‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचा विधीतील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी श्री महालक्ष्मीस्वरूप तेजतत्त्वाचे कार्य आरंभ व्हावे, सर्व साधकांवर तेजाची कृपा व्हावी, श्री महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धन-धान्य, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य, ऐश्‍वर्य आदींची संपन्नता लाभावी’, यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी माघ पौर्णिमेपूर्वी सनातनच्या रामनाथी आश्रमात कमलपिठावर दीपस्थापना विधी करावा’, असे चेन्नई (तमिळनाडू) येथील जीवनाडीपट्टी वाचक श्री. सेल्वम् गुरुजी यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी सांगितले होते. त्यानुसार रामनाथी आश्रमाच्या दर्शनी भागात निर्मिलेले सुगंधी द्रव्याने युक्त जलकुंड आणि त्याच्या मध्यभागी स्थापन करण्यात आलेले अष्टदलस्वरूप कमलपीठ यांवर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभहस्ते दीपलक्ष्मीची स्थापना करण्यात आली.

‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत कमलपिठावर दीपस्थापना विधी आरंभ होण्यापूर्वी आणि तो विधी झाल्यानंतर पुढील घटकांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

अ. कमलपिठावरील जलकुंडातील सुगंधी जल

आ. कमलपिठावरील दीप

इ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

टीप – लेखात इथून पुढे कमलपिठावरील जलकुंडातील सुगंधी जल आणि कमलपिठावरील दीप यांना अनुक्रमे ‘सुगंधी जल’ अन् ‘दीप’ असे संबोधले आहे.

या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. कमलपिठावर दीपस्थापना विधी झाल्यानंतर दीपातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे

दीपामध्ये आरंभी अल्प प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती (त्या वेळी दीपाच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरच्या भुजांनी १२० अंशाचा कोन केला); पण तिची प्रभावळ नव्हती. (‘यू.टी.’ स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.) विधी झाल्यानंतर दीपातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. त्या वेळी त्याच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरने ० अंशाचा कोन केला.

२ अ २. चाचणीतील अन्य घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. कमलपिठावर दीपस्थापना विधी झाल्यानंतर चाचणीतील सर्व घटकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. कमलपिठावर दीपस्थापना विधी झाल्यानंतर चाचणीतील सर्व घटकांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करतांना डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

३ अ. कमलपिठावर दीपस्थापना विधी झाल्यानंतर चाचणीतील
सर्व घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम आणि त्यामागील कारणमीमांसा

३ अ १. सुगंधी जल : मोगर्‍याच्या गंधाकडे श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट होते. कमलपिठावरील जलकुंडातील मोगर्‍याच्या सुगंधी द्रव्ययुक्त जलामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट झाल्याने विधीनंतर सुगंधी जलाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.

३ अ २. दीप : दीप हे तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. वेदांमध्ये ‘श्री महालक्ष्मीदेवीचे तेज सुवर्णासमान आहे’, असा महिमा वर्णन केला आहे. विधीच्या वेळी कमलपिठावरील दीपलक्ष्मीमध्ये (दीपामध्ये) श्री महालक्ष्मीदेवीचे आवाहन करून षोडशोपचार पूजन करण्यात आले. दीपामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट झाल्याने विधीनंतर दीपाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ अ ३. सद्गुरुद्वयी : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कमलपिठावर स्थापन केलेल्या दीपलक्ष्मीरूपी श्री महालक्ष्मीचे षोडशोपचार पूजन अतिशय भावपूर्णरित्या केले. त्यामुळे श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व जागृत झाले. त्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीचे चैतन्य सद्गुरुद्वयींकडे मोठ्या प्रमाणावर आकृष्ट झाले. त्यामुळे सद्गुरुद्वयींच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. यावरून भावपूर्ण पूजन करण्याचे महत्त्व लक्षात येते. सद्गुरुद्वयींपैकी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या एकूण ऊर्जेची प्रभावळ अधिक प्रमाणात वाढली आहे. याचे कारण ‘ईश्‍वर कार्यानुरूप आणि आवश्यकतेनुसार संबंधितांना शक्ती देतो’, हे आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२०.२.२०१९)

ई-मेल : [email protected]

 

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने
कमलपिठाच्या बांधकामाचे केलेले वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक संशोधन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दर्शनी भागात कमलपिठाचे बांधकाम आरंभ होण्यापूर्वी (७.१.२०१९ या दिवशी) तेथील भूमीची मोजणी केली असता, तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असून तिची प्रभावळ ३.९४ मीटर होती.

१. कमलपिठाच्या बांधकामाच्या विविध टप्प्यांवर
कमलपिठाच्या सात्त्विकतेत (सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत) उत्तरोत्तर वाढ होणे

अ. २२.१.२०१९ या दिवशी भूमी खोदाई झाल्यावर तेथील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होऊन ती ६.८८ मीटर झाली.

आ. ४.२.२०१९ या दिवशी एका संतांनी कमलपिठाच्या बांधकामाची पाहाणी करून त्यासंदर्भात काही सुधारणा सांगितल्या. त्यानंतर ५.२.२०१९ या दिवशी कमलपिठाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणखी वाढ होऊन ती १६.७० मीटर झाली.

इ. ६.२.२०१९ या दिवशी कमलपिठावर कमळाची प्रतिकृती बसवण्यात आल्यानंतर कमलपिठाच्या सकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ होऊन तिची प्रभावळ २१.२५ मीटर झाली.

ई. कमलपिठाचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचे रंगकाम चालू झाल्यावर म्हणजे ‘व्हाईट प्रायमर’चा (white primer) पहिला हात (coat) दिल्यावर पुन्हा एकदा कमलपिठाच्या सकारात्मक ऊर्जेची मोजणी केली असता, तिची प्रभावळ ३० मीटरपेक्षाही अधिक आली. (आश्रमाच्या कुंपणाची भिंत आल्याने त्यापुढे अचूक सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता येणे शक्य झाले नाही.)

‘व्हाईट प्रायमर’ दिल्यावर कमलपिठाला रंग देणे, कमलपिठावर दीपस्थापना विधी होण्यापूर्वी आणि विधी झाल्यानंतर, अशा पुढील टप्प्यांवरही उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्याचे नियोजन केले होते; परंतु चाचणीस्थळाची मर्यादा संपुष्टात आल्याने पुढील टप्प्यांच्या मोजण्यांच्या नोंदी करणे शक्य झाले नाही. असे जरी असले, तरी कमलपीठ सिद्ध होत असतांना (कमलपिठाचे बांधकाम चालू असतांना) ज्याप्रकारे त्याच्या सात्त्विकतेत उत्तरोत्तर वाढ होत गेली, यावरून कमलपीठ स्थापना विधीनंतर त्याच्यातील सात्त्विकतेत कैकपटीने वाढ झाली असणार, यात तिळमात्र शंका नाही.

कमलपिठासारख्या सात्त्विक वास्तूचे वैज्ञानिक उपकरणाद्वारे संशोधन करण्याची संधी मिळाल्याने पुढीलप्रमाणे लाभ झाला – ‘देवतांची मंदिरे, संतांचे आश्रम आदी सात्त्विक वास्तूंचे बांधकाम करतांना प्रत्येक टप्प्यावर वास्तूतील सात्त्विकतेत कशाप्रकारे वाढ हाऊ शकते’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात आले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.२.२०१९)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment