सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदुत्वाचे कार्य म्हणजे मोठे अनुष्ठानच ! – श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी विश्‍वेश्‍वरानंदगिरी महाराज, हरिद्वार, उत्तराखंड

श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी विश्‍वेश्‍वरानंदगिरी महाराज (डावीकडे) यांना धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाची माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर

प्रयागराज (कुंभनगरी) – सध्याच्या काळात सर्वसामान्य लोक अर्थहीन जीवन जगत आहेत. सनातनच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून सोळा संस्कार, नित्य पूजोपचार, तसेच दिनक्रम यांविषयी धर्मज्ञान दिले जात आहे. त्यामुळे सर्वांना अर्थपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग मिळणार आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदुत्वाचे कार्य म्हणजे मोठे अनुष्ठानच आहे. या कार्यास नेहमी आशीर्वाद असतील, असे आशीर्वचन उत्तराखंड राज्याच्या हरिद्वार येथील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी विश्‍वेश्‍वरानंदगिरी महाराज यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,‘‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती जनसामान्यांमध्ये वैदिक ज्ञान पोचवण्याचे कार्य करत आहेत. भावपूर्ण सेवा करणारे साधक आणि संतांचे अस्तित्व यांमुळे या ठिकाणी चैतन्य जाणवत आहे. साधकांनी नि:स्वार्थी मनाने केलेली सेवा हीच खरी राष्ट्रसेवा आहे.’’

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट अन् समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment