चिंचवड येथील पू. (श्रीमती) माया गोखलेआजी संतपदी विराजमान !

१ ऑगस्टला दोन ठिकाणी सत्संगांचे आयोजन केले होते. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये धर्मप्रसाराविषयी मार्गदर्शन करणार होत्या; पण ‘हा सत्संग म्हणजे गुरुमाऊलींची प्रीती अनुभवायला देणारा आणि साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आनंदवार्ता देणारा भावसोहळा असेल’, असे साधकांना वाटत होते. प्रत्यक्षातही तसेच घडले !चिंचवड येथील श्रीमती माया गोखलेआजी (वय ७४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाल्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र कृतज्ञताभावात स्वीकारणार्‍या पू. गोखलेआजी
(डावीकडून उभे) श्री. पराग गोखले (मुलगा), कु. मधुरा गोखले (नात), सौ. मेधा गोखले (सून) (बसलेल्या) पू. (श्रीमती) गोखले, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

 

वय आणि शरीर यांचे बंधन न ठेवता अखंड
साधनारत असणार्‍या पू. (श्रीमती) माया गोखलेआजी !

चिंचवड येथील कार्यक्रमात सद्गुरु (कु.) स्वातीताई म्हणाल्या, ‘‘साधना करायला वय आणि शरीर यांचे कोणतेही बंधन लागत नाही. साधना करण्यासाठी भाव महत्त्वाचा आहे. आपण किती घंटे सेवा केली, यापेक्षाही ती सेवा देवापर्यंत पोहोचली का, हे पहाणे महत्त्वाचे आहे.’’ या वेळी त्यांनी गुरुचरणी लीन झालेल्या संतरत्नाचे गुपित उलगडले.

‘वयाचे बंधन न ठेवता श्रीमती माया गोखलेआजी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८१ व्या संतपदी विराजमान झाल्या आहेत’, अशी घोषणा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केली. हे ऐकताच पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांची भावजागृती झाली. साधकांनाही भावाश्रू अनावर झाले. सद्गुरु (कु.) स्वातीताईंनी हार अर्पण करून आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्र देऊन पू. आजींचा सन्मान केला.

गुरुदेवांनी मला मायेपासून अलिप्त करून माझ्यावर कृपा केली ! – पू. (श्रीमती) माया गोखले

मी गुरुदेवांना सांगितले, ‘मला मायेतून बाहेर काढा आणि तुमच्यातच मला अडकवून टाका. मला मायेत अडकायचे नाही.’ गुरुदेवांनी मला मायेपासून अलिप्त केले आणि माझ्यावर कृपा केली.’

पू. माया गोखलेआजी यांनी साधकांना दिलेला संदेश

परम पूज्य गुरुदेव जे सांगतात, त्याचे आज्ञापालन केले पाहिजे. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे हेही अतिशय महत्त्वाचे आहे. प्रार्थना केवळ आकड्यात मोजण्यापेक्षा त्या देवापर्यंत पोहोचायला हव्यात.

साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना

१. सभागृहात श्रीमती ननावरेआजी श्रीकृष्णाच्या चित्राला नमस्कार करत असतांना ‘त्या संत असाव्यात’, असा विचार आला. प्रत्यक्षातही नंतर तशीच वार्ता मिळाल्यावर आनंद झाला. – सौ. वर्षा ठकार, आैंध, पुणे.
२. श्रीमती ननावरेआजी यांच्याकडे पाहून ‘त्या संत आहेत’, असा विचार मनात आला. प्रत्यक्ष कार्यक्रमातही आजींना संत म्हणून घोषित करण्यात आले. – सौ. जानकी पवळे, वडगावशेरी, पुणे.

व्यष्टी आढाव्यात सांगितल्यानुसार प्रयत्न करून पू. (श्रीमती)
गोखलेआजी मायेपासून अलिप्त झाल्या ! – पू. (श्रीमती) दातेआजी

पू. गोखलेआजींचा आढावा घेणार्‍या पू. दातेआजी म्हणाल्या, ‘‘पू. आजींना मायेत न अडकता साधनेचे प्रयत्न वाढवण्यास सांगितले होते. त्याचे पालन केल्याने त्या मायेतून अलिप्त झाल्या.’’

पू. गोखलेआजी संतपदी विराजमान झाल्या !
गो – सर्वांशी गोड बोलणार्‍या
ख – कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे उभ्या रहाणार्‍या
ले – लक्षात ठेवून परिपूर्ण सेवा करणार्‍या
– पू. (श्रीमती) दातेआजी

 

पू. गोखलेआजी यांच्याविषयी कुटुंबीय आणि साधिका यांचे मनोगत

१. श्री. पराग गोखले (मुलगा)

‘मी भाग्यवान आहे, अशी आई मला मिळाली. आईचे साधनेत पुष्कळ सातत्य आहे. आई नेहमी सर्वांशी प्रेमाने वागते. तिला कधीही मी कोणाशी भांडतांना किंवा रागवून बोलतांना पाहिले नाही. प्रेमभाव हा तिचा स्वभावच आहे. ‘आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी । प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार आई माझी ।’ असेच आज सांगावेसे वाटते. (हे सांगताना श्री. पराग गोखले यांचा भाव जागृत होत होता.)

२. सौ. मेधा पराग गोखले (सून)

‘आईंचे प्रत्येक गोष्टीत सातत्य असते. परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांचा ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ २४ घंटे त्यांच्यासह असतो. प्रतिदिन रात्री झोपतांना त्या सर्व संतांच्या छायाचित्रांना नमस्कार करून झोपतात. आज सोहळ्यासाठी येतांना ‘आमच्या घरातली पायरी सद्गुरु स्वातीताई यांच्या चरणांखाली ठेवण्यासाठी न्यायची आहे’, असे कळल्यावर त्या लगेच म्हणाल्या, ‘‘मीच पायरी असते, तर किती छान झाले असते !’’ त्यांचा संतांप्रती पुष्कळ भाव आहे.

३. कु. मधुरा पराग गोखले (नात)

आजी पुष्कळ प्रेमळ आहे. प्रेमभाव हा तिचा स्थायीभाव आहे. तिच्या मनात कोणाविषयीही कणभरही पूर्वग्रह नसतो. तिचा परमपूज्य गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. तिच्या सारणी लिखाणामध्ये, उपायांमध्ये सातत्य असते. रात्री झोपायला कितीही वाजले, तरी ती पहाटे ५ वाजता उठून मानसपूजा करते.

४. कु. वैभवी भोवर

आजींमध्ये स्वःला पालटण्याची आणि प्रयत्न करण्याची पुष्कळ तळमळ आहे. त्यांच्या घरी गेल्यावर प्रकाश जाणवला. घरी गेल्या गेल्या त्यांनी मला मिठी मारली. तेव्हा त्यांची त्वचा लोण्यासारखी मऊ मऊ झाल्याचे जाणवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment