परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावाने त्यांच्या तळपायांना झालेल्या भोवर्‍यांंना लावलेल्या मलमपट्ट्यांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे अन् तुलनेत उजव्या तळपायाच्या मलमपट्टीमधील चैतन्याचे प्रमाण अधिक असणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट
इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

डिसेंबर २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या तळपायाच्या मध्यभागी भोवर्‍या (कुरूप, कॉर्न) झाल्या होत्या. काही दिवसांनी डाव्या तळपायालाही भोवर्‍या झाल्या. तळपायांना प्रतिदिन मलमपट्टी (ड्रेसिंग) करण्यात येत होती. डाव्या तळपायापेक्षा उजव्या तळपायाची जखम अधिक खोल होती. जानेवारी २०१८ मध्ये त्यांच्या तळपायांना केलेल्या मलमपट्ट्यांमध्ये चैतन्य असल्याचे सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले.

मलमपट्ट्यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ३०.१.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तर्फे केलेल्या चाचणीसाठी ‘पिप’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. त्याच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

चाचणीत एका पटलावर (टेबलावर) लहान पांढरा ठोकळा ठेवून तेथील वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळ नोंद’ होय. त्यानंतर कोणीही न वापरलेली मलमपट्टी (तुलनेसाठी), परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या तळपायाची मलमपट्टी आणि त्यांच्या उजव्या तळपायाची मलमपट्टी एकेक करून पटलावर ठोकळ्याचा आधार देऊन ठेवली अन् त्यांची ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या आणि उजव्या तळपायांच्या मलमपट्ट्यांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे समजले.

वाचकांना सूचना : जागेअभावी लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे goo.gl/tVR7Pw या दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल आहेत.

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. मूळ नोंद : प्रभावळीत (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीत) ४८ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने आणि ५२ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने होती.

पुढे दिलेल्या निरीक्षणांत चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.

२ आ. कोणीही न वापरलेल्या मलमपट्टीमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण वाढणे

कोणीही न वापरलेल्या मलमपट्टीच्या प्रभावळीत एकूण नकारात्मक स्पंदने ३२ टक्के, तर  सकारात्मक स्पंदने ६८ टक्के होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या मलमपट्टीच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने १६ टक्क्यांनी वाढली होती. प्रभावळीत चैतन्याचा पिवळा रंग ४० टक्के, म्हणजे ‘मूळ नोंदी’तील पिवळ्या रंगाच्या (२८ टक्क्यांच्या) तुलनेत अधिक होता. चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंग ११ टक्के दिसत होता. थोडक्यात ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत कोणीही न वापरलेल्या मलमपट्टीमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण वाढले, असे यावरून लक्षात येते.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या तळपायाच्या मलमपट्टीमुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होणे, वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण वाढून नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या तळपायाच्या मलमपट्टीच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ७८ टक्के सकारात्मक स्पंदने आणि २२ टक्के नकारात्मक स्पंदने होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत डाव्या तळपायाच्या मलमपट्टीच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने २६ टक्क्यांनी वाढली होती.

२. प्रभावळीतील चैतन्याचा पिवळा रंग ३४ टक्के होता, म्हणजे ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (२८ टक्क्यांच्या) तुलनेत तो अधिक होता.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंगही २८ टक्के दिसत होता.

थोडक्यात, परात्पर गुरु डॉक्टरांच्या डाव्या तळपायाच्या मलमपट्टीमुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झाली, तसेच वातावरणातील चैतन्याचे प्रमाण वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले, असे लक्षात येते.

२ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या उजव्या तळपायाच्या मलमपट्टीमुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने पुष्कळ प्रमाणात, तर सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमतेची स्पंदनेही काही प्रमाणात प्रक्षेपित होणे आणि वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या तळपायाच्या मलमपट्टीच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ८१ टक्के सकारात्मक स्पंदने आणि १९ टक्के नकारात्मक स्पंदने होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत उजव्या तळपायाच्या मलमपट्टीच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने २९ टक्क्यांनी वाढली होती.

२. प्रभावळीतील चैतन्याचा पिवळा रंग ३१ टक्के होता, म्हणजे ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (२८ टक्क्यांच्या) तुलनेत तो थोडा अधिक होता.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंग ३३ टक्के दिसत होता.

४. प्रभावळीत सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमतेचा पोपटी रंगही ५ टक्के दिसत होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या तळपायाच्या मलमपट्टीमुळे सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमतेची, चैतन्याची आणि पुष्कळ प्रमाणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित झाली. वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले. डाव्या तळपायाच्या मलमपट्टीच्या तुलनेत उजव्या तळपायाच्या मलमपट्टीमुळे वातावरणात प्रक्षेपित झालेल्या उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण थोडे अधिक होते, असे लक्षात आले.

वरील सूत्रांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’मध्ये दिले आहे.

३. निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. कोणीही न वापरलेल्या मलमपट्टीतून वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारण

चाचणीतील कोणीही न वापरलेली मलमपट्टी ही सुती आणि पांढर्‍या रंगाची होती. सुती धागा नैसर्गिक असल्याने सात्त्विक असतो. पांढरा रंग हा निर्गुणाचे प्रतीक असल्याने त्याकडे दीर्घकाळ पाहिल्यावर मन निर्विचार होते. ही मलमपट्टी कोणीही वापरलेली नसल्यामुळे तिच्यात कोणाही व्यक्तीची स्पंदने नव्हती. एकंदरीतच या मलमपट्टीशी संबंधित सर्व घटक (रंग, धाग्याचा प्रकार आदी) सात्त्विक असल्याने त्यामध्ये सकारात्मक स्पंदने आढळली.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या आणि डाव्या तळपायांच्या मलमपट्ट्यांतून वातावरणात चैतन्याची अन् शुद्धतेची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होण्यामागील कारण

सामान्य व्यक्तीला देहबुद्धी पुष्कळ असल्याने देहाला काही इजा झाल्यास व्यक्तीला वेदना होतात. वेदनांमुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त होते. तिच्यात त्रासदायक स्पंदने निर्माण होतात. याउलट संतांना देहबुद्धी अत्यल्प असते वा नसते. त्यांचा मनोलय, बुद्धीलय झालेला असल्याने ते स्वतःच्या देहाकडे साक्षीभावाने पाहू शकतात. संतांच्या देहाला काही इजा झाली, तरी ते सतत आनंदावस्थेत असतात. त्यांच्यातील चैतन्यावर दुखापतीचा परिणाम होत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदावरील संत असल्याने त्यांचा देह पुष्कळ शुद्ध, सात्त्विक, तसेच चैतन्यमयही आहे. संतांच्या संपूर्ण देहातून चैतन्य प्रक्षेपित होते.

त्यामध्ये चरणांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या तळपायांना लावलेल्या मलमपट्ट्यांवर होऊन त्यातून वातावरणात चैतन्याची आणि शुद्धतेची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झाली.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या तळपायापेक्षा त्यांच्या उजव्या तळपायाच्या मलमपट्टीतून वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होण्यामागील कारण

मानवी शरिराच्या उजव्या भागावर सूर्यनाडीचा (पिंगला नाडीचा) आणि डाव्या भागावर चंद्रनाडीचा (इडा नाडीचा) प्रभाव असतो. सूर्यनाडी अग्नीतत्त्वाची, तर चंद्रनाडी आपतत्त्वाची निर्देशक आहे. त्यामुळे सूर्यनाडी तेजस्वी, तर चंद्रनाडी शीतल असते. सूर्यनाडी तेजस्वी असल्याने त्यांच्या डाव्या पायापेक्षा त्यांच्या उजव्या पायामध्ये अधिक शक्ती आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या तळपायाला लावलेल्या मलमपट्टीपेक्षा उजव्या तळपायाला लावलेल्या मलमपट्टीतून वातावरणात अधिक चैतन्य प्रक्षेपित झाले.

थोडक्यात, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावाने त्यांच्या तळपायांच्या मलमपट्ट्यांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले. संतांच्या स्थूलदेहाला इजा झाली, तरी ते सतत आनंदावस्थेत असल्याने त्यांच्यातील चैतन्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही; परंतु संतांमधील चैतन्याचा परिणाम त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तूंवर मात्र मोठ्या प्रमाणावर होतो, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (६.७.२०१८)

ई-मेल : [email protected]

सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच चाचणीतील वस्तू येथे ग्राह्य धरलेल्या नाहीत.

सूचना २ : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.