देवद येथील सनातनच्या आश्रमातील बलभीम येळेगावकर आजोबा ८२ व्या संतपदी विराजमान !

गुरुमाऊलींनी दिली सर्वांना दीपावलीची आनंददायी भावभेट !

३ साधिकांनीही गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

संतपदी विराजमान झाल्यानंतर पू. बलभीम येळेगावकर यांची भावमुद्रा

सन्मान सोहळ्यानंतर डावीकडून श्रीमती अनुराधा मुळ्ये, पू. बलभीम येळेगावकर आजोबा, सौ. संध्या जामदार आणि मागे उभ्या असलेल्या सौ. जया साळोखे

पनवेल – देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये ५ नोव्हेंबरला झालेल्या एका भावसोहळ्यात आश्रमातील साधक श्री. बलभीम येळेगावकर (वय ८४ वर्षे) हे संतपदी विराजमान झाले असल्याचे सनातनच्या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी घोषित केले. ते सनातनचे ८२ वे संत झाले आहेत. या आनंदवार्तेसह याच सोहळ्यात आश्रमात सेवा करणार्‍या साधिका श्रीमती अनुराधा मुळ्ये, सौ. जया साळोखे आणि सौ. संध्या जामदार या ३ साधिकांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली असल्याचे घोषित करण्यात आले.

पू. बलभीम येळेगावकर यांचा सन्मान आणि ३ साधिकांचा सत्कार सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांनी केला. या वेळी पू. बलभीम येळेगावकर यांनी आणि ३ साधिकांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी आणि त्यांच्यासमवेत सेवा करणार्‍या साधकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला परात्पर गुरु पांडे महाराज, पू. गुरुनाथ दाभोलकरकाका, पू. देशपांडेआजोबा, पू. सदाशिव (भाऊ) परब, पू. उमेश शेणै, पू. सत्यवती दळवीआजी, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

क्षणचित्रे

१. गुरुमाऊलींनी दिवाळीला अनमोल भेट दिली, याविषयी सर्वांचे नातेवाईक आणि साधक यांना कृतज्ञता वाटत होती.

२. घोषणा झाल्यानंतर पू. येळेगावकरआजोबा यांच्या तोंडवळ्यावर साक्षीभाव होता. तसेच तीनही साधिकांचा भाव जागृत झाला.

३. सौ. जया साळोखे यांना आदल्या रात्री ‘आपला उद्या सत्कार होणार आहे’, अशी पूर्वसूचना मिळाली होती, असे त्यांनी मनोगतामध्ये सांगितले.

४. पू. येळेगावकरआजोबा यांची नात सौ. स्वराली ओंकार पाध्ये यांनी ‘आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पहात होतो’, असे मनोगतामध्ये सांगितले.

५. दिवाळीच्या निमित्ताने गुरुदेव या अनमोल भावभेटीद्वारे किती आनंद देत आहेत, असे वाटून देवद आश्रमातील सर्व साधकांना कृतज्ञतेने भरून येत होते.

लागली सर्वत्र चैतन्यदायी दीपावलीची चाहूल ।
देवद आश्रमातील साधिकांनी
टाकले आध्यात्मिक प्रगतीचे पाऊल ॥  
आध्यात्मिक प्रगतीच्या सुवार्तेने
हर्षोल्हासित झाले साधकजन ।
दीपोत्सवात आनंदोत्सव
अनुभवे देवद आश्रम ॥

 

साक्षीभाव, स्थिरता, नम्रता आदी गुण
अंगी असलेले पू. बलभीम येळेगावकरआजोबा !

पू. बलभीम येळेगावकरआजोबा
यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

‘श्री. बलभीम येळेगावकरआजोबा जसे येळेगावकर कुटुंबियांसाठी साधनेमध्ये आदर्श आहेत, तसेच ते सनातनच्या सर्व साधकांसाठी त्यांच्यातील साक्षीभाव, स्थिरता, नम्रता आणि मायेपासून अलिप्तता या गुणांमुळे आदर्श आहेत. त्यांनी त्यांचा मुलगा श्री. कौस्तुभ आणि सून सौ. केतकी यांना पूर्ण वेळ साधना करण्यास अनुमती दिलीच, तसेच त्यांना स्वतःलाही पूर्ण वेळ साधनेविषयी विचारल्यावर तेही लगेचच देवद आश्रमात आले. तेथे आल्यानंतर वर्षभरातच त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. याचा अर्थ आधीपासूनच त्यांच्यामध्ये साधकत्व होते. त्यांच्या आदर्श वर्तनाचा संस्कार त्यांच्या कुटुंबियांवर आपोआपच झाला.

येळेगावकरआजोबांवर जी काही संकटे आली, त्यांमध्ये आजोबा ‘ती परिस्थिती म्हणजे आपले प्रारब्ध आहे’, हे जाणून स्थिर राहिले. तसेच ते कोणत्याही आनंदाच्या क्षणीही स्थिरच रहातात, हे मी त्यांची नात सौ. वैष्णवी पिसोळकर हिच्या विवाहाच्या वेळी पाहिले आहे.

देवद आश्रमामध्ये आध्यात्मिक उपायांसाठी मंत्रजप किंवा नामजप करायचा असेल, तर येळेगावकरआजोबांचेच नाव प्रथम तोंडामध्ये येते. ते ती सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात. आता ८४ व्या वर्षीही ते सेवारत आहेत. असे हे येळेगावकरआजोबा आज संतपदी विराजमान झाले आहेत, याचा मला आनंद वाटतो. ते सनातनचे ८२ वे व्यष्टी संत झाले आहेत. ‘त्यांची यापुढील आध्यात्मिक उन्नतीही जलद गतीने होऊ दे’, अशी मी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

प.पू. गुरुदेवांनीच प्रयत्न करवून घेतले,
कृतज्ञतेविना माझ्याकडे शब्द नाहीत ! – पू. बलभीम येळेगावकर

प.पू. गुरुदेवांची कृपा आणि सर्वांच्या सदिच्छा यांमुळेच हे शक्य झाले. मी काहीच केलेले नाही. मी केवळ माध्यम आहे. प.पू. गुरुदेवांनीच प्रयत्न करून घेतले. मी बुद्धीचा वापर केला नाही. गुरु जे सांगतात, तेच केले. प्रयत्न करण्याची प्रेरणा त्यांनीच दिली अन्यथा मी कोठे पोहोचलो असतो, हे सांगू शकत नाही. मी याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. कृतज्ञतेविना माझ्याकडे शब्द नाहीत. माझे प्रयत्न नगण्य आहेत. सर्वांविषयी कृतज्ञता !

 

संतांनी पू. येळेगावकरआजोबांचे केलेले गुणवर्णन

१. पू. (सौ.) अश्‍विनी पवार

सनातनच्या संतांमधील नम्रतेचे दर्शन घडवणारे पू. आजोबा आणि पू. (सौ.) अश्विेनी पवार !

१ अ. साधी राहणी : पू. आजोबा यांची राहणी अतिशय साधी आहे. त्यांचे वय ८४ वर्षे असूनही ते प्रतिदिन स्वतःची सर्व कामे स्वतः करतात.

१ आ. निरासक्त : पू. आजोबा मायेपासून निरासक्त आहेत. त्यांना ‘मुले, नातवंडे यांनी संपर्क करून आपली चौकशी करावी’, अशी अपेक्षा नसते. ते नातेवाइकांना मायेतील अनावश्यक बोलण्यासाठी वेळ देतात, असेही नसते. त्यांना कुटुंबियांची चिंताही नसते. ते सतत अनुसंधानात असल्यामुळे मायेच्या पलीकडे गेले असून आनंदी आहेत.

१ इ. साक्षीभाव : काही वर्षांपूर्वी पू. आजोबांच्या मुलाचे निधन झाले होते; मात्र त्यांच्यातील साक्षीभावामुळे ते स्थिर होते.

१ ई. सेवेची तळमळ : या वयातही त्यांना सेवेची तीव्र तळमळ आहे. मध्यंतरी आजारपण आणि अनिष्ट शक्तींचा त्रास यांमुळे त्यांना पुष्कळ थकवा होता. तेव्हा त्यांना ‘स्वतःकडून सेवा होत नाही’, याची खंत वाटत होती.

१ उ. नम्रता : आश्रमात वावरतांना ते साधकांना नम्रतेने वाकून नमस्कार करतात. स्मितहास्य करून सर्वांशी जवळीक साधतात.

१ ऊ. कुटुंबियांना साधनेमध्ये सहकार्य करून त्यांच्यावर सुसंस्कारही करणे 

त्यांनी १५ – २० वर्षांपूर्वी मुलगा, सून, तसेच दोन्ही नाती यांनाही पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती दिली. पू. आजोबांमधील दैवी गुणांमुळे त्यांनी आपल्या मुलांवर आणि नातवंडांवर चांगले संस्कार केले. याचा परिणाम म्हणून मुलगा श्री. कौस्तुभ यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, सून सौ. केतकी येळेगावकर यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, तर नात सौ. वैष्णवी श्रेयस पिसोळकर यांची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.

२. पू. रमेश गडकरी

संतपद गाठल्यानंतर पू. येळेगावकरआजोबांचा सन्मान करतांना पू. रमेश गडकरीकाका

२ अ. सेवेतून सात्त्विक स्पंदने येण्याइतकी परिपूर्ण सेवा करणारे पू. येळेगावकरआजोबा (पू. आबा) !

उत्पादनांची सेवा करणार्‍या साधकांमध्ये वृद्ध साधकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या नियोजनात पू. आबांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्यात व्यवस्थितपणा असल्याने ते सेवा परिपूर्ण करतात. त्यांनी केलेल्या सेवेतून सात्त्विक स्पंदने येतात. त्यांच्या सेवेचा वेग तरुणांनाही लाजवेल असा आहे. ‘ते सेनापतीच आहेत’, असे आपण म्हणू शकतो. त्यांच्या ‘बलभीम’ या नावातूनच शक्ती प्रगट होते !

संतद्वयींच्या सहजावस्थेची प्रचीती देणारा महाप्रसादाच्या वेळचा अनौपचारिक क्षण !
 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment