता पाटील यांनी शबरीसारखी साधना केली. ‘या झोपडीत राम कधीतरी येईल’, या भावाने शबरी सडारांगोळी करायची. पाटीलकाकूही ‘गुरुमाऊली घरी येऊन दर्शन देईल’ या भावाने प्रतिदिन भजन गुणगुणत रांगोळी काढतात. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।’, असे भक्त आणि देव यांचे नाते असते. ‘मी जिथे जाईन, तेथे समवेत या’, अशी प्रार्थना पाटीलकाकू करायच्या आणि म्हणूनच भगवंतही त्यांच्या समवेत असायचा.’’

 

‘प.पू. डॉक्टर समवेत आहेत’, या भावाने दैनंदिन सेवा करा ! – पू. (सौ.) संगीता पाटील

सर्वांना भावपूर्ण नमस्कार ! देव करवून घेईल, या भावाने सकारात्मक रहा. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, या भावाने दैनंदिन सेवा करा. त्यामुळे घरी चैतन्य रहाते. आपण आज्ञाधारक असायला हवे. प.पू. गुरुदेवांना समवेत नेले की, सेवा परिपूर्ण होते. व्यष्टी साधना असेल, तर समष्टी साधनाही सहजतेने होते. गुरुदेवांना आढावा द्या. साधनेने अडचणी निघून जातात. माझ्यापुढे पुष्कळ आव्हाने होती; पण देवाने मला मोठे केले. मला काहीच येत नाही. जे मिळाले, त्याचे सारे श्रेय प.पू. डॉक्टर आणि सद्गुरु स्वातीताई यांना आहे. कर्ते-करविते प.पू. डॉक्टरच आहेत !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment