झारखंड, बंगाल आणि आसाम राज्यांत ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

शास्त्र आणि धर्म यांचा त्याग केल्यास हिंदूंकडे काहीच
शिल्लक रहाणार नाही ! – डॉ. शिवनारायण सेन, शास्त्र धर्म प्रचार सभा

धनबाद (झारखंड) – सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांनी संयुक्तरित्या झारखंड, बंगाल अन् आसाम राज्यांत ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित केला होता. धनबाद येथे २४ जुलैला हनुमान मंदिर, रणधीर वर्मा चौक ते अग्रसेन भवन या मार्गावरून गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारफेरी काढण्यात आली, तर २७ जुलैला अग्रसेन भवनामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी कोलकाता येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. शिवनारायण सेन आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चित्तरंजन सुराल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. शिवनारायण सेन म्हणाले, ‘‘गुरूंच्या कृपेनेच आपल्या जीवनाचे कल्याण होऊ शकतेे. शास्त्र आणि धर्म यांचा त्याग केल्याने आपल्याकडे शिल्लक असे काहीच रहाणार नाही, हे सर्वांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे. भगवंत आणि संत यांच्या शक्तीनेच हे विश्‍व चालू आहे.’’

या महोत्सवाला ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास, गोसेवक श्री. पारस भाई, आसनसोल (बंगाल) येथील श्री. अरविंद साऊ आणि श्री. बरुण साऊ यांच्यासहित १२२ जिज्ञासू उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना डॉ. शिवनारायण सेन

श्यामडीह (कतरास, झारखंड) – येथील सरस्वती शिशू मंदिरामध्ये सकाळी साजर्‍या झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात सनातनचे पू. प्रदीप खेमका यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखवला. शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. शिव नारायण सेन, डॉ. कौशिकचंद्र मल्लिक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चित्तरंजन सुराल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शिशू मंदिराचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह ६०० जिज्ञासू उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना श्री. सुमंत देवनाथ

कतरास (झारखंड) – येथे २५ जुलैला जलाराम मंदिर ते कतरास बाजार या मार्गावरून गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारफेरी काढण्यात आली, तर २७ जुलैला सायंकाळी खेमका निवास येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. कौशिकचंद्र मल्लिक आणि सनातनचे संत पू. प्रदीप खेमका यांनी मार्गदर्शन केले. सौ. सुनिता खेमका यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्तचा संदेश वाचून दाखवला. या महोत्सवाला १७५ जिज्ञासू उपस्थित होते.

जमशेदपूर (झारखंड) – येथील बिस्टुपूरमधील राममंदिरामध्ये सायंकाळी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद महाराणा यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या वेळी ११० जिज्ञासू उपस्थित होते.

कोलकाता (बंगाल) – येथील शेक्सपिअर सरणी भागात असणार्‍या भारतीय भाषा परिषदेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी श्री. शियाराम साहा यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्तचा संदेश वाचून दाखवला, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंत देवनाथ यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ४६ जिज्ञासू उपस्थित होते.

बोंगाईगांव (आसाम) – येथील माता बागेश्‍वरी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. श्री. योगेश पांडे यांनी या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्तचा संदेश वाचून दाखवला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वनाथ कुंडू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. जयदीप पटवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बंगाली भाषेतील ‘धर्म फलक’ या ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथ प्रकाशन करतांना डावीकडून श्री. सोभन सेनगुप्ता, पू. प्रदीप खेमका आणि डॉ. कौशिकचंद्र मल्लिक

कतरास (झारखंड) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये सनातनचे संत पू. प्रदीप खेमका, शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. कौशिक चंद्र मल्लिक आणि श्री. सोभन सेनगुप्ता यांच्या हस्ते बंगाली भाषेतील ‘धर्म फलक’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

क्षणचित्रे

१. कतरास येथे काढण्यात आलेल्या प्रचारफेरीच्या वेळी पाऊस चालू झाला, तरीही फेरी न थांबता चालू होती. हा भाग बाजाराचा असल्याने अनेक दुकानदार बाहेर येऊन फेरीकडे पहात होते. ‘गुरूंप्रती श्रद्धा कशी असावी, हे यांच्याकडून शिकायला हवे’, असे दुकानदार म्हणत होते. फेरीमध्ये बालसाधकांचा सहभाग उत्साहपूर्ण होता.

२. डॉ. कौशिकचंद्र मल्लिक म्हणाले, ‘‘सनातनच्या साधकांमध्ये इतके प्रेम आहे की, आम्ही सनातनशी एकरूप झालो आहोत.’’

३.  डॉ. शिवनारायण सेन म्हणाले, ‘‘इतक्या सहजतेने आणि व्यवस्थित कार्यक्रम केवळ सनातनचे साधकच करू शकतात. त्यांचावर गुरुदेवांची अनंत कृपा आहे, अन्यथा असे होणे अशक्यच आहे.’’

४. जमशेदपूर येथील धर्माभिमानी श्री. आशीष अग्रवाल सकाळपासूनच त्यांचा व्यवसाय बंद करून महोत्सवाच्या सेवेमध्ये सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment