साधकांना साधनेसाठी प्रेमाने आणि तळमळीने मार्गदर्शन करणारे नाशिक येथे वास्तव्य करणारे सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रीय !

‘नाशिक येथे वास्तव्य करणारे सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रीय सध्या नाशिक रोड येथील त्यांच्या नव्या निवासस्थानी रहात असून त्यांच्या पूर्वीच्या वास्तूचा वापर साधक सेवेसाठी करतात. मी सेवेनिमित्त नाशिकला गेलो असतांना मला पू. महेंद्र क्षत्रीयकाकांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

 

१. पू. क्षत्रीयकाकांचे दर्शन होणे, त्यांनी साधकांच्या साधनेची स्थिती जाणून घेणे आणि
अत्यंत प्रेमाने ‘काळ खूप थोडा राहिला असल्याने साधनेकडे लक्ष द्या’, अशी जाणीव करून देणे

११.५.२०१८ या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता पू. क्षत्रीयकाका त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी आले होते. मी सेवेच्या निमित्ताने तेथेच असल्याने मला पू. काकांचे दर्शन झाले. त्यांनी आम्हा दोन साधकांना स्वतःजवळ बसण्यास सांगितले. त्यांंच्या जवळ बसल्यावर खूप आनंद आणि शांतता जाणवून माझे मन स्थिर झाले. त्यांनी आमच्या साधनेची स्थिती जाणून घेतली आणि अत्यंत प्रेमाने सांगितले, ‘‘काळ खूप थोडा राहिला आहे. नामस्मरण, प.पू. गुरुदेवांशी अनुसंधान, देवाला शरणागतीने प्रार्थना, तसेच स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांकडे लक्ष द्यायला पाहिजे.’’ आमच्याशी बोलतांना पू. काकांना अडचण आल्यावर ते त्यांच्या मुलीला खुणा करून सांगत आणि ती ‘त्यांना काय सांगायचे आहे’, हे आम्हाला सांगत होती. ‘ती योग्य ते सांगत आहे का ?’, याकडे पू. काकांचे लक्ष होते. पू. काका ‘साधनेकडे लक्ष द्या’, असे खूप तळमळीने आम्हाला सांगत होते.

पू. काकांचे प्रत्येक साधकाकडे लक्ष असते. ते प्रत्येकाच्या साधनेची चौकशी करतात आणि त्याला मार्गदर्शन करून ध्येयाची आठवण करून देतात.

२. पू. काकांनी सोसायटीच्या रखवालदाराला नमस्कार करून त्याची प्रेमाने चौकशी करणे

नंतर मी पू. काकांच्या समवेत त्यांच्या नवीन घरी रहाण्यासाठी गेलो. देवाने त्यांच्या घरी रहाण्याची संधी दिली, यासाठी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. पू. काकांच्या नवीन घराजवळ चारचाकी वाहनातून उतरल्यावर त्यांनी सोसायटीच्या रखवालदाराला नमस्कार केला आणि त्याची प्रेमाने चौकशी केली. पू. काका खूप प्रेमळ आहेत. ते सतत इतरांचा विचार करतात.

३. पू. काकांच्या घरी रामनाथी आश्रमासारखे प्रसन्न वाटणे

पू. काकांच्या घरी रामनाथी आश्रमासारखे खूप प्रसन्न वाटत होते. त्यांच्या घरी पुष्कळ स्वच्छता होती आणि प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी योग्य जागा होती. पू. काकांनी स्वतंत्र खोलीत ध्यानमंदिर केले आहे. ध्यानमंदिरात गेल्यावर पुष्कळ सुगंध आला. मी तो सुगंध अर्धा घंटा अनुभवत होतो.

४. प्रेमळ आणि आतिथ्यशील परिवार !

त्यांच्या घरातील प्रत्येकाच्या तोंडवळ्यावर आनंद दिसत होता. पू. काकांच्या पत्नी, मुलगा आणि मुली आलेल्या प्रत्येक साधकाची प्रेमाने विचारपूस करतात.

पू. काकांचा माझ्या साधनेसाठी लाभ करून घेण्यात मी खूप न्यून पडतो. आमची साधना व्हावी, याची पू. काकांनाच अधिक तळमळ आहे.’

– श्री. यशवंत सहस्रबुद्धे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.७.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात