परिपूर्णता आणि तळमळ यांचा आदर्श असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

भृगु महर्षींनी निवडलेल्या उत्तराधिकार्‍यांची वैशिष्ट्ये

‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी लिहायला आरंभ केल्यास ‘कुठून प्रारंभ करायचा ?’, हा प्रश्‍न पडेल; कारण त्यांचे कार्य अफाट आहे. साधनेविषयी साधकांना मार्गदर्शन करणे, साधकांसाठी भावसत्संग घेणे, नाडीपट्टीत महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आश्रमातील यज्ञयागादी सर्व सेवा करणे, साधकांच्या साधनेतील अडचणी सोडवणे आणि साधकांना वेळोवेळी अध्यात्मप्रसाराच्या कार्याविषयी मार्गदर्शन करणे, अशा अनेक स्तरांवर त्यांना आध्यात्मिक कार्य करावे लागते. एवढे कार्य करणार्‍या त्या एकमेव आहेत !

फुलांकडे जशी फुलपाखरे आकृष्ट होतात तशा प्रीतीस्वरूप सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या दर्शनासाठी आतुरलेल्या आश्रमातील साधिका (वर्ष २०१३)

 

१. ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना’ या समष्टी
कार्यासाठी  आवश्यक असणार्‍या सर्वच गुणांचा समुच्चय असणे

सद्गुरु बिंदाताई विविध स्तरांवर आध्यात्मिक कार्य करत असूनही त्यांच्याकडे पाहिल्यावर काहीच जाणवत नाही. याचे कारण म्हणजे नियोजनबद्ध कार्य, अभ्यासपूर्ण नियोजन, ‘ईश्‍वराला काय अपेक्षित आहे ?’, यासंदर्भातील व्यापक दृष्टी, सर्वांचा विचार इत्यादी अनेक गुणांमुळे त्यांना कुठल्याच कार्याचे दडपण येत नाही. त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच ताण नसतो. त्या नेहमी हसतमुख आणि उत्साही असतात. त्यांच्या या गुणांमुळेच महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापने’च्या आध्यात्मिक कार्याची धुरा त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्यावर एखादे कार्य सोपवले की, त्या ते अभ्यासपूर्ण करत असल्याने त्या आध्यात्मिक कार्याची पूर्ण फलनिष्पत्ती मिळते. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना, म्हणजेच गुरूंना अपेक्षित असे करण्याची तळमळही त्यांच्यात दिसून येते. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये सर्वच गुण दिसून येतात.

अखिल भारतीय हिंदु आधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (२०१४)

 

२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मूळ स्वभाव शांत आणि
अबोल असणे अन् त्यांनी स्वतःमध्ये गुणांचा समुच्चय प्रयत्नपूर्वक केला असणे

वर्ष २००४ मध्ये मी जेव्हा त्यांना प्रथम पाहिले, तेव्हा त्यांचे व्यक्तीमत्त्व शांत आणि अबोल होते. तेव्हा त्या लेखाची सेवा करत होत्या. वर्ष २००६ मध्ये त्यांना आश्रमाविषयी सेवा करण्याचे सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी या सेवेचा अनुभव नसतांनाही ती सेवा पूर्ण तन्मयतेने करू लागल्या. या सेवेमध्ये आश्रमातील त्यांचा सर्वांशीच संपर्क यायचा, त्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व पूर्ण पालटले आणि ते समष्टी सेवेला अनुरूप असे झाले. त्यांचा स्वभाव बोलका झाला. त्या सर्वांमध्ये मिसळू लागल्या. त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण आला इत्यादी. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि साधनेमध्ये वेगाने उन्नती केली. त्यामुळे त्यांना जो तीव्र आध्यात्मिक त्रास होता, तोही ४ – ५ वर्षांतच दूर झाला आणि त्यांचे व्यक्तीमत्त्व उजळून निघाले. तीव्र आध्यात्मिक त्रासातही त्यांनी साधनेमध्ये अत्युच्च उन्नती केली.

कु. स्वाती गायकवाड यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली तेव्हा त्यांना वात्सल्यभावाने आलिंगन देतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (२०१३)

 

३. नेतृत्वगुण असूनही वात्सल्यगुणही असणे

सद्गुरु बिंदाताईंमध्ये उत्तम नेतृत्वगुणाबरोबरच वात्सल्य हाही गुण आहे. समष्टी सेवेमध्ये ‘प्रीती’ हा गुणांचा राजा आहे. वात्सल्य असल्याशिवाय प्रेमभाव निर्माण होत नाही आणि प्रेमभाव निर्माण झाल्याशिवाय प्रीती निर्माण होत नाही. साधकांची साधना होण्यासाठी सद्गुरु बिंदाताई जितक्या कडक वागतात, तितक्याच त्या साधकांशी वात्सल्यानेही वागतात. नेतृत्वगुण असलेल्या एखाद्यामध्ये वात्सल्यगुण असतोच असे नाही; पण तो गुण सद्गुरु बिंदाताईंमध्ये विशेषत्वाने आहे. त्या आश्रमातील, तसेच प्रसारातील साधकांची चोख व्यवस्था बघतात.

 

४. प्रतिदिन १९ – २० घंटे सेवा करूनही ‘त्या दमल्या आहेत’, असे कधी त्यांच्या
तोंडवळ्यावर न दिसणे आणि त्या इतकी सेवा त्यांच्यातील दैवी चैतन्यामुळेच करू शकत असणे

सद्गुरु बिंदाताई प्रतिदिन १९ – २० घंटे सेवा करतात. एवढी सेवा करणार्‍या त्या सनातनमधील एकमेव आहेत. त्या पहाटे ४ वाजेपर्यंत जागून तातडीच्या सेवा पूर्ण करतात आणि त्यानंतर केवळ २ – ३ घंटे झोपून पुन्हा सकाळी ११ वाजता सेवेसाठी आश्रमात येतात. त्या म्हणतात, ‘शरीर आहे म्हणून मी केवळ तेवढा वेळ झोपते, नाहीतर थकायला होतच नसल्याने मला सतत सेवाच करावीशी वाटते.’ या १९ – २० घंट्यांमध्ये ‘त्या दमल्या आहेत’, असे त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच दिसत नाही. त्या नेहमी ताज्या-तवान्याच दिसतात. हेही त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये त्यांनी कधी थकून दुपारी विश्रांती घेतलेली मला आठवत नाही. त्या त्यांच्यातील दैवी चैतन्यावरच एवढे कार्य करतात. हे चैतन्य त्यांना त्यांच्यातील सेवेशी एकरूपता, भाव आणि तळमळ या गुणांमुळे, तसेच गुरुकृपेमुळे मिळते. त्यामुळे त्या अनेक स्तरांवर अथक कार्य करू शकतात.

 

५. एकाच वेळी अनेक कार्ये करणार्‍या, म्हणजे ‘अष्टावधानी’ असणे

त्यांच्या कार्याचे आणखी एक वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहे. त्या सत्संग घेत असतात आणि त्या आलेल्या भ्रमणभाषवर साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत असतात. त्याच वेळी त्या तातडीचा निरोप देणार्‍या अन्य सेवेतील साधकांना काहीतरी सांगत असतात आणि धारिकेतील (फाईलमधील) कागदांमधील एखादे सूत्र हातावेगळेही करत असतात. एवढे करूनही त्यांना सत्संगातील विषय आकलन झालेला असतो. त्यामुळे त्या सत्संगात योग्य आणि सर्वांगपूर्ण मार्गदर्शन करू शकतात. अशा प्रकारे त्या अष्टावधानी आहेत.

 

६. सनातनचे कोणतेही कार्य सद्गुरु बिंदाताईंशिवाय पूर्ण होणे शक्य नाही !

त्या त्यांचा विषय नसलेले बांधकाम, ध्वनीचित्रीकरण यांच्याशी संबंधित साधकांनाही साधनेविषयी मार्गदर्शन करू शकतात. सनातनचे कोणतेही कार्य सद्गुरु बिंदाताईंशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले सद्गुरु बिंदाताईंना कौतुकाने म्हणतात, ‘तुम्हाला साधी शिंक येऊनही उपयोगाचे नाही.’ त्या आजारी पडल्या, तर अहोरात्र सेवा करणार्‍या साधकांना प्रेरणा कुठून मिळणार ? सद्गुरु बिंदाताई म्हणजे सनातनच्या कार्याचा पृथ्वीवर कोसळणारा धबधबाच आहे !

सनातनच्या कुठल्याही साधकावर जिवावर बेतणारे संकट येऊ दे, सनातनवर बंदीचे संकट येऊ दे वा इतर काही संकट येऊ दे, साधकांना त्या वेळी त्यांचा मोठा आधार वाटतो.

 

७. संसार आणि साधना यांचे परिपूर्णत्व असणे

त्यांच्यामध्ये केवळ साधनेतीलच परिपूर्णत्व आहे असे नाही, तर त्या गृहकृत्यदक्षही आहेत. घरातल्यांना, तसेच घरातील कुलाचारासारख्या कार्यांमध्येही त्या आवश्यक तेवढा वेळ देतात. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये संसार आणि साधना यांचे परिपूर्णत्व आहे.

 

८. महर्षि त्यांच्या नाडीपट्टीत सद्गुरु बिंदाताईंचे नेहमी कौतुक करत असणे

सद्गुरु बिंदाताई यांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वामुळे जसे परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांचे कौतुक करतात, तसे महर्षिही त्यांच्या नाडीपट्टीत नेहमी त्यांचे कौतुक करतात. ते म्हणतात, ‘बिंदा सिंगबाळ म्हणजे गुरुदेवांचा उजवा हात आहे. त्यांच्यामध्ये महालक्ष्मीचे तत्त्व आहे.’ त्यांच्या या बोलांची अनुभूती साधक घेत आहेत.

अशा या आदर्श अशा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि त्यांची ज्यांच्यामुळे आम्हाला प्राप्ती झाली, ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी नमन !’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१४.२.२०१९)

शिष्यत्व आणि गुरुत्व या दोन्हींचा संगम असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

त्या एखाद्या प्रसंगातून स्वतः शिकत असतात, तसेच दुसर्‍यांना शिकवतही असतात. याचा अर्थ एकाच वेळी त्या शिष्यभावात असतात, तसेच गुरुभावातही असतात. हे अहं अल्प असल्याचे लक्षण आहे. – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात