सनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रय देशपांडेआजोबा (वय ८३ वर्षे) यांचा साधनप्रवास

अनुक्रमणिका

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

सनातनचे संत केवळ संत नाहीत, तर गुरुच आहेत !

संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे सार्थक होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. बालपण

१ अ. वडिलांना शेतीच्या कामांत साहाय्य करण्यासाठी चालत शेतात जावे लागणे
आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अनवाणी चालतांना असह्य त्रास होणे

‘माझे बालपण गोठे, जमखंडी (जि. बागलकोट, कर्नाटक) या खेड्यात गेले. तेथेच माझे ६ वी पर्यंतचे शिक्षण झाले. या शाळेत माझा दुसरा क्रमांक येत होता. लहानपणी माझा स्वभाव भित्रा आणि हट्टी होता. माझे वडील वयस्कर असल्यामुळे मी त्यांना शेतीच्या कामात साहाय्य करायचो. आमचा मळा दुसर्‍या खेड्यात असल्यामुळे मला प्रतिदिन अडीच मैैल चालत जाणे-येणे करावे लागायचे. आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे माझ्या पायात पादत्राणे नसायची. त्यामुळे चालतांना माझा जीव रडकुंडीला यायचा.

१ आ. पाळीव प्राण्यांची आवड

आमच्या घरी गाय आणि घोडा होती. गायीला चारणे, बाहेर गेलेल्या घोड्याला शोधून आणणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे, हा माझा विरंगुळा होता.

१ इ. आई-वडिलांनी सर्व भावंडांवर चांगले संस्कार करणे

माझ्या वडिलांचा स्वभाव काटकसरी होता आणि आई भोळ्या स्वभावाची होती. आई-वडिलांनी आम्हा सर्व भावंडांवर चांगले संस्कार केले. त्यामुळेे आम्ही धार्मिक उत्सवांत सहभागी व्हायचो. मी लहान असतांनाच माझे वडील वारले. माझा मोठा भाऊ पुष्कळ धार्मिक वृत्तीचा होता. त्याला लोक ‘रामदासी’ म्हणायचे. तो शाळेत जातांना धोतर नेसायचा. मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तो वारला.

१ ई. ‘प्रभु श्रीराम प्रत्यक्ष दर्शन देईल’, या भावाने नामजप करणे

मी शेतातील माल स्वच्छ करतांना रामनामाचा जप करत असे; कारण ‘१३ कोटी नामजप केल्यावर प्रभु श्रीराम प्रत्यक्ष भेटतो’, अशी माझी श्रद्धा होती. मी आईकडून प्रतिदिन पुराणांतील गोष्टी ऐकत असे. माझ्याकडून शाळेचा अभ्यास करायचा राहिला की मी शाळेत जातांना नामजप करत जायचो.

 

२. महाविद्यालयीन शिक्षण

२ अ. शिक्षण घेण्याची तळमळ असल्याने भावाच्या आग्रहाला न जुमानता शिकायचे ठरवणे

मी पुढील शिक्षणासाठी शहरात, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी रहायला गेलो. आमच्या कुटुंबात कोणीही कमावणारे नव्हते. त्यामुळे माझा मोठा भाऊ ‘तू शिक्षण न घेता शेतीच कर’, असा मला आग्रह करायचा; पण मी ‘शिकायचे आहे’, असे मनाशी ठरवले होते. मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला; परंतु माझा ‘गणित’ हा विषय कच्चा असल्यामुळे मी १२ वीत अनुत्तीर्ण झालो.

२ आ. पुष्कळ मानसिक त्रास होत असतांना
स्वामी शिवानंद वरूड यांच्या ग्रंथाचा पुष्कळ प्रभाव पडणे

मध्यंतरीच्या एक वर्षाच्या काळात मला पुष्कळ मानसिक त्रास झाला. तेव्हा अमरावती येथील स्वामी शिवानंद वरूड यांचा ‘ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू’ हा ग्रंथ माझ्या वाचनात आला. या ग्रंथांचा माझ्यावर पुष्कळ प्रभाव पडला.

 

३. नोकरी आणि वैवाहिक जीवन

३ अ. पुण्यात स्वामींशी भेट होऊन काही मास त्यांच्या कुटीत राहून त्यांची सेवा
करणे आणि नंतर आरंभी पोष्टमनची नोकरी अन् पुढील ३२ वर्षे रेल्वेतील नोकरी करणे

बरेच प्रयत्न करूनही मला नोकरी मिळत नव्हती; म्हणून मी घर सोडून स्वामींच्या भेटीला गेलो. मी पुण्यात मावशीच्या घरी रहात असतांना काही योगासने शिकलो आणि नंतर पुण्यातच माझी स्वामींशी भेट झाली. मी काही मास त्यांच्या कुटीत राहून त्यांची सेवा केली. भाऊ मला प्रतीमास पैसे पाठवायचा. त्यामुळे मी एक वेळ बाहेर खानावळीत जेवायचो. एक दिवस मला भावाची तार आली, ‘तुला पोष्टमनची नोकरी मिळत आहे. लवकर ये.’ स्वामीजींनीही मला जाण्याची आज्ञा केली आणि मी बागलकोटला पोष्टमनच्या नोकरीत भरती झालो. मी दीड वर्ष ती नोकरी केली. त्या वेळी मी एका खोलीत राहून हाताने स्वयंपाक करायचो. नंतर मला जानेवारी १९६१ मध्ये रेल्वेच्या नोकरीचा आदेश मिळाला. मी भावाच्या दबावामुळे किंवा अन्नाचे ऋण असल्यामुळे नागपूरला रूजू झालो. नंतर ३२ वर्षे मी रेल्वेतील नोकरी केली.

३ आ. स्वतः ठरवल्याप्रमाणे न घडता ईश्‍वरेच्छेप्रमाणे
विवाह होऊन उभयतांनी गृहस्थाश्रम धर्माचे पालन करणे

मी ‘पदवीधर व्हायचे, ब्रह्मचारी रहायचे आणि कीर्तन करायचे’, असे ध्येय ठेवले होते; परंतु शेवटी ईश्‍वरेच्छेप्रमाणेच घडते. वर्ष १९६२ मध्ये माझा विवाह सौ. विजया यांच्याशी झाला. माझी पत्नी धार्मिक वृत्तीची होती. आमचा संसार सुखाचा आणि निर्विघ्न व्हावा; म्हणून आम्ही गृहस्थाश्रम धर्माचे पालन करत होतो अन् तुळशीविवाह, नवरात्र, श्राद्ध-पक्ष इत्यादी सर्व नियमित करत होतो.

 

४. सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी करत असलेली साधना !

४ अ. गुरुपदेश

वर्धा येथे प.पू. गणपतराव महाराज (स्वराज्य संस्था, कन्नूर) यांच्याकडून मी ‘नाम गुरुपदेश’ घेतला.

४ आ. कीर्तन आणि प्रवचन यांची आवड

मी नोकरीत असतांना नामसाधना केली नाही; परंतु मी कीर्तन आणि प्रवचन यांना नियमित जात होतो. कार्यालयीन वेळेत एखादे महत्त्वाचे कीर्तन-प्रवचन असले, तर सहकार्‍यांवर दायित्व सोपवून मी जायचो. मला अध्यात्माची आवड होती. त्यामुळे मी मार्गदर्शन घेण्यासाठी विविध संस्थांमध्ये जाऊ लागलो.

 

५. सनातन संस्थेशी संपर्क

५ अ. मंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाचेे
ध्वनीमुद्रण ऐकल्यावर ते आवडणे आणि सनातन संस्थेची माहिती घेणे

वर्ष १९९७ मध्ये वर्ध्यातील एका ‘राम मंदिरा’त एक दांपत्य सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वितरण करत होते. ते अधूनमधून मंदिरात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘साधना, तसेच शंकानिरसन’ यांविषयीच्या मार्गदर्शनाचेे ध्वनीमुद्रण लावत होते. तो विषय ऐकल्यावर मला तो पुष्कळ आवडला. नंतर मी त्यांच्याकडून सनातन संस्थेची माहिती घेतली.

५ आ. सत्संगात गेल्यावर सनातन संस्थेकडे आकर्षित होणे

नंतर अनेक मासांनी मी सनातनच्या सत्संगात गेलो. सत्संगातील ‘शंकानिरसन’ हा भाग मला पुष्कळ आवडला. नंतर हळूहळू मी इतर आध्यात्मिक संस्थांसह सनातन संस्थेतही नियमितपणे जाऊ लागलो. काही काळाने एक एक करत अन्य सर्व संस्थांमध्ये जाणे कधी थांबले आणि ‘मी सनातन संस्थेकडे केव्हा आकर्षित झालो ?’, हे मला कळलेच नाही.

 

६. साधनेची वाटचाल

६ अ. ‘सनातन प्रभात’ म्हणजे गुरुदेवांचे पत्र
आहे’, असे वाटणे आणि वाचनाची आवड निर्माण होणे

एकदा मी साप्ताहिक सनातन प्रभात वाचले. मला ते पुष्कळ आवडले आणि मी त्याचा वार्षिक वर्गणीदार झालो. मला वाचनाची विशेष आवड नव्हती, तरी मी आवडीने सनातन प्रभात वाचायचो. मला ‘सनातन प्रभात म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पत्रच आहे’, असे वाटायचे. त्यामुळे माझी वाचनाची अभिरूची वाढली.

६ आ. आनंदाने आणि उत्साहाने सेवेला आरंभ करणे

मी हळूहळू साधकांत रमू लागलो. माझी शिकण्याची वृत्ती वाढू लागली. मी दैनिक, साप्ताहिक आणि मासिक सनातन प्रभात यांचे वितरण करणे, नूतनीकरण करणे, तसेच विज्ञापने आणणे, साहित्य वितरण करणे इत्यादी सेवा आनंदाने अन् उत्साहाने करू लागलो. ‘सेवा करतांना माझ्यासमवेत परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असा माझा भाव असायचा. मी सर्व सेवा सायकलवरून जाऊन करायचो.

६ इ. ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित
न होता ती ६८ टक्के घोषित झाल्यावर विस्मयचकीत होणे

मी एक साधारण साधक होतो, तरी दैनिक सनातन प्रभातमध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित न होता ती ६८ टक्के घोषित केली होती. त्यामुळे सर्वांना आश्‍चर्य वाटले. मीही विस्मयचकीत झालो. त्या वेळी दैनिकात एक मथळा छापला होता, ‘लवकरच विदर्भात एक संत होणार !’

६ ई. सेवेची तीव्र तळमळ असल्याने सोबत सतत प्रसारसाहित्य असणे

‘जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती’ या उक्तीप्रमाणे मी कुठेही गेलो, तरी माझ्याकडे सतत दोन पिशव्या असायच्या. एका पिशवीत माझे वैयक्तिक साहित्य असायचे, तर दुसर्‍या पिशवीत सनातन प्रभातचे अंक आणि सनातनची सात्त्विक उत्पादने असायची.

 

७. सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात रहाण्याची मिळालेली संधी !

७ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मिळाल्यावर परमानंद होणे

एकदा मला सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात जाण्याचा योग आला. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन लाभले. त्या वेळी मला परमानंद होऊन माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. त्या वेळी त्यांना भेटल्यावर मला ‘तुका आकाशाएवढा’, असे वाटत होते.

७ आ. रामनाथी आश्रमात ३ मास रहाण्यास मिळणे

खरेतर मी ४ च दिवस आश्रमात रहाणार होतो; पण माझी प्रकृती ठीक नसल्याने माझे ४ दिवसांनंतरचे परतीचे आरक्षण रद्द करण्यात आले आणि ‘सर्व वैद्यकीय तपासण्या करूनच मी परत जायचे’, असे ठरले. त्यानंतर माझे मूळव्याधीचे शस्त्रकर्म करण्याचे ठरले आणि त्या निमित्ताने माझे ३ मास आश्रमात वास्तव्य झाले. नंतर मी देवद आश्रम पाहून वर्ध्याला परत गेलो.

 

८. वर्धा येथे गेल्यानंतर ‘संत’ म्हणून घोषित केले जाणे

यानंतर एक वर्षाने, म्हणजे वर्ष २०१२ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ७१ टक्के होऊन मला ‘संत’ म्हणून घोषित करण्यात आले.

 

९. आश्रमात रहायला जाण्याविषयी झालेली मनाची स्थिती !

मला उत्तरदायी साधकांनी विचारले, ‘‘आता तुम्ही कोणत्या आश्रमात रहायला जाणार ? कि वर्ध्यातच साधकांकडे जाऊन रहाणार ?’’

९ अ. सांसारिक दायित्व पूर्ण झाल्याने पत्नीने आश्रमात रहाण्याची अनुमती देणे

माझा आश्रमात रहायला जाण्याचा अजून निर्धार होत नव्हता आणि मला पत्नीकडून अनुमतीही मिळाली नव्हती, तरी मी ‘मला आश्रमात जायचे आहे. मी घरी रहाणार नाही’, असे सतत पत्नीला सांगत होतो. माझे सांसारिक दायित्व पूर्ण झाले होते. माझ्या कल्पना, वीणा आणि मेघा या तीनही मुलींचेे विवाह झाले होते. त्यामुळे पत्नीने ‘गावात साधकांच्या घरी न रहाता आश्रमात जाऊन राहू शकता’, असे सांगून मला नाईलाजाने अनुमती दिली.

९ आ. ‘आश्रमाचे नियम पाळता येतील का ?’,
असे वाटून आश्रमात रहायला जाण्याची भीती वाटणे

घर सोडल्यावर मी मुंबईत एका साधकाच्या घरी ३ मास रहात होतो; कारण मला आश्रमात जाण्याची भीती वाटत होती. ‘मला आश्रमाचे नियम पाळता येतील का ? मला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, तसेच लिखाण आदी जमेल का ?’, असे वाटत होते. मी ज्या साधकाकडे रहात होतो, त्याने मला आधार दिला आणि माझी हिम्मत वाढवली.

९ इ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याशी बोलून देवद आश्रमात रहायला जाणे

मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याशी बोलायलाही घाबरत होतो. एकदा मी त्यांना संपर्क केला आणि नंतर काही दिवसांतच मला देवद आश्रमात रहायला जाण्याची संधी मिळाली.

 

१०. देवद आश्रमात राहून साधना करतांना आलेल्या अनुभूती !

मी गेल्या साडेचार वर्षांपासून देवद आश्रमात राहून साधना करत आहे. आता आश्रमात रहाण्याविषयीची माझी भीती दूर झाली आहे. मी आश्रमात जमेल तेवढी सेवा, तसेच नामजप करतो. मी दैनिकाचे वाचन विशेष आवडीने करतो.

१० अ. शस्त्रकर्म न करताच हातावरील फोड बरा होणे

मला चार वर्षांपूर्वी उजव्या हातावर एक मोठा फोड झाला होता. त्यासाठी रुग्णालयात माझ्या सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या आणि निदान झाल्यावर शस्त्रकर्म करायचे ठरले; पण भूलतज्ञांनी एक तपासणी न झाल्याचे कारण सांगून माझे शस्त्रकर्म रहित केले. नंतर १५ दिवसांतच तो फोड कोणत्याही औषधाविना आणि शस्त्रकर्म न होताच केवळ गुरुकृपेने पूर्ण बरा झाला. आता त्या ठिकाणी अगदी पुसटसा डाग दिसतो.

१० आ. आश्रमातील चैतन्य आणि वैद्यकीय उपचार यांमुळे वजन १७ किलोंनी वाढणे

आश्रमात येण्यापूर्वी माझे वजन ३५ किलो एवढेच होते. मला वर्ध्याच्या वैद्यांनी आव्हान दिले होते, ‘जर तुम्ही १ किलो वजन वाढवून दाखवले, तर मी तुम्हाला १ सहस्र रुपये पारितोषिक देईन !’ आश्रमातील चैतन्य आणि पुण्यातील डॉ. नरेंद्र पेंडसे यांचे उपचार यांमुळे आज माझे वजन ५२ किलो आहे, म्हणजेच वयाच्या ८३ व्या वर्षी माझे वजन १७ किलो वाढले आहे.

१० इ. गुरुकृपा, परात्पर गुरु पांडे महाराज यांची कृपा
आणि आश्रमातील चैतन्य यांमुळे जुनाट आजार बरा होणे

मी गेल्या ५० वर्षांपासून शौच आणि पचनक्रिया यांच्या आजाराने पीडित आहे. यासाठी मी प्रतिदिन २५ काळ्या मनुका (पाण्यात भिजवलेल्या), एक अंजीर आणि एक केळे खातो. बाह्यतः या घरगुती उपायांनी मी बरा झालो; परंतु माझ्यावर असलेली गुरुकृपा, परात्पर गुरु पांडे महाराज यांची कृपा आणि आश्रमातील चैतन्य यांमुळे माझा जुनाट आजार आकस्मिकरित्या बरा झाला.

हे सर्व परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच झाले. त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे मनोगत गुरुचरणी समर्पित करतो.’

– (पू.) श्री. दत्तात्रय व्यंकटेश देशपांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.७.२०१८)

Leave a Comment