श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील चैतन्यामुळे तेथील माती आणि कृष्णा नदीचे पाणी यांच्यामध्येही चैतन्य असणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्री गेल्यावर तेथील चैतन्याची अनुभूती भक्तांना येते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) हे महाराष्ट्रातील अत्यंत जागृत दत्तक्षेत्र आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती तेथे १२ वर्षे राहिले. तेथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम आहे. सध्याच्या कलियुगात अनेक कुटुंबांना अतृप्त पूर्वजांंमुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होतात. पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतात. तसेच दत्ताच्या तीर्थक्षेत्री गेल्यासही तेथील चैतन्यामुळे व्यक्तीला होणारा पूर्वजांचा त्रास अल्प होण्यास साहाय्य होते. तीर्थक्षेत्रातील चैतन्याचा परिणाम तेथील वातावरणावरही होतो. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील माती आणि कृष्णा नदीचे पाणी यांवर तेथील चैतन्याचा झालेला परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील माती आणि कृष्णा नदीचे पाणी यांचे नमुने, तसेच तुलनेसाठी सर्वसाधारण पाणी यांचे नमुने घेऊन त्यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. सर्वसाधारण मातीमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती अन् तिची प्रभावळ १.४६ मीटर होती.

२ अ २. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील माती, तसेच सर्वसाधारण पाणी आणि कृष्णा नदीचे पाणी यांच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
२ आ १. सर्वसाधारण मातीमध्ये सकारात्मक ऊर्जा नसणे; पण श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मातीमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. सर्वसाधारण मातीमध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. याउलट श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मातीमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ ३.७६ मीटर होती.

२ आ २. सर्वसाधारण पाण्यामध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे; पण कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

सर्वसाधारण पाण्यामध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ मोजता येईल इतपत नव्हती. (सर्वसाधारण पाण्याच्या संदर्भात ‘यू.टी.’स्कॅनरच्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.) कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ २.८० मीटर होती.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात. या प्रभावळीमध्ये त्या घटकाची सगुण आणि निर्गुण स्पंदने एकत्रित असतात; म्हणून तिला त्या घटकाची ‘एकूण प्रभावळ’, असे म्हणतात.

२ इ १. सर्वसाधारण मातीपेक्षा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मातीची एकूण प्रभावळ पुष्कळ अधिक असणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. सर्वसाधारण मातीची एकूण प्रभावळ २.०२ मीटर, तर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मातीची प्रभावळ ५.१८ मीटर होती. याचा अर्थ सर्वसाधारण मातीपेक्षा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मातीची एकूण प्रभावळ ३.१६ मीटर अधिक होती.

२ इ २. सर्वसाधारण पाण्यापेक्षा कृष्णा नदीच्या पाण्याची एकूण प्रभावळ अधिक असणे

सर्वसाधारण पाण्याची एकूण प्रभावळ २.३९ मीटर, तर कृष्णा नदीच्या पाण्याची एकूण प्रभावळ ३.४७ मीटर होती. याचा अर्थ सर्वसाधारण पाण्यापेक्षा कृष्णा नदीच्या पाण्याची एकूण प्रभावळ १.०८ मीटर अधिक होती.

३. निष्कर्ष

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील माती आणि कृष्णा नदीचे पाणी यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले. कलियुगात सर्वत्र रज-तमाचा प्रभाव अधिक असल्याने सर्वसाधारण वस्तू वा व्यक्ती यामध्ये सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात आढळतात. याचाच प्रत्यय सर्वसाधारण मातीच्या संदर्भात केलेल्या चाचणीतून दिसून आला. आज भारतातील बहुतांश जलस्त्रोत प्रदूषित आहेत. देवतांची तीर्थक्षेत्रे ही चैतन्याची स्त्रोत असल्याने त्या चैतन्याचा परिणाम तेथील माती, तसेच नदीचे वाहते पाणी यांवरही होतो, हे लक्षात येते. तीर्थक्षेत्रांतील चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी, तसेच सर्वत्र चैतन्य निर्माण करण्यासाठी कलियुगातील मनुष्याने धर्माचरण आणि त्या जोडीला साधना करणे आवश्यक आहे.’

– श्री. अरुण डोंगरे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (५.१२.२०१८)

ई-मेल : [email protected]

वाचकांना सूचना

जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment