सनातनचे ९ वे समष्टी संत पू. बाबा (सदानंद) नाईक (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग १

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

२७ जुलै २०१८ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा झाली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांचा साधनाप्रवास येथे प्रकाशित करत आहोत.
आश्‍विन शुक्ल पक्ष षष्ठी (१४.१०.२०१८) या दिवशी पू. बाबा (सदानंद) नाईक यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.

१. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ

१ अ. आध्यात्मिक त्रासामुळे मुलीची बसण्याची स्थिती
नसतांनाही ती संत भक्तराज महाराजांच्या सत्संगाला अडीच घंटे बसू शकणे

‘वर्ष १९९५ मध्ये संत भक्तराज महाराज पणजी (गोवा) येथे आले होते. मी आणि माझी मुलगी कु. नंदा त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा नंदाला आध्यात्मिक त्रास होत असल्याने तिची अर्धा घंटाही बसण्याची स्थिती नव्हती. मी तिला सत्संगस्थळी घेऊन गेलो. तेथे ती अडीच घंटे बसू शकली. हीच माझ्यासाठी पहिली अनुभूती होती.

१ आ. प्रति आठवड्याला सत्संगाला जाऊ लागणे

त्यानंतर मी प्रति आठवड्याला सत्संगाला जाऊ लागलो. आरंभी मी घरातून एकटाच सत्संगाला जायचो. सत्संगाला जाऊ लागल्यानंतर श्री. श्रीहरि मामलेदार यांनी मला केरी या केंद्राचे प्रसाराचे दायित्व दिले.

१ इ. सत्संग घेत असतांना ‘आपण काय बोलत आहोत’,
हे लक्षात न येणे, तेव्हा ‘ईश्‍वरच बोलून घेत आहे’, याची जाणीव होणे

केरी येथे जाऊन लोकांना बोलावून मी मार्गदर्शन करू लागलो. यापूर्वी मला अध्यात्मावर बोलता यायचे नाही, तरी मी लोकांना अध्यात्मावर मार्गदर्शन करू लागलो. ‘मी काय बोलत आहे आणि ऐकणारे काय ऐकत आहेत ?’ ते मला कळायचे नाही; पण बोलतांना मला फार आनंद व्हायचा. ‘माझ्याकडून ईश्‍वरच बोलून घेत आहे’, असे जाणवायचे. साधारण एक घंट्याने मी ‘सत्संग संपला’, असे उपस्थितांना सांगायचो; पण ते आणखी काहीतरी ऐकण्यास उत्सुक असल्याने तेथून उठायला सिद्ध नसत.

१ ई. सेवेची तळमळ वाढून सेवेला आरंभ होणे

असे ३ ठिकाणी मार्गदर्शन करून मी ३ सत्संग चालू केले. त्यामुळे माझ्यात सेवेची तळमळ जागृत झाली. ‘आपण ईश्‍वराकडे एक पाऊल गेलो की, तो आपल्याला पुढे घेऊन जातो’, ही अनुभूती मला येऊ लागली. मला हवे होते, त्या योग्य ठिकाणी ईश्‍वराने मला आणून सोडले होते. नंतर मी साधना आणि सेवा यांना आरंभ केला.

 

२. स्वतःच्या मुलीच्या विवाहप्रसंगी भगवंताच्या साहाय्याची घेतलेली प्रचीती !

२ अ. एका वरिष्ठ अधिकार्‍याने मुलीवर चोरीचा आरोप करणे, तिचा
विवाह ठरल्याने ‘विवाह पत्रिका कशा वाटायच्या ?’, याची चिंता वाटणे

वर्ष १९९७ मध्ये माझ्या मुलीचा (वृंदाचा) विवाह ठरला. त्या वेळी गावातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने माझ्या मुलीवर ‘हिने माझ्या पत्नीच्या बांगड्या चोरल्या’, असा चोरीचा आरोप केला. विवाहाच्या निमंत्रणपत्रिका छापून झाल्या होत्या. मुलीवर हा आरोप झाल्यावर ‘सर्वांना विवाहाच्या पत्रिका कशा वाटायच्या ?’, याचे मला मोठे संकट वाटले. त्या लोकांनी संपूर्ण गावात हे वृत्त पसरवल्याने मला त्याचा फार त्रास होऊ लागला.

२ आ. एके रात्री संपूर्ण कुटुंबाला आध्यात्मिक त्रास होऊ लागणे

एके दिवशी मुलीच्या विवाहाचा अति विचार करून माझे डोके दुखू लागले. त्या रात्री माझ्या चारही मुलींना पुष्कळ त्रास होऊ लागला. त्यांना होणारा आध्यात्मिक त्रास त्या मला सांगू लागल्या. तेव्हा मी संभ्रमावस्थेत होतो. ‘मला काय होत आहे ?’ हेे मी त्यांना सांगितले नाही. त्या रात्री आम्ही कुणीच झोपलो नाही.

२ इ. मुलीच्या सांगण्यानुसार सत्संग घेणार्‍या साधकाला सर्व कौटुंबिक परिस्थिती सांगणे

दुसर्‍या दिवशी सकाळी मी माझ्या दुसर्‍या मुलीला (कुंदाला) साधक या नात्याने ‘‘आता पुढे काय करूया ?’’ असे विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘श्री. भास्कर जोशी यांना (सत्संगसेवकांना) सांगा. ते सांगतील, त्याप्रमाणे करूया.’’ नंतर मी मये येथे भास्करकाकांना भेटायला गेलो. त्यांना सर्व स्थिती सांगितल्यावर त्यांनी मला गुरुदेवांना भेटण्यास सांगितले.

२ ई. पणजीला गुरुदेवांचे केवळ दर्शन झाल्यावर सर्व अडचणी सुटणे

त्या वेळी परात्पर गुरुदेव आणि प.पू. रामानंद महाराज एका विवाहासाठी पणजीला आले होते. लग्न समारंभ झाल्यानंतर मला गुरुदेवांचे दर्शन झाले. तेव्हा मला ‘त्यांना काही सांगावे’, असे वाटले नाही. त्यांना काही न सांगताच त्यांचे केवळ दर्शन घेऊन मी निघालो. तेथून आल्यानंतर ‘माझ्या सर्व अडचणी सुटल्या आहेत’, असे मला वाटू लागले. त्यानंतर ‘विवाहपत्रिका वाटूया’, असे मला वाटू लागले आणि मी पत्रिकावाटप चालू केले. ज्यांनी चोरीचा आरोप केला होता, त्यांनासुद्धा पत्रिका दिली. त्या व्यक्तीच्या भावाचा मुलगा विवाहाला आला होता. या प्रसंगी मुलीच्या विवाहाच्या वेळचे मोठे संकट टळल्याची मला अनुभूती आली.

२ उ. गावकर्‍यांनी आरोप करणार्‍या व्यक्तीसमोर साधकाची बाजू घेणे

‘गुरुदेवांच्या केवळ दर्शनाने माझे संकट दूर झाले’, असे मला आतून जाणवले. ज्या व्यक्तीने आमच्यावर चोरीचा आळ घेतला, तिच्यासमोर सर्व गावकर्‍यांनी आमची बाजू घेतली आणि ते प्रकरण मिटवून टाकले. त्या व्यक्तीने माझ्या मुलीचा विवाह मोडण्यासाठी ते कारस्थान केले होते.

 

३. तळमळीने विविध सेवा करणे

३ अ. प्रतिदिन १५ किलोमीटर फिरून साप्ताहिक वितरण करणे आणि रात्री उशिरा घरी पोहोचणे

मी प्रतिदिन सकाळी ७.३० वाजता दैनिक वितरणाच्या सेवेला जायचो. १ घंटा वितरण सेवा करून मी नोकरीवर जायचो. नोकरीवरून आल्यानंतर मी पुन्हा सनातनचे ग्रंथ, तसेच दैनिक आणि साप्ताहिक सनातन प्रभात यांचे घरोघरी जाऊन वितरण करायचो. त्यासाठी मला सायकलने १५ किलोमीटर फिरावे लागायचे. माझ्याकडे सायकल नसल्यास मी ७ – ८ किलोमीटर चालत जाऊन वितरण करायचो. रात्री-अपरात्री खेडेगावात जातांना माझा पुष्कळ नामजप व्हायचा. त्या नामाच्या विचारातच सेवा करून मी रात्री १२.३० ते १ वाजता घरी यायचो आणि नंतर जेवायचो.

३ आ. एके दिवशी ग्रंथविक्री करत असतांना मी ६ फूट खोल असलेल्या खड्डयात सायकलसह पडलो; पण मला काहीच दुखापत झाली नाही, तसेच सायकलही सुस्थितीत राहिली.

३ इ. ‘राजकारणात सक्रीय असलेले एक हितचिंतक दैनिक घेतील
का ?’ असा विचार मनात येणे; पण त्यांनी आवडीने दैनिकवाचन करणे

धर्मप्रसारासाठी गेल्यावर प्रतिष्ठित लोक मला काही प्रश्‍न विचारायचे. त्या प्रश्‍नांना माझ्याकडून दिली जाणारी उत्तरे ही माझ्यासाठी अनुभूतीच असायची. मी दिलेली उत्तरे ऐकून ते माझे पुष्कळ कौतुक करायचे. एक हितचिंतक राजकारणात सक्रीय होते.  त्यांचे नातेवाईक माझे फार कौतुक करायचे. पूर्वी माझ्या मनात ‘हे हितचिंतक आपले दैनिक कसे काय घेतील ?’, असा विचार मनात यायचा. ‘ईश्‍वराचे कार्य आहे आणि तोच ते करून घेतो. त्यामुळे ईश्‍वराने ते हितचिंतक, तसेच त्यांचे नातेवाईक यांना वाचक बनवले’, हे नंतर माझ्या लक्षात आले. अंक बंद होऊ नये; म्हणून १ मास पूर्ण होण्यापूर्वीच ते वर्गणी भरायचे.

‘अन्य संप्रदायातील लोक कशी सेवा करतात आणि हे कसे सेवा करतात ?’ असे म्हणून ते माझे फार कौतुक करायचे.

३ ई. नोकरी सांभाळून बांधकामाची सेवा करणे

सुखसागर सेवाकेंद्रात बांधकाम करण्यासाठी साधक हवा होता. त्या वेळी मी डिचोलीहून कामावरून थेट सेवाकेंद्रात बांधकामाच्या सेवेला जायचो. रात्री १ – २ वाजेपर्यंत बांधकामाची सेवा करायचो. पहाटे ४ वाजता उठून बांधकामाची सेवा करायचो आणि सकाळी ६ वाजता कामाला जायचो. कार्यालयातील मालकांनी माझ्या साधनेला कधीच विरोध केला नाही वा माझ्यावर दबाव आणला नाही. उलट सर्वजण मला साहाय्यच करायचे. मला संध्याकाळी लवकर सेवेला जायचे असेल, तर ते मला अनुमती देत असत.

३ उ. आठवड्यातून ३ दिवस मुंबईला सेवेसाठी जाणे

नंतर मी शुक्रवारी नोकरीनंतर श्री. प्रकाश जोशी यांच्यासह थेट मुंबईला जायचो. तेथून सोमवारी येऊन थेट नोकरीला जायचो. मी प्रति आठवड्याला ३ दिवस घरी नसायचो. त्यामुळे माझ्या दोन्ही मुली (कुंदा आणि नंदा) घरात एकट्याच असायच्या. त्यांनी मला कधीही ‘आम्हाला भीती वाटते. तुम्ही जाऊ नका’, असे म्हटले नाही.

३ ऊ. सेवेतून पुष्कळ आनंद मिळणे

नंतरच्या काळात माझ्याकडील सेवांचे दायित्व वाढले. त्यातून मला एवढा आनंद मिळू लागला की, मी तो शब्दांत वर्णन करू शकत नाही. मला थकवा किंवा त्रास आदी काही जाणवत नव्हते वा कसलीही भीती वाटत नव्हती. ‘सर्वकाही ईश्‍वरच करून घेत आहे’, असे मला वाटत असे.’

 

४. प्रसारसेवा करतांना केलेले प्रयत्न

४ अ. सार्वजनिक सभांच्या वेळी दिलेली सेवा लवकर पूर्ण
करण्याची तळमळ असणे आणि मिळालेली सेवा मनापासून करणे

वर्ष २००० नंतर ठिकठिकाणी परात्पर गुरूंच्या सार्वजनिक सभा चालू झाल्या. त्या सभांमधून मला मोठमोठ्या अनुभूती आल्या आणि शिकायला मिळाले. ‘सभांच्या वेळी दिलेली सेवा मी लवकरात लवकर कशी पूर्ण करीन’, यासाठी माझा प्रयत्न असायचा. सेवा संपल्यानंतर मी ‘आता काय करू ?’, असे उत्तरदायी साधकांना विचारायचो आणि ती सेवा लगेचच पूर्ण करायचो. त्यानंतर पुन्हा मी त्यांच्याकडे जाऊन पुढच्या सेवेविषयी विचारायचो. त्या वेळी सर्व जण आश्‍चर्यचकीत व्हायचे. सर्व सेवा संपल्यानंतर मी मैदानाबाहेर लावलेली संस्थेची वाहने धुवायचो. नंतर साधकांची वाहनेही धुवायचो. प्रत्येक सभेच्या ठिकाणी मी अशा सेवा करायचो. एवढे करूनसुद्धा मला कसलाही त्रास होत नव्हता, तर पुष्कळ आनंदच मिळत होता.

संत भक्तराज महाराजांचे एक भजन आहे, ‘वेडा होऊनी…’ आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर आपल्याला सेवेमध्ये वेडे व्हायलाच पाहिजे. या दृष्टीने मी प्रयत्न करायचो.

४ आ. इतरांकडून सेवेची तळमळ शिकता येणे

या सर्व सभांच्या वेळी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे आणि श्री. प्रकाश जोशी रात्री ३ – ४ वाजता झोपायचे आणि सकाळी ६ वाजता उठून सेवेला आरंभ करायचे. त्यांच्यातील ही तळमळ मला आचरणात आणता आली.

४ इ. उत्तरदायी साधकांविषयी अपार कृतज्ञताभाव !

श्री. प्रकाश जोशी, आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, श्री. श्रीहरि मामलेदार आणि सौ. दीपा मामलेदार यांच्याकडे प्रसारसेवेचे दायित्व होते. ते आमच्यासाठी बरेच काही करायचे. आम्ही केलेल्या सेवेकडे त्यांना लक्ष द्यावे लागू नये; म्हणून मी ‘मला दिलेली सेवा चांगली कशी होईल’, याकडे लक्ष द्यायचो. त्या सर्वांचे मी सूक्ष्मातून पाय चेपायचो. हा प्रयत्न ईश्‍वर माझ्याकडून करून घेत असल्याने माझी जलद आध्यात्मिक प्रगती झाली.

 

५. सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ साधनेला
आरंभ केल्यावर गुरूंचा अमूल्य सत्संग लाभणे

५ अ. सुखसागर सेवाकेंद्रात असतांना पहाटे बांधकामाच्या
सेवेला लवकर आरंभ करणे आणि तेव्हा गुरुदेव साहाय्याला येणे

वर्ष २००० मध्ये मी पूर्णवेळ साधक झालो. त्या वेळी फोंड्याला ‘सुखसागर’ सेवाकेंद्र होते. मी पहाटे ५ वाजता बांधकामाची सेवा चालू करायचो. माझे सहसाधक सकाळी ९.३० वाजता सेवेला यायचे. तोपर्यंत माझ्या साहाय्याला कोणी नसायचे. हे लक्षात आल्यावर प्रत्यक्ष परात्पर गुरुदेव माझ्या साहाय्याला येऊ लागले. आम्ही दोघे सकाळी ९.३० वाजेपर्यंत सेवा करायचो. सहसाधक येण्याअगोदर आमची ५.३० घंटे सेवा व्हायची. काही वेळा आम्ही जागरण करूनही सेवा करायचो. एवढी सेवा करूनसुद्धा मला थकवा येत नसे, तसेच जागरणाचा त्रास होत नसे.

५ आ. दगड तासण्याची सेवा करतांना गुरुदेवांच्या हाताला
फोड येणे, तेव्हा रडू लागल्यावर गुुरुदेवांनी समजूत घालणे

एकदा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘मला बांधकामाची सेवा शिकव.’’ नंतर ते दगड तासू लागले. दगड तासता तासता त्यांच्या हाताला फोड आला. ते मला म्हणाले, ‘‘बाबा, बघा ! माझ्या हाताला केवढा मोठा फोड आला आहे !’’ त्यांचे ते बोलणे ऐकून मला एकदम रडू आले. ते म्हणाले, ‘‘वेड्यासारखे रडता कशाला ? मी संत भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पुष्कळ सेवा केली होती. तेव्हा मला कधीच फोड आला नव्हता. तुमच्यासह सेवा करतांना माझ्या हाताला फोड आला. आता माझी शूद्र वर्णाची साधना पूर्ण झाली.’’ असे बोलून त्यांनी माझी समजूत घातली.

५ इ. गुरुदेवांनी ‘मी सिमेंट कालवणार, दगड आणून देणार’, असे सांगणे

एके दिवशी परात्पर गुरुदेव सेवेला आले आणि मला म्हणाले, ‘‘आज तू काहीही करायचे नाहीस. मी सिमेंट कालवणार आणि दगड आणून देणार. तू केवळ बांधकाम कर.’’ नंतर प्रत्यक्षातही त्यांनी त्या सर्व सेवा केल्या. तेव्हा ‘गुरुदेव एवढे जड दगड कसे उचलून आणून देणार ?’, असे वाटून मला फार रडू आले. या प्रसंगाचे स्मरण झाले, तरी माझी भावजागृती होते. या प्रसंगांतून गुरुदेवांनी मला पुष्कळ काही शिकवले.

५ ई. गुरुदेवांनी विविध सेवा शिकवून त्या करून घेणे

परात्पर गुरु डॉक्टर मला स्नानगृहाचे मार्किंग करून द्यायचे आणि माझ्याकडून लाद्या बसवून घ्यायचे. ‘मला यंत्र (मशिन) चालवायला येत नाही’, असे मी त्यांना कधीच सांगितले नाही. त्यांनी सांगितले आणि मी केले, असेच होत गेले. माझ्यासह डुंबरेबाबा (६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. विजय डुंबरे) असायचे. गुरुदेवांनी भांडी धुण्याच्या मांडणीचे (रॅकचे) मार्किंग करून देऊन माझ्याकडून मांडणी बनवून घेतली.

५ उ. आश्रमाचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी गुरुदेव स्वतः साहाय्याला येणे

मी सेवेला लवकर यायचो. त्यामुळे तेही माझ्या साहाय्यासाठी यायचे. त्यामुळे त्यांना त्रास व्हायचा; पण मला शिकवण्यासाठी ते यायचे. ते म्हणायचे, ‘‘मला ही सेवा शिकव.’’ ईश्‍वराला काही शिकवावे लागते का ? सुखसागर येथील बांधकाम लवकर पूर्ण व्हावे; म्हणून ते यायचे. वर्ष २००१ मध्ये एका संतांनी सांगितले होते, ‘सेवाकेंद्र सिद्ध व्हायला ३ वर्षे लागतील.’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘३ वर्षे नाही, तर ३ मासांत सेवाकेंद्र सिद्ध व्हायला हवे.’’ त्यानंतर अक्षरशः ३ मासांत सुखसागर सेवाकेंद्र सिद्ध झाले. माझे पूर्वसंचित होते; म्हणून प्रत्यक्ष ईश्‍वरासह सेवा करण्याचे भाग्य मला लाभले.

५ ऊ. ‘सेवाकेंद्रात एके ठिकाणी रॅक बनवू शकतो का ?’, असे
गुरुदेवांनी विचारल्यावर नकार देणे, नंतर स्वतःच्या चुकीची जाणीव होणे

सुखसागरमध्ये एके ठिकाणी भिंत नव्हती. ‘त्या ठिकाणी रॅक बनवून होईल का ?’, असे गुरुदेवांनी मला विचारल्यावर मी नकार दिला. त्या दिवशी दुपारी माझ्या मनात विचार चालू झाले, ‘प.पू. डॉक्टरांनी विचारले आहे, म्हणजे तिथे रॅक होणारच.’ मी त्याविषयी विचार करू लागलो; परंतु ‘ती रॅक कशी बनवायची ?’, हे मला सुचत नव्हते. त्या रात्री मी जेवून झोपलो; पण मला झोप लागत नव्हती. रात्री १२.४५ च्या दरम्यान गुरुदेव सूक्ष्मातून तेथे आले आणि त्यांनी त्यांच्या आवाजात विचारले, ‘काय कसला विचार करत आहात ?’ नंतर त्यांनी मला ‘अमुक अमुक करायचे’, असे सांगितले. त्यांच्या सांगण्यामुळे माझ्या डोक्यात ते पूर्ण नियोजन सिद्ध झाले. दुसर्‍या दिवशी सकाळी मी गुरुदेवांना भेटायला गेलो आणि ‘रॅक होणार’, असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला ‘कोणी सांगितले ?’, असे विचारले. मी त्यांना आदल्या रात्रीचा प्रसंग सांगितल्यावर त्यांनी रॅक बनवण्यास होकार दिला.

५ ए. सेवानिवृत्तीनंतर साधकाने काही रक्कम अर्पण केल्यावर परात्पर
गुरूंनी ‘हे कशाला अर्पण दिलेस ? तू तुला अर्पण केलेस ना, तेवढेच बस !’, असे सांगणे

वर्ष २००० मध्ये मी सेवानिवृत्त झालो. निवृत्तीचे पैसे असलेली पिशवी मी एका साधिकेकडे अर्पण म्हणून दिली. गुरुदेवांना हे कळल्यावर त्यांनी मला बोलावून विचारले, ‘‘हे अर्पण कशाला दिलेस ? हे पैसे राष्ट्रीय बँकेत भर. पुढे तुला उपयोगी पडतील. तू तुला अर्पण केले आहेस ना, मला तेवढेच बस !’ नंतर गुरूंच्या आशीर्वादानुसार कोणाकडूनही पैसे न घेता त्या पैशांनी माझ्या २ मुलींचे विवाह लावून देता आले.

५ ऐ. कोणतीही सेवा येत नसली, तरी ती करण्यास कधीच
नकार न देणे आणि स्वप्नात ‘ती सेवा कशी करायची ?’, ते सुचणे

सेवानिवृत्त झाल्यानंतर मी आश्रमात स्नानगृह आणि शौचालय बांधणे, सुतारकाम करणे अशा विविध प्रकारच्या सेवा करू लागलो. या सेवा मी अगोदर कधीच केल्या नव्हत्या. मला साधकांनी त्या सेवा सांगितल्यावर ‘ही सेवा मला येत नाही’, असे मी कधीच म्हटले नाही. त्या वेळी ‘साधक सांगतात म्हणजे गुरुच सांगतात. गुरूंचा संकल्प आहे, तर ती होणारच’, असे मला वाटायचे. त्या रात्री मला स्वप्न पडून ‘ती सेवा कशी करायची ?’, ते सुचायचे आणि दुसर्‍या दिवशी ती लगेच पूर्ण व्हायची.

 

६. रामनाथी आश्रमात सेवा करणे

६ अ. पहाटे उठून सेवा करतांना कधीही एकटेपणा न जाणवणे

आम्ही सर्व साधक सुखसागरमधून रामनाथी आश्रमात रहायला आलो. तेव्हा मी पहाटे ४ वाजता उठून वाळूची गाडी रिकामी करायचो. तेव्हा ‘मी एकटा आहे’, असे मला कधीही वाटले नाही. ‘प्रतिदिन माझ्यासह कोणीतरी आहे’, असे मला वाटायचे. हे सर्व करायला मला ईश्‍वरच स्फूर्ती देत होता.

६ आ. प्रतिदिन सकाळी गुरुदेव आश्रमाचे बांधकाम पहाण्यासाठी येत असणे

त्या वेळी प्रतिदिन सकाळी ७.३० वाजता गुरुदेव आश्रमाचे बांधकाम बघण्यासाठी यायचे. नंतर मी त्यांना ‘सध्या कोणते बांधकाम चालू आहे आणि अजून काय करायचे आहे ?’, हे सांगायचो. त्या वेळी ते बांधकामामध्ये काही सुधारणा सुचवायचे. त्याप्रमाणे आम्ही पालट करायचो. एके दिवशी गुरुदेव बांधकाम पहायला आले होते. त्या वेळी मी सर्वांत वरच्या मजल्यावर चालू असलेल्या बांधकामाची सेवा करत होतो. शिडीवरून मजल्यावर चढावे लागत होते. ती शिडी हलत होती, तरीही गुरुदेव शिडीवरून चढून मला शोधायला त्या मजल्यावर आले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही येथे आहात का ? मी तुम्हाला कुठे कुठे शोधले !’’

६ इ. गुरूंनी पुष्कळ अनुभूती देणे

माझ्याकडून जे काही घडत होते, तेथे मी केवळ नाममात्र असायचो. सर्वकाही तेच माझ्याकडून करून घ्यायचे. प्रत्येक गोष्ट त्यांनी मला शिकवली. त्यांनी मला पुष्कळ अनुभूती दिल्या. तळमळ असल्याने गुरूंनी मला स्थुलासह सूक्ष्मातूनही शिकवले.

 

७. ६० ते ७० टक्के आध्यात्मिक गाठण्याच्या प्रवासातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

७ अ. सनातनच्या आणि इतर संतांच्या आश्रमांत बांधकामाच्या
सेवेसाठी जाणे आणि ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित होणे

रामनाथी आश्रमाचे बरेचसे बांधकाम झाल्यावर मी वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामाच्या सेवेसाठी गेलो. वर्ष २००८ मध्ये मिरजेला असतांना माझी ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित केले. माझी ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर मी ‘माझे काय चुकते ?’, ते पहाण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून काही चुका व्हायच्या. त्या मी गुरुदेवांना सांगायचो. ते मला म्हणायचे, ‘‘या चुका होत असतांना तुझ्या मनात काही नव्हते ना ? पुढे हळूहळू त्या चुका न्यून होत जातील.’ नंतर याची अनुभूती मला येऊ लागली.

नंतर मी कुडाळला प.पू. परुळेकर महाराजांच्या इकडे सेवेला गेलो. त्यानंतर प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवेसाठी होतो. वर्ष २०१० मध्ये मी पुन्हा रामनाथी आश्रमात आलो आणि बांधकामाची सेवा पाहू लागलो.

७ आ. संतपद गाठण्यापूर्वी

७ आ १. मनाची स्थितीत झालेले पालट

वर्ष २०११ मध्ये ३ मासांत माझा आध्यात्मिक स्तर ६ टक्क्यांनी वाढला. त्यापूर्वी ‘जास्तीतजास्त साधक एकत्र कसे येतील ?’, अशी माझी तळमळ वाढली. माझे शरीर हलके होऊ लागले. अंग जड होणे, डोके दुखणे आदी सर्व त्रास न्यून होऊ लागले.

७ आ २. साधकांना साधनेत साहाय्य करण्याचा भाग वाढल्याने पुष्कळ आनंद मिळू लागणे

बांधकामाच्या सेवेतील एक साधक नामजप करतांना झोपत असे. मी त्याला सांगितले, ‘‘झोप आली, तर तोंडावर पाणी मारा. ते पाणी पुसू नका. तेवढा वेळ नामजप होईल.’’ मी सांगितलेले त्याने कृतीत आणले. त्याच्याकडून नीट साधना होत नव्हती. तो सतत त्या विचारामध्येच असायचा. तेव्हा मी सांगितलेली सूत्रे त्याने कृतीत आणली. नंतर ४ दिवसांनी त्याला कोणीतरी विचारले,  ‘‘तुझा तोंडवळा चांगला वाटतो. तू काय करतोस ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी साधनेविषयी बाबांशी बोलतो.’’ त्यानंतर अवघ्या १० – १२ दिवसांत त्याची ६० टक्के पातळी झाल्याचे घोषित झाले. त्या साधकात नम्रता आणि भाव असल्याने त्याला ते लवकर साध्य झाले. साधनेत ‘सांगितले आणि केले’, याला फार महत्त्व असते. त्यामुळे त्याची, तसेच माझीही प्रगती होऊ लागली. मी शब्दांत वर्णन करू शकत नाही, एवढा मला आनंद मिळू लागला.

७ आ ३. संत होण्यापूर्वी आठ दिवसांपासून ‘बांधकाम सेवेतील सर्व साधक माझी मुलेच आहेत’, असे वाटू लागणे

संत होण्याआधी ८ दिवसांपासून माझ्या शब्दांत पुष्कळ शक्ती आल्याचे मला जाणवू लागले. ते मी शब्दांत सांगू शकत नाही. ‘साधकांकडे कसे बघायला हवे ? साधकांना साधनेत पुढे कसे घेऊन जायला पाहिजे ?’, हे लक्षात येऊ लागले. बांधकामाच्या सेवेतील ‘सर्व साधक माझी मुलेच आहेत’, असे मला वाटू लागले. त्यांच्याकडून व्यायाम करून घेण्याची मला आतून प्रेरणा मिळाली. व्यायाम आणि गुरूंचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) आशीर्वाद यांमुळे मी दिवसभरात कितीही वेळ सेवा करू शकतो. आश्रमातून उंचावरील लागवडीमध्ये कितीही वेळा जाऊ शकतो, हे लक्षात आले.

मला या ४ दिवसांत ‘काहीतरी वेगळे घडत आहे’, असे जाणवत होते; परंतु नेमके कळत नव्हते. ‘काहीतरी होणार आहे’, एवढे जाणवले होते; पण मी कोणाला सांगितले नाही.

७ इ. संत घोषित केल्यानंतर झालेली विचारप्रक्रिया

२८.१०.२०११ या दिवशी मला संत म्हणून घोषित केले. त्या वेळी मला फार आनंद झाला. ‘माझ्या शब्दांत चैतन्य आणि शक्ती येऊ लागली आहे. त्याचा लाभ सर्व साधकांना होऊ दे. सर्व साधक संघटित होऊ देत. हे होण्यासाठी साधकांना अन्य संतांचेही साहाय्य लाभू दे, तरच आपण लवकर पुढे जाऊ शकतो. सर्व साधक संत झाले, तर आपण सर्व अडचणींवर मात करू शकतो. सहज जिंकू शकतो’, असे मला वाटू लागले.