परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यातून पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या
कंगव्यातून पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या
लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होणे; नंतर हा कंगवा वाईट
शक्तींचा त्रास असलेल्या साधिकेने वापरल्यावर तिच्यावर
आध्यात्मिक उपाय होऊन त्यातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होणे

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

उच्च कोटीच्या संतांंनी हाताळलेल्या दैनंदिन उपयोगाच्या निर्जीव वस्तूही त्या संतांमधील सत्त्वगुणाने भारित होऊन पावन होतात; म्हणूनच संतांनी वापरलेल्या वस्तू जतन करून ठेवण्याची परंपरा आहे. संतांच्या सत्त्वगुणाने भारित अशी एखादी वस्तू आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीने जवळ ठेवल्यास किंवा तिचा वापर केल्यास त्या वस्तूमधील सत्त्वगुणामुळे त्या व्यक्तीला असलेला त्रास न्यून किंवा नष्ट होतो, असा अनुभव सनातनच्या अनेक साधकांनी घेतला आहे. संतांनी हाताळलेल्या वस्तूंचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल, या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या, अन्य संतांच्या आणि काही साधकांच्याही वापरातील वस्तूंचा प्रभावळ आणि ऊर्जामापक यंत्रांच्या साहाय्याने अभ्यास केला आहे. संतांनी वापरलेल्या वस्तूंतील वैशिष्ट्यपूर्ण पालट सर्वसाधारण व्यक्तीलाही समजून घेता यावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा आणि वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वापरलेला कंगवा यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने ४.१२.२०१६ या दिवशी चाचणी घेण्यात आली. गोव्यातील सनातन आश्रमात घेण्यात आलेल्या या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत सर्वसाधारण कंगवा, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा आणि वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वापरलेला कंगवा यांची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. सर्वसाधारण कंगवा

हा प्लास्टिकचा कंगवा कोणीही वापरलेला नाही. त्याचा आकार अन्य दोन कंगव्यांप्रमाणेच आहे. तो तुलनेसाठी घेतला आहे.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला  कंगवा

हा प्लास्टिकचा कंगवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १ वर्ष वापरला आहे.

२ इ. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या
साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वापरलेला कंगवा

वाईट शक्तींचा तीव्र त्रास (टीप १) असलेल्या साधिकेवर आध्यात्मिक उपाय (टीप २) व्हावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः वापरलेला कंगवा तिला वापरायला दिला होता. त्या साधिकेने तो १ मास (महिना) वापरला आहे.

टीप १ – वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन)

टीप २ – आध्यात्मिक उपाय : एखाद्या विशिष्ट घटकातील सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील नकारात्मक स्पंदने न्यून किंवा नष्ट होणे आणि सकारात्मक स्पंदनांत वृद्धी होणे, याला आध्यात्मिक उपाय होणे, असे म्हणतात. आध्यात्मिक त्रास असलेली व्यक्ती साधना करणारी असल्यास तिची संवेदनशीलता वाढलेली असते. त्यामुळे तिला स्वतःवर आध्यात्मिक उपाय होत आहेत अथवा नाहीत ?, हे जाणवू शकते.

वाचकांना सूचना : या लेखातील यू.टी.एस् उपकरणाची ओळख, उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण आदी नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq30cC या लिंकवर दिली आहेत.

 

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील केलेल्या मोजणीचे विवेचन

३ अ १. सर्वसाधारण कंगवा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा यांत नकारात्मक ऊर्जा नसणे

सर्वसाधारण वास्तू किंवा वस्तू यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु या चाचणीतील सर्वसाधारण कंगवा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय स्पष्टीकरण सूत्र ६ मध्ये दिले आहे.)

३ अ २. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा वापरल्यानंतर त्या कंगव्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होणेे 

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा वापरल्यानंतर त्या कंगव्यातील इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा मोजतांना स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ या कंगव्यामध्ये इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा होती. तिची स्पंदने कंगव्यापासून १.१४ मीटर दूरपर्यंत होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यामध्ये ही नकारात्मक ऊर्जा अजिबात नव्हती. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने तो कंगवा वापरल्यामुळे या कंगव्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा मोजण्यासाठी केलेल्या मोजणीच्या नोंदीत स्कॅनरच्या भुजा १२० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे या कंगव्यामध्ये ही नकारात्मक ऊर्जाही काही प्रमाणात होती; पण या ऊर्जेची प्रभावळ नव्हती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यामध्ये ही नकारात्मक ऊर्जा अजिबात नव्हती. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय स्पष्टीकरण सूत्र ५मध्ये दिले आहे.)

३ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ आ १. सर्वसाधारण कंगव्यात सकारात्मक ऊर्जा नसणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. सर्वसाधारण कंगव्यात सकारात्मक ऊर्जा नव्हती.

३ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यात सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात असणे; पण वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा वापरल्यानंतर त्या कंगव्यातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अत्यल्प होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यातील सकारात्मक ऊर्जा मोजतांना स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ त्या कंगव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती. तिची स्पंदने त्या कंगव्यापासून १.९४ मीटर दूरपर्यंत होती. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा वापरल्यानंतर त्या कंगव्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन ती अत्यल्प झाली. त्या कंगव्याच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा केवळ ४० अंशाच्या कोनात उघडल्या. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय स्पष्टीकरण सूत्र ५ आणि ६ यांमध्ये दिले आहे.)

३ इ. वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ इ १. सर्वसाधारण कंगव्याची प्रभावळ सामान्य असणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. प्रयोगातील सर्वसाधारण कंगव्याची प्रभावळ १.०४ मीटर होती.

३ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्याची प्रभावळ पुष्कळ मोठी असणे आणि वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कंगवा वापरल्यानंतर त्या कंगव्याची प्रभावळ निम्म्याने न्यून होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्याची प्रभावळ मोजल्यावर ती ३.१० मीटर, म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिच्या प्रभावळीपेक्षा पुष्कळ जास्त होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने वापरल्यानंतर त्या कंगव्याची प्रभावळ जवळ जवळ निम्म्याने न्यून होऊन ती १.७० मीटर झाली. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय स्पष्टीकरण सूत्र ५ आणि ६ यांमध्ये दिले आहे.)

 

४. निष्कर्ष

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यामधून वातावरणात पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने प्रक्षेपित झाली. तो कंगवा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने वापरल्यानंतर त्या कंगव्यामधून वातावरणात नकारात्मक, म्हणजे त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित झाली, हे या चाचणीतून लक्षात येते.

 

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा वाईट
शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने वापरल्यावर त्या कंगव्या
मध्ये नकारात्मक स्पंदने निर्माण झाल्याचे अध्यात्मशास्त्रीय कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यामधून पुष्कळ प्रमाणात सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. तो कंगवा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेली साधिका वापरू लागल्यावर तिच्यामध्ये त्या कंगव्यातील सात्त्विकता संक्रमित होऊ लागली. या सात्त्विकतेचा तिला लाभ मिळू नये, यासाठी वाईट शक्तींनी कंगव्यावर तमोगुणाचे आवरण निर्माण केले.

संतांचा देह सात्त्विक झालेला असल्याने त्यांच्यावर किंवा त्यांनी वापरलेल्या एखाद्या घटकावर वाईट शक्तींनी तमोगुणाचे आवरण आणण्याचा प्रयत्न केला, तरी त्यावर तमोगुणात्मक स्पंदने आपला प्रभाव खोलवर पाडू शकत नाहीत; कारण संतांचा देह किंवा त्यांनी वापरलेली वस्तू सात्त्विकतेने परिपूर्ण बनलेली असते. सत्त्वगुणाच्या तुलनेत तमोगुण अल्प सूक्ष्म असल्याने ऊर्जामापक यंत्राला त्या तमोगुणी आवरणाच्या खालची सात्त्विकतेची सकारात्मक स्पंदने कळू शकत नाहीत. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरलेल्या कंगव्याच्या बाबतीतही तसेच झाले. त्या कंगव्यावरील तमोगुणी आवरणातील नकारात्मक स्पंदने यू.टी.एस् उपकरणाला मोजता आली; परंतु त्या आवरणाच्या खालची सात्त्विकतेची सकारात्मक स्पंदने यंत्र पकडू शकले नाही.

 

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यामध्ये
पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असण्याचे अध्यात्मशास्त्रीय कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या सर्वोच्च पातळीच्या आणि सहजावस्थेत असलेल्या संतांनी एखाद्या वस्तूला क्षणिक स्पर्श केल्यानेही त्या वस्तूमध्ये सात्त्विकता येते. त्यांनी त्या वस्तूचा सातत्याने वापर केल्यावर ती वस्तू सात्त्विकतेने पूर्णतः भारित होते.

 

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला
कंगवा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने
वापरल्यानंतर तिचा वाईट शक्तींचा तीव्र त्रास न्यून होणे

ही साधिका गेली २० वर्षे गुरुकृपायोगानुसार साधना करत असून तिला सूक्ष्मातील (टीप) कळते. तिने सांगितले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा मी वापरल्यानंतर मला असलेला वाईट शक्तींचा तीव्र त्रास २० ते ३० टक्के न्यून झाल्याचे जाणवले. त्रासामुळे न्यून झालेली माझी बौद्धिक क्षमता तो कंगवा वापरल्यावर पूर्ववत झाली, तसेच माझे केस मऊ झाले. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय स्पष्टीकरण सूत्र ८ मध्ये दिले आहे.)

ती साधिका पुढे म्हणाली, या कंगव्याचा रंग लाल आहे; परंतु मला तो सूक्ष्मातून पिवळा दिसला. मी कंगवा वापरायला आरंभ केल्यावर त्याचा सूक्ष्मातील पिवळा रंग न्यून होत असल्याचे मला जाणवले. मी तो कंगवा १ मास वापरल्यानंतर प्रयोगाच्या वेळी त्याचा सूक्ष्मातील पिवळा रंग साधारण २० – ३० टक्के न्यून झाल्याचे मला जाणवले. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय स्पष्टीकरण सूत्र ५ मध्ये दिले आहे.)

टीप – सूक्ष्मातील : स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे सूक्ष्मातील.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन)

 

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेला कंगवा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधिकेने  वापरल्यामुळे तिचा त्रास न्यून होण्याची प्रक्रिया परात्पर गुरु डॉ. आठवले  यांनी वापरलेल्या वस्तू मधील सात्त्विकता ती वस्तू वापरणार्‍या व्यक्तीच्या भावाप्रमाणे (टीप) कार्य करते.

टीप – भाव म्हणजे ईश्‍वराप्रतीचे अतीव प्रेम, जवळीक आणि शरणागती यांच्या संगमातून निर्माण झालेला ओलावा. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ भावाचे प्रकार आणि जागृती)

८ अ. साधकांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती श्रद्धा आणि भक्ती आहे. श्रद्धेमुळे व्यक्तीमधील सत्त्वगुणात वृद्धी होते. भक्तीमुळे सत्त्वगुण टिकण्यास साहाय्य होते.

८ आ. या सत्त्वगुणाच्या साहाय्याने परात्पर गुरूंनी वापरलेल्या वस्तूंमधील उच्च स्तरावरील सात्त्विकता त्यांना ग्रहण करता येते.

८ इ. या सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक स्पंदने न्यून किंवा नष्ट होतात आणि सकारात्मक स्पंदनांत वृद्धी होते.

– आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१७.७.२०१७)

Leave a Comment