परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या निघालेल्या त्वचेतूनही वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट
इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘एप्रिल २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावर ज्या ठिकाणी ते पायजम्याची नाडी बांधतात, त्या ठिकाणी उष्णतेमुळे फोड आले होते. ते फोड नंतर फुटले. तेथील त्वचा सुकल्यावर त्या त्वचेचे काही तुकडे संग्रही ठेवले होते. संग्रह केलेल्या त्वचेच्या तुकड्यांतून चांगली स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे त्यांच्या सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या निघालेल्या त्वचेतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ९.५.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणेआणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका पटलावर (टेबलावर) चाचणीसाठी त्वचेचा नमुना ठेवण्यापूर्वी वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळ नोंद’ होय. त्यानंतर त्वचारोग झालेल्या ‘एका व्यक्तीची’ त्वचा (टीप) (तुलनेसाठी) आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणची सुकलेली त्वचा यांचे नमुने एकेक करून पटलावर ठेवून त्यांची ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणची सुकलेली त्वचा आणि ‘एक व्यक्ती’ हिची सुकलेली त्वचा यांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे समजले.

टीप – या चाचणीतील ‘एक व्यक्ती’ हिला वर्ष २०१७ मध्ये ‘सोरायसिस’ हा त्वचारोग झाला आहे. या चाचणीत तुलनेसाठी त्या व्यक्तीच्या सुकलेल्या त्वचेचा उपयोग करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे goo.gl/tVR7Pw या दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. चाचणीतील घटकांच्या प्रभावळीतील काही महत्त्वाच्या स्पंदनांची तुलनात्मक स्थिती

वरील सारणीमध्ये ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीतील (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीतील) आणि चाचणीतील घटकांच्या प्रभावळीतील महत्त्वाची स्पंदने दर्शवणार्‍या रंगांचे प्रमाण दिले आहे. पुढे दिलेल्या विवेचनात चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.

२ आ. चाचणीतील ‘एक व्यक्ती’ हिच्या त्वचेमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून होणे, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटणे

वरील सारणीवरून लक्षात येते की, ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत ‘एक व्यक्ती’ हिच्या त्वचेच्या प्रभावळीतील एकूण सकारात्मक स्पंदने ६ टक्के घटली होती. ‘एक व्यक्ती’ हिच्या त्वचेच्या प्रभावळीत चैतन्याचा पिवळा रंगही १२ टक्के घटला होता. थोडक्यात, ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत ‘एक व्यक्ती’ हिच्या त्वचेमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून झाले, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटले, असे यावरून लक्षात येते.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या त्वचेमुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित होणे, वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या त्वचेच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या त्वचेच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने १६ टक्के वाढली होती.

२. प्रभावळीतील चैतन्याचा पिवळा रंगही ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या तुलनेत १२ टक्के अधिक होता.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंगही दिसत होता.

थोडक्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या त्वचेमुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित झाली, तसेच वातावरणातील चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले, असे लक्षात येते.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. चाचणीतील ‘एक व्यक्ती’ हिच्या त्वचेतून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारणे 

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या त्वचेमध्ये (रूप) त्याची स्पंदने (शक्ती) असतात. चाचणीतील ‘एक व्यक्ती’ हिच्या त्वचेतून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारणे पुढे दिली आहेत.

१. त्वचेला भाजणे, कापणे, खरचटणे आदींमुळे इजा होते. त्वचेला इजा झाल्यावर त्या भागातील त्वचेचे अखंडत्व भंग पावते. तेव्हा त्वचेच्या त्या भागातील पेशी मृत पावण्यास आरंभ होतो. त्वचारोगामध्येही त्या भागातील पेशी मृत पावू लागतात. मृत पेशींत तमोगुण असतो. त्यामुळे त्वचारोग झालेली ‘एक व्यक्ती’ हिच्या त्वचेत नकारात्मक स्पंदने असणे स्वाभाविक आहे.

२. सर्वसाधारण व्यक्ती साधना करत नाही. तिच्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाणही अधिक असते, म्हणजेच तिच्यामध्ये सत्त्वगुण अल्प प्रमाणात आणि तमोगुण अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे तिच्यामध्ये सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. या चाचणीतील ‘एक व्यक्ती’ साधना करत नाही.

३. सामान्य व्यक्तीला देहबुद्धी पुष्कळ असल्याने तिच्या देहाला काही इजा झाल्यास व्यक्तीला वेदना होतात. वेदनांमुळे ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या त्रस्त होते. अशा वेळी त्या व्यक्तीमध्ये त्रासदायक स्पंदने निर्माण होतात. या चाचणीतील ‘एक व्यक्ती’ हिला त्वचारोग झाला आहे. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त असणे स्वाभाविक आहे.

‘मूळ नोंदी’च्या तुलनेत चाचणीतील ‘एक व्यक्ती’ हिच्या त्वचेमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून होणे, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटणे’, हे त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने अधिक असल्याचे द्योतक आहे.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या त्वचेतून वातावरणात चैतन्याची आणि शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील शास्त्र

संतांना देहबुद्धी अत्यल्प असते वा नसते. तसेच त्यांचा मनोलय आणि बुद्धीलय झालेला असतो. यामुळे ते स्वतःच्या देहाकडे साक्षीभावाने पाहू शकतात. त्यामुळे संतांच्या देहाला काही इजा झाली, तरी ते सतत आनंदावस्थेत असतात. संतांमधील चैतन्यावर दुखापतीचा काहीच परिणाम होत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांचा देह पुष्कळ शुद्ध आणि सात्त्विक आहे, तसेच तो चैतन्यमयही आहे. त्यांच्या संपूर्ण देहातून चैतन्य प्रक्षेपित होते. संतामधील चैतन्य त्यांचे केस, नखे आणि त्वचा यांतूनही प्रक्षेपित होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या त्वचेतून वातावरणात चैतन्याची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झाली. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले उच्च आध्यात्मिक स्तरामुळे विकारविरहित असल्याने त्यांच्याकडून शुद्ध स्पंदनेही प्रक्षेपित झाली.

थोडक्यात संतांच्या स्थूलदेहाला इजा झाली, तरीही ते सतत आनंदावस्थेतच असतात. संतांमधील चैतन्यावर त्यांना झालेल्या दुखापतीचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे ‘संतांच्या देहाच्या इजा झालेल्या भागातूनही (त्वचेतूनही) वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते’, हेच या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.७.२०१८)

ई-मेल : [email protected]

सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २ आणि ३ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच छायाचित्रे यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सूचना २ : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.