जयपूर (राजस्थान) येथील श्रीमती गीतादेवी खेमका (वय ७६ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका

पू. खेमकाआजी यांचे पुत्र पू. प्रदीप खेमका हे संत असल्याने आता
एकाच कुटुंबातील माता आणि पुत्र संत असल्याचे हे एक दुर्मिळ उदाहरण !

एकाच कुटुंबातील पहिल्या पिढीतील सदस्य संतपदी विराजमान झाल्याचे,
दुसर्‍या पिढीतील सदस्य जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे, तर चौथ्या
पिढीतील सदस्य महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आल्याचे घोषित झाल्याची ही अनोखी घटना !

संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यावर पू. खेमकाआजी यांची भावजागृती झाली, तो क्षण!

जयपूर (राजस्थान), १२ डिसेंबर (वार्ता.) – येथील सनातनच्या साधिका तथा झारखंड राज्याचे धर्मप्रसारसेवक पू. प्रदीप खेमका यांच्या मातोश्री श्रीमती गीतादेवी खेमका (वय ७६ वर्षे) या सनातनच्या ८३ व्या संतरत्न पदावर विराजमान झाल्या. त्यांच्या निवासस्थानी ९ डिसेंबर २०१८ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या सत्संगात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली. एकाच कुटुंबात माता आणि पुत्र संत असल्याचे हे दुर्मिळ उदाहरण होय ! याच कार्यक्रमात पू. प्रदीप खेमका यांच्या भावजय (वहिनी) तथा पू. खेमकाआजी यांच्या स्नुषा सौ. अर्चना सुदीप खेमका (वय ४९ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे, तसेच पू. प्रदीप खेमका यांचा नातू, तसेच पू. खेमकाआजी यांचा पणतू चि. श्रीहरि राहुल खेमका (वय २ वर्षे) महर्लोकातून साधनेसाठी पृथ्वीवर जन्माला आल्याचे आणि त्याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे या वेळी घोषित करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी पू. प्रदीप खेमका यांच्या पत्नी, तसेच ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. सुनीता खेमका, तसेच खेमका कुटुंबातील अन्य सदस्य आणि साधक उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित सर्व साधकांना सकाळपासून खूप आनंद आणि उत्साह जाणवत होता. ‘कार्यक्रम म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सवच आहे’, असेच त्यांना वाटत होते.

चि. श्रीहरि याची गुणवैशिष्ट्ये सांगण्यास
सांगून तो महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आल्याचे सांगणे

चि. श्रीहरि याचा सत्कार करतांना पू. प्रदीप खेमका. सोबत चि. श्रीहरि याची आई सौ. रेशू खेमका

जयपूर येथे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचेे मार्गदर्शन आयोजित करण्यात आल्याने तेथील सर्व साधक एकत्रित जमले होते. प्रथम पू. खेमकाकाका यांनी ‘साधना’ विषयावर मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनुभूती सांगितल्या. या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सर्व साधकांना चि. श्रीहरि याची आध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगण्यास सांगितले. साधकांनी त्याची वैशिष्ट्ये सांगितल्यावर चि. श्रीहरि याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे सद्गुरु पिंगळेकाका यांनी घोषित केले.

पू. खेमकाआजी संतपदी विराजमान झाल्याचे गुपित असे उघड केले !

पू. खेमकाआजी यांचा सन्मान करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

त्यानंतर सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘श्रीमती गीतादेवी खेमका यांच्या तोंडवळ्याकडे पाहून काय वाटते’, असे सर्व साधकांना विचारले. साधकांनी ‘त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहून आनंद, सहजता आणि अंतर्मुखता जाणवते’, असे सांगितले. या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी, ‘सनातनच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे की, माता आणि पुत्र दोन्ही संत झाले आहेत’, असे सांगत पू. खेमकाआजी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता दिली. या वेळी तेथे उपस्थित सर्वांची भावजागृती झाली.

गुरूंविषयी भाव असणार्‍या सौ. अर्चना
खेमका यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. अर्चना खेमका (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. गीता खेमकाआजी

या वेळी सद्गुरु पिंगळेकाका यांनी सौ. अर्चना खेमका यांना त्यांनी केलेली प्रार्थना वाचून दाखवण्यास सांगितली. त्यांनी भावपूर्णरित्या म्हटलेल्या प्रार्थनेमध्ये शरणागत भाव जाणवत होता. ती ऐकून साधकांची भावजागृती झाली. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाका यांनी सौ. अर्चना खेमका यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे सांगितले.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पू. खेमकाआजी आणि
सौ. अर्चना खेमका यांच्याविषयी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये व्यष्टी
साधना कशी करावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पू. खेमकाआजी !

१. पू. खेमकाआजी यांना कर्करोग झाल्यानंतर त्यांच्यावर ‘केमोथेरपी’ करण्यात आली. या उपचारामुळे रुग्णाचा तोंडवळा काळा पडतो; परंतु पू. खेमकाआजी यांचा तोंडवळा काळा पडण्याऐवजी उजळला आहे. साधनेचे बळ आणि चैतन्य यांमुळे असे झाले आहे.

२. त्यांच्या चौथ्या पिढीतील चि. श्रीहरि याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे सांगण्यात आले. हे सर्व पू. खेमकाआजी यांच्या चांगल्या संस्कारांमुळे झाले आहे. त्यांनी सर्वांच्या समोर ‘व्यष्टी साधना कशी करावी’, याचा आदर्श ठेवला आहे.

३. जेव्हा पू. खेमकाआजी यांच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हा त्यांना ‘तुमची काय इच्छा आहे ?’, असे विचारण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी, ‘मला काहीच नको. केवळ प.पू. गुरुदेवांचे दर्शन घ्यायचे आहे’, अशी इच्छा व्यक्त केली होती. यावरून लक्षात येते की, त्यांना विरक्ती येण्यास त्याच वेळी प्रारंभ झाला होता. त्यांच्या वानप्रस्थाश्रमास आरंभ झाला होता आणि तो संपण्यापूर्वीच त्यांना संतपद प्राप्त झाले.

सेवाभाव असणार्‍या आणि प्रतिकूल परिस्थितीत
स्वतःच्या क्षमतेनुसार साधना करणार्‍या सौ. अर्चना खेमका !

१. सौ. अर्चनाताई यांच्यामध्ये ‘घर म्हणजेच आश्रम आहे’, असा भाव आहे.

२. त्यांच्यात खूप सेवाभाव आणि प्रेमभाव आहे. साधक जेव्हा त्यांच्या घरी जातात, तेव्हा त्या त्यांचे प्रेमाने स्वागत करतात.

३. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी स्वतःच्या क्षमतेनुसार साधनेचे प्रयत्न केले आहेत.

४. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि प.पू. गुरुदेव यांचे नाव ऐकताच त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू वहातात. त्यांच्यात एवढा भाव जागृत होतो.

चि. श्रीहरि याच्याविषयी सद्गुरु काका म्हणाले, ‘‘महर्लोकातील जिवाने खेमका परिवारात चि. श्रीहरि याच्या रूपात जन्म घेतला आहे.’’

‘सद्गुरु पिंगळेकाका यांच्या रूपात प.पू. गुरुदेवच घरी आले आहेत’, अशी अनुभूती येणे

‘आज सकाळी प्रार्थना करतांना प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाले. त्यांनी निळ्या रंगाचा सदरा घातला आहे, असे दिसले. ‘गुरुदेव नेहमी पांढर्‍या रंगाचा सदरा घालतात. आज वेगळ्या रंगाच्या सदर्‍यामध्ये त्यांचे दर्शन कसे झाले ?’, असा विचार आला. त्यानंतर कार्यक्रमात सद्गुरु काकांना पाहिले. त्यांनी निळ्या रंगाचा सदरा घातला होता. तेव्हा ‘सद्गुरु पिंगळेकाका यांच्या रूपात प.पू. गुरुदेवच घरी आले आहेत’, हे लक्षात आले. – सौ. अर्चना खेमका

पू. आजींविषयी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

१. पू. आजींचे शस्त्रकर्म झाले. आधुनिक वैद्य शस्त्रकर्म करत असतांना, ‘प.पू. गुरुदेवच ते करत आहेत’, असे पू. आईंना वाटत होते.’ – पू. प्रदीप खेमका, पू. आजींचे पुत्र

२. ‘२-३ दिवसांपासून मला सतत वाटत होते की, आई संत होणार. कुठलीही कृती करतांना त्या अखंड नामजप करतात.’– सौ. अर्चना सुदीप खेमका, पू. आजी यांच्या स्नुषा

३. ‘पू. आई माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन मला साधनेत खूप साहाय्य करतात.’ – श्रीमती पुष्पा गोयल, पू. आजींच्या कन्या

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment