वयाचे बंधन झुगारून देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करणारे मध्यप्रदेशातील दुर्ग येथील सनातनचे १८ वे संतरत्न पू. चत्तरसिंग इंगळे (वय ८८ वर्षे) !

‘मध्यप्रदेशातील दुर्ग या ठिकाणी मार्गदर्शनासाठी कोणी नसतांनाही पू. छत्तरसिंग इंगळे यांनी साधना करून संतपद गाठले आणि त्यानंतरही प्रगती चालूच ठेवली आहे. हे मार्गदर्शनासाठी कोणी नसलेल्या सर्वच साधकांना दिशादर्शक आहे. ईश्‍वरप्राप्तीची खरी तळमळ असेल, तर देव कसे साहाय्य करतो, याचे हे एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. ‘त्यांची पुढील प्रगतीही अशीच वेगाने होईल’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

१. कौटुंबिक जीवन आणि नोकरी

‘माझे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आहे. आम्ही ५ भाऊ आणि ३ बहिणी असा परिवार आहे. खामगाव येथे आम्ही एकत्र रहात होतो. मी आय्.टी.आय्. येथे नोकरी करत होतो. प्रथम मी ट्रेनिंग ऑफिसर, नंतर फोरमन, नंतर उपप्राचार्य आणि निवृत्तीच्या वेळी प्राचार्यपदावर होतो.

 

२. सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना

२ अ. प.पू. गजानन महाराजांवर श्रद्धा असणे, नियमित
गीतावाचन करणे आणि ‘भक्तीविजय’ या ग्रंथाचे वर्षातून दोन वेळा पारायण करणे

मला लहानपणापासून देवाची आवड होती. मी देवपूजा करत असे. माझी प.पू. गजानन महाराज यांवर श्रद्धा होती. मी नियमित गीता वाचत असे. तसेच प.पू. गजानन महाराज यांच्या ‘भक्तीविजय’ या ग्रंथाचे मी वर्षातून दोन वेळा पारायण करत असे. मी नोकरी करत असतांनाही हे सर्व करत होतोे. माझी पत्नीही धार्मिक होती. तिचीही प.पू. गजानन महाराज यांच्यावर श्रद्धा होती.

२ आ. गावात गहिनीनाथांचे मंदिर बांधणे
आणि वर्षातून एकदा गावातील मंदिरात दर्शनाला येणे

मी चारधाम यात्रा केली आहे. आमच्या गावाजवळ एक संत रहात होते. त्यांनी मला आमच्या गावात नवनाथांपैकी गहिनीनाथांचे मंदिर बांधायला सांगितले. त्याप्रमाणे मी ते बांधले. मी नोकरीला कुठेही असलो, तरी वर्षातून एकदा गावातील मंदिरात दर्शनाला येत होतो. आता वयोमानामुळे ते शक्य होत नाही.

 

३. सनातन संस्थेशी संपर्क

३ अ. सत्संगात गेल्यावर लगेच सनातनचे ग्रंथ
विकत घेऊन वाचणे आणि ग्रंथवाचनाची गोडी लागणे

मी दुर्ग येथे स्थायिक झालो. वर्ष १९९८ मध्ये वर्धा येथील श्री. श्रीकांत पाध्ये आणि सौ. अंजली पाध्ये हे दांपत्य दुर्गमध्ये प्रसारासाठी येत होते. त्यांनी सांगितल्यानुसार मी एका सत्संगाला गेलो. तेथे सांगत असलेला साधनेचा विषय मला भावला. मी लगेच सनातनचे काही ग्रंथ विकत घेतले आणि त्यांचे वाचन करू लागलो. नंतर मला ग्रंथवाचनाची गोडी लागली.

३ आ. सनातनचे कार्य आवडल्याने साधकांना घर विनामूल्य रहायला देणे

आरंभी माझा कार्यात प्रत्यक्ष सहभाग नसे. एकदा पाध्ये दांपत्याने सनातनचे प्रसारकार्य वाढवण्यासाठी दुर्ग येथे रहाण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्यासाठी मला जागा पहायला सांगितली. मी त्यांना सांगितले, ‘‘मी रहात असलेल्या घराचा पहिला माळा वापरू शकता.’’ ‘एवढ्या मोठ्या घराचे भाडे पुष्कळ असेल’, असे वाटून त्यांनी चौकशी केली, तेव्हा मी त्यांना माळा विनामूल्य देणार असल्याचे सांगितले. मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही केवळ विद्युतदेयक देऊ शकता.’’ पुढे मला सनातनचे कार्य इतके आवडले की, एक मास पूर्ण झाल्यावर ते मला विद्युतदेयक द्यायला आले असता मी तेही स्वीकारले नाही.

३ इ. घरात सेवाकेंद्र चालू होणे आणि सेवाकेंद्रात गुरुपौर्णिमा साजरी करणे

माझे घर म्हणजे सेवाकेंद्र आहे. साधक येथे सत्संगासाठी येतात. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि सद्गुरु नंदकुमार जाधव हे संत सेवाकेंद्रात अनेक वेळा आले आहेत.

दुर्ग येथे साधकसंख्या अल्प असल्याने आम्ही सेवाकेंद्रातच गुरुपौर्णिमा साजरी करतो. त्या वेळी सर्व साधक येतात. त्या दिवशी मी भंडारा करून सर्व साधकांच्या कुटुंबियांना महाप्रसादासाठी बोलावतो.

३ ई. विविध प्रकारच्या सेवा करणे आणि
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतपदी आरूढ करणे

मी पाध्ये दांपत्यासह प्रसाराला जाऊ लागलो. मी मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावत असे. काही मासांनंतर त्यांनी मला दुर्गचे कार्य पहाण्याचे दायित्व दिले. मी त्यांच्याकडून सेवा शिकून घेतल्या आणि ग्रंथप्रदर्शन लावणे, विज्ञापने आणणे, साप्तााहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार करणे अन् वितरण करणे, गुरुपौर्णिमेच्या वेळी अर्पण घेणे, ग्रंथप्रदर्शनस्थळी येणार्‍या जिज्ञासूंना साधना सांगणे, या सेवा मी करत असे. मी माझ्या नातवाच्या लग्नात चाळीसगाव येथे फ्लेक्सप्रदर्शन आणि ग्रंथप्रदर्शन लावले होते. वर्ष २०१२ पासून राजीम येथे अर्धकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. तेथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यास मी आरंभ केला. त्याच वर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला संतपदी आरूढ केले.

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
नामजप आणि समष्टीसाठी प्रार्थना करण्यास सांगणे

मी रामनाथी आश्रमात गेलो असतांना परात्पर गुरु डॉक्टर माझे कौतुक करून म्हणाले, ‘‘तुमची निर्विचार अवस्था असते. तुम्ही अखंड नामजप करता. हे छान आहे.’’ प्रत्यक्षात मला यातील काही कळत नाही. मी केवळ त्यांचे आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांना सांगितले, ‘‘दुर्ग येथील सेवाकेंद्राची स्वच्छता मी आवडीने करतो.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आता तुम्ही करू नका. आपण साधकांकडून स्वच्छता करवून घेऊ. तुम्ही आता केवळ नामजप आणि समष्टीसाठी प्रार्थना करा.’’ आता दुर्ग येथील साधिका मधूनमधून सेवाकेंद्राची स्वच्छता करतात.

 

५. साधनेमुळे झालेले पालट

५ अ. परेच्छेने आणि सर्वांशी प्रेमाने वागणे

पूर्वी मला पुष्कळ राग येत असे. मी मुलांवर रागावत असे. ‘मी जे म्हणेन, तेच त्यांनी करावे’, अशी माझी अपेक्षा असे आणि तसे न झाल्यास मी त्यांना रागावत असे. मी एक प्रकारे हुकूमशहाप्रमाणे (डिक्टेटरप्रमाणे) वागत होतो. आता मी परेच्छेने वागतो. आता मला राग येत नाही. मी कुटुंबातीलच नव्हे, तर सर्वांशीच प्रेमाने वागतो.

५ आ. मायेपासून अलिप्त

मी प्रत्येक वेळी इतरांचा विचार करतो. आता माझे सर्व लक्ष केवळ सनातनकडे असते. माझी कुटुंब आणि पैसे यांविषयी आसक्ती न्यून झाली आहे. नातेवाइकांकडे लग्न असल्यास मी तेथे जात नाही. मी मुलांना जायला सांगतो.

 

६. अनुभूती

६ अ. पहिल्या माळ्यावरील छतावर उभा असतांना तोल जाऊन उलटा पडणे, तेव्हा
‘प.पू. गजानन महाराज यांनी हातात झेलून बाजूच्या घराच्या गच्चीवर बसवले’, असे जाणवणे

वर्ष १९८५ मध्ये घराच्या पहिल्या माळ्यावरील खोलीच्या छताचे काँक्रीट करायचे होते. मी छतावर जाऊन ते पहात होतो. अकस्मात माझा तोल गेला आणि मी उलटा पडलो. भूमीपासून स्लॅब २० फूट उंचावर होता. मला ‘प.पू. गजानन महाराजांनी हातात झेलले आणि बाजूच्या घराच्या गच्चीवर बसवले’, असे जाणवले. सर्वांना वाटले, ‘माझा मृत्यू झाला असेल’; पण मी थोड्याच वेळात घरी परत आलेला पाहून सर्वांनाच आश्‍चर्य वाटले.

६ आ. दुचाकीचा अपघात झाल्याने निपचित पडणे, ‘प्राण देहातून बाहेर गेला आहे
आणि काही वेळानंतर शरिराबाहेर गेलेला प्राण पुन्हा शरिरात आला’, असे जाणवणे

एकदा मी प्रसार करण्यासाठी जात असतांना माझ्या दुचाकीचा अपघात झाला. मी निपचित पडलो होतो. तेव्हा मला जाणवले, ‘माझा प्राण देहातून बाहेर गेला आहे. त्या ठिकाणी एक पोकळी निर्माण झाली आहे. माझा आत्मा शरिराबाहेर निघू शकत नाही. तिथे जमलेल्या लोकांना ‘मी मृत झालो’, असे वाटले. काही वेळानंतर शरिराबाहेर गेलेला प्राण पुन्हा शरिरात आला.’ मी जागेवर उठून बसलो. मी उठून बसल्यावर जमलेल्या लोकांना आश्‍चर्य वाटले.

‘देवाला माझ्याकडून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करवून घ्यायची असल्याने देवाने मला वाचवले’, असे आता लक्षात येते.

६ इ. एकदा मला सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून दर्शन झाले.

६ ई. मला घरात सुगंध येतो.

६ उ. आज माझे वय झाले असले, तरी केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मी आजही कुणावर अवलंबून नाही.

६ ऊ. देवतांची चित्रे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे निळसर होणे

देवघरातील गणपति, श्रीकृष्ण, हनुमान आणि अन्य देवता यांची चित्रे, तसेच परात्पर गुरुदेव यांची छायाचित्रे निळसर होत आहेत. ती निर्गुणाकडे जात असल्याचे हे द्योतक आहे.’

– (पू.) चत्तरसिंगजी इंगळे, दुर्ग, छत्तीसगड. (१.९.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात