ज्ञानयोगी आणि ऋषितुल्य परात्पर गुरु परशराम पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग !

परात्पर गुरु पांडे महाराज

देवद (पनवेल) – येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साक्षात प्रतिरूप असलेले, सनातनच्या प्रत्येक साधकावर अपार प्रीतीच्या वर्षावाचे कृपाछत्र पांघरणारे, सहस्रो साधकांना मंत्रोपाय देऊन त्यांना जीवनदान देणारे, ज्ञानयोगी अन् ऋषितुल्य परात्पर गुरु पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांनी रविवार, माघ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५१२० (म्हणजेच ३ मार्च २०१९) या दिवशी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.

वयाच्या ९३ व्या वर्षीही अविरत सेवारत राहून आगामी हिंदु राष्ट्रासाठी आणि तत्पूर्वी येणार्‍या आपत्काळासाठी अखिल मानवजातीला उपयुक्त ज्ञानामृत देणारे परात्पर गुरु पांडे महाराज यांना २५ फेब्रुवारीला रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारानंतर २ मार्चच्या रात्री त्यांना येथील सनातन आश्रमात परत आणण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका येण्याच्या २ मिनिटांपूर्वी परात्पर गुरु पांडे महाराज देवद आश्रमातील एका साधकाला म्हणाले, ‘‘मृत्यू शांतपणे आला तर बरे होईल !’’ प्रत्यक्षातही त्यांनी अतिशय शांत स्थितीत देहत्याग केला. परात्पर गुरु पांडे महाराज हे ३ जानेवारी २००७ पासून देवद येथील आश्रमात वास्तव्यास होते.

देहत्यागाच्या समयी त्यांच्याजवळ त्यांचे पुत्र श्री. अमोल पांडे, स्नुषा सौ. देवयानी पांडे, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली नात कु. गौरी आणि नातू श्री. सौरभ, तसेच अन्य नातलग उपस्थित होते.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यावर ४ मार्च या दिवशी अंत्यसंस्कार विधी करण्यात येणार आहेत.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अखिल मानवजातीसह सनातनच्या साधकांवर केलेल्या कृपेसाठी सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांच्या वतीने त्यांच्या पावन चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

 

कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा एकमेवाद्वितीय सुरेख
संगम असलेले परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !

वर्ष २००७ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आनंददायी भेटीतील एक भावक्षण !

‘भक्तीयोगात गोडवा असतो, तर ज्ञानयोगात एकप्रकारे रुक्षता असते. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यात भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा सुरेख संगम होता. इतरत्र असे कुठेही अनुभवता येणार नाही. या संगमामुळे, म्हणजे त्यांच्या बोलण्यातील गोडव्यामुळे आणि ज्ञानामुळे ‘त्यांचे बोलणे सतत ऐकत रहावे’, असे वाटायचे. आमचे जेव्हा दूरभाषवर बोलणे व्हायचे, तेव्हा ८० टक्के बोलणे त्यांचे असायचे आणि मी त्याचा आनंद घेत रहायचो. वर्ष १८.२.२००५ या दिवशी झालेल्या आमच्या पहिल्या भेटीपासून मी हे अनुभवत आहे.  त्यांचे लिखाण केवळ अध्यात्मशास्त्रासंदर्भात नसायचे, तर समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातही सर्वांना समजेल, अशा भाषेत असायचे. त्यामुळे ते सनातन प्रभातमध्ये नियमित प्रकाशित व्हायचे. आध्यात्मिक कारणांमुळे देश-विदेशांतील साधकांना त्रास होत असल्यास ते रात्री-बेरात्री कधीही उपाय विचारल्यास तत्काळ प्रेमाने सांगायचे आणि नंतर साधकाची चौकशीही करायचे, म्हणजे ते अखंड कर्मयोगीही होते. त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे सहस्रो साधकांना लाभ झालेला आहे.

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांची कृपादृष्टी आम्हा सर्वांवर अखंड राहो’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

मयन महर्षींनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथनजी यांच्या
माध्यमातून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी दिलेला संदेश !

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर पू. (डॉ.) ॐ उलगनाथनजी यांचा आम्हाला भ्रमणभाष आला. त्यांनी मयन महर्षींनी दिलेला संदेश आम्हाला सांगितला.’

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाची आणि भूमंडलाची कक्षा भेदून वर जाण्याची वेळ

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सायंकाळी ५.२२ वाजता देहत्याग केला. मयन महर्षींच्या संदेशात सायंकाळी ५.३८ अशी वेळ आली आहे. हा भेद असण्याचे शास्त्र पुढीलप्रमाणे आहे. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सायंकाळी ५.२२ वाजता देहत्याग केला, म्हणजे त्या वेळी त्यांचा पृथ्वीलोक सुटला. त्यानंतर त्यांचा लिंगदेह पृथ्वीचे आवरण, म्हणजे भूमंडलाची कक्षा भेदून सर्व साधकांना शक्ती देऊन वर गेला. तेव्हाची नोंद मयन महर्षींनी केली. यातून ‘मृत्यूनंतरही संत सर्व साधकांच्या कल्याणासाठी किती कृपा करतात’, हेही शिकायला मिळते.’

२. ‘१६ मिनिटांपूर्वी देवद आश्रमात रहाणारे वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध परात्पर गुरु पांडे महाराज (जे शुद्ध आत्मास्वरूप होते) यांची आत्मज्योत परमेश्‍वराच्या चरणी विलीन झाली. त्यांची गणेशावर विशेष श्रद्धा होती आणि त्यांनी गणेशावर एक विशेष ग्रंथही लिहिला होता. (‘हो. योग्य आहे.’ – संकलक)

३. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नावाने आज बिहार येथील मधुपुरा नावाच्या गावात असलेल्या ‘श्रृृंंगेश्‍वर’ (प्रचलित नाव – सिंहेश्‍वर) मंदिरात एक पूजा करावी. (‘३.३.२०१९ ला रात्री ८.३० वाजता तेथील मंदिराच्या पुजार्‍यांना सांगून एक पूजा करण्यात आली.’ – संकलक)

मधुपुरा (प्रचलित नाव – माधेपुरा) हे बिहारची राजधानी पाटण्यापासून ६ घंट्यांच्या अंतरावर आहे. श्रृंगेश्‍वर हे स्थान श्रृंंगी ऋषींचे तपश्‍चर्या स्थान आहे. दशरथ राजाने श्रृंंगी ऋषींच्या आज्ञेने याच ठिकाणी पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी याग’ केला होता. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची एकत्रित मूर्ती आहे. या ठिकाणी असलेल्या देवीचे नाव सिंहेश्‍वरी आहे. ही महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची एकत्रित शक्ती आहे.

४. १९.४.२०१९ या चैत्र पौर्णिमेच्या आधी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या स्थानी जाऊन यावे.’ (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ त्या दिवशी तेथे जाणार आहेत. – संकलक)

– मयन महर्षि, (पू. (डॉ.) ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून,३.३.२०१९, संध्याकाळी ६.२६)

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आलेले मोठे मृत्युसंकटरूपी गंडांतर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी स्वतःवर घेतले.’

– मयन महर्षि, (पू. (डॉ.) ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून, ३.३.२०१९, संध्याकाळी ६.२६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात