शिवाची आरती

शिव Shiv

शिव

आरती लयबद्ध पद्धतीने म्हणण्याने आपल्यात जलद भावजागृती होण्यास साहाय्य होते. आरतीचा अर्थ समजून ती म्हटली, तर त्याचा अधिक लाभ होतो. यादृष्टीने काय करायला हवे त्याचा उहापोह येथे केला आहे.

भावजागृती होण्यास साहाय्य करणारी आरती

‘सनातन’च्या भाव असलेल्या म्हणजे ईश्‍वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

तर ऐकूया, सनातनच्या साधकांच्या आवाजातील शिवाची आरती ….

शिवाची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।

लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।। १ ।।

जय देव जय देव जय श्री शंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।। धृ० ।।

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।

विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। २ ।।

देवीं दैत्यीं सागरमंथन पै केले ।

त्यामाजी अवचित हालाहल जे उठले ।

ते त्वा असुरपणे प्राशन केले ।

नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ।। ३ ।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरी ।। ४ ।।

– समर्थ रामदासस्वामी

शिवाच्या आरतीमधील कठीण शब्द

‘लवथवती विक्राळा …….’ ही शिवाची आरती समर्थ रामदास स्वामी विरचित आहे. कोणत्याही देवतेची आरती म्हणतांना ती अर्थ समजून घेऊन म्हटल्यास भाववृद्धी लवकर होण्यास साहाय्य होते. यासाठी आता आपण शिवाच्या आरतीतील कठीण शब्दांचा अर्थ पाहूया.

अ. ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।’ याचा अर्थ असा आहे, ‘समुद्रमंथनातून निघालेल्या भयंकर अशा हलाहल विषाच्या भयाने अतीप्रंचड अशी अनंत ब्रह्मांडांची संपूर्ण माळ कंप पावू लागली.’

आ. ‘लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।’ यामध्ये ‘बाळा’ म्हणजे गंगा नदी.

इ. ‘विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ।’ यातील ‘शितिकंठ’ म्हणजे मोराच्या कंठासारखा निळा कंठ असलेला.

ई. ‘शतकोटीचे बीज वाचे उच्चारी’ याचा अर्थ शंभर कोटी जपसंख्येएवढे फळ देणार्‍या श्रीरामनामरूपी. बीजमंत्राचा जप शिव अखंड करत असतो.

उ. ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी शिवाच्या चरणी प्रार्थना.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आरतीसंग्रह (अर्थासह)’

Leave a Comment