भृगु महर्षींच्या सांगण्यानुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात केलेला श्री गुरुपादुकांचा प्रतिष्ठापना सोहळा

‘अनंतकोटी तीर्थे ज्यांच्या चरणांवर आहेत, अशा श्री गुरुपादुकांची मनोभावे सेवा केल्यास तो भाविक मुक्तीपदाला प्राप्त होतो’, हे आणि यासारखी अनेक वचने श्री गुरुपादुकांचे महत्त्व उद्धृत करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना नेहमीच अध्यात्मातील तत्त्वज्ञान कृतीत आणायला आणि ही वचने प्रत्यक्षात अनुभवायला शिकवली. त्यानुसार साधक श्री गुरुचरणांना शरण जाऊन, त्यांचे स्मरण करून आणि या चरणांची मनोभावे सेवा म्हणून श्रीगुरूंना अपेक्षित असलेले धर्मप्रसाराचे अन् धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. साधकांसाठी सर्व तीर्थांसमान असलेल्या या श्री गुरुचरणांतील चैतन्य आता यापुढे श्री गुरुपादुकांच्या माध्यमातून सर्वत्रच्या साधकांसाठी चैतन्य प्रक्षेपित करणार आहे. श्री गुरूंचा केवढा हा कृपावर्षाव !

‘भृगु महर्षींच्या सांगण्यानुसार १०.२.२०१९ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्री गुरुपादुकांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूजेपुरत्या पायांत घातलेल्या पादुकांचा) पूजासोहळा पार पडला. त्या वेळी मला हातांच्या बोटांनी इतर १६ पादुकांना स्पर्श करण्यास सांगण्यात आले. त्या भारतात आणि जगातील विविध राष्ट्रांत स्थापन करण्यास महर्षींनी सांगितले आहे. १२.२.२०१९ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्री गुरुपादुकांचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. 

 

१. श्री गुरुपादुकांची प्रतिष्ठापना

आजारपणामुळे वर्ष २००७ पासून मी गोव्यातील रामनाथी येथील आश्रमातून बाहेर कुठे जाऊ शकलेलो नाही. आतापर्यंत बरेच साधक, संत, गुरु, तसेच समाजातील व्यक्ती यांनी सनातनच्या आश्रमात जाणवणारी शक्ती, चैतन्य, आनंद इत्यादींच्या संदर्भातील त्यांचे अनुभव सांगितले आहेत.

काही नाडीपट्टी वाचनांतूनही या आश्रमाची अनेक वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत. त्यांतील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सद्यस्थितीत हा आश्रम पृथ्वीवरील ईश्‍वरी कार्याचा केंद्रबिंदू आहे. याचा अर्थ ईश्‍वरी कार्यासाठी लागणारी आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य या आश्रमात येते. ते आश्रमातील प्रमुख साधक आणि संत ग्रहण करतात आणि त्यामुळे ते कार्य करू शकतात. आता कार्य अनेक पटींनी वाढणार असल्याने शक्ती आणि चैतन्य यांचा आश्रमात येणारा ओघ खूप वाढणार आहे. तो ग्रहण करून कार्याद्वारे सर्वत्र प्रक्षेपित करणे प्रमुख साधक आणि संत यांना शक्य होणार नाही. यासाठी श्री गुरुपादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री गुरुपादुका शक्ती आणि चैतन्य ग्रहण करून आवश्यक त्या वेळी आवश्यक ठिकाणी प्रक्षेपित करतील.

 

२. भारतात आणि जगातील विविध देशांत स्थापन करण्यात येणार्‍या १६ पादुका

रामनाथी आश्रमात श्री गुरुपादुकांची प्रतिष्ठापना केल्याने ईश्‍वरी कार्यासाठी लागणारी शक्ती आणि चैतन्य ग्रहण होणार असले, तरी ते पृथ्वीवरील सर्व देशांत कार्य होण्यासाठी तेथे पोहोचणेही आवश्यक आहे. त्यासाठी भारतात आणि जगातील विविध देशांत १६ पादुका स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे रामनाथी आश्रमातून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य त्या त्या ठिकाणच्या पादुकांत ग्रहण होऊन त्या भागात प्रक्षेपित होईल. त्यामुळे तेथील कार्य शीघ्रगतीने होईल. आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांतून प्रक्षेपित होणारे कार्यक्रम ऐकता यावेत आणि दिसावेत, यांसाठी अनुक्रमे घरी ‘नभोवाणी-संच (रेडिओ)’ आणि ‘दूरचित्रवाणी-संच (टी.व्ही.)’ असणे आवश्यक असते, तसेच या १६ पादुका जगभरच्या कार्यासाठी आवश्यक आहेत.

 

३. महर्षींनी सर्वत्र छायाचित्रांच्या ऐवजी पादुकांची स्थापना करण्यास सांगण्यामागील कारण

मानवी देहाच्या सर्व अवयवांपैकी पावलांतून शक्ती प्रक्षेपित होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. पादुका काही वेळ पायांत धारण केल्यामुळे पादुकांमध्ये शक्ती संग्रहित झाली. महर्षींनी पादुकांच्या ऐवजी छायाचित्रांची स्थापना सर्वत्र करण्यास सांगितले असते, तर शक्ती संग्रहित होण्याचा उद्देश तेवढ्या प्रमाणात साध्य झाला नसता. यावरून महर्षींमधील ‘दूरदर्शित्व’ हा गुणही शिकायला मिळाला.

ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठीच्या कार्यासाठी शक्ती आणि चैतन्य कसे मिळवायचे, हे सांगणार्‍या भृगु महर्षींप्रती अनंत कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

४. भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात
साजरा झाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका प्रतिष्ठापनेचा अलौकिक सोहळा !

साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्या, लाभला हा दैवी आविष्कार ॥
भाग्यवान आम्ही साधकजन, जाहलो या अनमोल क्षणांचे साक्षीदार ॥

पादुकाधारण विधीनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आरती करतांना डावीकडे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे सगुण रूप असलेल्या गुरूंचे कार्य वाढवणे, हे गुरूंच्या सगुणातील सेवेपेक्षा कित्येक पटींनी मोठे आहे; कारण ते निर्गुणाशी संबंधित आहे. गुरुकार्य वाढवण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती गुरुच पुरवत असतात. ही ऊर्जा प्रदान करणारे गुरुपादुकांहून श्रेष्ठ या भूतलावर अन्य काहीही नाही. शिष्य त्याच्या हृदयमंदिरी विराजमान असलेल्या श्रीगुरुपादुकांच्या स्मरणात राहून श्रीगुरूंचे कार्य अर्थात् त्यांच्या नामाचा महिमा विश्‍वभर पोचवण्यासाठी प्रयत्नरत असतो. भरताने श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून १४ वर्षे राज्य चालवले. श्रीरामाच्या पादुकांनीच भरताला ते कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान केली.

रामराज्यासम असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय घेऊन सनातनचे साधक व्रतस्थपणे कार्यरत आहेत. साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेच्या बळावरच साधक धर्मसंस्थापनेचे शिवधनुष्य पेलू शकत आहेत. आगामी काळात सनातन संस्थेच्या धर्मकार्याला आणि हिंदु राष्ट्र चालवणार्‍या अनेक भावी पिढ्यांना आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी महर्षि भृगु यांनी चेन्नई (तमिळनाडू) येथील भृगु जीवनाडीवाचक श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून केलेल्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात १० फेब्रुवारी या वसंतपंचमीच्या मंगलदिनी ‘श्री गुरुपादुका धारण विधी’, तर १२ फेब्रुवारी या रथसप्तमीच्या शुभदिनी ‘श्री गुरुपादुका प्रतिष्ठापना विधी’ भावपूर्ण अन् दैवी वातावरणात पार पडला. अशा प्रकारे सनातनच्या सुवर्णमयी इतिहासात आणखी एक मुकुटमणी रोवला गेला.

श्री गुरुचरणांमध्ये अनंत कोटी ब्रह्मांडे सामावलेली आहेत. गुरुपादुकांची महती वर्णन करण्यास मनुष्याची वाणी असमर्थ आहे. त्यातूनही अखिल सृष्टीच्या उद्धारार्थ कार्यरत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या एकमेवाद्वितीय अशा गुरूंच्या पादुकांची महती काय वर्णावी ? सनातनच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या २९ वर्षांत अभूतपूर्व अशी श्री गुरुपादुका पूजनाची अमृतपर्वणी साधकांना प्रथमच लाभली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका प्रतिष्ठापनेचा सोहळा चालू असतांना संपूर्ण ब्रह्मांडात चैतन्यधारा ओसंडून वहात असल्याची अनुभूती सर्वत्रच्या साधकांनी घेतली. या अनुपम सोहळ्याचे वार्तांकन करतांना शब्दही थिटे पडत आहेत. अनंत गुरुपौर्णिमांचे फळ देणारा हा महन्मंगल सोहळा साधकजन अन् हिंदुत्वनिष्ठ, वाचक यांना पुन:पुन्हा अनुभवता यावा, यासाठी श्रीगुरूंनीच सुचवलेल्या शब्दांत तो सोहळा येथे मांडत आहोत.

 

५. निर्गुणाची अनुभूती देणारा श्री गुरुपादुकापूजन अन् प्रतिष्ठापना सोहळा !

रथसप्तमीच्या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री गुरुपादुकांचे षोडशोपचार पूजन केले. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उजव्या पादुकेचे, तर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी डाव्या पादुकेचे पूजन केले. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी पौरोहित्य केले. सद्गुरुद्वयींचा अनन्य शिष्यभाव अन् श्री. वझेगुरुजी यांनी केलेले भावपूर्ण मंत्रोच्चार यांमुळे ‘साक्षात् वैकुंठातच हा पूजाविधी चालू आहे’, असे साधकांनी अनुभवले.

 

६. पृथ्वीवर रामराज्य स्थापन होण्यासाठी गुरुपादुकांची स्थापना ! – महर्षि भृगु

‘पृथ्वीवर रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन होण्यासाठी आवश्यक ऊर्जा आणि चैतन्य या गुरुपादुकांच्या माध्यमातून सर्व साधकांना मिळणार आहे. अनेक भावी पिढ्यांना सनातनचे कार्य करण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरुद्वयींना त्यांच्या पादुका दिल्या आहेत. श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले या पादुकांच्या माध्यमातून संपूर्ण ब्रह्मांडाला चैतन्य देत आहेत’, असा साधकांनी भाव ठेवावा.

साधकांनी गुरुपादुकांसमोर शरणागतीने नतमस्तक व्हावे !

भृगु महर्षि यांनी भृगु जीवनाडी वाचन क्रमांक ६ मध्ये म्हटले आहे की, सर्व तीर्थक्षेत्री जाण्याने जे फळ मिळेल, त्याहीपेक्षा अधिक फळ सनातनच्या साधकांना गुरुपादुकांना शरणागतीने नतमस्तक केल्यावर मिळेल. साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांची पाद्यपूजा करण्याऐवजी आता त्यांच्या पादुकांची पूजा करावी. परात्पर गुरु डॉ. आठवले जीवनमुक्त आहेत, तरीही साधकांसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत रहाणार आहेत.

१२ फेब्रुवारीनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले आत्म्याशी अधिकाधिक एकरूप होऊन म्हणजे अधिकाधिक निर्गुण स्थितीत राहून कार्य करणार आहेत.

गुरुधर्माचा प्रसार करणे, हे साधकांचे परमकर्तव्यच आहे !

संपूर्ण पृथ्वीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे दुसरे कोणतेच गुरु नाहीत. त्यांनी सांगितलेल्या गुरुधर्माचा प्रसार करणे, हे साधकांचे परमकर्तव्यच आहे. गुरूंमुळेच साधकाला ईश्‍वरप्राप्ती होते. ईश्‍वरापर्यंत जाण्याचा मार्ग श्री गुरु दाखवतात. देवतेचे दर्शन होऊनही साधकांना ईश्‍वरप्राप्ती होत नाही. गुरुकृपेनेच साधकांना ईश्‍वरप्राप्ती होते. वर्तमानकाळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुधर्माचा प्रसार संपूर्ण विश्‍वात व्हायला हवा. त्यासाठी महर्षींनी वेळोवेळी सांगितलेले यज्ञ-याग, पूजाविधी करावेत. सनातन संस्थेला शिव, विष्णु आणि ब्रह्मा या त्रिमूर्तींचे पूर्ण आशीर्वाद आहेत. या तीनही देवता गुरूंमध्ये असल्याने गुरुपूजा केली जाते.

 

७. वैकुंठलोकाची अनुभूती देणारा गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा !

पादुकाधारी गुरुरूप ‘याची देही याची डोळा’ पहाण्यास मिळणे, हा दुर्लभ क्षण !

उच्च आध्यात्मिक अधिकार असूनही एरव्ही अत्यंत साधी रहाणी असलेल्या परात्पर गुरूंनी पादुका धारण करणे, हे अत्यंत दुर्लभ होते. तीव्र शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले सोहळ्याच्या स्थळी आसंदीवर विराजमान झाले. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अनुक्रमे परात्पर गुरूंच्या उजव्या अन् डाव्या चरणाला अत्यंत भावपूर्ण नमस्कार करून पादुका अर्पण केल्या. त्यानंतर पादुका धारण केलेल्या गुरुचरणांवर पुष्पार्चना केली. या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी आदि शंकराचार्य विरचित गुरुपादुका स्तोत्र म्हटले. सद्गुरुद्वयींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भावपूर्ण आरती केली. त्यानंतर सर्वत्रच्या साधकांना लाभ होण्यासाठी विविध ठिकाणी स्थापन करण्यात येणार्‍या १६ पादुकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केला आणि ‘अवघ्या विश्‍वातील पुढील अनेक पिढ्यांना त्यांचे निर्गुण चैतन्य आणि अस्तित्व यांचा लाभ होईल’, यासाठी आश्‍वस्त केले.

 

८. श्री गुरुपादुकांचे षोडशोपचार पूजन !

सद्गुरुद्वयींनी श्री गुरुपादुकांच्या पूजनाच्या वेळी हातात अक्षता घेऊन ‘साधकांवर गुरुकृपा होऊन शीघ्रातीशीघ्र आध्यात्मिक उन्नती व्हावी. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी बळ मिळावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे पूजन करत आहे’, असा संकल्प केला. त्यानंतर पूजाविधी निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी महागणपतिपूजन अन् षोडशोपचारांनी श्री गुरुपादुकांचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर पंचारती करण्यात आली.

 

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा शिष्यभाव !

पादुकांची प्रतिष्ठापना करण्यासाठी साधक रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात जागेची निवड करण्यासाठी देवतांची चित्रे अन् मूर्ती यांची रचना करत होते. विविध प्रकारे रचना करून पाहिल्यावर ध्यानमंदिरात मध्यभागी संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे, त्याखालीच पादुकांसाठी जागा निवडण्यात आली. येथे डाव्या बाजूला श्रीरामाचे, तर उजव्या बाजूला दत्तगुरूंचे चित्र आहे. ती जागा परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर तीच जागा पादुकांसाठी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ‘या पादुका बाबांच्या (संत भक्तराज महाराज यांच्या) आहेत’, असे परात्पर गुरु डॉक्टर या वेळी म्हणाले. यातून ‘परात्पर गुरु डॉक्टर सतत शिष्यावस्थेतच असतात’, हे शिकायला मिळाले.

 

१०. स्थितप्रज्ञतेच्या उच्चतम स्थितीला असणारे परात्पर गुरु डॉक्टर !

ध्यानमंदिरात श्री गुरुपादुकांची सद्गुरुद्वयी प्रतिष्ठापना करत असतांना परात्पर गुरु डॉक्टरही तेथे उपस्थित होते. सद्गुरूंनी श्रीगुरूपादुकांवर अक्षता अर्पण केल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनीही त्यावर अक्षता अर्पण केल्या. स्वत: धारण केलेल्या पादुका संत भक्तराज महाराज यांच्याच असल्याप्रमाणे त्यावर अक्षता अर्पण करणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांची उच्चतम स्थितप्रज्ञ स्थिती अन् शिष्यभाव या वेळी दिसून आला.

 

११. गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्यातील व्यापक निर्गुण तत्त्वाची प्रचीती देणारी क्षणचित्रे

सोहळ्याला उपस्थित संत आणि मान्यवर

या सोहळ्याला बेळगाव (कर्नाटक) येथील संत प.पू. वासुदेव गिंडे महाराज, पानवळ-बांदा (सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, पू. भगवंतकुमार मेनराय, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी, पू. (श्रीमती) सुमन नाईक, पू. सदानंद नाईक, पू. संदीप आळशी, पू. पृथ्वीराज हजारे, पू. (कु.) रेखा काणकोणकर, पू. पद्माकर होनप, पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडे, एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले आदी संत आणि साधक उपस्थित होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू ती. अनंत आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनीती आठवले हेही या वेळी उपस्थित होते.

प्रार्थना आणि कृतज्ञता !

‘हे गुरुदेव, आपल्या पादुका आम्हा सर्व साधकांसाठी पृथ्वीवरील आपले विद्यमान सिंहासनच आहे. आपण या पादुकांच्या माध्यमातून येणार्‍या पिढ्यांना कार्य करण्यासाठी शक्ती प्रदान करत आहात. ‘श्रीं’ बीजमंत्राच्या सुवर्णपदकाच्या माध्यमातून आम्हा सर्व साधकांना आध्यात्मिक संपन्नता प्रदान करत आहात अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक ती शक्ती देत आहात, यासाठी आम्ही सर्व साधक आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. हे विष्णुस्वरूप गुरुदेवा, तुम्ही स्वयं श्रीमन्नारायण आहात. या पादुकांचे आम्हाला अखंड स्मरण राहो. आपण सोपवलेले कार्य आमच्याकडून होवो, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना !’

सगुणब्रह्म साचार निर्गुण निरहंकार । नसे रूपाला ज्यांच्या पार हो ।
कलीयुगी श्रीदत्त अवतरले हो ॥ माझ्या नाथांच्या दरबारी या हो ।

 

१२. साधकांनी अनुभवले भगवंताचे साहाय्य !

सोहळा चालू असतांना पुष्कळ मोठ्या प्रमाणात निर्गुण तत्त्व कार्यरत झाले होते. या निर्गुण तत्त्वाची अन् ईश्‍वराच्या अनन्य कृपेची प्रचीती देणार्‍या विविध भावानुभूती साधकांना आल्या. ‘साधकांची श्रद्धा वाढावी, यासाठी अनुभूतींच्या माध्यमातून भगवंत कसा साहाय्य करत आहे’, हे दर्शवणारी क्षणचित्रे येथे दिली आहेत.

  • सद्गुरुद्वयींनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर अर्पण केलेल्या पुष्पांची रचना आपोआपच ‘ॐ’ च्या आकाराप्रमाणे झाली होती.
  • ‘परात्पर गुरु डॉक्टर पुढे निर्गुण स्तरावर कार्य करतील’, हा महर्षींचा संदेश श्री. विनायक शानभाग सांगत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे ध्यान लागले होते.
  • गुरुपादुका धारण विधीच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर देहाने उपस्थित असूनही ते तेथे उपस्थित नसल्याप्रमाणे वाटत होते. ‘हीच त्यांची निर्गुण अवस्था आहे’, असे या वेळी श्री. विनायक शानभाग यांनी सांगितले. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाही असेच जाणवले.
  • पादुका पूजनाच्या वेळी जलोपचार करतांना गुरुपादुकांवर तुळशीदलांनी जलाचे प्रोक्षण करण्यात आले. हे जल ‘ॐ’च्या आकाराप्रमाणे दिसत होते.
  • पादुकापूजनाच्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सूक्ष्मातून ‘ॐ’कार ऐकू आला. आप अन् आकाश या तत्त्वांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे हे संकेत होते.
  • ‘पादुकांची आरती करण्यापूर्वीच पंचारतीच्या ज्योतींचे तेजोवलय पुष्कळ तेजस्वी दिसून ते आधीपेक्षा वाढले होते, तसेच ज्योती स्थिर झाल्या होत्या’, असे सूक्ष्म परीक्षण करणारे साधक श्री. निषाद देशमुख यांना जाणवले.
  • आरतीच्या वेळी दाखवण्यात आलेल्या धुपाच्या धुरामध्ये ‘ॐ’चा आकार निर्माण झाल्याचे लक्षात आले.
  • ‘पूजनाच्या वेळी सर्व देवता सूक्ष्मातून येऊन श्री गुरुपादुकांना स्पर्श करून त्यांना वंदन करत आहेत’, असे श्री. विनायक शानभाग यांना जाणवले.
  • ‘संपूर्ण सोहळ्याच्या वेळी अन्य कोणतेही विचार मनात न येता केवळ आनंदावस्था अनुभवली’, असे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी सांगितले.
  • पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मानसी राजंदेकर त्यांच्या घरी संगणकीय प्रणालीद्वारे सोहळा पहात असतांना ३ मोरांनी तेथे केकारव केला.
  • भारतातील १७ राज्यांसह एशिया पॅसिफिक, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या देशांतील ९ सहस्र ३६१ जणांनी संगणकीय प्रणालीद्वारे या भावसोहळ्याचा लाभ घेतला. संगणकीय प्रणालीद्वारे सोहळ्यात सहभागी असलेल्या साधकांना संपूर्ण सोहळ्यात भावाश्रू येत होते.
  • संपूर्ण सोहळ्याची यू.टी.एस्. या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment