परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्या खोलीतील देवघर येथे ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारांमध्ये चैतन्य निर्माण होणे अन् ते पुष्कळ दिवस टिकून रहाणे

संतांच्या खोलीतील चैतन्याचे महत्त्व

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘हिंदु संस्कृतीत देवघर आणि देवपूजा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरी देवपूजेत पंचोपचार पूजा केली जाते. ‘देवाला फुले वाहणे’ हा पंचोपचार पूजेतील एक महत्त्वाचा उपचार आहे. ‘देवपूजेत वापरलेल्या फुलांचे निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जन करावे’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आणि त्यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या मोगर्‍याच्या फुलांच्या हारांवर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो आणि तो परिणाम किती दिवस टिकून रहातो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत २९.५.२०१८ या दिनी सकाळी मोगर्‍याचा प्रत्येकी १ हार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पुढील ३ ठिकाणी ठेवण्यात आला.

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघर

इ. ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा करण्यात येणारी खोली (हे ठिकाण तुलनेसाठी निवडले होते.)

२९.५.२०१८ या दिनी मोगर्‍याच्या फुलांचा प्रत्येकी एक हार वरील तिन्ही ठिकाणी दिवसभर ठेवल्यानंतर सायंकाळी त्या तिन्ही हारांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. त्यानंतर दुसर्‍या दिवशी (३०.५.२०१८ या दिनी) सकाळी तिन्ही हारांच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या हारांतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेला हार त्यानंतर देवघराच्या वर ठेवण्यात आला. पुढे तिसर्‍या दिवशी (३१.५.२०१८ या दिवशी) आणि त्यानंतर थेट २५ व्या दिवशी (२२.६.२०१८ या दिवशी) त्या तिन्ही हारांच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजणांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. मोगर्‍याच्या हारांच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेला मोगर्‍याचा हार, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेला मोगर्‍याचा हार आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेला मोगर्‍याचा हार या तिन्ही हारांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ आ १. ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हाराची सकारात्मक ऊर्जा २५ व्या दिवशी पूर्णपणे घटलेली आढळणे; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेला मोगर्‍याचा हार आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेला मोगर्‍याचा हार या दोन्ही हारांमध्ये २५ व्या दिवशीही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. तीन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारांच्या सकारात्मक ऊर्जेची स्थिती पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

अ. ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हाराची सकारात्मक ऊर्जा ३ र्‍या दिवशी (३१.५.२०१८ या दिनी) थोडी घटली, हे ‘त्या हाराच्या संदर्भात स्कॅनरच्या भुजांनी पहिले दोन्ही दिवस दर्शवलेला ९० अंशाचा कोन तिसर्‍या दिवशी ४५ अंश दर्शवला’, यावरून लक्षात येते. (ऊर्जा मोजतांना स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केल्यासच त्या ऊर्जेच्या प्रभावळीची लांबी मोजता येते. त्यामुळे या हाराच्या संदर्भात ती दिलेली नाही.) २५ व्या दिवशी (२२.६.२०१८ या दिनी) त्या हाराच्या संदर्भात स्कॅनरच्या भुजा उघडल्या नाहीत. त्यामुळे त्या हारामध्ये सकारात्मक ऊर्जा नव्हती, हे समजते.

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हाराच्या सकारात्मक ऊर्जेत २ र्‍या दिवशी (३०.५.२०१८ या दिनी) पुष्कळ वाढ झाली; पण ३ र्‍या दिवशी त्यात घट झाली. २५ व्या दिवशी मात्र त्या हाराच्या सकारात्मक ऊर्जेत पुन्हा वाढ झाली.

इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या मोगर्‍याच्या हाराच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये २ र्‍या दिवशी थोडी वाढ झाली. त्यानंतर ३ र्‍या दिवशी त्यात थोडी घट झाली आणि २५ व्या दिवशी त्यात आणखी थोडी घट झाली.

वरील सारणीवरून असेही लक्षात आले की, ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारामध्ये २५ व्या दिवशी काहीच सकारात्मक ऊर्जा नव्हती. याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारामध्ये २५ व्या दिवशीही सकारात्मक ऊर्जा होती. तसेच २५ व्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारामध्ये असलेल्या सकारात्मक ऊर्जेहून अधिक होती.

२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ इ १. ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेला मोगर्‍याचा हार, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेला मोगर्‍याचा हार आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेला मोगर्‍याचा हार या तिन्ही हारांची एकूण प्रभावळ आधीच्या दिवसांतील प्रभावळीपेक्षा  उत्तरोत्तर न्यून होत जाणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

अ. तिन्ही हारांची एकूण प्रभावळ त्यांच्या आधीच्या दिवसांतील प्रभावळीपेक्षा उत्तरोत्तर न्यून होत गेली.

आ. २५ व्या दिवशी तिन्ही हारांमध्ये ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हाराची एकूण प्रभावळ सर्वांत अल्प होती, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या मोगर्‍याच्या हाराची एकूण प्रभावळ सर्वांत अधिक होती.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. मोगर्‍याचे फूल सात्त्विक असल्याने त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असणे

विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व ग्रहण करून ते प्रक्षेपित करण्याची क्षमता असते, उदा. मोगरा, जाई आणि निशिगंध ही फुले अनुक्रमे श्री दुर्गादेवी, श्रीराम आणि दत्त या देवतांची तत्त्वे ग्रहण करून ती प्रक्षेपित करतात. देवतेचे तत्त्व ग्रहण करू शकणारी फुले सात्त्विक असतात. मोगर्‍याचे फूल सात्त्विक असल्याने चाचणीतील तिन्ही ठिकाणी ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारांमध्ये पहिल्या दिवशी सकारात्मक ऊर्जा आढळली.

३ आ. ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारामध्ये १ ल्या दिवसाएवढीच २ र्‍या दिवशीही सकारात्मक ऊर्जा टिकून रहाणे; पण ३ र्‍या दिवशी ती न्यून होणे आणि २५ व्या दिवशी ती पूर्णपणे नाहीशी होणे; पण तेव्हा त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा न येणे, यामागील शास्त्र

सनातनच्या आश्रमात सात्त्विकता असल्याने ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीतही सात्त्विकता आहे. त्यामुळे त्या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारामध्ये पहिल्या दिवशी होती, तेवढीच सात्त्विकता (सकारात्मक ऊर्जा) दुसर्‍या दिवशीही टिकून राहिली होती.

तिसर्‍या दिवशी त्या हारातील सकारात्मक ऊर्जा थोडी न्यून झाली आणि २५ व्या दिवशी ती पूर्णपणे नाहीशी झाली. याचे कारण फुलांचे जीवन अगदी अल्प म्हणजे साधारण १ ते २ दिवसांचे असते. त्यानंतर ती कोमेजतात. कोमेजलेल्या फुलांमध्ये सात्त्विकता टिकून रहात नाही. तसेच येथे दिसून आले.

सर्वसाधारणपणे फुले १ – २ दिवसांत कोमेजल्यानंतर ती काही दिवस तशीच ठेवल्यास त्यांत नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते. सनातनच्या आश्रमातील सात्त्विकतेमुळे त्या आश्रमातील ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारामध्ये २५ व्या दिवशीही नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील चैतन्याच्या प्रभावाने त्यांच्या खोलीत ठेवलेला मोगर्‍याचा हार २५ दिवसांत पूर्णपणे कोमेजूनही त्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारामध्ये १ ल्या दिवशी थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. दुसर्‍या दिवशी त्या हाराच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. याचे कारण म्हणजे, परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे त्यांची खोली चैतन्यमय झाली आहे. त्यांच्या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हाराने त्या खोलीतील चैतन्य ग्रहण केल्याने त्या हाराच्या सकारात्मक ऊर्जेत दुसर्‍या दिवशी वाढ झालेली दिसून आली. निसर्गनियमानुसार फुले कोमेजण्याची प्रक्रिया आरंभ झाल्यावर त्या हारातील सकारात्मक ऊर्जा घटणे स्वाभाविक आहे. तसे येथे तिसर्‍या दिवशी केलेल्या मोजणीत दिसून आले. पुढे या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील सात्त्विकतेचा वैशिष्ट्यपूर्ण परिणाम दिसून आला. २५ दिवसांनी पूर्णपणे कोमेजलेल्या फुलांतील सात्त्विकता पूर्णपणे नष्ट व्हायला हवी होती (तसे ‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेल्या हाराच्या संदर्भात २५ व्या दिवशी आढळून आले); पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेल्या हारातील सात्त्विकता २५ व्या दिवशी पुष्कळ वाढलेली आढळली.

यातून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले हे चैतन्याचे स्रोत आहेत आणि त्यांच्यातील चैतन्याचा परिणाम त्यांची खोली अन् त्या खोलीतील वस्तू (उदा. या चाचणीतील मोगर्‍याचा हार) यांवर मोठ्या प्रमाणात होतो.

२. सनातनच्या आश्रमातील इतर खोल्यांच्या तुलनेत त्या आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीत पुष्कळ अधिक प्रमाणात चैतन्य आहे.

३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या हारामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे आणि ती २५ व्या दिवशीही टिकून रहाणे, यांमागील शास्त्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात त्यांचे गुरु संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि काही संतांनी दिलेली देवतांची चित्रे अन् मूर्ती आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये देवता आणि गुरु यांप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव असल्याने त्यांना देवता अन् गुरु यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात. यामुळे त्यांच्या खोलीतील देवघरात पुष्कळ अधिक प्रमाणात चैतन्य आहे. देवघरात ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारावर या चैतन्याचा परिणाम झाल्याने त्या हारामध्ये अन्य दोन्ही हारांपेक्षा अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे १ ल्या दिवशी केलेल्या चाचणीत दिसून आले. देवघरातील चैतन्याचा परिणाम त्या हारावर होऊन २ र्‍या दिवशी त्या हारातील सकारात्मक ऊर्जा वाढली. तिसर्‍या दिवशी या हारातील फुले कोमेजण्याच्या प्रक्रियेमुळे या हाराची सकारात्मक ऊर्जा अगदी थोड्या प्रमाणात न्यून झाली. पुढे २५ दिवसांनी केलेल्या मोजणीत या हारातील सकारात्मक ऊर्जा बर्‍याच प्रमाणात टिकून होती. तेव्हा या हारातील सकारात्मक ऊर्जा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेल्या हारातील सकारात्मक ऊर्जेपेक्षा साधारण दुप्पट अधिक होती.

३ उ. तिन्ही हारांची ‘एकूण प्रभावळ’ उत्तरोत्तर न्यून होत गेली, यामागील शास्त्र

‘दैनिक सनातन प्रभात’ नियतकालिकाशी संबंधित सेवा चालणार्‍या खोलीत ठेवलेल्या मोगर्‍याच्या हाराची सकारात्मक ऊर्जा न्यून होत गेली. त्याप्रमाणे त्या हाराची एकूण प्रभावळही उत्तरोत्तर न्यून होत गेली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेला मोगर्‍याचा हार आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेला मोगर्‍याचा हार यांची सकारात्मक ऊर्जा दुसर्‍या दिवशी वाढूनही त्या दिवशी त्यांची एकूण प्रभावळ न्यून झाली, तसेच पुढेही ती न्यून झाली. याचे कारण पुढीलप्रमाणे देता येईल.

सकारात्मक ऊर्जा सगुण स्तराची असते, तर एकूण प्रभावळ निर्गुण स्तराची असते. एकूण प्रभावळ हीही एक प्रकारची ऊर्जाच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील चैतन्य मिळून तेथील हारांची सकारात्मक ऊर्जा वाढली. हे चैतन्य त्या हारांना सगुण स्तरावर प्राप्त झाले. मोगर्‍याचा हार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये आणि खोलीतील देवघरात ठेवण्याचा उद्देश केवळ ‘चाचणी करणे’ हा एकच होता. ‘त्या हारांना ऊर्जा मिळावी’ हा नव्हता. कार्यानुरूप ईश्‍वराची शक्ती प्राप्त होत असते. सगुण स्तराची ऊर्जा ही कनिष्ठ, तर निर्गुण स्तराची ऊर्जा ही उच्च प्रतीची असते. ईश्‍वर काटकसरी असल्याने तो अनावश्यक उच्च प्रतीची ऊर्जा देत नाही. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये असूनही मोगर्‍याच्या हारांना केवळ सकारात्मक ऊर्जा मिळाली; पण त्यांची एकूण प्रभावळ वाढली नाही. एखाद्या घटकाकडून काही कार्य घडले, तर त्याची एकूण प्रभावळ वाढू शकते. हारांकडूनही कोणतेही कार्य न झाल्याने आणि ते कोमेजत गेल्याने त्यांची एकूण प्रभावळ न्यून होत गेली.

३ ऊ. सारांश

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आणि खोलीतील देवघरात पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याने त्याचा चांगला परिणाम तेथील मोगर्‍याच्या फुलांच्या हारांवर होऊन तो पुढे अनेक दिवस टिकून राहिला, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले. यातून संतांचे निवासस्थान आणि त्यांचे देवघर यांचे चैतन्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात येते.

२. संतांनी त्यांच्याकडील दिलेली एखादी प्रासादिक वस्तू किंवा प्रासादिक फुले यांचेही महत्त्व किती आहे, हेही कळते. त्या वस्तू म्हणजे चैतन्याचे स्त्रोत असतात.

३. ‘देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जन करावे’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. याचे कारण देवाला वाहिलेल्या फुलांमध्ये चैतन्य असते. निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जन केल्याने त्या फुलांमधील चैतन्य पाण्यात मिसळते आणि ते दूरपर्यंत पोहोचून त्याचा समष्टीला लाभ होतो. यातून ‘धर्मशास्त्रात सांगितलेल्या धार्मिक कृतींना अध्यात्मशास्त्रीय आधार आहे’, हे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३.७.२०१८)
ई-मेल : [email protected]