साधनेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर आणि परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणारे सनातनचे ५१ वे संत पू. जयराम कृष्णाजी जोशी (वय ७९ वर्षे) !

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

पू. जयराम कृष्णाजी जोशी

१. बालपण

१ अ. गाई आणि म्हशी यांचे दूध काढून घरोघरी दूध देऊन शाळेत जाणे

‘माझ्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय होता. मला वयाच्या आठव्या वर्षापासून पहाटे ४ वाजता गाई आणि म्हशी यांचे दूध काढणे, शेण काढणे अन् गोठा स्वच्छ करणे, यांसाठी उठावे लागत असे. मी घरोघरी दुधाचे रतीब पोहोचवण्यासाठी पायी जात असेे. त्यानंतर मी गाई आणि म्हशी यांना नदीवर नेऊन पाणी पाजत असेे. नंतर मी घरचे आवरून शाळेत जात होतो.

१ आ. देवाधर्माची आवड असणे

मी शाळेत जाण्याच्या वाटेवर शंकर आणि मारुति यांचे देऊळ होते. मी नियमितपणे देवळात जाऊन देवाला नमस्कार करून शाळेत जायचो. मी प्रतिदिन सायंकाळी परवचा (तोंडाने म्हटलेली उजळणी) म्हणायचो. यामुळे मला देवाधर्माचे करायची गोडी लागली.

१ इ. स्वयंपाक करायला शिकणे

लहान भावंडांना सांभाळून आणि आईला स्वयंपाकघरात साहाय्य करून मी शालेय शिक्षण घेतले. भावडांत मी मोठा असल्याने आई रुग्णाइत असतांना मी स्वयंपाक करत असे. अशा प्रकारे देवाच्या कृपेने मी संपूर्ण स्वयंपाक शिकलो. मी देवरुख (जि. रत्नागिरी) येथे अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

१ ई. महाविद्यालयीन शिक्षण घेण्याएवढी घरची आर्थिक स्थिती नसल्याने मी वयाच्या २१ व्या वर्षी पुणे येथे नोकरीसाठी आलो.

 

२. नोकरी आणि व्यवयाय

२ अ. स्टेशनरीच्या दुकानात नोकरी करणे

वर्ष १९६० मध्ये मी पुण्यात आल्यावर स्टेशनरीच्या दुकानात नोकरी केली. त्या वेळी मावस बहिणीच्या घरी राहून मी दुकानात जात असे. पुण्यातील हुजूरपागा शाळेच्या इमारतीतच स्टेशनरी आणि होजिअरीचे दुकान असल्याने माझा पालक अन् त्यांचे पाल्य यांच्याशी संपर्क वाढला. त्यामुळे माझ्या ओळखी वाढल्या. दुकानाच्या वर रुग्णालय असल्याने तेथील रुग्णांच्या नातेवाइकांशी माझा संपर्क वाढला. पालक मुलींना देण्याचे साहित्य माझ्याकडे विश्‍वासाने देत असत.

 

३. वैवाहिक जीवन

३ अ. रहाण्यासाठी जागा नसल्याने पत्नीला गावी देवरुख येथे पाठवणे, नंतर
सदाशिव पेठेत एक लहान खोली भाड्याने घेणे आणि एका गुरुजींचे दुकान चालवणे

वर्ष १९६४ मध्ये माझा विवाह झाला. आम्हाला रहाण्यासाठी खोली नसल्याने मी पत्नीला गावी देवरुख येथे पाठवले. त्यानंतर दोन वर्षांनी एका ‘गॅरेज’मध्ये, पत्र्याच्या शेडमध्ये २ पातेली, २ पत्र्यांचे डबे आणि १ स्टोव्ह असे साहित्य गोळा करून आमचा संसार चालू झाला. आम्हाला ६ मासांनंतर (महिन्यांनंतर) गावात एक खोली मिळाली. तेथे आम्हा दोघांसह नोकरीसाठी आलेला माझा भाऊ रहात होता. भावाचा विवाह झाल्यावर रहात असलेली खोली भावाला देऊन आम्ही सदाशिव पेठेत ८ × १० फूट असणारी लहान खोली भाड्याने घेतली. वर्ष १९७२ मध्ये मालकाने दुकान विकले. त्याच वेळी एका गुरुजींनी त्यांचे जिन्याखाली ३ × ४ फूट असणार्‍या छोट्या जागेतील दुकान मला चालवायला दिले. ते मी २२ वर्षे चालवले.

३ आ. खानावळ चालू करणे

३ आ १. ‘ना नफा, ना तोटा’ हे ब्रीद ठेवून अल्प पैशांत मुलांना पोटभर जेवण देणे

वर्ष १९७८ मध्ये इतरांनी माझ्या पत्नीला जेवणाचे डबे देण्याचा आग्रह केल्याने तिने डबे देणे चालू केले. नंतर सकाळ-संध्याकाळ ४० जण आमच्या खानावळीत जेवत होतेे. आम्ही दोघे मिळून घरातील सर्व कामे, स्वयंपाक, धुणी-भांडी करत असू. घरातील सर्व कामे घरच्या घरी करून आणि काटकसर करून ‘ना नफा, ना हानी’ हे ब्रीद ठेवून अल्प पैशांत मुलांना पोटभर जेवण देत होतो.

३ आ २. ‘खानावळीत जेवणारी मुले आमचीच आहेत’, या भावाने स्वयंपाक केल्याने मुलांना घरी जावेसे न वाटणे

खानावळीतील मुलांना जेवण वाढतांना ‘ही आमचीच मुले आहेत’, असा भाव आम्ही ठेवत असू. लहान खोलीतही मुले मांडीला मांडी लावून जेवत असत. अधिकोषातील किंवा मोठ्या आस्थापनात उच्च पदावर कार्यरत असलेले अधिकारी खाली बसूनच जेवत. ते म्हणत, ‘‘मामी, तुम्ही प्रेमाने स्वयंपाक करता. तुमचा ‘माझी मुलेच जेवणार आहेत’, असा भाव असल्याने इथे लहान जागेत जेवूनही आम्हाला जे आंतरिक समाधान मिळते, ते बाहेर जेवतांना मिळत नाही.’’ आम्ही त्यांच्या आजारपणातील पथ्य-पाणीही सांभाळत असू. त्यामुळे कुणी आजारी पडले, तरी ते घरी जात नसत. सणासुदीला आम्ही तेवढ्याच पैशांत गोड-धोड करून त्यांना वाढायचो. त्यामुळे मुलांचे आई-वडील आणि नातेवाइक आम्हाला म्हणायचे, ‘‘तुमच्याकडे यायला लागल्यापासून आमच्या मुलांना घरीही यावेसे वाटत नाही.’’

अशा प्रकारे ३० वर्षे खानावळ चालवतांना गावोगावची मुले जेवून गेल्यामुळे देवाने आमच्यासाठी प्रत्येक गावात एक ओळखीचे घर निर्माण केले.

३ आ ३. व्यापार्‍यांनी करणी केल्याने भ्रमिष्टासारखा वागणे, मालकाला दुकान परत द्यावे लागणे, करणी उतरवण्यासाठी उपाय केल्यावर दीड वर्षाने त्या स्थितीतून बाहेर येणे

वर्ष १९९२ मध्ये दुकानाच्या बाजूला असणार्‍या व्यापार्‍यांनी माझ्यावर करणी केली. मला दुकान चालवायची इच्छा होत नव्हती. मी भ्रमिष्टासारखा वागत होतो. मला जेवण जात नसे, तसेच कुणी काही बोललेलेही मला समजत नसे. त्या वेळी लोकांनी मला ‘वेडा’ ठरवले. ते माझ्या कुटुंबियांना मला वेड्यांच्या इस्पितळात पाठवण्याविषयी सांगायचे. माझी पत्नी आणि मुलगा यांनी या प्रसंगाला धिराने तोंड दिले. त्यांनी सर्वांना सांगितले, ‘‘आम्ही त्यांना घरातच सांभाळू.’’ त्या वेळी माझ्यावर पुष्कळ ऋण झाले होते. केवळ प.पू. गजानन महाराज यांच्या कृपेने मी जिवंत राहू शकलो. माझी पत्नी आणि आणि मुलगा यांनी मला साथ दिली. मला मालकाला दुकान परत द्यावे लागले. त्यांच्याकडून काही रक्कम मिळाल्याने मला ऋण फेडायला साहाय्य झाले. आमच्या घराशेजारील श्री. जोशी यांनी माझ्यावर केलेली करणी उतरवण्यासाठी उपाय सांगितले. ते उपाय केल्याने दीड वर्षाने मला या स्थितीतून बाहेर पडता आले. हे केवळ गुरूंच्या कृपेनेच शक्य झाले.

३ आ ४. पत्नीचे मोठे शस्त्रकर्म होणे, २ मास बंद असलेली खानावळ मुलांच्या आग्रहाखातर पूर्ववत चालू होणे

त्यानंतर मी आणि पत्नी खानावळ चालवू लागलो. वर्ष १९९२ मध्ये पत्नीचे गर्भाशयाचे एक मोठे शस्त्रकर्म करावे लागले. तिच्या पोटात जवळजवळ पाऊण किलो वजनाचा ‘ट्यूमर’ निघाला. त्या वेळी वैद्यांनी केवळ २४ घंट्यांची मुदत दिली होती; पण त्यातूनही श्री गुरूंच्या कृपेने ती सुखरूप बाहेर पडली. या कालावधीत खानावळ २ मास पूर्ण बंद ठेवावी लागली. त्यानंतर श्री गुरूंच्या कृपेने, वैद्यांच्या समादेशानुसार आणि मुलांच्या आग्रहाखातर खानावळ पुन्हा चालू झाली. ती पुढे ११ वर्षे चालू राहिली.

३ आ ५. पायांवर उकळत्या आमटीचे आणि उकळत्या भाजीचे मोठे पातेले उपडे पडल्याने दोन्ही पाय कमरेपासून भाजणे; वैद्यांनी १ मास मलमपट्टी करूनही पैसे न घेणे

वर्ष १९९८ मध्ये एके दिवशी दुपारी स्वयंपाक करत असतांना धक्का लागून माझ्या एका पायावर उकळत्या आमटीचे आणि दुसर्‍या पायावर उकळत्या भाजीचे मोठे पातेले उपडे पडले. माझे दोन्ही पाय कमरेपासून भाजले. त्याच स्थितीत मी पाय धुऊन आणि कपडे पालटून चालत वैद्यांकडे गेलो. वैद्यांनी माझी स्थिती पाहिल्यावर ‘‘तुम्ही चालत येथपर्यंत कसे येऊ शकलात ?’’, असे आश्‍चर्य व्यक्त केले. त्यांनी माझ्यावर सर्व उपचार केले. त्यानंतर १ मास मलमपट्टी केली. माझ्या जखमा पूर्ण भरल्यानंतर मी वैद्यांना पैशांविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्या घरातीलच एक आहात. मला पैशांबद्दल विचारू नका.’’ आता माझ्या पायांवर भाजलेल्याचे व्रणही राहिले नाहीत. ही केवळ गुरुकृपाच !

 

४. सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी करत असलेली साधना

४ अ. मी प्रतिदिन नित्यनेमाने मारुति आणि शंकर यांच्या देवळात जाऊन तेलवात करत असे. मी प्रतिदिन प.पू. गजानन महाराज यांच्या पोथीतील एक अध्याय वाचत होतो.

४ आ. रात्री झोपण्यापूर्वी दत्ताच्या देवळात जाऊन
आत्मनिवेदन करणे आणि झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना करणे

मी रात्री झोपण्यापूर्वी दत्ताच्या देवळात जाऊन आत्मनिवेदन करत असे. मी ‘दिवसभरात काय घडले ?’, हे देवाला सांगून ‘देवाने माझी काळजी घेतली’, यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असे. माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मी क्षमायाचना करत असे. कितीही पाऊस-पाणी असले, तरी मी हा नियम कधीच मोडला नाही.

 

५. सनातनशी संपर्क

५ अ. जावई साधना करत असल्याने मुलगी आणि मुलगा यांनी साधनेस आरंभ करणे, मुलाने
सेवा चालू केल्यावर साधक घरी येऊ लागणे आणि ते खानावळीत जेवत असल्याने त्या माध्यमातून सेवा होणे

वर्ष १९९१ मध्ये माझी मुलगी कु. आरती हिचा विवाह श्री. प्रसाद म्हैसकर यांच्याशी झाला. ते सनातनच्या माध्यमातून साधना करत होते. नंतर माझी मुलगी आणि मुलगा श्री. योगेश हेही साधना करू लागले. वर्ष १९९७ पासून योगेशने पुण्यात सेवा चालू केली. साधक आमच्या घरी येऊ लागले, तसेच खानावळीत जेवूही लागले. आमचा व्यवसाय असल्याने आम्हाला सेवेसाठी बाहेर जाता येत नसेे; परंतु खानावळीच्या माध्यमातून देवाने आमची सेवा चालू केली. वर्ष १९९९ पासून आम्ही मुलाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी ठाणे येथील सेवाकेंद्रात पाठवले.

५ आ. आतापर्यंत केलेल्या सेवा

५ आ १. नातीला सांभाळण्यासाठी देवद आश्रमात गेल्यावर स्वयंपाकघरात सेवा करणे

वर्ष २००४ मध्ये आमच्या पुण्यातील रहात्या जागेवर इमारतीचे बांधकाम होत होते. तेव्हा माझी नात (योगेशची मुलगी) चि. ऐश्‍वर्या ही ६ मासांची होती. तिला सांभाळण्यासाठी आम्ही देवद आश्रमात राहिलो. तेथे मला ऐश्‍वर्याला सांभाळून स्वयंपाकघरात सेवा करायला मिळाली. तेथेही मला देवाने साधकांच्या माध्यमातून भरपूर प्रेम दिले. मी देवाच्या कृपेनेे स्वयंपाकघर सेवेचे दायित्वही पेलले.

५ आ २. पत्नीचे देहावसान झाल्यानंतर रामनाथी आश्रमात राहून सेवा करणे

वर्ष २००६ ते २०१० पर्यंत पुन्हा पुणे येथे राहून मी छोट्या प्रमाणात खानावळ चालवली. त्यानंतर माझ्या पत्नीचे देहावसान झाले. त्या वेळी माझा मुलगा योगेश रामनाथी आश्रमात सेवा करत असल्याने श्री गुरुदेवांनी मला एकटे पुण्यात न रहाता रामनाथी आश्रमात येण्यास सांगितले. त्यांच्या कृपेमुळे जुलै २०१० पासून मला पू. पद्माकर होनपकाका आणि कै. आदगोंडा पाटीलकाका (डॉ. (कु.) माया पाटील यांचे वडील) यांच्या समवेत अर्पण पावती पुस्तकांची तपासणी करण्याची सेवा करण्याची संधी मिळाली.

५ आ ३. रामनाथी आश्रमात आल्यावर ९ मासांनी मार्च २०११ मध्ये गुरुदेवांनी माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करून माझ्या साधनेच्या पुढील वाटचालीला गती दिली.
५ आ ४. मिरज आश्रमातील ध्यानमंदिरात देवपूजा आणि आरती करणे, स्वागतकक्षात सेवा करणे, आजारी पडल्यावर गुरुदेवांनी ‘प्रार्थना आणि नामजप करणे’, हीच आता तुमची साधना आहे’, असे सांगणे

त्यानंतर जुलै २०११ मध्ये मी मिरज आश्रमात आलो. तेथे मी सकाळी ध्यानमंदिरातील देवपूजा आणि आरती करत असे. मी स्वागतकक्षात ८ ते ९ घंटे सेवा करत असे. त्यानंतर मी आजारी झाल्याने स्वागतकक्षात सेवा करू शकत नव्हतो. तेव्हा ‘माझ्याकडून काही सेवा होत नाही’, असे मला वाटत असे. तेव्हा गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘प्रार्थना आणि नामजप करणे’, हीच आता तुमची साधना आहे.’’

५ आ ५. साप्ताहिक सनातन प्रभात पोस्टाने पाठवण्याच्या संदर्भातील सेवा भावपूर्ण करणे

त्यानंतर मला साप्ताहिक सनातन प्रभात पोस्टाने पाठवण्याच्या संदर्भात सेवा मिळाली. साप्ताहिक सनातन प्रभातच्या घड्या घालणे, पत्त्यांचे ‘लेबल’ कापणे, ‘लेबल’ अंकांवर चिकटवणे, अंकांचे गावांनुसार गठ्ठे बांधणे आणि ते अंक पोस्टात पाठवणे, अशा सेवा मी करत होतो. माझ्याकडून ही सेवा पुष्कळ भावपूर्ण आणि नामजपासहित होत असे. साप्ताहिक सनातन प्रभातचे गठ्ठे पहाणार्‍या व्यक्तींचीही भावजागृती होत असे. आरंभीचे काही दिवस ही सेवा करण्यासाठी मला एक सप्ताह लागत असे. नंतर ही सेवा माझ्याकडून ४ – ५ दिवसांतच पूर्ण होऊ लागली. मला साहाय्याला येणार्‍या साधकांमधील निराशा दूर होऊन त्यांचा उत्साह वाढला. या सर्व सेवा केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच मी करू शकलो.

५ आ ६. जुलै २०१५ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांनी मला संतपदी विराजमान केले.
५ आ ७. साधकांसाठी नामजप करणे आणि त्यांच्या साधनेतील अडचणी सोडवणे

श्री गुरुदेवांच्या कृपेमुळे मला ऑगस्ट २०१५ पासून मिरज आश्रम आणि सांगली येथील साधकांसाठी नामजप करणे अन् त्यांच्याशी बोलून त्यांच्या साधनेतील अडचणी सोडवणे, या सेवा मिळाल्या.

 

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

६ अ. ‘पत्नी कमरेच्या दुखण्याने त्रस्त असतांना तिला रुग्णालयात नेणे, डबे देणे आणि
खानावळ सांभाळणे, हे वयाच्या ७० व्या वर्षी एकट्याने करू शकणे’, ही गुरुदेवांची कृपा !

वर्ष २००६ मध्ये मी देवद आश्रमातून पुणे येथे गेलो. त्यानंतर वर्ष २००८ ते २०१० या कालावधीत माझ्या पत्नीचे कमरेचे दुखणे वाढले. तेव्हा मुलगा आणि सून यांची देवद आश्रमात तातडीची सेवा चालू असल्याने मी त्यांना काहीच कल्पना दिली नाही. त्या वेळी पत्नीला प्रतिदिन सकाळी ‘टॅ्रक्शन’ लावण्यासाठी रुग्णालयात नेऊन सायंकाळी परत आणणे, डबे देणे आणि खानावळ सांभाळणे, हे सर्व करण्याची शक्ती गुरुदेव मला देत होते. मी प्रत्येक रात्री गुरुदेवांना प्रार्थना करत असे, ‘गुरुदेवा, मुलांची सेवा महत्त्वाची आहे. त्यांना इकडे बोलावणे योग्य नाही. तुम्हीच मला शक्ती देऊन माझ्याकडून या सेवा करवून घ्या.’ मी मुलांना सांंगितले, ‘‘तुम्ही घरी येऊ नका. सेवेलाच प्राधान्य द्या.’’ घरातील स्वयंपाक, अन्य कामे आणि पत्नीचे सर्व सांभाळणे, हे ‘वयाच्या ७० व्या वर्षी एकट्याने करणे’, हे माझ्या आवाक्याबाहेरचे होते; परंतु ‘गुरुदेवच सर्व करवून घेत आहेत’, याची मला अनुभूती आली. तेव्हा ‘माझ्या समवेत गुरुदेव आहेत’, याची मला पदोपदी जाणीव होत असे. प्रतिदिन मी माझ्या मनातील सर्वकाही गुरुदेवांना सांगत असे. त्या काळात माझी गुरुदेवांवरील श्रद्धा पुष्कळ वाढली. देव मला खानावळीत जेवायला येणारी मुले आणि साधक यांच्या माध्यमातून साहाय्य करत होता.

६ आ. पत्नी फिट येऊन बेशुद्ध झाल्यावर तिला रुग्णालयात भरती करणे, पत्नी ‘कोमा’त
गेल्यावर तिला घरी आणणे, रामनाथी आश्रमातून मुलगा आणि सून घरी येणे आणि नंतर तिचा प्राण जाणे

जून २०१० मध्ये माझ्या पत्नीला फिट येऊन ती बेशुद्ध झाली. त्या वेळी मुलगा आणि सून रामनाथी आश्रमात गेले होते. मी साधकांच्या साहाय्याने तिला त्वरित रुग्णालयात भरती केले. वैद्यांनी पत्नीला १२ घंट्यांची मुदत दिली होती. त्याच रात्री मुले रामनाथीहून परत आली. ती ‘कोमा’त गेल्याने आम्ही तिला घरी आणले.

त्या वेळी लोक आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या पत्नीला घरी कसे आणले ? तुम्ही उपचार का केले नाहीत ? ‘कोमा’तील व्यक्तीचा भरवसा नसतो.’’ मी श्री गुरुदेवांना कळकळीने प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, तुम्हीच तिला मुक्ती द्या.’ या प्रार्थनेनंतर लगेच तिने प्राण सोडला. हे सर्व तिला घरी आणल्यावर केवळ १ घंट्यातच घडले. रुग्णालयातील रज-तमाच्या वातावरणात तिचा प्राण जाण्यापासून श्री गुरुदेवांनीच वाचवले. देवानेच तिला ‘कोमा’त खितपत न ठेवता मुक्ती दिली. श्री गुरुदेवांनी मला दिलेली ही मोठी अनुभूती आहे.

६ इ. श्री गुरुदेवांनी रामनाथी आश्रमात बोलावणे

पत्नीच्या निधनाच्या मोठ्या प्रसंगातून सावरणे माझ्यासाठी कठीण होते. श्री गुरुदेवांनी मला रामनाथी आश्रमात बोलावून सर्व साधकांचे प्रेम देऊन, माझ्याशी बोलून आणि धीर देऊन यातून बाहेर काढले.

 

७. स्वतःत झालेले पालट

७ अ. मिरज आश्रमात आल्यावर ‘आश्रम जीवनाशी एकरूप होता येईल का ?’, असे
वाटणे आणि आश्रमातील सेवा करतांना व्यापकत्व येऊन आश्रमजीवनाशी समरस होणे

घरून आश्रमात आल्यावर ‘मला आश्रमजीवनाशी एकरूप होता येईल का ?’, असे वाटत असे. मिरज आश्रमात आल्यावर घराप्रमाणेच आश्रमातील स्वयंपाकगृह, देखभाल दुरुस्ती, स्वागतकक्ष आणि अन्य सेवांतील अडचणी सोडवणे, तसेच छोट्या छोट्या गोष्टी साधकांच्या लक्षात आणून देणे अन् त्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा घेणे आणि श्री गुरुदेवांना अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करवून घेणे, यांमुळे देवाने माझ्यात व्यापकत्व आणून मला आश्रमाशी समरस करून घेतले.

विविध आंदोलने, हिंदु धर्मजागृती सभा, शिबिरे, अधिवेशन यांतील अडथळे दूर होण्यासाठी मला गुरुदेवांनी प्रार्थना करायला सांगितल्या, साधकांचे त्रास दूर करण्यासाठी मला नामजप (उपाय) करण्यास सांगितला आणि मला साधकांशी बोलून त्यांना निराशेतून बाहेर काढून प्रोत्साहन देण्यास सांगितले. या सर्व सेवांमधून गुरुदेवांनी मला व्यष्टी साधनेतून समष्टी साधनेकडे नेले.

७ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्संग आणि मिळालेली शिकवण

१. गुरुदेवांच्या खोलीत मला टापटीपपणा पहावयास मिळाला. तेव्हा मीही ‘कोणतीही अपेक्षा न ठेवता ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने वागायला हवे’, हे माझ्या लक्षात आले.

२. ‘गुरुदेव रुग्णाइत असले, तरी ते सतत सेवारत असतात, तसे आपणही झोकून देऊन सतत सेवा करायला हवी’, हे मला शिकायला मिळाले.

पू. जयराम जोशी यांच्या समवेत डावीकडून श्री. योगेश जोशी (मुलगा), कु. ऐश्‍वर्या (नात) आणि सौ. भाग्यश्री (सून)

३. मी रामनाथी आश्रमात महाप्रसाद ग्रहण करतांना मला गुरुदेवांची आठवण येत असे. गुरुदेव सर्वांना भरभरून जेवण देतात; परंतु स्वतः मात्र लहान भांड्यात थोडेसेच जेवतात. त्यामुळे प्रतिदिन जेवतांना मला त्यांची आठवण येते.

४. गुरुदेवांचे साधकांवरील प्रेम पाहून ‘मलाही साधकांवर असेच निरपेक्ष प्रेम करता यायला हवे’, हा भाग माझ्या मनावर ठसला.

५. गुरुदेवांना ‘साधकांनी साधना करून पुढे जायला हवे’, हाच एक ध्यास आहे. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा विषय निघाल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंद पाहून मला पुष्कळ गहिवरून आले. ‘साधकांना प्रत्येक वेळी किती देऊ ?’, असे त्यांना झालेले असते’, असे केवळ आपली गुरुमाऊलीच करू शकते’, याची मला जाणीव झाली.

६. एकदा माझी गुरुदेवांची भेट झाल्यावर त्यांनी माझे हात हातात घेतले. तेव्हा माझ्या अंगावर रोमांच आले आणि ‘माझ्या संपूर्ण शरिरात चैतन्याचा स्रोत जात आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘माझी पात्रता नसतांना देव मला सर्व देत आहे’, असे मला वाटत होते. ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय होती. ‘ही प्राणप्रिय गुरुमाऊली मला केवळ ईश्‍वराकडे नेण्यासाठी झटत आहे. मलाही देहभान हरपून आणि मन अर्पण करून तिला आनंद द्यायलाच हवा’, हे माझ्या मनावर ठसले.

 

८. अनुभूती

८ अ. मिरज आश्रमात योगतज्ञ दादाजी वैशंपायन आल्यावर ‘त्यांच्याशी
भेट होईल का ?’, असा विचार येणे आणि त्यानंतर १५ मिनिटांनी त्यांनी बोलावून
आपुलकीने विचारपूस करणे अन् त्यांच्या समवेत अनुष्ठान अन् यज्ञ यांना बसण्याची संधी मिळणे

वर्ष २०१३ मध्ये मिरज आश्रमात योगतज्ञ दादाजी वैशंपायन आले होते. तेव्हा ‘माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होईल का ?’, असा माझ्या मनात विचार आला. त्यानंतर १५ मिनिटांनी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावून माझी आपुलकीने विचारपूस केली. त्या वेळी मला त्यांच्या समवेत अनुष्ठान आणि यज्ञ यांना बसण्याची संधी मिळाली. गुरुदेवांच्या कृपेनेच हे झाले. यासाठी माझ्याकडून गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

८ आ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची आठवण येणे आणि
एका साधकाने ‘योगतज्ञ दादाजी तुमची आठवण काढत होते’, असे सांगणे

त्यानंतर मध्येमध्ये मला योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची पुष्कळ आठवण येत होती. माझा श्री. अतुल पवार यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन तुमची आठवण काढत होते’, असे सांगितले.

८ इ. मिरज आश्रमात बांधकामाची सेवा चालू असतांना ‘काम चालू करण्यापूर्वी
देवाला सांगितले नाही’, असा मनात विचार येणे, त्यानंतर मजूर कामावर येणे बंद होणे, उत्तरदायी
साधकाला ध्यानमंदिरात जाऊन गुरुदेवांची क्षमा मागण्यास सांगणे आणि नंतर आवश्यक मजूर मिळणे

वर्ष २०१३ मध्ये मिरज आश्रमात बांधकामाची सेवा चालू होती. ‘काम चालू करण्यापूर्वी देवाला सांगितले नाही’, असा माझ्या मनात विचार येत होता. त्या वेळी अकस्मात मजूर कामावर येणे बंद झाले. तेव्हा मी बांधकामाला उत्तरदायी साधकाला विचारले, ‘‘ही सेवा चालू करण्यापूर्वी तुम्ही गुरुदेवांना सांगितले होते का ?’’ त्या वेळी त्या साधकाने ‘नाही’, असे सांगितले. त्यानंतर मी त्या साधकाला ध्यानमंदिरात जाऊन गुरुदेवांची क्षमा मागण्यास आणि नंतर मजूर आणायला जाण्यास सांगितले. त्याने तसे केल्यावर आवश्यक तेवढे मजूर मिळून काम सुरळीत पार पडले. ‘ही माझी बुद्धी नाही’, तर गुरुदेवच माझ्या मनात हे विचार घालतात.

८ ई. मिरज आश्रमातील ध्यानमंदिरातील श्री भवानीदेवीच्या मूर्तीने ‘काळोखात
का ठेवले आहे ?’, असे विचारणे आणि नंतर साधकाला सांगून तेथे दिवा लावणे

मिरज आश्रमातील ध्यानमंदिरात एका भक्ताने दिलेली श्री भवानीदेवीची मूर्ती ठेवली होती. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी देवी प्रत्यक्षात माझ्यासमोर उभी राहिली आणि तिने मला सांगितले, ‘मला काळोखात का ठेवले आहे ?’ त्यानंतर मी ही चूक लगेच साधकाला सांगितली आणि तिथे दिवा लावला. अशा प्रकारे देव मला दृष्टांत देऊन साहाय्य करतो.

८ उ. मुलगा, मुलगी, जावई आणि नातू यांना व्यष्टी साधना करण्यासाठी सांगितल्यावर स्थिर रहाता येणे

वर्ष २०१४ मध्ये ३ – ४ मासांच्या कालावधीत माझा मुलगा, मुलगी, जावई आणि नातू यांना व्यष्टी साधना करण्यास सांगितले. त्या वेळी गुरुदेवांच्या कृपेमुळे मला स्थिर रहाता आले. गुरुदेवांनीच त्यांचा सांभाळ करून त्यांना पुन्हा साधनेत आणले.

८ ऊ. दिवंगत पत्नीच्या प्रगतीविषयी मनात विचार येणे आणि वर्ष
२०१६ मध्ये गुरुदेवांनी तिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के असल्याचे सांगितल्यावर काळजी मिटणे

माझ्या पत्नीचे पहिले वर्षश्राद्ध रामनाथी आश्रमात, दुसर्‍या वर्षी देवद आश्रमात, तिसर्‍या वर्षी मिरज आश्रमात, चौथ्या आणि पाचव्या वर्षी नरसोबाची वाडी येथे झाले. गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि सात्त्विक ठिकाणी विधी झाल्यामुळे तिला मुक्ती मिळाली. माझ्या मनात ‘दिवंगत पत्नीची प्रगती होत आहे कि नाही ?’, असे विचार येत होते. वर्ष २०१६ मध्ये गुरुदेवांनी माझ्या पत्नीची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के असल्याचे सांगितले. त्यामुळे माझी तिच्या विषयीची काळजी मिटली.

८ ए. गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन त्यांना दूरभाष करण्याचा विचार
मनात येणे आणि नंतर गुरुदेवांनीच दूरभाष करणे, ‘गुरुमाऊली भक्तांची प्रत्येक इच्छा
पूर्ण करण्यासाठी झटते’, तसे गुरूंच्या राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलायलाच हवा’, असे वाटणे

एकदा मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन ‘त्यांना दूरभाष करता येईल का ?’, असे वाटले. ‘गुरुदेवांचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे’, असे वाटून मी हा विचार सोडून दिला. नंतर गुरुदेवांचा मला दूरभाष आला. त्या वेळी ‘आपल्या मनातील प्रत्येक विचार गुरुदेवांपर्यंत पोहोचतो’, याची जाणीव होऊन मला आनंद झाला आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली. ‘गुरुमाऊली भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी झटते’, तसे मलाही गुरूंच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलायलाच हवा’, असे वाटले.

८ ऐ. मी गुरुदेवांना प्रार्थना करत असतांना ‘ते माझ्या समोर उभे आहेत’, असे मला जाणवते. प्रार्थनेतील शब्दही तेच सुचवतात आणि ती प्रार्थनाही तेच फलद्रूप करतात.

८ ओ. साधकांसाठी नामजप करतांना गुरुमाऊलीच नामजप करत असल्याचे दिसणे

साधकांसाठी नामजप करतांना ‘माझ्या जागी गुरुमाऊली बसली आहे आणि तेच नामजप करत आहेत’, असे मला जाणवते. साधकांनाही माझ्या जागी परात्पर गुरुदेव बसलेले दिसतात.

 

९. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘गुरुदेवा, या साधनाप्रवासात माझे असे काहीच नाही. गुरुमाऊलीची कृपा, कुटुंबियांचे सहकार्य आणि साधकांचे प्रेम यांमुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो. साधना, स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया यांविषयी मला काहीही ठाऊक नव्हते. मी व्यावहारिक जीवन जगत असतांना माझ्याकडून साधना करवून घेऊन आपण मला ‘संत’ बनवलेत. ‘गुरुदेव, आपण माझ्याकडून करवून घेत असलेल्या भोळ्या भाबड्या सेवेचा स्वीकार करावा आणि आपणच माझ्याकडून पुढील साधना जलद करून घेऊन मला आपल्या चरणी अर्पण करवून घ्यावे’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आणि कोटी कोटी कृतज्ञता !’

– (पू.) जयराम कृष्णाजी जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१७.७.२०१८)


पू. जयराम जोशी यांच्या अस्तित्वामुळे अकस्मात वर आलेल्या त्यांच्या खोलीतील लाद्या काही दिवसांनी पूर्ववत होणे

१. मिरज आश्रमातील पू. जयराम जोशी आजोबांच्या खोलीतील लाद्या अकस्मात वर येणे आणि बांधकामातील तज्ञ साधक श्री. मधुसूदन कुलकर्णी यांनी ‘लाद्यांमध्ये साठलेली हवा बाहेर काढण्यासाठी त्या काढाव्या लागतील’, असे सांगणे

‘२०.२.२०१८ या दिवशी मिरज आश्रमातील पू. जोशीआजोबा यांच्या खोलीतील लाद्या अकस्मात वर आल्या होत्या. काही दिवसांनी त्या लाद्यांचा फुगवटा एवढा वाढला की, त्यांच्यावरून चालतांना खोलीतील कपाटही हलत होते. बांधकामातील तज्ञ साधक श्री. मधुसूदन कुलकर्णी यांना त्या दाखवल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘लाद्यांत हवा साठली आहे. ती बाहेर काढण्यासाठी लाद्या काढाव्या लागतील.’’

२. काही दिवसांनी लाद्या आपोआप पूर्ववत होणे आणि श्री. कुलकर्णी यांनी ‘माझ्या ३३ वर्षांच्या
बांधकामाच्या अनुभवात असे घडलेले मी प्रथमच पहात असून पू. जोशीआबांच्या अस्तित्वाने हे घडले आहे’, असे सांगणे

१३.३.२०१८ या दिवशी लाद्यांंवरील फुगवटा नाहीसा झाला आणि लाद्या पूर्ववत झाल्या. श्री. मधुसूदन कुलकर्णीकाका म्हणाले, ‘‘मी आतापर्यंत लाद्या वर आलेल्या पाहिल्या आहेत; परंतु वर आलेल्या लाद्या आपोआप पूर्ववत झालेल्या कधी पहिल्या नाहीत. माझ्या ३३ वर्षांच्या बांधकामाच्या अनुभवातील ही पहिलीच घटना आहे. हे केवळ पू. जोशीआबांच्या अस्तित्वामुळे घडल्याचे जाणवले.’’ त्या वेळी शेजारच्या खोलीतील लाद्या पूर्णपणे वर आल्या होत्या.

३. पू. जोशीआबांना ‘वर आलेल्या लाद्या काढण्यासाठी साधकांचा वेळ आणि गुरुधन
यांचा व्यय होऊ नये’, असे वाटणे आणि त्यांनी हे सर्व गुरुदेवांच्या कृपेनेच झाल्याचे सांगणे

आतापर्यंत मिरज आश्रमातील पुष्कळ खोल्यांमधील लाद्या वर आल्याने त्या काढाव्या लागल्या आहेत; परंतु ‘वर आलेल्या लाद्या न काढता पूर्ववत होणे’, हे पहिल्यांदाच अनुभवायला मिळत आहे. पू. आबांना ‘वर आलेल्या लाद्या काढण्यासाठी साधकांचा वेळ आणि गुरुधन यांचा व्यय (खर्च) होऊ नये’, असे वाटत होते.’’ लाद्या पूर्ववत झाल्याचे पाहिल्यावर पू. जोशीआबा म्हणाले, ‘‘हे सर्व परात्पर गुरुदेवांच्याच कृपेने झाले. यात माझे काही नाही.’’

– सौ. भाग्यश्री जोशी आणि श्री. योगेश जोशी (अनुक्रमे पू. जयराम जोशीआबा यांची सून आणि मुलगा), सनातन आश्रम, मिरज. (२८.३.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात