सनातन साधक-पुरोहित पाठशाळा

समाजाला धर्माचरण करण्यास उद्युक्‍त करणार्‍या आणि ईश्‍वरप्राप्तीची योग्य दिशा दाखवणार्‍या पुरोहितांना सिद्ध करून त्यांना अल्प कालावधीत मोक्षाला नेणे, हा प.पू. डॉक्टरांचा व्यापक उद्देश असलेली पाठशाळा !

 

सध्या विविध कारणांस्तव समाजात पुरोहित हा चेष्टेचा विषय झाला आहे. त्यामुळे धर्माने सांगितलेल्या विधींनाही गौण स्वरूप प्राप्त झाले आहे. हे सर्व धर्महानी करणारे आहे. हे कुठेतरी थांबावे, धर्मावर आलेली ही काजळी दूर व्हावी यासाठी सनातन संस्थेतर्फे ‘साधक-पुरोहित’ पाठशाळा चालू करण्यात आली आहे.

सनातन संस्था ही हिंदु धर्मासाठी कार्य करणारी आहे. त्यामुळे संस्थेचे प्रत्येक कार्य अगदी ग्रंथ प्रकाशन, संशोधन अन् संस्थेतर्फे राबवला जाणारा प्रत्येक उपक्रम हा हिंदु धर्माचे पुनरुत्थान अन् अभिवृद्धी व्हावी याच उद्देशाने राबवला जात आहे. हाच उद्देश ‘साधक-पुरोहित’ पाठशाळा सुरू करण्यामागील आहे.

१. कलियुगातील पुरोहित

‘कलियुगात पुरोहितांना धर्मशिक्षण नसल्याने त्यांनी मंत्रांचे दास्यत्व सोडून आधुनिक जीवनमूल्यांचे दास्यत्व पत्करले आणि स्वतःतील तेजाच्या बिजांचा र्‍हास करून घेतला. प्रत्येक विधी धनाच्या मागे लागून भावरहित अवस्थेतून अयोग्य आणि अशुद्ध मंत्रोच्चारणातून करून वायूमंडल अशुद्ध बनवून पापाचे धनी होण्याचा पुरोहितांनी सपाटाच लावला. या कारणाने समाज खर्‍या आणि शुद्ध अशा तेजोरूपी धार्मिक विचारधारांचे शिक्षण देणार्‍या प्रमुख स्रोताला मुकला. यातूनच पुरोहितांतील धर्मतेजाला अवकळा प्राप्त होऊन समाजात तो एक चेष्टेचा विषय बनला. यातूनच महापापाची निर्मिती होऊ लागली.

२. इतर वैदिक पाठशाळा

या पुरोहितांना नुसतेच वैदिक शिक्षण देतात; परंतु समाजाकडून धार्मिक कृती भावपूर्ण रूपात योग्य शास्त्रशुद्ध दृष्टीकोनातून कशा करून घ्यावयाच्या, याचे समाजाला शिक्षण देण्यात त्या न्यून पडत असल्याने या वैदिक पाठशाळा सध्याच्या धर्मविषयक नीतीमूल्यांच्या दृष्टीकोनाच्या अभावी भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देऊ शकत नाहीत.

३. खर्‍या पुरोहितांची वैशिष्ट्ये

अ. उपासनाकांडातून वैदिक समष्टी-धर्माची शिकवण घेऊन सिद्ध झालेले पुरोहित समाजाला धर्माच्या नैतिक मूल्यांच्या शिकवणीतून नरजन्माचे सार्थक कसे करायचे, याचे शिक्षण देतात.

आ. चांगला पुरोहित स्वतःतील चैतन्याने वायूमंडलाची मंत्रोच्चाररूपी आघातात्मक उच्चारणातून शुद्धी करून देत असल्याने जेथे पुरोहितांचे वास्तव्य असते, ते ते वायूमंडल तेजस्वी विचारधारांनी नटलेले असते; कारण मंत्रांतील तेजस्वरूप ओघवती भाषा देहशुद्धीसमवेत स्पर्शाच्या स्तरावर वायूमंडलाच्या शुद्धीकरणातून इतरेजनांचीही शुद्धी करते.

४. सनातनच्या पुरोहित पाठशाळेची वैशिष्ट्ये

४ अ. साधनेचे बीज असलेले युवक-पुरोहित सिद्ध होणार असणे

ही पाठशाळा ‘आचार, विचार आणि विहार’ या त्रयींतून समाजास योग्य धार्मिक दृष्टीकोन देऊन त्यांना भावपूर्ण विधी कसे करायचे, यांचे स्वयंप्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात अग्रेसर ठरणारी असल्याने या पाठशाळेतून अनेक उज्ज्वल अन् साधनेचे बीज असलेले युवक-पुरोहित सिद्ध होणार आहेत. या पुरोहितांना केवळ मंत्रोच्चार कसा करावयाचा, हे शिकवले जाणार नसून त्यासह विधीपूर्व देवता-पूजनाची सिद्धता शास्त्रशुद्धदृष्ट्या कशी करायची, विधी भावपूर्ण कसा करावयाचा, तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

४ आ. धर्मशिक्षण देऊन धर्मप्रसार

ही व्यष्टीतून समष्टी मार्ग साधणारी, म्हणजेच लोकांना मंत्रयुक्‍त विधीमुल्यांतून धर्मशिक्षण देऊन धर्मप्रसारास मोठ्या प्रमाणात हातभार लावणारी आहे.

४ इ. आचार-विचार-विहार या तीन मुल्यांतून मोक्षाकडे प्रयाण करणे

मंत्रोच्चाररूपी व्यष्टीला भावपूर्ण भक्‍तीमार्गाच्या कृतीची जोड दिल्याने त्याच्या चैतन्ययुक्‍त स्पंदनांचा वायूमंडलावर परिणाम होऊन त्यातून साधणारी फलप्राप्ती ही समष्टी साधनेच्या स्तरावरील परिणामात्मक आनंद देणारी असल्याने यातून आचार, विचार आणि विहार अशा तीन मुल्यांतून साधक-पुरोहित नक्कीच आनंदप्राप्ती, परिणामी मोक्षाकडे प्रयाण करणारे ठरणारे आहेत.

४ इ १. उत्तम आचार

योग्य मंत्रोच्चारातून शक्‍तीरूपी तेजाचे संवर्धन होण्यास साहाय्य झाल्याने यातून उत्तम आचाराची निर्मिती होते.

४ इ २. सात्त्विक विचार

उत्तम आचारातून भावजागृती होऊन प्रत्येक कृती ईश्‍वरचरणी समर्पित झाल्याने त्यातून सात्त्विक विचारांची निर्मिती होण्यास साहाय्य होते.

४ इ ३. उत्तम विहार (उत्तम विचारांसहित केलेले व्यापक भ्रमण, समष्टी साधना)

सात्त्विक विचारांच्या प्रेरणेतून जीव समष्टी कल्याणाचा विचार करू लागतो. यातूनच विहाराची, म्हणजेच आकाशमंडलात साधल्या जाणार्‍या व्यापकत्वाची निर्मिती होते. उत्तम विहार, म्हणजेच उत्तम विचारांसहित केलेले व्यापक भ्रमण जिवाला समष्टी साधनेचे बळ प्राप्त करून देते.

४ इ ३ अ. गुरुकृपेचे छत्र

उत्तम विहारातून गुरुकृपेचे छत्र अल्प कालावधीत जिवाला प्राप्त होते.

५. गुरुकृपायोगात विलीन होण्याचा महामार्ग

सनातनची साधक-पुरोहित पाठशाळा, म्हणजेच कर्मकांडयुक्‍त उपासनाकांडातून निष्काम कर्ममार्गाने समष्टी साधनेच्या साहाय्याने गुरुकृपायोगात विलीन होण्याचा महामार्ग आहे.

६. ईश्‍वरी राज्य स्थापनेच्या दृष्टीकोनातून
ईश्‍वरप्राप्तीपर्यंतचे उन्नतीचे टप्पे – साधक-पुरोहित, शिष्य-पुरोहित, संत-पुरोहित

पुढे हे पुरोहित धर्मशास्त्रयुक्‍त संकल्पाच्या आधारावर ईश्‍वरी राज्याची तेजोमय धुरा पेलवण्यास समर्थ असणार आहेत. या पुरोहितांना वैदिक मंत्रांतूनच समष्टी साधनेचे बाळकडू पाजले जाणार असून भावी ईश्‍वरी राज्य स्थापनेच्या दृष्टीकोनातून त्यांना साधक-पुरोहित, शिष्य-पुरोहित, संत-पुरोहित या मार्गाने ईश्‍वराकडे जाण्याचा मार्ग लीलया कसा चोखाळायचा, हेही शिकवले जाणार आहे. यामुळे निश्चितच सनातनची ही शाळा आत्मतेजासह धर्मतेजाचे देहात संवर्धन करणारी असल्याने ईश्‍वराच्या धर्मरूपी व्यापकत्वातच शेवट जिवाला विलीनीकरण साधून देणारी आहे.

७. आध्यात्मिक विश्‍वविद्यालयाच्या अंशात्मक रूपाची स्थापना

ही पाठशाळा नव्हे, तर एका दृष्टीने आध्यात्मिक विश्‍वविद्यालयाच्या अंशात्मक रूपाची स्थापनाच आहे. पुढे याचा वटवृक्ष होणार असून अनेक आध्यात्मिक स्तरावरील कलात्मक दालनांची यांमध्ये निर्मिती होणार आहे. या सर्वांचे बीज वैदिक धारणेतच सामावलेले असल्याने त्याच चैतन्यमय बीजरूपी स्थापनाखंडाला आता ‘पुरोहित पाठशाळे’च्या निमित्ताने आरंभ झाला आहे. या सुवर्णक्षणाचे सर्व देवमंडलच साक्षी असणार आहे.

८. प.पू. डॉक्टरांचा व्यापक उद्देश – समाजाला धर्माचरण करण्यास उद्युक्‍त करणार्‍या
आणि ईश्‍वरप्राप्तीची योग्य दिशा दाखवणार्‍या पुरोहितांना सिद्ध करून अल्प कालावधीत मोक्षाला नेणे

आचार-विचार-विहार अशा धर्मसंहितेतून प्रत्यक्ष समाजाला धर्माचरण करण्यास उद्युक्‍त करणार्‍या पुरोहितांना सिद्ध करून त्यांनाही, परिणामी समाजालाही ईश्‍वरप्राप्तीची योग्य दिशा दाखवणार्‍या आणि अल्प कालावधीत मोक्षाला नेणार्‍या या पाठशाळेची निर्मिती करण्याचा प.पू. डॉक्टरांचा व्यापक उद्देश कळण्यास यातून साहाय्य होईल.’

– सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, चैत्र कृष्ण अष्टमी (२८.४.२००८), सायं. ५.०२)

Leave a Comment