मुलांना व्यावहारिक गोष्टींमध्ये न अडकवता त्यांना साधनेत प्रगती करण्याची प्रेरणा देणारे आणि उतारवयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने सेवा करणारे सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप !

 

१. सनातन संस्थेत येण्यापूर्वीची साधना

१ अ. गुरुवारी उपवास आणि दत्ताची पूजा मनोभावे करणे

‘बाबा पूर्वीपासून प्रत्येक गुरुवारी दत्ताचा उपवास करत आणि दत्ताच्या चित्राची मनोभावे पूजा करत. बाबा गुरुचरित्राचे पारायणही करायचे.

१ आ. ते ‘तुकारामाची गाथा’ वाचत असत.

१ इ. संसारात अलिप्त राहून नामजपाकडे लक्ष देणे

बाबा संध्याकाळी नोकरीवरून घरी आल्यावर आमच्याशी विविध विषयांवर तेवढ्यापुरती चर्चा करायचे आणि त्यानंतर पलंगावर विश्रांती घेत नामजप करायचे. स्वतः करत असलेल्या साधनेविषयी ते इतरांशी कधीही चर्चा करत नसत. काही वेळा त्यांना नोकरीत फिरती असतांना अनेक घंटे बसने प्रवास करावा लागायचा. त्या वेळी हा वेळ न दवडता बाबा सातत्याने नामजप करायचे.

१ ई. नोकरीवरून घरी आल्यावर देवळात कीर्तनाला जाणे

बाबा नोकरी करून संध्याकाळी घरी यायचे, तेव्हा ते थकलेले असायचे, तरीही ते आईच्या समवेत रात्री देवळात कीर्तन श्रवणासाठी जायचे.

१ उ. आध्यात्मिक कार्यक्रमाची आवड

सुटीच्या दिवशी कुठे आध्यात्मिक कार्यक्रम असल्यास ते घरी न थांबता त्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे.

 

२. गुणवैशिष्ट्ये

२ अ. काटकसरी

१. बाबा शासकीय नोकरीत लेखा परीक्षा अधिकारी म्हणून काम करत होते, तरीही त्यांच्याकडे ठराविक कपडेच होते. हेच कपडे त्यांनी वर्षानुवर्षे वापरले. त्यांनी क्वचित् प्रसंगीच नवीन कपड्यांची खरेदी केली.

२. नोकरीचे ठिकाण घरापासून काही अंतरावर होते. बाबा रिक्शाने न जाता चालत जात असत.

३. अन्य ठिकाणी रिक्शाने जायचे असल्यास स्वतंत्र रिक्शा न करता सीटप्रमाणे, म्हणजे अन्य व्यक्तींच्या समवेत रिक्शाने प्रवास करत.

४. अन्य गावी प्रवास करतांना खाजगी बसने प्रवास न करता शासकीय बसने अल्प पैशांमध्ये प्रवास करत.

२ आ. उत्तम आरोग्य लाभणे

बाबा तापामुळे झोपले आहेत किंवा शारीरिक व्याधींवर उपचारासाठी त्यांना कधी रुग्णालयात जावे लागले, असे आम्ही कधी पाहिले नाही. ‘बाबांना उत्तम आरोग्य त्यांच्या साधनेमुळेच प्राप्त झाले आहे’, असे आम्हाला वाटते.

 

३. कौटुंबिक जीवन

३ अ. मुलांकडून व्यावहारिक अपेक्षा नसणे

बाबांनी आमच्याकडून नोकरी करून भरपूर पैसे घरी आणावे किंवा विवाह करावा, याविषयी कधी आग्रह धरला नाही. कलियुगात असे घडणे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’ – श्री. राम (मुलगा) आणि कु. दीपाली (मुलगी) होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ आ. मुलाला १२ वीत अल्प गुण मिळाल्यावर न रागावता सकारात्मक रहाणे

‘मला लहानपणापासून आध्यात्मिक त्रास आहे’, हे मला सनातन संस्थेत आल्यावर समजले. १२ वीत शिकत असतांना माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली. त्यामुळे माझे अभ्यासात लक्ष लागत नसे. परिणामी मी जेमतेम गुणांनी १२ वी उत्तीर्ण झालो. तेव्हा बाबांनी ‘इतके अल्प गुण कसे मिळाले ? आता भविष्यात तुझे कसे होणार ?’, असे न म्हणता ‘उत्तीर्ण तरी झाला’, असे ते मला म्हणाले.

३ इ. मुलगा सलग दोन वर्षे अनुत्तीर्ण झाल्यावरही न रागावणे

श्री. राम होनप

१२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा मला होणारा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढला होता. अनावर गुंगी येणे आणि अन्य आध्यात्मिक त्रास यांमुळे माझे अभ्यासाकडे लक्ष नसायचे. महाविद्यालयात वर्ग चालू असतांना मला झोप यायची. त्यामुळे मी सलग दोन वर्षे अनुत्तीर्ण झालो. या दोन वर्षांत बाबांनी मला केवळ २ – ३ वेळा अभ्यास करण्याची आठवण करून दिली. याव्यतिरिक्त ते या कारणावरून माझ्याशी कधीही रागाने अथवा ओरडून बोलले नाहीत.’

– श्री. राम होनप

३ ई. मुलगी आजारी पडल्यावर तिची मनापासून आणि प्रेमाने सेवा करणे

‘महाविद्यालयात असतांना मी गंभीर आजारी होते. मला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मी २३ दिवस रुग्णालयात होते. त्या वेळी बाबा फिरतीवर असल्याने बाहेरगावी होते. मी आजारी असल्याचे कळल्यावर ते रजा घेऊन घरी आले. त्यांनी त्या कालावधीत घरून रुग्णालयात माझ्यासाठी डबा आणणे, हेलपाटे घालणे इत्यादी सेवा मनापासून, प्रेमाने आणि स्थिर राहून केल्या.

 

४. सनातन संस्थेशी संपर्क आणि केलेली सेवा

४ अ. घराजवळील मंदिरातील सनातनचे प्रवचन आवडल्याने आई-वडिलांनी मुलीला प्रवचनाला पाठवणे, जवळजवळ वर्षभर ती एकटीच सत्संगाला उपस्थित असणे, त्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारल्यावर त्यांनी सत्संग चालू ठेवण्यास सांगणे

कु. दीपाली होनप

वर्ष १९९८ मध्ये घराजवळील श्री भद्रकालीच्या मंदिरात सनातनचे प्रवचन होते. आई-बाबा त्या प्रवचनाला गेले होते. ते प्रवचन त्यांना आवडले. त्यामुळे त्यांनी आम्हाला पुढील प्रवचनाला जायला सांगितले. त्यानंतर मी नियमित सत्संगाला जाऊ लागले आणि सेवेत क्रियाशील झाले. तेथील सत्संगाला जवळजवळ एक वर्षभर मी एकटीच जात असे. सत्संगाला अन्य कुणी येत नसे. याविषयी सत्संग घेत असलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘ती एकटीच सत्संगाला येत असली, तरी सत्संग चालूच ठेवा.’’ कालांतराने माझ्यानंतर माझा भाऊ राम सत्संगाला येऊ लागला आणि सेवा करू लागला अन् आम्ही पूर्णवेळ साधक झालो. त्यानंतर बाबा सेवानिवृत्त झाल्यावर ते आणि आई रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करू लागले. त्यानंतर दोघांची प्रगती होऊन त्यांनी संतपद गाठले. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्या एकटीसाठी सत्संग चालू ठेवण्यामागील कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला. त्या सत्संगातून देवाला सनातनला दोन संत द्यायचे होते.

४ आ. कुलदेवतेचा नामजप आणि सेवा करणे

मी सत्संगाला जाऊ लागल्यावर साधक वैयक्तिक संपर्कासाठी घरी येऊ लागले. साधकांनी आई-बाबांना कुलदेवतेच्या नामाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी नामजपाला आरंभ केला. त्यानंतर काही दिवस बाबांनी सुटीच्या दिवशी साधकांनी दिलेल्या अर्पणाचा हिशोब ठेवण्याची सेवा केली.

 

५. मुलांना पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणे

माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नाशिक येथील सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ साधना करू लागले. त्या वेळी आई-बाबांनी विरोध न करता मला तसे करण्याची अनुमती दिली. त्यांनी ‘मी विवाह करावा किंवा नोकरी करावी’, असा आग्रह कधीच केला नाही.

५ अ. पूर्णवेळ साधना करायला निघालेल्या मुलीला केलेला उपदेश !

मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी देवद आश्रमात जायला निघाले असता बाबा मला म्हणाले, ‘‘आपण एकदा एक मार्ग निवडला की, कधीही मागे फिरायचे नाही. त्या मार्गाने यशच मिळवायचे. तू साधनेचा मार्ग निवडला आहेस, तर त्याच मार्गावर चालत रहा. कितीही अडथळे आले, तरी मागे फिरू नकोस.’’ त्या वेळी मला साधना करायला प्रेरणा मिळाली.’ – कु. दीपाली होनप

५ आ. मुलाचा अध्यात्माकडे असलेला कल पाहून साधनेत पूर्णवेळ होण्याचे सुचवणे

‘महाविद्यालयात सलग दोन वर्षे मी अनुत्तीर्ण झालो. याच काळात मी सनातन संस्थेशी जोडलो गेलो होतो. संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यावर तेथून जवळच असलेल्या सेवाकेंद्रात मी सेवेला जायचो. हळूहळू माझा साधनेकडे कल वाढू लागला. हे पाहून बाबा एकदा मला म्हणाले, ‘‘शिक्षण न घेता तुला पूर्णवेळ साधना करायची असल्यास तू करू शकतोस.’’ – श्री. राम होनप

५ इ. मुले पूर्णवेळ साधक झाल्यावर नातेवाईक
आणि समाज यांच्या प्रश्‍नांना ठामपणे उत्तरे देणे

‘मी आणि राम पूर्णवेळ साधक झाल्यावर नातेवाईक अन् आजूबाजूचे लोक आमच्यावरून आई-बाबांना बोलत असत. ‘मुलांचे पुढे कसे होईल ?’, अशा तर्‍हेचे प्रश्‍न ते विचारत; पण दोघेही त्यांना ठामपणे उत्तरे देत. ‘देव त्यांचे बघेल’, असे ते लोकांना सांगत.’ – कु. दीपाली होनप

 

६. पूर्णवेळ साधना

६ अ. पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात
आल्यावर मनापासून आणि झोकून देऊन साधना करण्यास प्रारंभ करणे

‘वर्ष २००६ मध्ये आई-बाबा पूर्णवेळ साधना करण्यासाठी नाशिकहून रामनाथी आश्रमात आले. ते लेखाची सेवा करत असत, तसेच त्यांना ध्यानमंदिरात प्रतिदिन पूजा अन् आरती करण्याची सेवा मिळाली. त्यांनी आश्रमात आल्यापासून वेळ न दवडता सतत साधनारत रहाण्याचा प्रयत्न केला.

६ आ. लेखाची सेवा नामजपासहित आणि भावपूर्ण करणे

बाबांना अर्पणाची पावती-पुस्तके मोजण्याची सेवा मिळाली होती. त्यातील प्रत्येक पावती ते नामजपासहित मोजत होते आणि प्रत्येक सेवा भावपूर्ण करत होते.

६ इ. आश्रमात पूर्णवेळ साधक झाल्यापासून
पालट म्हणून घरी जाण्याचा विचार मनात न येणे

आश्रमात पूर्ण झाल्यापासून, ‘आता कंटाळा आला आहे. काही दिवस पालट म्हणून घरी जातो’, असा विचार त्यांच्या मनात कधीही आला नाही.

६ ई. आध्यात्मिक त्रास असलेल्या
साधकांसाठी नामजप करण्याची सेवा झोकून देऊन करणे

वर्ष २००८ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर त्यांना आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी नामजप करण्याची सेवा मिळाली. बाबांना अनेक वेळा आरती करण्याचा अथवा साधकांना त्रास होत असल्यास त्यांच्यासाठी नामजप करण्याचा रात्री-अपरात्रीही निरोप यायचा, तरीही बाबांनी या सेवांना कधी नकार दिला नाही.’ – श्री. राम आणि कु. दीपाली होनप

 

७. प्रतिकूल परिस्थितीत केलेली साधना

७ अ. पत्नी आणि मुलगा दोघेही एकाच वेळी रुग्णाईत असतांना मनाने स्थिर रहाणे

‘वर्ष २००८ मध्ये आईला अर्धांगवायूचा झटका आला, तसेच पार्किन्सस हा आजार झाला. त्यामुळे आईचे शरीर लुळे पडले आणि तिची स्मृतीही अल्प झाली. त्यानंतर मी दीर्घकाळ रुग्णाईत होतो. अशा स्थितीत बाबांचे मन स्थिर होते आणि या परिस्थितीतही ते आनंदाने साधनारत रहायचे.

७ आ. पत्नी आणि मुलगा यांची सेवा न कंटाळता आनंदाने करणे

आई आणि मी दीर्घकाळ रुग्णाईत होतो. आमची सेवा माझी बहीण आणि बाबा यांना करावी लागत असे. मला वैद्यकीय उपचारांसाठी मिरज येथे जावे लागले. तेथे मी आठ दिवस रुग्णालयात भरती होतो. त्या वेळी बाबा माझी सेवा करायचे. रुग्णालयात त्यांना बरीच धावपळ करावी लागायची; परंतु ते न कंटाळता अथवा चिडचिड न करता माझी सर्व सेवा आनंदाने करत होते.

७ इ. कठीण परिस्थितीत देवाला दोष न देणे

त्या कठीण परिस्थितीतही बाबांच्या मनात ‘आम्ही सगळे पूर्णवेळ साधना करतो. देवाने आमच्या संदर्भात असे का केले ?’, असा विचार आला नाही आणि त्यांनी कधीही देवाला दोष दिला नाही.’ – श्री. राम होनप

७ ई. ‘१२.८.२०१० या दिवशी आईने देहत्याग केला. तिचे ३ वर्षांचे आजारपण आणि देहत्याग या कालावधीत बाबा स्थिर होते.

 

८. बाबांमध्ये झालेला पालट

८ अ. राग येण्याचे प्रमाण उणावणे

पूर्वी बाबा पुष्कळ रागीट होते. एकदा त्यांना राग आलेला असतांना त्यांनी उलथणे फेकले. ते एका ताटाला लागले आणि त्या ताटाला एक भोक पडले होते. साधनेत आल्यानंतर त्यांचा रागीटपणा उणावला आहे.’ – कु. दीपाली होनप

 

९. संतपद प्राप्त झाल्यानंतर

९ अ. संतपद प्राप्त झाल्याची वार्ता स्वतःहून नातेवाइकांना कळवणे

‘११.६.२०११ या दिवशी आश्रमातील एका कार्यक्रमात बाबांना संत म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतःहून भ्रमणभाष करून ही वार्ता नातेवाइकांना कळवली. यातून ‘प्रेमभाव आणि अहं अल्प असणे’, हे त्यांचे गुण माझ्या लक्षात आले.

९ आ. संतपद प्राप्त झाल्यानंतरही देवळात कीर्तन श्रवणासाठी जाणे

बाबांना काही कामानिमित्त नाशिकला जावे लागत होते. त्यांना सत्संगाची गोडी असल्याने संतपद प्राप्त झाल्यानंतरही बाबा पूर्वीप्रमाणे कीर्तन ऐकण्यासाठी जात होते.’ – श्री. राम आणि कु. दीपाली

९ इ. मुलीविषयी तिच्या लहानपणी झालेल्या चुकीविषयी क्षमायाचना करणे

‘मी लहान असतांना माझ्याकडून दळणाचा डबा आणतांना त्यातील पीठ सांडले होते. त्या वेळी बाबांनी मला मारले होते. मे २०१८ मध्ये झालेल्या भाववृद्धी सत्संगात आपल्या कुटुंबियांच्या संदर्भात झालेल्या चुकांच्या संदर्भात त्यांची क्षमायाचना करण्यास सांगितले होते. तो सत्संग झाल्यावर बाबांनी मला लगेच भ्रमणभाष करून माझी क्षमायाचना केली. संत असूनही चुकांविषयीची त्यांची संवेदनशीलता आणि अल्प अहं पाहून माझी भावजागृती झाली.

 

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे

१० अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली चूक स्वीकारणे

एकदा बाबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील सर्व साधकांसाठी श्रीखंड मागवले होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी भेटीदरम्यान परात्पर गुरु डॉ. आठवले बाबांना म्हणाले, ‘‘काल वाढदिवस चांगला झाला ना ! सगळ्यांना श्रीखंड दिले; पण ‘पात्रे दानम् ।’ महत्त्वाचे असते. आश्रमात भाव असलेले साधक थोडेच आहेत. सगळ्यांसाठी श्रीखंड आणण्याची आवश्यकता नव्हती. भाव असलेल्या साधकांना खाऊ देऊ शकतो.’’ तेव्हा बाबा आश्रमात नवीनच आले होते, तरीही बाबांनी ही चूक स्वीकारली.

१० आ. महाराष्ट्र आणि नंतर इतर राज्ये येथे सेवेसाठी जाणे

‘संत झाल्यानंतर यांनी बाबांनी आधी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आणि नंतर अनेक राज्यांत जाऊन सेवा केली.

 

११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले कौतुकोद्गार

अ. एकदा माझी परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाली. तेव्हा त्यांच्याशी बोलतांना बाबांच्या नावाच्या संदर्भात विषय निघाला. बाबांचे नाव ‘पद्माकर’ आहे. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘पद्माकरचा अर्थ कमळाप्रमाणे हात असलेला; पण बाबांचे बोलणे, हसणे सगळेच कमळाप्रमाणे आहे.’’

आ. बाबांना ठराविक काळाने एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवास करावा लागायचा. हा प्रवास ते शारीरिक क्षमता उत्तम असलेल्या एखाद्या तरुणाप्रमाणे करत होते. या विषयाला अनुसरून एकदा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘बाबा, ‘युवा संत’ आहेत.’’ – कु. दीपाली होनप

 

१२. बाबांविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१२ अ. लहानपणापासून बाबांचे हास्य पाहून चिडचिड होणे

जेव्हा बाबा काही प्रसंगी जोराने हसायचे, तेव्हा ते मला सहन होत नसे आणि त्या वेळी माझी चिडचिड व्हायची; कारण ‘त्यांच्या हास्यातून माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याने मला तसा त्रास होत होता’, हे माझ्या आता लक्षात आले.

१२ आ. शस्त्रकर्म चालू असतांना कुणीतरी नामजप
करत असल्याने त्रास सहन करण्याची शक्ती मिळत असल्याचे जाणवणेे

रुग्णाईत असतांना मिरज येथे माझे एक शस्त्रकर्म झाले. हे शस्त्रकर्म चालू असतांना ‘कुणीतरी माझ्यासाठी नामजप करत असून त्यामुळे मला हा त्रास सहन करण्याची शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवत होते. शस्त्रकर्म झाल्यानंतर मी हे सूत्र बाबांना सांगितले. तेव्हा त्यांनी शस्त्रकर्माच्या वेळी त्यांनी माझ्यासाठी नामजप केला असल्याचे सांगितले.

१२ इ. रुग्णालयातील खोलीत बाबांमुळे चैतन्य जाणवणे

मी मिरज येथील रुग्णालयात असतांना आठ दिवस बाबा माझ्यासमवेत होते. तेव्हा बाबांमुळे मला रुग्णालयातील खोलीत चैतन्य जाणवत होते. त्यामुळे मला होणारा त्रास सुसह्य होत होता. – श्री. राम होनप

 

१३. ‘मनात केवळ साधनेचे विचार
असावेत’, यासाठी स्वतःचे घर आणि शेती विकणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा म्हणाले होते, ‘‘जे आपल्याकडे आहे, त्याविषयी आपल्या मनात विचार येतात. जी वस्तू आपल्याकडे नाही, त्याविषयी आपल्या मनात विचार येत नाहीत.’’ ‘मनात केवळ साधनेचे विचार असावेत’, यासाठी बाबांनी वर्ष २०१५ मध्ये आमचे नाशिकचे घर आणि वर्ष २०१८ मध्ये त्यांची गावाकडील शेती विकली. – कु. दीपाली होनप (१३.७.२०१८)