कर्नाटक येथे आयोजित धर्मसंसदेत सनातनच्या कन्नड भाषेतील ‘गणेश पूजा आणि आरती’ या अ‍ॅपचे प्रकाशन

रामराज्याच्या स्थापनेसाठी कर्नाटक येथे धर्मसंसदेचे आयोजन

केवळ संतच राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करू
शकतात ! – सद्गुरु श्री श्री श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी

धर्मसंसदेत उपस्थित संत आणि (१) सनातनचे पू. रमानंद गौडा

मंगळुरू – राजकारण्यांनी राष्ट्राच्या आध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीसाठी संतांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. केवळ संतच राष्ट्रहितासाठी कोणती व्यवस्था, कायदे, धर्म आवश्यक आहेत, हे सांगू शकतात आणि तेच राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करू शकतात, असे प्रतिपादन सद्गुरु श्री श्री श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांनी येथे केले. मॅकोले याची इंग्रजी शिक्षणपद्धत बंद करून भारताच्या संस्कृतीशी समरस असणारी गुरुकुल शिक्षणपद्धत अवलंबली पाहिजे. त्यामुळे धर्म आणि नैतिकता वाढीस लागेल. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालये यांत हिंदु धर्मावर आधारित अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. असे झाले, तरच भारत परत एकदा विश्‍वगुरूचे स्थान प्राप्त करेल, असेही ते पुढे म्हणाले. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या नित्यानंदनगर धर्मस्थळ येथील श्री रामक्षेत्र महासंथानम येथे सद्गुरु श्री श्री श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या पट्टाभिषेक जयंती दिनानिमित्त धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या धर्मसंसदेत सनातन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी रामराज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने संत आणि सहस्रो भाविक यांनी सहभाग घेतला.

क्षणचित्र : या कार्यक्रमास सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांचीही उपस्थिती लाभली. या ठिकाणी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

सनातनच्या कन्नड भाषेतील ‘गणेश पूजा आणि आरती’ या अ‍ॅपचे प्रकाशन

‘गणेश पूजा आणि आरती’ या कन्नड भाषेतील अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनचे प्रकाशन श्री श्री श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी

या प्रसंगी सनातन संस्थेने बनवलेल्या कन्नड भाषेतील ‘गणेश पूजा आणि आरती’ या अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनचे प्रकाशन श्री श्री श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या अ‍ॅपमध्ये श्री गणेशाची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी, आरती, स्तोत्र, गणेशोत्सव साजरा करण्याची आणि श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पद्धत यांच्या ध्ननीचित्रफिती आहेत. तसेच श्री गणेशाचे विडंबन वैध मार्गाने कसे थांबवावे, याची माहिती देण्यात आली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, दक्षिण कन्नड जिल्ह्य समन्वयक श्री. चंद्र मोगेर आणि धर्माभिमानी श्री. दिनेश उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात