६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. (सौ.) मिनु रतन यांनी घेतलेल्या ‘श्‍वेत प्रकाश-उपचार पद्धत’ (‘व्हाईट लाईट थेरपी’) या विषयावरील अभ्याससत्राचा साधक आणि संत यांच्यावर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सूर्याकडून येणार्‍या प्रकाशाच्या साहाय्याने आपल्याला होणारे शारीरिक, मानसिक अथवा अन्य कोणतेही विकार दूर करण्याचा सरळ, सोपा आणि स्वतःच स्वतःवर करण्याचा उपाय म्हणजे ‘श्‍वेत प्रकाश-उपचार पद्धत’ ! डॉ. (सौ.) मिनु रतन यांनी १६.१२.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांसाठी ‘श्‍वेत प्रकाश-उपचार पद्धत’ या विषयावर एक अभ्याससत्र घेतले. त्या वेळी त्यांनी ‘श्‍वेत प्रकाश-उपचार पद्धत म्हणजे नेमके काय ?’, याविषयी सविस्तर समजावून सांगितले आणि त्याचे प्रात्यक्षिकही करवून घेतले. या अभ्याससत्राला पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु सत्यवान कदम हे संतद्वयी उपस्थित होते. ‘डॉ. (सौ.) मिनु रतन यांनी ‘श्‍वेत प्रकाश-उपचार पद्धत’ या विषयावर घेतलेल्या अभ्याससत्राचा साधक आणि संत यांच्यावर काय परिणाम झाला ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. १६.१२.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी करण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

डॉ. (सौ.) मिनु रतन

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीमध्ये डॉ. (सौ.) मिनु रतन यांनी ‘श्‍वेत प्रकाश-उपचार पद्धत’ या विषयावरील अभ्याससत्र घेण्यास आरंभ करण्यापूर्वी त्यांची स्वतःची आणि या अभ्याससत्राला उपस्थित असलेल्या साधकांपैकी आध्यात्मिक त्रास असणारा एक साधक, मानसिक त्रास असणारी एक साधिका, आध्यात्मिक त्रास नसणारा एक साधक, ६० टक्क्यांहून अधिक पातळीचा एक साधक आणि ‘गुरु’ अन् ‘सदगुरु’ पातळीचे संत असे एकूण ४ साधक अन् २ संत यांची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे मोजणींच्या नोंदी करण्यात आल्या. डॉ. मिनु रतन यांनी १.३० घंट्याचे अभ्याससत्र घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्या सर्वांच्या मोजणींच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजणींच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. केलेल्या मोजणींच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. डॉ. (सौ.) मिनु रतन यांनी घेतलेल्या ‘श्‍वेत प्रकाश-उपचार पद्धत’ या विषयावरील अभ्याससत्राचा झालेला परिणाम
२ अ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील केलेल्या मोजणींच्या नोंदींचे विवेचन
२ अ १ अ. अभ्याससत्रामुळे आध्यात्मिक त्रास असणारा साधक आणि मानसिक त्रास असणारी साधिका यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होणे

आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकामध्ये अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती. (‘यू.टी.एस्.’ स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला.) त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली अन् ती १.१६ मीटर होती. अभ्याससत्र झाल्यानंतर त्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन स्कॅनरने ९० अंशाचा कोन केला. मानसिक त्रास असणार्‍या साधिकेमध्येही अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती (स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला.) आणि त्या ऊर्जेची प्रभावळ १.०१ मीटर होती. अभ्याससत्र झाल्यानंतर त्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ न्यून होऊन ती ०.६४ मीटर झाली. दोन्ही साधकांमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी आणि अभ्याससत्र झाल्यानंतरही आढळली नाही.

२ अ १ आ. अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी आणि अभ्याससत्र झाल्यानंतरही आध्यात्मिक त्रास नसणारा साधक, ६० टक्के पातळीचा साधक, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ अ १ इ. डॉ. (सौ.) मिनु रतन यांच्यामध्ये अल्प प्रमाणात असलेली ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा त्यांनी अभ्याससत्र घेतल्यानंतर पूर्णपणे नष्ट होणे

डॉ. मिनु रतन यांनी अभ्याससत्र घेण्यास आरंभ करण्यापूर्वी त्यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात होती. तेव्हा स्कॅनरने ४५ अंशाचा कोन केला. त्यांनी अभ्याससत्र घेतल्यानंतर त्यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट झाली. त्यांच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा अभ्याससत्र घेण्यापूर्वी आणि अभ्याससत्र घेतल्यानंतरही आढळली नाही.

२ अ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील केलेल्या मोजणींच्या नोंदींचे विवेचन

२ अ २ अ. अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी आध्यात्मिक त्रास असणारा साधक आणि मानसिक त्रास असणारी साधिका यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती आणि अभ्याससत्र झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही.

२ अ २ आ. अभ्याससत्रामुळे आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकातील सकारात्मक ऊर्जेत पूर्णपणे वाढ होणे अन् त्या ऊर्जेची प्रभावळही मोजता येणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात होती. तेव्हा स्कॅनरने ४० अंशाचा कोन केला. अभ्याससत्र झाल्यानंतर या साधकातील सकारात्मक ऊर्जेत पूर्णपणे वाढ झाली. तेव्हा स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला. त्यामुळे त्या ऊर्जेची प्रभावळ मोजता आली अन् ती १.३० मीटर होती.

२ अ २ इ. अभ्याससत्रामुळे ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत दुपटीने वाढ होणे

या साधकामध्ये अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ १.१३ मीटर होती. अभ्याससत्र झाल्यानंतर त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत १.०६ मीटर वाढ होऊन ती २.१९ मीटर झाली, म्हणजे ती दुपटीने वाढली.

२ अ २ ई. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत अभ्याससत्रानंतर थोडी वाढ होणे

अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ अनुक्रमे १.९१ मीटर आणि २.२२ मीटर होती. अभ्याससत्र झाल्यानंतर पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ९ सेंटीमीटर वाढ होऊन ती २.०० मीटर झाली आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत १४ सेंटीमीटर वाढ होऊन ती २.३६ मीटर झाली; म्हणजे दोन्ही संतांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत थोडी वाढ झाली.

२ अ २ उ. अभ्याससत्र घेतल्यामुळे डॉ. (सौ.) मिनु रतन यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत थोडी वाढ होणे

अभ्याससत्र घेण्यापूर्वी डॉ. मिनु रतन यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती आणि तिची प्रभावळ १.४९ मीटर होती. अभ्याससत्र घेतल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत १९ सेंटीमीटर वाढ होऊन ती १.६८ मीटर झाली, म्हणजे त्यात थोडी वाढ झाली.

२ अ ३. चाचणीतील त्रास असणारे साधक, संत आणि अभ्याससत्र घेणार्‍या डॉ. (सौ.) मिनु रतन यांच्या एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणींच्या नोंदींचे विवेचन
२ अ ३ अ. अभ्याससत्रामुळे आध्यात्मिक त्रास असणारा साधक आणि मानसिक त्रास असणारी साधिका यांच्या एकूण प्रभावळीत थोडी वाढ होणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी आध्यात्मिक त्रास असणारा साधक आणि मानसिक त्रास असणारी साधिका यांची एकूण प्रभावळ अनुक्रमे १.६८ मीटर अन् १.६५ मीटर होती. अभ्याससत्र झाल्यानंतर त्यांच्या एकूण प्रभावळीत अनुक्रमे ३५ सेंटीमीटर अन् १७ सेंटीमीटर वाढ होऊन ती २.०३ मीटर अन् १.८२ मीटर झाली, म्हणजे थोडी वाढली.

२ अ ३ आ. आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकाची एकूण प्रभावळ अभ्याससत्रापूर्वी जेवढी होती तेवढीच अभ्याससत्रानंतरही रहाणे

अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी या साधकाची एकूण प्रभावळ १.८३ मीटर होती. अभ्याससत्र झाल्यानंतर ती १.८३ मीटर होती; म्हणजे तेवढीच राहिली.

२ अ ३ इ. अभ्याससत्रामुळे ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकाच्या एकूण प्रभावळीत लक्षणीय वाढ होणे

अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी या साधकाची एकूण प्र्रभावळ १.९२ मीटर होती. अभ्याससत्र झाल्यानंतर त्यात ६२ सेंटीमीटर वाढ होऊन ती २.५४ मीटर झाली, म्हणजे त्यात लक्षणीय वाढ झाली.

२ अ ३ ई. अभ्याससत्रानंतर पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या एकूण प्रभावळीत अल्प प्रमाणात वाढ होणे, तर सद्गुरु सत्यवान कदम यांच्या एकूण प्रभावळीत अधिक प्रमाणात वाढ होणे

अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची एकूण प्रभावळ २.७४ मीटर होती. अभ्याससत्र झाल्यानंतर त्यात ८ सेंटीमीटर वाढ होऊन ती २.८२ मीटर झाली, म्हणजे त्यात अल्प प्रमाणात वाढ झाली. अभ्याससत्र आरंभ होण्यापूर्वी सद्गुरु सत्यवान कदम यांची एकूण प्रभावळ ३.४९ मीटर होती. अभ्याससत्र झाल्यानंतर त्यात ८२ सेंटीमीटर वाढ होऊन ती ४.३१ मीटर झाली, म्हणजे त्यात अधिक प्रमाणात वाढ झाली.

२ अ ३ उ. अभ्याससत्र घेतल्यामुळे डॉ. (सौ.) मिनु रतन यांच्या एकूण प्रभावळीत थोडी वाढ होणे

अभ्याससत्र घेण्यापूर्वी डॉ. मिनु रतन यांची एकूण प्रभावळ २.१२ मीटर होती. अभ्याससत्र घेतल्यानंतर त्यांच्या प्रभावळीत ९ सेंटीमीटर वाढ होऊन ती २.२१ मीटर झाली; म्हणजे त्यात थोडी वाढ झाली.

वरील सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजणींच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. श्‍वेत प्रकाशाच्या उपायांचे महत्त्व

सूर्याकडून मिळणारा श्‍वेत प्रकाश हा सप्तरंगांना स्वतःमध्ये सामावून घेणारा आहे. तो निर्गुण आहे. तो सर्वकाळ सर्वत्र उपलब्ध असतो. भावपूर्ण प्रार्थना करून आवाहन केल्यावर श्‍वेत प्रकाशाची ऊर्जा प्रार्थना करणार्‍यासाठी कार्यरत होते. श्‍वेत प्रकाशाचे उपाय मानसरित्या करावयाचे असल्याने त्याला स्थळ-काळाचे बंधन नाही. त्यामुळे ते कधीही, कोणत्याही ठिकाणी, कशाही परिस्थितीमध्ये करता येण्याजोगे सहजसुलभ आणि प्रभावी उपाय आहेत. श्‍वेत प्रकाशाचे उपाय म्हणजे ईश्‍वराने आपत्काळात मानवासाठी उपलब्ध करून दिलेली संजीवनी आहे.

३ आ. डॉ. (सौ.) मिनु रतन यांनी भावपूर्णरित्या घेतलेल्या अभ्याससत्रामुळे साधकांना श्‍वेत प्रकाशाच्या उपायांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येणे आणि तो लाभ ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणींच्या नोंदींवरून दिसून येणे

डॉ. मिनु रतन यांनी अभ्याससत्रात श्‍वेत प्रकाशाचे महत्त्व भावपूर्णरित्या समजावून सांगितले. त्यामुळे साधकांचा श्‍वेत प्रकाशाप्रती भाव जागृत होऊन त्यांना श्‍वेत प्रकाशाचे उपाय भावपूर्णरित्या करता आले. मुळातच परिणामकारक असलेले श्‍वेत प्रकाशाचे उपाय आणि त्याला डॉ. मिनु रतन यांनी घेतलेल्या भावपूर्ण अभ्याससत्रामुळे मिळालेली भावाची जोड यांमुळे ते उपाय आणखी परिणामकारक झाले. त्यामुळे साधकांना पुढीलप्रमाणेे आध्यात्मिक स्तरावर लाभ झाले.

१. आध्यात्मिक त्रास असणारा साधक आणि मानसिक त्रास असणारी साधिका यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली. त्यामुळे त्यांची एकूण प्रभावळ वाढली.

२. आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

३. ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाली. त्यामुळे त्याची एकूण प्रभावळही वाढली.

३ इ. डॉ. (सौ.) मिनु रतन यांनी ‘अभ्याससत्र घेणे ही ईशसेवा आहे’ या भावाने अभ्याससत्र घेतल्यामुळे त्यातून त्यांची समष्टी साधना होणे, तसेच त्यांना त्यांची सकारात्मक ऊर्जा, प्रभावळ वाढण्याच्या स्वरूपातही लाभ होणे

डॉ. मिनु रतन त्यांच्यामध्ये प्रेमभाव, इतरांप्रती संवेदनशीलता आणि साधनेची तीव्र तळमळ हे समष्टीसाठी पूरक गुण आहेत. त्यांचा गुरूंप्रती (म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) भाव आहे. त्यामुळे त्यांनी ‘अभ्याससत्र घेणे ही ईशसेवा आहे’, या भावाने अभ्याससत्र घेतले. यातून त्यांची समष्टी साधना झाल्यामुळे त्यांना स्वतःलाही आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला. आरंभी त्यांच्यात थोड्या प्रमाणात असलेली नकारात्मक ऊर्जा अभ्याससत्र घेतल्यानंतर नष्ट झाली, तसेच त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीतही वाढ झाल्याचे दिसून आले.

३ ई. उपायांचा संतांवर अल्प प्रमाणात परिणाम होण्याचे कारण

संतांमधील सकारात्मक ऊर्जा कार्यानुमेय कार्यरत होते. श्‍वेत प्रकाशाच्या उपायांमधील सात्त्विकतेच्या तुलनेत संतांमध्ये असलेली सात्त्विकता मुळातच पुष्कळ अधिक होती. त्यामुळे या सात्त्विकतेचा साधकांवर जेवढ्या प्रमाणात परिणाम दिसून आला, तेवढ्या प्रमाणात परिणाम संतांवर झालेला दिसून आला नाही.

३ उ. अभ्याससत्राच्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांचे ध्यान लागले होते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ झालेली दिसून आली.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (८.२.२०१८)
ई-मेल : [email protected]

Leave a Comment