साधकांच्या रक्षणासाठी स्वतःच्या देहाची तमा न बाळगता सद्गुरु (सौै.) अंजली गाडगीळ करत असलेला खडतर दैवी प्रवास !

अनुक्रमणिका

‘संतांना देहबुद्धी अत्यल्प असते. त्यांना देहाची जाणीव नसते’, असे आपण ऐकलेले असते. सद्गुरु (सौै.) अंजली गाडगीळकाकूंच्या समवेत प्रवास आणि सेवा करतांना गुरुकृपेने मला हे अनुभवता आले. आजच्या या लेखात उत्तराखंडमधील गढवाल प्रदेशातील ‘छोटा चारधाम’ येथील प्रवासाच्या कालावधीत सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंनी केलेल्या खडतर प्रवासाचे वर्णन आपण वाचणार आहोत. हा लेख वाचून साधकांचा ‘साधना करण्याचा निश्‍चय दृढ होवो आणि साधकांच्या मनात ‘प्रत्येक क्षणी ईश्‍वर पाठीशी आहे’, हा भाव सतत जागृत राहो’, अशी मी श्रीगुरूंच्या चरणी तळमळीने प्रार्थना करतो.

 

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

१. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेला दैवी प्रवास

१ अ. प्रवासाच्या माध्यमातून समाजातील लोकांशी
जवळीक साधून त्यांना साधना सांगणे आणि साधकांना घडवणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अनुमाने एक दशक सातत्याने आणि अविश्रांतपणे भारताच्या कानाकोपर्‍यांत अन् भारताबाहेरही भ्रमण करत आहेत. त्या विविध धार्मिक क्षेत्रे, देवालये आणि ऐतिहासिक स्थाने यांना भेटी देऊन त्या ठिकाणची माहिती आणि अनमोल दुर्मिळ वस्तू यांचा संग्रह करत आहेत. या वस्तू पाहून साधकांचा ‘भारताची संस्कृती आणि जाज्वल्य इतिहास’ यांविषयीचा अभिमान दृढ होत आहे. या प्रवासाच्या माध्यमातून त्या समाजातील लोकांशी जवळीक साधून त्यांना साधना सांगण्याचे आणि साधकांना घडवण्याचे कार्यही करत आहेत.

१ आ. ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत
असलेला दैवी प्रवास’, हे ईश्‍वरी नियोजन असणे

संबंधित देवतेची शक्ती त्या त्या स्थानी अधिकाधिक कार्यरत असते. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ त्या ठिकाणी गेल्याने तेथील ऊर्जेचा लाभ त्यांच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्या पुनरुत्थानाच्या कार्यासाठी झटणार्‍या साधकांना होत आहे. ‘संतांच्या चरणांचा ज्या स्थानांना स्पर्श होतो, ते स्थान शुद्ध आणि पवित्र होते’, या वचनानुसार त्यांचे हे भ्रमण हे ईश्‍वरी नियोजनच आहे. ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत प्रवासात सहभागी होऊन ईश्‍वराची ही लीला अनुभवता येणे आणि त्यात कृतीप्रवण होणे’, हे आमचे महद्भाग्य आहे. त्या आम्हाला सावकाश आणि काळजीपूर्वक वाहन चालवायला सांगत.

१ इ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ देहाची
तमा न बाळगता लोककल्याणार्थ करत असलेला खडतर प्रवास !

आमचे उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रा करण्याचे नियोजन आम्ही संभाजीनगर येथे असतांना ठरले. हा प्रवास आम्ही सप्टेंबर २०१८ मध्ये करणार होतो. प्रवासास आरंभ करतांना पावसाळा संपून थंडी जाणवू लागली होती. आम्ही प्रथम बद्रीनाथ येथे गेलो. उत्तराखंड राज्यातील हा सर्व भाग म्हणजे थेट हिमालयाच्या उदरात गेल्यासारखे आहे. त्यामुळे येथे ऑक्टोबर मासातील (महिन्यातील) उष्णता जाणवत नाही. येथे वातावरण थंड असले, तरी योग्य काळजी न घेतल्यास सूर्याच्या किरणांचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना अति थंड ठिकाणचा प्रवास मानवत नाही. त्यांना अतिशय उंचावर असलेल्या ठिकाणी गेल्यास चक्कर येते. हा सर्व प्रवास अशाच प्रदेशांतील होता, तरीही त्यांनी या ठिकाणी जाण्याचे ठरवले. ‘या सर्व ठिकाणचे चित्रीकरण मिळावे आणि या ठिकाणी असलेल्या स्थानांतील दैवी ऊर्जा समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी झटत असलेली सनातन संस्था अन् प्रत्येक साधक यांना मिळावी’, असा त्यांचा कल्याणकारी विचार होता.

 

२. चारधाम यात्रेत सद्गुरु (सौ.)
अंजली गाडगीळ यांनी केलेला खडतर प्रवास

२ आ. केदारनाथ परिसरातील प्रवास

२ आ १. परिसरातील सिद्ध योग्यांच्या अस्तित्वाची जाणीव असणे

बद्रीनाथ येथून आम्ही केदारनाथ येथे जाण्यासाठी निघालो. या मार्गातील परिसर अत्यंत सुंदर आहे. या परिसरात एक निराळी शांतता अनुभवता येते. अनेक सिद्धयोगी निरनिराळ्या वन्य जिवांच्या रूपांत वावरत असल्याचे सद्गुरु काकूंनी सूक्ष्मातून जाणले होते.

२ आ २. पुढे उद्भवणार्‍या कठीण परिस्थितीचा सूक्ष्मातून वेध घेणे

केदारनाथ येथील वातावरणात क्षणाक्षणाला पालट होत असतो. येथे येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी काही संस्थांनी हेलिकॉप्टरची सोय केली आहे. वातावरणात पालट होत असल्यामुळे हेलिकॉप्टरची सुविधा अनिश्‍चित असते. केदारनाथ मंदिरापर्यंत पायी जाण्याचे अंतर २२ किलोमीटर आहे. तेथे जाण्यासाठी एक दिवस लागतो. आमच्याकडे वेळ अल्प असल्याने आम्ही हेलिकॉप्टरने केदारनाथ येथील मंदिराच्या परिसरात गेलो. ‘वातावरणात होत असलेला पालट आणि हेलिकॉप्टर्स मिळण्याची शाश्‍वती नसणे’, यांमुळे सद्गुरु काकूंनी आम्हाला ‘येथेच रहावे लागल्यास निवासाची काही सोय आहे का ?’, हे पाहून येण्यास सांगितले. संध्याकाळी वातावरण प्रतिकूल असल्यामुळे हेलिकॉप्टर आले नाही. आम्हाला रात्री मंदिराच्या परिसरातच थांबावे लागले. हेलीपॅडच्या जवळच ‘गढवाल मंडल विकास निगम’चे सरकारी विश्रामगृह आहे. येथे खोल्यांऐवजी प्रत्येकी एक पलंग, अशी निवासाची सोय असते. तेथील कर्मचार्‍यांनी आम्हाला सांगितले, ‘‘आताच ५ जागा रिकाम्या झाल्या आहेत. तुम्ही लगेच आरक्षण केले नाही, तर या जागा हातातून जातील.’’ आम्ही लगेचच जागा आरक्षित केल्या. सद्गुरु काकूंनी ‘रात्र येथेच काढावी लागणार’, हे सूक्ष्मातून जाणले होते. त्यांच्या सांगण्यानुसार प्रयत्न केल्याने आमच्या निवासाची सोय झाली. यातून ‘संतांचे आज्ञापालन विनाविकल्प करणे आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे’, हे मला शिकायला मिळाले. रात्री महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही निवासकक्षाच्या बाहेर आल्यावर आम्हाला दिसले, ‘निवासाची सोय न झाल्याने अनेक लोक आसंद्यांवर बसून होते.’ परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु काकू यांच्या कृपेने कडाक्याच्या थंडीत आमची निवासाची सोय झाली.

सरकारी विश्रामगृहात निवास करतांना सद्गुरु गाडगीळकाकू आणि श्री. दिवाकर आगावणे
२ आ ३. प्राणवायूचे अल्प प्रमाण आणि कडाक्याची थंडी यांमुळे रात्रभर जागरण होऊनही दुसर्‍या दिवशी उत्साही असणे

हा परिसर समुद्रसपाटीपासून ३ सहस्र ५०० मीटर उंचीवर हिमाच्छादित पर्वत शिखरांनी वेढलेला आहे. त्यामुळे येथे पुष्कळ थंडी असते. येथील हवेत प्राणवायूचे प्रमाणही अल्प असते. या ठिकाणी येतांना ‘दर्शन घेऊन हेलिकॉप्टरने लगेचच परत येऊ’, असा आमचा विचार होता. हेलिकॉप्टरमधून प्रवास करतांना स्वतःसमवेत मोजकेच साहित्य नेण्याची अनुमती होती. त्यामुळे आम्ही समवेत पूजेचे मोजकेच साहित्य घेतले होते. कडाक्याच्या थंडीमुळे सद्गुरु काकूंचे पाय वळत होते आणि हवेत प्राणवायूचे प्रमाण अल्प असल्याने त्यांना श्‍वासोच्छ्वास करतांना त्रास होत होता. आम्ही आणलेला कापूर मंदिरात पूजेसाठी वापरला गेल्याने डबीत कापराचे काही तुकडेच शेष होते. अशा स्थितीत सद्गुरु काकूंनी कापराच्या एका लहानशा तुकड्याचा वास घेत संपूर्ण रात्र जागून काढली. त्यांना रात्रभर जागरण होऊनही दुसर्‍या दिवशी तितक्याच उत्साहाने त्या पुढील प्रवासासाठी सिद्ध होत्या.

बद्रीनाथ क्षेत्रातील खडतर प्रवास

१. ‘माणा ते वसुधारा’ हा ८ किलोमीटरचा प्रवास ‘पिठ्ठू’त बसून करणे

‘बद्रीनाथ’ हे पौराणिक क्षेत्र आहे. या परिसरातील विविध स्थाने पहाण्यासाठी आम्ही गेलो होतो. या परिसरात ‘माणा’ हेे गाव आहे. पांडवांनी अज्ञातवासात असतांना या गावात काही काळ वास्तव्य केले होते. आम्हाला या गावातून मार्गक्रमण करत पुढे वसुधारापर्यंत जायचे होते. ‘वसुधारा’ या ठिकाणी वसुदेवाने श्रीविष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्‍चर्या केली होती. हा सर्व प्रवास पर्वतीय क्षेत्रातील असून अतिशय अवघड आहे. या स्थानापर्यंत जाण्यासाठी आम्हाला एका स्थानिक व्यक्तीने सहकार्य केले. तिने हा प्रवास ५ किलोमीटर अंतराचा असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात हे अंतर ८ किलोमीटर असल्याचे आमच्या लक्षात आलेे. पांडव याच मार्गाने स्वर्गाच्या द्वाराच्या दिशेने चालत गेले होतेे. ज्यांना या मार्गावरून चालत जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी येथे ‘पिठ्ठू’ असतात. एका मोठ्या वेताच्या टोपलीला एका बाजूने कापून त्यामध्ये एक व्यक्ती बसू शकेल, अशी व्यवस्था केलेली असते. व्यक्ती त्यात बसल्यावर त्या टोपलीला बांधलेल्या दोर्‍यांच्या साहाय्याने वाहक टोपलीत बसलेल्या व्यक्तीला पाठीवर घेतो. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंसाठी अशा एका ‘पिठ्ठू’ची व्यवस्था करून आम्ही चालत निघालो.

पिठ्ठूवरून प्रवास करतांना सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू
२. ‘पिठ्ठू’त बसल्याने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा तोंडवळा काळा पडणे, त्यांनी या प्रवासात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सिद्ध केलेला मंत्र म्हणणे आणि साधकांसाठी प्रार्थना करणे

या पिठ्ठूत बसणार्‍या व्यक्तीचा तोंडवळा वरच्या दिशेने असल्यामुळे तिच्या तोंडवळ्यावर थेट सूर्यकिरण पडतात. सद्गुरु काकूंना अशा स्थितीत बराच वेळ बसावे लागले. त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्याची त्वचा करपून काळी पडली. पिठ्ठूत बसल्यामुळे चालतांना होणारे श्रम होत नसले, तरी बसण्यासाठी जागा अपुरी असल्यानेे व्यक्तीच्या दोन्ही पायांच्या मांड्यांना टोपलीची कड रूतून वेदना होतात. पिठ्ठूत बसल्यावर तोल सांभाळण्यासाठी एक दोरखंड बांधलेला असतो. हा दोरखंड घट्ट धरून ठेवल्याने व्यक्तीचे हात आणि बोटे दुखू लागतात. अशा स्थितीतही सद्गुरु काकूंनी हा प्रवास आनंदाने केला. त्यांनी या संपूर्ण प्रवासात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सिद्ध केलेला ‘ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ । ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥’ हा मंत्रजप अव्याहतपणे केला. हा मंत्रजप करतांना त्या ‘आम्हा सर्वांच्या भोवती संरक्षककवच रहावे आणि प्रवास सुखरूपपणे पूर्ण व्हावा’, अशी ईश्‍वराच्या चरणी अखंड प्रार्थना करत होत्या.

पिठ्ठूत बसणार्‍या व्यक्तीचा तोंडवळा वरच्या दिशेने असल्यामुळे तिच्या तोंडवळ्यावर थेट सूर्यकिरण पडतात. सद्गुरु काकू यांनी असा प्रवास केल्याने त्यांचा तोंडवळा नंतर काळवंडला.
३. ‘पिठ्ठू वाहून नेणार्‍या व्यक्तीला विश्रांती मिळावी’, या हेतूने काही अंतर चालत जाणे

सद्गुरु काकूंना देहाच्या मर्यादा असूनही अत्यंत दुर्धर ठिकाणी त्या प्रकृतीला झेपेल इतका प्रवास चालत करतात. बद्रीनाथ येथे पिठ्ठूतून उतरून त्या काही अंतर चालत गेल्या. त्या म्हणाल्या, ‘‘या मार्गावरून पांडवही चालत गेले आहेत. त्यांनी जेवढ्या यातना सहन केल्या, त्याच्या तुलनेत आपल्याला होणारा त्रास नगण्य आहे.’’ ‘चालण्याचा थोडासा अनुभव मिळावा आणि पिठ्ठूतून त्यांना उचलून नेणार्‍या व्यक्तीला विश्रांती मिळावी’, हा सद्गुरु काकूंचा काही अंतर चालत जाण्यामागचा हेतू होता.

४. प्रवासात झालेल्या त्रासाकडे सकारात्मकतेने पहाणे

त्यांचा तोंडवळा १ मास काळवंडलेला होता. या काळात त्यांच्या तोंडवळ्याचा दाह होत होता; मात्र प्रवासात किंवा अन्य व्यक्तींना संपर्क करतांना त्यांनी त्यांना होणारा त्रास जाणवू दिला नाही. ‘माझा रंग पांडुरंगासारखा झाला आहे,’ असे सांगून त्यांनी वातावरण सकारात्मक केले.

 

३. अन्य ठिकाणी केलेला खडतर प्रवास

३ अ. तमिळनाडूतील अरुणाचलेश्‍वर
पर्वताला प्रदक्षिणा घालतांना काही अंतर पायी चालणे

तिरुवण्णमलै येथील अरुणाचलेश्‍वर या पर्वताला प्रदक्षिणा घालतात. एका नाडीवाचकांनी सद्गुरु काकूंना या पर्वताला एक प्रदक्षिणा घालायला सांगितली होती. त्यांना ही प्रदक्षिणा शक्य तितकी चालत आणि उर्वरित वाहनात बसून पूर्ण करण्यास सांगितले होते. त्या वेळी सद्गुरु काकू प्रदक्षिणेतील २५ टक्के अंतर पायी चालत गेल्या.

३ आ. आंध्रप्रदेशातील अहोबिलम् या स्थानी
जाण्यासाठी पायवाटही नसतांना प्रवास करणे

आंध्रप्रदेशातील अहोबिलम् या स्थानी जाण्यासाठी पायवाटही नव्हती, तरीही सद्गुरु काकूंनी हा प्रवास केला. ‘प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंताने नृसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. आताच्या काळातही ‘भगवंताने अवतार घेऊन साधकांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करावे’, या हेतूने सद्गुरु काकूंनी हा प्रवास केला’, असे आम्हाला वाटले.

– श्री. सत्यकाम कणगलेकर, बेळगाव (१७.१२.२०१८)

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !

अ. असा दैवी प्रवास करणार्‍या सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ या एकमेवाद्वितीय आहेत !

एप्रिल २०१५ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या प्रवासाला ‘दैवी प्रवास’ असेच म्हणता येईल. मलाही एवढा प्रवास करता आला नाही. असा प्रवास करणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या एकमेवाद्वितीय आहेत.’’

कुमारकोम (केरळ) येथे बोटीतून प्रवास करतांना सद्गुरु काकू

 

कोणार्क मंदिर (ओडिशा) येथे सद्गुरु काकू

 

ऊटी (तमिळनाडू) येथील चहाच्या मळ्यात सद्गुरु काकूंचे काढलेले छायाचित्र

 

मुन्नार (केरळ) येथे बोटीतून प्रवास करतांना सद्गुरु काकू आणि सनातनचे साधक

 

मुन्नार (केरळ) येथे चित्रीकरण करतांना सद्गुरु काकू

५. दैवी प्रवासाची वैशिष्ट्ये

५ अ. देश-विदेशांत प्रवास करणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ७ वर्षांत भारतातील २९ राज्यांपैकी २४ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांपैकी ४ प्रदेशांमध्ये प्रवास केला आहे. त्यांनी भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर या ९ देशांमध्ये डिसेंबर २०१८ पर्यंत ८ लक्ष कि.मी. प्रवास केला आहे.

५ आ. पर्वतरांगांमधून खडतर प्रवास करणेे

त्यांनी हिमालयातील शिवालिक, धौलधार, गढवाल, लडाख, पिरपंजाल, झंस्कार या पर्वतश्रेणी आणि गिरनार, विंध्याचल, अरावली, नीलगिरी आणि शेषाचल या पर्वतरांगामधून खडतर प्रवास केला आहेेे.

५ इ. भारतातील सप्तनद्यांचे दर्शन घेणे आणि पूजा करणे

त्यांनी आतापर्यंत ७ नद्यांचे दर्शन घेतले आहे. त्यांनी गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी आणि कावेरी, या ५ नद्यांच्या उगमस्थानी जाऊन पूजा केली आहेे.

५ ई. ३० शक्तीपिठांचे दर्शन घेणे

त्यांनी पृथ्वीवरील ५१ शक्तीपिठांपैकी ३० शक्तीपिठांचे दर्शन घेतले आहे. त्यांनी त्या ठिकाणी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी पूजा किंवा याग केले आहेत.

५ उ. ४ धाम आणि १२ ज्योर्तिलिंगे यांचे दर्शन घेऊन पूजा करणे

त्यांनी जगन्नाथपुरी, रामेश्‍वरम्, बद्रिनाथ आणि द्वारका या चार धामांचे दर्शन घेतले आहे. सोमनाथ, श्रीशैलम्, उज्जैन, ॐकारेश्‍वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी, त्र्यंबकेश्‍वर, औढ्या नागनाथ, बैद्यनाथ, घृष्णेश्‍वर आणि रामेश्‍वरम्, या १२ ज्योर्तिलिंगांचे दर्शन घेऊन त्यांनी तेथे पूजा केली आहे.

५ ऊ. श्रीविष्णूच्या दिव्य स्थानांना भेट देणे

श्रीविष्णूच्या १०८ दिव्य स्थानांपैकी पृथ्वीवर (भारत आणि नेपाळ या देशांत) १०६ स्थाने आहेत. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आतापर्यंत ३८ ठिकाणांना भेट दिली आहे.

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (८.१२.२०१८)

 

६. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या
दैवी प्रवासाविषयी संतांनी काढलेले गौरवोद्गार !

६ अ. प्रवास करून आल्यावरही सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ यांचा तोंडवळा आनंदी दिसतो !

‘मला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या प्रवासाविषयी पुष्कळ आश्‍चर्य वाटते. एवढा प्रवास करूनही त्यांना कधीही थकवा येत नाही. प्रवास करून आल्यावरही त्यांचा तोंडवळा नेहमी आनंदी असतो. मलाही ‘त्यांच्या समवेत दैवी प्रवासाला जावे’, असे वाटते.’ – प.पू. आबा उपाध्ये, पुणे, महाराष्ट्र.

६ आ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ स्वतः एक चमत्कार आहेत !

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची फार मोठी कृपा आहे. सामान्य मनुष्य २ – ३ दिवस सतत प्रवास करून आल्यावर आजारी पडतो किंवा विश्रांती घेतो; मात्र असे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात तसे घडत नाही. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ स्वतः एक चमत्कार आहेत !’’ – प.पू. रामभाऊस्वामी, तंजावूर, तमिळनाडू.

६ इ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेला प्रवास
आणि तीर्थक्षेत्री जाऊन केलेल्या प्रार्थना यांमुळे साधकांचे रक्षण होईल !

‘सद्गुरु  (सौ.) अंजली गाडगीळ यांचा प्रवास हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी चालू आहे. त्यांचा प्रवास आणि त्यांनी तीर्थक्षेत्री जाऊन केलेल्या प्रार्थना यांमुळे सनातनच्या सर्व साधकांचे रक्षण होणार आहे. त्या ज्या-ज्या गावी जातील, त्या-त्या ठिकाणी असलेले साधक आणि त्यांची घरे यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होईल.’ – पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्, चेन्नई, तमिळनाडू.

Leave a Comment