श्रीरामाची आरती


Shriram
 

श्रीराम

आपण देवाची आरती म्हणतो म्हणजे त्या त्या देवतेची स्तुती करतो आणि तिच्या कार्याचे श्रेष्ठत्व वर्णन करतो. आरती म्हणत असतांना आपला भाव जागृत होतो. श्रीरामाची आरती संत माधवदास स्वामी यांनी रचलेली असल्याने त्यात मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.

 

भावजागृती होण्यास साहाय्य करणारी आरती

‘सनातन’च्या भाव असलेल्या म्हणजे ईश्‍वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

 

श्रीरामाची आरती

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।

जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।।

निजबळे निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।।

अनाहतध्वनि गर्जती अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ।। ४ ।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर । सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ५ ।।

– संत माधवदास

 

पाठभेद

काही ठिकाणी श्रीरामाच्या आरतीत प्रथम पुढील कडवे आणि नंतर उर्वरित कडवी म्हटली जातात.

स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली । देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली ।

शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली । तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली ।

जय देव जय देव निजबोधा रामा ।। १ ।।

 

आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ

अ. ‘जय देव जय देव निजबोधा रामा’ या ध्रुपदातील ‘निजबोधा रामा’ म्हणजे ‘आत्मबोधरूप आत्मारामा’.

आ. ‘मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला’ यामधील ‘भुवनी त्राहाटिला’ म्हणजे हनुमानाने आकाशात भ्रमण करून स्वतःच केलेला शत्रूचा विध्वंस पाहिला.

इ. ‘अनाहतध्वनि गर्जती अपार ।’ याचा भावार्थ आहे, श्रीरामाच्या विजयाप्रीत्यर्थ मेघनाद, तसेच घंटा, शंख, भेरी इत्यादी वाद्यांचा अपार नाद होऊ लागला. मेघनादासारखा नाद स्वर्गस्थ देवतांकडून होत असल्याने त्याला ‘अनाहतध्वनी’ असे म्हटले आहे.

ई. ‘अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।’ यातील ‘अठरा पद्मे’ म्हणजे १८० लक्ष कोटी.

उ. ‘सहजांची आरती वाद्यांचा गजर ।’ याचा अर्थ सहजावस्थेत असणार्‍या वसिष्ठादी मुनींनी प्रभु श्रीरामचंद्रांची आरती केली आणि मंगलवाद्यांचा गजर केला, असा आहे.

ऊ. ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आरतीसंग्रह (अर्थासह)’

Leave a Comment