वात्सल्यभाव, सेवाभाव आणि गुरूंप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

१. श्री. आर्. जयकुमार

१ अ. कोणताही प्रश्‍न विचारल्यावर अचूक उत्तर मिळणे आणि शांत अन् स्थिर असणे

‘पू. (सौ.) उमाक्का चेन्नईमध्ये आहेत’, हे आमचे भाग्य आहे. मला त्यांच्या समवेत प्रवचन करण्याच्या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. पू. उमाक्कांना आध्यात्मिक किंवा व्यावहारिक असे कोणतेही प्रश्‍न विचारल्यावर त्यांच्याकडून अचूक उत्तर किंवा मार्गदर्शन मिळते. त्यांच्याकडे अद्ययावत् आणि पुष्कळ चांगली माहिती असतेे. असे असूनही त्या अतिशय शांत आणि स्थिरचित्त आहेत.

१ आ. पतीचे शस्त्रकर्म होणार असतांना तोंडवळ्यावर काळजी, प्रतिक्रिया किंवा भावना यांचा लवलेशही नसणे आणि पतीच्या शस्त्रकर्माच्या वेळी त्यांना रुग्णालयात आलेल्या अनुभूती वाचल्यानंतर त्यांनी आपले सर्वस्व श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले असल्याची जाणीव होणे

त्यांचा शरणागतभाव दर्शवणारा एक प्रसंग मी सांगतो. एकदा पू. उमाक्कांचे पती श्री. रवि यांच्यावर शस्त्रकर्म करण्यात येणार होते. त्या वेळी त्यांच्यासाठी रक्तदान करण्याची संधी मला मिळाली होती. मी त्या दिवशी त्यांच्या समवेत रुग्णालयातच होतो. रुग्णालयाच्या स्वागतकक्षात मी आणि अन्य दोन साधक यांच्याशी पू. उमाक्का सहजपणे बोलत होत्या. त्यांच्या तोंडवळ्यावर काळजी, प्रतिक्रिया किंवा भावना यांचा लवलेशही नव्हता. शस्त्रकर्माची सिद्धता चालू होती अन् अर्ध्या घंट्यात श्री. रवि यांना शस्त्रकर्मासाठी नेण्यात येणार होते. त्या वेळी पू. उमाक्का यांना भ्रमणभाष आला आणि त्यावर बोलतांना ‘अर्ध्या घंट्यानंतर मी सत्संगातसाठी ‘संगणकीय प्रणालीवर लॉग-इन’ होते’, असे त्या म्हणाल्या. ‘एखाद्या स्त्रीच्या पतीवर शस्त्रकर्म होणार असतांना ती संगणकीय प्रणालीवर कशी जोडलेली असू शकते ?’, याचे मला आश्‍चर्य वाटले; परंतु पू. उमाक्का याचे प्रत्यक्ष उदाहरण आहेत.

पतीच्या शस्त्रकर्माच्या वेळी त्यांना रुग्णालयात आलेल्या अनुभूती काही दिवसांनंतर त्यांनी साधकांना पाठवल्या होत्या. त्या वाचल्यानंतर मला ‘पू. उमाक्कांनी आपले सर्वस्व श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले आहे’, याची मला जाणीव झाली. त्यांचा ईश्‍वराप्रती संपूर्ण शरणागत भाव आहे.

१ इ. ‘श्रीकृष्णच सर्वकाही करत असल्याने आपण काळजी करायला नको’, या पू. उमाक्कांच्या मार्गदर्शनाचा लाभ जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये होणे

मला मार्गदर्शन करतांना पू. उमाक्कांनी मला अनेक वेळा म्हटले आहे, ‘‘श्रीकृष्णच सर्वकाही करत असतो. तो काळजी घेणारच असल्याने आपण काळजी का करायची ?’’ पू. उमाक्कांनी केलेल्या या मार्गदर्शनाचा लाभ माझ्या जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये परिस्थिती समजून घेतांना मला झाला आहे. त्यासाठी मी पू. उमाक्कांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

२. सौ. गीतालक्ष्मी

२ अ. साधिकेने स्वतःची अडचण मोघमपणे सांगूनही पू. उमाक्कांनी तिच्या मनातील ओळखून तिला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यामुळे परिस्थितीकडे पहाण्याचा तिचा दृष्टीकोन पालटणे

‘एकदा एका सत्संगात साधकांना साधनेत येणार्‍या अडचणी सांगण्यास सांगितले होते, जेणेकरून त्यावर आध्यात्मिक मार्गदर्शन मिळून त्या अडचणी दूर करणे शक्य होणार होते. माझी एक न सुटणारी अडचण सांगण्याची संधी मला मिळाली होती. ती अडचण थोडी वैयक्तिक स्तरावर असल्यामुळे मी ती स्पष्टपणे न सांगता मोघमपणे सांगितली; परंतु पू. उमाक्कांनी माझ्या मनातले ओळखून मला योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे परिस्थितीकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोनच पालटला. त्या दिवसापासून पू. उमाक्कांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या मनात साठवली जाते.

२ आ. सेवाभाव

एकदा एका मंदिरामध्ये प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शनही लावण्यात येणार होते. ‘पू. उमाक्का प्रवचन करत असतांना ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी थांबता यावे’, यासाठी पू. उमाक्कांनी मला ‘तुम्ही माझ्या समवेत येऊ शकता का ?’, असे विचारले. मला ते ठिकाण ठाऊक नसल्यामुळे पू. उमाक्कांनीच मला तेथे नेले आणि आणूनही सोडले. मला सेवेची संधी दिल्याबद्दल आणि नेऊन पुन्हा घरी पोहोचवल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद दिल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मला एका साधकाला घेऊन जाण्याची संधी दिल्याबद्दल खरेतर मीच तुमचे धन्यवाद मानायला हवे.’’ लहानातली लहान सेवा करतांनाही त्यांचा सेवाभाव पाहून मी चकित झाले.

२ इ. पू. उमाक्कांचा वात्सल्यभाव !

त्या दिवशी मंदिरातील ग्रंथप्रदर्शनाची सेवा संपायला फार उशीर झाला होता. त्या वेळी पू. उमाक्कांनी मला ‘भूक लागली आहे का ?’, असे विचारले. ‘असू दे अक्का, आपण निघूया’, असे मी म्हटल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘रिकाम्यापोटी फार वेळ राहू नये. महाप्रसाद देत असलेल्या ठिकाणी जाऊन तो घ्या. तोपर्यंत मी प्रदर्शनाच्या ठिकाणी थांबते.’’ वास्तविक त्यांनाही उशीर झाला होता; परंतु त्यांनी मला घरापर्यंत पोहोचवून मगच त्या घरी गेल्या. या एका प्रसंगावरून त्यांचा प्रेमभाव माझ्या लक्षात आला. त्यानंतर त्या अनेक वेळा केवळ माझीच नाही, तर माझ्या मुलांचीही मातृवत प्रेमाने काळजी घेत अन् विचारपूस करत असत. त्या एक उत्कृष्ट आई आहेत.

आम्हाला पू. उमाक्का दिल्याबद्दल श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता ! आम्हा सर्व साधकांसाठी त्या आशीर्वादच आहेत.’

३. सौ. सुधा गोपालकृष्णन्

३ अ. प्रेमभाव

‘मला पूर्वीपासूनच पू. उमाक्का यांच्याविषयी लिहून देण्याची फार इच्छा होती; परंतु ते मला कधी जमले नाही. आज गुरुकृपेने मी लिहू शकत आहे अन् मला त्याचा फार आनंद होत आहे.

वर्ष २०१२ मध्ये चेन्नई येथील विनयगार (विनायक) मंदिर ते पेरुमल मंदिर येथे झालेल्या नामदिंडीच्या वेळी मला पू. उमाक्कांच्या समवेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी उमाक्कांच्या समवेत सेवा करतांना मला पुष्कळ भाव जाणवत होता. साधकांप्रतीचा तोच प्रेमभाव मला आजही त्यांना पहातांना जाणवतो.

३ आ. अल्प अहं

खरेतर मला पू. उमाक्कांकडून पुष्कळ शिकायला मिळालेले असल्यामुळे मला त्याचा लाभ झाला होता; परंतु त्या अमेरिकेला जायला निघाल्या, तेव्हा मला म्हणाल्या, ‘‘मी अमेरिकेत असतांना संगणकीय प्रणालीवरील सत्संग असतांना मला जोडून घ्यायला विसरू नका.’’ त्यांच्यामध्ये मला कधी तसूभरही अहं जाणवला नाही.’

४. सौ. कल्पना बालाजी

४ अ. सर्व प्रकारच्या सेवा भावपूर्ण रितीने करणे

‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सेवेला आरंभ केला. तेव्हापासून पू. उमाक्का माझ्यासाठी प्रेरणास्थानी आहेत. पू. उमाक्का सेवेमध्ये कधीच भेदभाव करत नाहीत. एखाद्या ठिकाणी त्या प्रवचन करणार असल्या, तर तेथील व्यासपिठाची स्वच्छता करणे किंवा इतर कोणतीही सेवा त्या तितक्याच भावपूर्ण रितीने करतात.

४ आ. वागण्या-बोलण्यात भावनेचा लवलेश नसणे आणि प.पू. गुरुदेव अन् श्रीकृष्ण यांच्याप्रती संपूर्ण शरणागती दिसून येणे

पू. उमाक्का कधीही त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी सांगत नाहीत. विशेषतः त्यांचे पती श्री. रवि यांच्या अनारोग्याबद्दल आम्हाला उशिरा समजले. (श्री. रवि यांच्यावर यकृताचे शस्त्रकर्म करण्यात आले होते.) पू. उमाक्कांच्या वागण्यात भावनेचा लवलेशही दिसत नाही. उलट प.पू. गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्याप्रती पू. उमाक्कांची संपूर्ण शरणागती दिसून येते. एक स्त्री म्हणून मी पू. उमाक्कांकडून ‘साधना आणि कौटुंबिक दायित्व या दोन्हींचा समतोल कसा राखायचा ?’, ते मी शिकत आहे.’

५. श्री. के. बालाजी

५ अ. सर्व साधकांविषयी सारखेच प्रेम आणि आपुलकी असणे

‘पू. उमाक्कांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी वधूची आई म्हणून त्या अत्यंत व्यस्त होत्या; परंतु लग्नाच्या गर्दीत मला पाहून त्या लगेच माझ्याशी बोलल्या आणि ‘तुमची पत्नी तुमच्या समवेत का आली नाही ?’, असे त्यांनी मला विचारले. त्या वेळी मी साधनेत नवखा होतो. साधक नवीन असो वा जुना, पूू. उमाक्कांचा प्रेमभाव आणि आपुलकी सारखीच असते. पू. उमाक्कांच्या वागण्यामुळे माझ्या मनात सनातन संस्थेविषयीची आस्था आणखी वाढली.

५ आ. प्रत्येकामध्ये श्रीकृष्णाला पहाणार्‍या पू. (सौ.) उमाक्का !

एकदा चंद्रग्रहणाच्या दिवशी साधकांनी पाळावयाच्या नियमांविषयी रामनाथी आश्रमातून काही सूचना आल्या होत्या. ‘या सूचना केवळ साधकांपुरत्याच आहेत कि त्या आपण इतर नातेवाइकांना सांगू शकतो ?’, असे एका साधकाने पू. उमाक्कांना विचारल्यावर त्या लगेच म्हणाल्या, ‘‘आपण इतर नातेवाइकांनाही सांगू शकतो; कारण ते भावी साधक असतील !’’ त्यांच्या या उत्तरावरून मला ‘पू. उमाक्का संपूर्ण समाजाकडे गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) दृष्टीने पहातात’, हे लक्षात आले. या ५ वर्षांच्या कालावधीत केलेल्या निरीक्षणातून ‘पू. उमाक्का प्रत्येकामध्ये श्रीकृष्णाला पहातात’, हे माझ्या लक्षात आले. मला त्यांच्याकडून आणखी शिकण्याची इच्छा आहे आणि श्री गुरूंच्या कृपेने तसे होणारही आहे.’

६. सौ. सुगंधी जयकुमार

६ अ. साधे राहणीमान

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. उमाक्कांसाठी साडीची निवड करत असतांना त्या २ – ३ साड्याच दाखवत असत. सनातनचा सत्संग असो किंवा एखादा लग्न समारंभ असो, त्यांचा पोषाख एकाच प्रकारचा असतो. यातून त्यांचे साधे राहणीमान दिसून येते.

६ आ. दिवसाच्या कोणत्याही क्षणी मी त्यांच्याशी बोलले, तरी त्या तेवढ्याच उत्साहात असतात.

६ इ. आम्हाला एखादी सेवा द्यायची असल्यास त्या एवढ्या नम्रतेने, प्रेमपूर्वक अन् अपेक्षाविरहित पद्धतीने विचारतात की, कुणीही नकार देऊ शकत नाही.

६ ई. प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने बोलणे

आई असो किंवा सासूबाई, पू. उमाक्कांचे त्यांच्याशी वागणे एकाच पद्धतीचे असते. समोरची व्यक्ती कुणीही असली, तरी त्या तिच्याशी प्रेमानेच बोलतात. हे मी त्यांच्या घरी गेलेले असतांना आणि त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी पाहिले आहे.

६ उ. साधकांचे कौतुक करून त्यांना प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देणे

आम्ही एखादी लहानशी सेवा केली, तरी पू. उमाक्का हसतमुखाने आमची पाठ थोपटतात. त्यांना त्या गोष्टीचा फार आनंद होतो. प्रत्यक्षात त्या अनेक सेवा करत असतात; परंतु प्रत्येकाच्या क्षमतेचा आदरही त्या करतात. त्यांच्या उत्साहवर्धक बोलण्यामुळे आम्हाला आणखी अधिक प्रयत्न करण्यास प्रेरणा मिळते.

६ ऊ. पू. (सौ.) उमाक्कांकडून वैयक्तिक जीवनातील परिस्थिती हाताळण्याची नैसर्गिक पद्धत शिकायला मिळणे

पू. उमाक्का आम्हा चेन्नईच्या सर्व साधकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्याकडून आम्हाला केवळ सत्संग किंवा मार्गदर्शनच मिळत नाही, तर वैयक्तिक जीवनातील परिस्थिती हाताळण्याची त्यांची सहज नैसर्गिक पद्धत शिकायला किंवा तिचे अनुकरण करायला मिळते.

६ ए. अनेक साधकांना स्वावलंबी बनवणे

पू. उमाक्कांच्या प्रभावामुळे अनेक साधक स्वावलंबी झाले आहेत, उदा. दुचाकी किंवा चारचाकी शिकणे, कपडे घालण्याच्या पद्धतीविषयी शिकणे, चित्रकलेच्या माध्यमातून भाववृद्धी करणे, सत्संग घेणे, परिस्थिती हाताळणे इत्यादी.

६ ऐ. पू. उमाक्कांचे उत्साहवर्धक मार्गदर्शन मिळाल्यामुळे भावनावशतेतून लवकर बाहेर पडता येऊन ताजेतवाने अन् आनंदी वाटणे

‘पू. उमाक्कांचा सत्संग मिळणे’, ही देवाचीच कृपा आणि आमच्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे. माझ्याकडून प.पू. गुरुदेवांच्या अपेक्षेनुसार सेवा होत नसल्याने काही वेळा मला निराशा येत असे. अशा वेळी पू. उमाक्कांचे उत्साहवर्धक मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी लगेच भावनावशतेतून बाहेर पडत असे अन् वर्तमानात रहाता येऊन मला ताजेतवाने (उत्साही) आणि आनंदी वाटत असे.

सर्व साधक रामनाथी आश्रमात राहू शकत नाहीत; परंतु प.पू. गुरुदेवांच्या कृपेने पू. उमाक्कांच्या सत्संगात रहाण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.’

७. श्री. पी. प्रभाकरन्

७ अ. सतत सत्मध्ये रहाणे आणि कौटुंबिक कर्तव्यही तितक्याच गांभीर्याने पूर्ण करणे

‘१० वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी पू. उमाक्कांच्या संपर्कात आहे. या संपूर्ण कालावधीत मी त्यांना एखाद्या गोष्टीचा आळस करतांना किंवा एखाद्या मनोरंजनात्मक गोष्टीत गुंतलेले असल्याचे कधीच पाहिले नाही. त्या गप्पा-गोष्टींमध्ये वेळ न घालवता सतत आध्यात्मिक उपक्रमांमध्ये तल्लीन असतात, तसेच एक गृहिणी म्हणून त्या कौटुंबिक कर्तव्यही तितक्याच गांभीर्याने पूर्ण करतात.

७ आ. एखादी व्यक्ती त्यांच्याशी गैरवर्तन करत असतांनाही त्या शांत आणि नम्र असतात.

७ इ. पू. उमाक्का त्यांच्या संपर्कात येणार्‍या लोकांवर अपार प्रेम करतांनाचे कितीतरी प्रसंग मी पाहिले आहेत.

७ ई. सेवेचे ध्येय निश्‍चित करून अविरत प्रयत्नांनी ते साध्य करणे

पू. उमाक्का नेहमी तमिळ भाषेतील ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी ध्येय ठरवून आणि त्यासाठी अथक परिश्रम करून ते ध्येय पूर्ण करतात. तमिळ भाषेतील सनातनच्या पंचांगासाठी त्या प्रतिवर्षी प्रायोजक मिळवणे आणि नंतर पंचांगांचे वितरण करणे, यांसाठी ध्येय निश्‍चित करून अविरत प्रयत्न करून ते पूर्ण करतात.’

८. सौ. प्रफुल्ला रामचंद्रन्

८ अ. सकारात्मक 

‘मी पू. उमाक्कांना गेल्या ७ वर्षांपासून ओळखते. त्यांनी कोणत्याही सेवेला ‘नाही’ किंवा ‘हे शक्य नाही’, असे म्हटलेले मी पाहिले नाही. त्या सतत सकारात्मक स्थितीत असतात.

८ आ. इतरांची सेवा चांगली होण्यासाठी स्वतःच्या सेवेत तडजोड करणे

‘इतर साधकांची सेवा चांगल्या प्रकारे व्हावी’, यासाठी त्या स्वतःच्या सेवेत तडजोड करतात. एकदा मी भाषांतराची सेवा करत होते. ‘ती सेवा नियोजित वेळेत पूर्ण व्हावी’, यासाठी त्यांनी माझ्या मुलासाठी जेवण बनवून दिले.

८ इ. पू. उमाक्का सतत साक्षीभावात असतात.’

९. सौ. रागिणी प्रेमनाथ

‘देवाच्या कृपेने मला पू. उमाक्कांच्या समवेत तमिळ भाषेतील सनातनचे ग्रंथ आणि पंचांग यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्यातील अनेक गुण मला शिकता आले.

९ अ. समर्पणभाव

पू. उमाक्का एखादी सेवा संपूर्ण समर्पणभावाने करतात. त्या दिवसाच्या कोणत्याही वेळी सेवा करण्यास किंवा साधकांना साहाय्य करण्यास उत्साहाने सिद्ध असतात. मी त्यांना ‘मी दमले आहे’, असे म्हणतांना किंवा एखादे नकारात्मक वाक्य उच्चारतांना कधीच पाहिले नाही. त्या सतत सकारात्मक असतात. त्या व्यावहारिक विषयांवर कधीच वेळ वाया घालवत नाहीत.

९ आ. चूक स्वीकारून ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे

पू. उमाक्कांना त्यांची भाषांतराची एखादी चूक लक्षात आणून दिल्यावर त्या लगेच स्वीकारतात आणि भविष्यात ती न होण्यासाठी प्रयत्न करतात.

९ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा शरणागत भाव

पू. उमाक्का परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी संपूर्णपणे शरणागत आहेत. साधकांना मार्गदर्शन करत असतांना इतर साधकांचा भाव जागृत होण्यासाठी त्या परात्पर गुरु डॉक्टरांचा उल्लेख आवर्जून करतात. त्यांच्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग, मग तो सुखाचा असो किंवा दुःखाचा, त्या तो परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रसाद म्हणून स्वीकारतात.

९ ई. जाणवलेला पालट

त्यांची आध्यात्मिक प्रगती होण्याच्या समवेतच सेवेत त्यांच्याकडून होणार्‍या भाषांतराच्या चुका उणावल्या आहेत. ‘त्या परिपूर्णतेकडे जात आहेत’, असे मला वाटते.’

१०. श्री. एस्. प्रेमनाथ

१० अ. दृढ निश्‍चय आणि एकाग्रता यांच्या बळावर संतपद प्राप्त करणार्‍या पू. उमाक्का !

‘पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना घडवल्याबद्दल प.पू. गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता ! दृढ निश्‍चय आणि एकाग्रता यांच्या बळावर साधनाप्रवासात येणार्‍या अडथळ्यांवर मात केल्यामुळे पू. उमाक्का यांना आता त्याची गोड फळे चाखायला मिळाली आहेत. केवळ चेन्नई येथीलच नव्हे, तर जगभरातील साधकांसाठी ही एक शिकवण आहे. चेन्नई येथील प्रथम संतांना माझे नम्र अभिवादन !

१० आ. सर्वगुणसंपन्न

पू. उमाक्कांनी गायन, नृत्य, वीणावादन आणि चित्रकला यांमध्ये प्राविण्य मिळवले आहे. ‘संघनेतृत्व, ध्येय निश्‍चित करणार्‍या, ध्येय साध्य करणार्‍या, प्रवचन करणार्‍या, शिक्षिका, हितचिंतक, आध्यात्मिक मार्गदर्शक, कुटुंब सांभाळणार्‍या, माता, पत्नी आणि आता संत’, ही त्यांची इतर वैशिष्ट्ये आहेत.

पू. उमाक्कांच्या मार्गदर्शनाखाली मला ‘फेसबूक’, धर्माभिमान्यांना वृत्तपत्रिका पाठवणे (मेल करणे) यांसारख्या संगणकीय सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्यातील संयम आणि साधकांप्रती असलेला प्रेमभाव यांव्यतिरिक्त त्यांच्यातील सकारात्मकता, सेवेप्रती असलेली निष्ठा, प्रतिक्रियांविना परिस्थिती हाताळण्याची पद्धत, श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला शरणागतभाव, हे सर्व मला अनुभवता आले. मला आमच्या लाडक्या उमाक्कांविषयी लिहून देण्याची संधी दिल्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

Leave a Comment