सेवाभावी आणि साधकांना बारकाव्यांसह सेवा शिकवणारे आध्यात्मिक पिता : ७२ वे संत पू. नीलेश सिंगबाळ !

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

 

२७ जुलै २०१८ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा झाली. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची गुणवैशिष्ठ्ये प्रकाशित करत आहोत.

१. व्यवस्थितपणा

अ. ‘मला पू. नीलेश सिंगबाळ यांच्या समवेेत खोलीत रहाण्याचे भाग्य लाभले. प्रथमच मला ‘व्यवस्थितपणे कसे रहावे ?’, शिकायला मिळाले. ते प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवतात, उदा. नोंदवही, धारिका, बॅग, ग्रंथ, व्हिजिटिंग कार्ड, कपडे, अंथरूण. त्यांच्या खोलीतील स्नानगृहही स्वच्छ असते.

आ. पू. दादा प्रतिदिन खोलीची स्वच्छता करतात. त्यामुळे त्यांच्या खोलीच्या दिशेकडे पहातांना किंवा तेथून जातांना चैतन्य मिळते.

२. थकवा असूनही रात्री साधकांना साहाय्य करणे

एका वाचकाने भेटवस्तूंच्या १०० खोक्यांची मागणी केली होती. त्यांना खोके द्यायचे असल्याने आम्ही खोक्यांची बांधणी करत होतो. पू. दादांनीही त्यासाठी आम्हाला साहाय्य केले. प्रत्यक्षात ते पुष्कळ थकलेले असूनही त्यांनी रात्री २.३० पर्यंत ही सेवा केली.

३. सेवाभाव

अ. सेवाकेंद्रातील प्रत्येक सेवा करतांना ‘प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि सुंदर कशी राहील’, याकडे त्यांचे संपूर्ण लक्ष असते. एखाद्या वस्तूत बिघाड झाला, तर ते स्वतः ती दुरुस्त करतात, उदा. पाण्याची मोटर, इनव्हर्टर, गीझर, पाण्याचा नळ, संगणक, चारचाकी किंवा दुचाकी, तसेच अन्यही वस्तू यांची ते दुरुस्ती करतात.

आ. मध्यंतरी साधकसंख्या अल्प असतांनाही सेवाकेंद्राची स्वच्छता, लेखा सेवा, केंद्राशी संबंधित आणि अन्य केंद्रांसंबंधी सेवा, तसेच बाहेरील लोकांना संपर्क करणे इत्यादी करत असतांना ते स्थिर होते. या परिस्थितीतही ते इतरांचा विचार करत. प्रतिदिन सेवाकेंद्राबाहेरील ७० ते ८० मीटरपर्यंची स्वच्छता करावी लागते. जेव्हा मला घरी जावे लागायचे, तेव्हा ते सर्व स्वतःच करत. त्या वेळी ते रात्री जास्त वेळ जागून आणि सकाळी लवकर उठून आश्रमसेवा करूनच बाहेर सेवेला जात होते.

४. सेवेतील बारकाव्यांविषयी मार्गदर्शन करणे

आंदोलन, धर्मजागृती सभा, शोभायात्रा असतांना मी पोलिसांच्या अनुमती घेण्यासाठी जायचो. ‘प्रशासकीय अधिकारी, अधिवक्ता यांच्याशी कसे बोलायचे ?’, यांविषयीही ते मार्गदर्शन करायचे. ‘अधिवक्त्यांचे साहाय्य केव्हा, कधी घ्यायचे ? कुठे थांबायचे ? कुठे जायचे ?’, याविषयीही त्यांचे पावलोपावली मार्गदर्शन मिळायचे.

५. ‘समाजातील व्यक्तींना संपर्क करण्याची सेवा कशा
प्रकारे करायला हवी ?’, हे पू. दादांकडून शिकायला मिळणे

हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती, विज्ञापनदाते, अर्पणदाते, समाजातील व्यक्ती यांना वैयक्तिक संपर्क करतांना ‘संपर्क प्रत्येक दृष्टीने प्रभावी कसा असायला हवा ?’, ‘कुठल्या व्यक्तीला कसे प्राधान्य द्यावे ? दिनांकानुसार नियोजन कसे करावे ?’, हेही त्यांच्याकडून शिकता आले. ‘कोणती व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे ?’, त्याचाही अभ्यास पू. दादांनी केला आहे, उदा. साधना करणारा कोण आहे ? साधक कोण बनू शकतो ? हिंदुत्ववादी कोण आहे ? विज्ञापन देणारा कोण आहे ? अर्पण देणारा कोण आहे ? वरवर बोलणारा आणि अंतर्मनातून बोलणारा कोण आहे ?

६. आध्यात्मिक पिता

पू. दादा एका आध्यात्मिक पित्याप्रमाणे आहेत. त्यांनी मला व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सांभाळले आहे.

७. तत्त्वनिष्ठ राहून साधनेविषयी मार्गदर्शन करणे

पू. दादा नेहमी तत्त्वनिष्ठ राहून समोरच्याला चूक सांगतात. ते कुणालाही भावनिक स्तरावर हाताळत नाहीत. चूक सांगितल्यानंतर साधकांना दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शन करून ते साधकांचा उत्साह वाढवतात. नेहमी सकारात्मक राहून ते म्हणतात, ‘‘या प्रसंगातून ईश्‍वराने आपल्याला शिकवले आहे.’’

८. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

जवळजवळ २ वर्षांपासून ते जे बोलायचे, त्याप्रमाणेच व्हायचे. एकदा रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये जेथून आम्हाला जायचे होते, तो मार्ग पारंपरिक नसल्याने प्रशासन आम्हाला अनुमती देत नव्हते. पू. दादा म्हणाले, ‘‘आपल्याला अनुमती अवश्य मिळेल. परात्पर गुरुदेव समवेत आहेत.’’ त्यानंतरच अधिवक्त्यांचा प्रतिसाद आणखी चांगल्या पद्धतीने मिळून ते पूर्ण मन लावून अनुमती घेण्याच्या सेवेला लागले. तेव्हा आम्हाला अनुमती मिळाली.

९. प्रसारसाहित्याविषयीचा भाव

वस्तू खरेदीच्या संदर्भात ते अभ्यास करतात. वस्तू अर्पण मिळण्यासाठीही प्रयत्न करतात. २६ जानेवारीनिमित्त काढलेल्या पत्रकांसाठी प्रायोजक मिळाल्यावर पू. दादांनी सांगितले, ‘‘ही पत्रके कुणालाही वाटायची नाहीत. ती जिज्ञासूपर्यंत जायला हवीत.’’ ‘अर्पण देणार्‍याची साधना व्हावी आणि गुरुदेवांनी दिलेले ज्ञान चांगल्या व्यक्तीपर्यंत जायला हवे’, असा त्यांचा दृष्टीकोन होता.’

– श्री. राजन केशरी, वाराणसी (२०.२.२०१८)