साधकांना आईप्रमाणे आधार देणारे आणि प.पू. गुरुदेवांचे नाव ऐकताच भावजागृती होणारे पू. रमानंद गौडा !

पू. रमानंद गौडा

‘बेंगळूरू दौर्‍याच्या वेळी पू. रमानंद गौडा यांच्यासमवेत असतांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

 

१. साधकांना आईप्रमाणे आधार देणारे पू. रमानंदअण्णा !

पू. अण्णा साधकांसमवेत असतांना साधक सतत आनंदाची अनुभूती घेतात. पू. रमानंदअण्णा त्यांच्यासमवेत असलेल्या साधकांची आईसारखी काळजी घेतात. जिल्ह्यातील साधकांची स्थिती ओळखून त्यांना त्यांच्या स्तरावर मार्गदर्शन करतात आणि आधार देतात. त्यामुळे साधकांना पू. रमानंदअण्णा आईसारखे वाटतात.

 

२. प.पू. गुरुदेवांचे नाव ऐकताच भावजागृती होणारे पू. रमानंदअण्णा !

पू. रमानंदअण्णांच्या मनात प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्याविषयी सतत कृतज्ञता भाव असतो. प.पू. गुरुदेवांचे नाव ऐकताच त्यांची भावजागृती होते. पू. अण्णांच्या मनात प.पू. गुरुदेवांविषयी असलेल्या भावामुळे इतर साधकांच्या मनातही प.पू. गुरुदेवांविषयी श्रद्धा निर्माण होते.

 

३. परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ

दौर्‍याच्या वेळी एक दिवस पू. रमानंदअण्णांना पुष्कळ त्रास होत होता. त्यामुळे त्यांना सारखी ग्लानी येत होती. पू. अण्णांना त्रास होत असल्याने त्यांना आढाव्याचे टंकलेखन करायला जमत नव्हते. त्यामुळे ते साधकांचे साहाय्य घेऊन आढाव्याचे टंकलेखन करत होते. त्या वेळी ते ५ मिनिटे झोपायचे आणि पुन्हा उठून आढावा सांगायचे. यातून पू. रमानंदअण्णांची परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ शिकायला मिळाली.

 

४. साधकांच्या प्रगतीची तळमळ असल्याने झोपेतही साधकांविषयी बोलणे

एकदा पू. रमानंदअण्णांना त्रास होत असल्याने ते झोपले होते. रात्री झोपेत ते ‘सर्व साधकांचे स्वभावदोष निर्मूलन झाले पाहिजे. सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे’, असे बोलत होते. हे ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली. तसेच पू. अण्णांना ‘सर्व साधकांच्या प्रगतीची किती तळमळ आहे’, हे शिकायला मिळाले.

 

५. पू. रमानंदअण्णांमधील चैतन्यामुळे
समाजातील व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होणे

५ अ. एका अपरिचित व्यक्तीने पू. अण्णांना तिची नामजपाची वही दाखवणे

दौर्‍यात असतांना पू. अण्णा आम्हा साधकांना बेंगळूरू येथील वीरांजनेयाच्या (मारुतीच्या) मंदिरात घेऊन गेले होते. आम्ही दर्शन घेऊन बसलो असतांना एक अपरिचित व्यक्ती पू. अण्णांजवळ आली आणि तिने पू. अण्णांना तिची वही दाखवली. त्या व्यक्तीने वहीत सहस्रांहून अधिक वेळा श्रीरामाचा नामजप लिहिला होता. ती व्यक्ती म्हणाली, ‘‘यांना (पू. रमानंदअण्णांना) पाहून मला त्यांना नामजपाची वही दाखवावी, असे वाटले.’’

५ आ. एका व्यक्तीने तिच्या वैयक्तिक जीवनातील प्रसंग मनमोकळेपणाने सांगणे

त्याच मंदिरात आणखी एक व्यक्ती भक्तीगीत म्हणत होती. पू. अण्णा त्या व्यक्तीला भेटले. तेव्हा तिने तिच्या वैयक्तिक जीवनातील प्रसंग सांगितला. तसेच देवाने तिला त्या प्रसंगात कसे साहाय्य केले आणि त्यामुळे तिच्यात भक्ती कशी निर्माण झाली, हे सारे पू. अण्णांना अगदी मनमोकळेपणाने सांगितले. या प्रसंगामुळे पू. रमानंदअण्णांमध्ये असलेले चैतन्य कसे कार्य करते, हे मला शिकायला मिळाले.

कृतज्ञता : हे कृपाळू गुरुमाऊली, पू. रमानंदअण्णांमधील समष्टी भाव अणि तळमळ या गुणांमुळे तुम्हीच त्यांना समष्टी संत बनवले आहे. आम्हा सर्व साधकांमध्ये पू. अण्णांसारखे तुम्हाला अपेक्षित असे गुण निर्माण करा, अशी तुमच्या श्रीचरणी प्रार्थना आहे.

पू. अण्णांसारखी समष्टी आई दिल्याविषयी आम्ही साधक आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’

– श्री. नीलकंठ बड़ची, जिल्हा विजयपूर, कर्नाटक.

Leave a Comment