कृतज्ञताभावात असलेले आणि श्री गुरूंचा स्थूल अन् सूक्ष्म सत्संग नित्य अनुभवणारे सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा !

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

१. बालपण

‘आम्ही पाच भावंडे. मला एक मोठा भाऊ आणि तीन मोठ्या बहिणी ! माझ्या वयाच्या ४ थ्या वर्षी वडील अन् ५६ व्या वर्षी माझी आई निवर्तली.

२. वाहनाची सोय नसल्याने पायी किंवा सायकलने प्रवास करून शिक्षण घ्यावे लागणे आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतांना ‘इलेक्ट्रिकल अन् इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयांतील शिक्षणही घेणे

माझे इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत, तर ८ वी ते ११ वी पर्यंतचे शिक्षण गावापासून ४ कि.मी. अंतरावर असणार्‍या माध्यमिक विद्यालयात झाले. माझा प्रतिदिन १६ कि.मी.चा पायी प्रवास व्हायचा. ११ वी नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी आम्हाला कारवार शहरामध्ये जावे लागायचे. तेथे जातांना वाटेत नदी लागायची. ती १ कि.मी. रुंद असल्याने ती पार करण्यासाठी होडी असायची; परंतु त्यासाठी बराच वेळ थांबावे लागायचे. त्या काळी वाहनांची सोय नसल्याने घरापासून एकूण ११ कि.मी. अंतराचा प्रवास पायी किंवा सायकलने करावा लागायचा. पावसाळ्यात मला वेळेत महाविद्यालयात पोहोचणे शक्य होत नसल्याने ‘मी माझ्या मावस भावाकडे रहायचे’, असा निर्णय घेतला. त्याच्याकडे रहात असतांना महाविद्यालयीन शिक्षणासह ‘इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयांतील शिक्षण घेण्याचाही योग आला. अशी ४ वर्षे झाल्यावर वर्ष १९६५ मध्ये मी ‘बी.ए.’ची परीक्षा उत्तीर्ण झालो.

३. गावातील वातावरण धार्मिक असल्याने देवाधर्माची आवड निर्माण होणे

तो वर्ष १९५० – ६० चा काळ असल्यामुळे त्या वेळी आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीचा परिणाम दिसत नव्हता. त्यामुळे गावात धार्मिक वातावरण असायचे. घरोघरी आणि मंदिरांत देवपूजा, स्तोत्रपठण, तसेच पुराणकथा-श्रवण असायचे. या धार्मिक वातावरणाचा माझ्यावर परिणाम होत होता आणि मला स्वतःलाही या सगळ्याची आवड होती. माझे एक नातेवाईक संन्यासी होते. त्यांच्या संपर्कात असल्याने माझ्याकडून देवादिकांची सेवा व्हायची. मी प्रतिदिन देवपूजा, अभिषेक, तसेच सूक्त आणि स्तोत्र पठण करायचो. अधूनमधून ज्ञानेश्‍वरी आणि गुरुचरित्र यांचे वाचनही करायचो.

४. स्वतःचा व्यवसाय चालू करणे आणि पत्नीचे
पूर्ण सहकार्य लाभल्याने समाधानाचे जीवन जगणे शक्य होणे

महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर वर्ष १९६५ मध्ये मी माध्यमिक शाळेत ‘शिक्षक’ म्हणून नोकरी केली. मला ‘इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयांत खूप आवड असल्याने, तसेच थोडेफार प्रायोगिक शिक्षण मिळाल्याने वर्ष १९६७ मध्ये मी नोकरी सोडून व्यवसाय चालू केला. काही वर्षे व्यवसाय केल्यावर वैवाहिक जीवन जगण्याचा योग जुळून आला आणि वर्ष १९७२ मध्ये माझा विवाह झाला. पुढील आयुष्यात पत्नीचे पूर्ण सहकार्य लाभले. तिची कष्ट सोसण्याची सिद्धता आणि समाधानी वृत्ती यांमुळे मुला-मुलींची मंगलकार्ये इत्यादी व्यावहारिक गोष्टी पूर्ण करता आल्या. त्याचप्रमाणे समाधानाचे जीवन जगणे शक्य झाले.

५. सनातनशी संपर्क

५ अ. साधनेची आवड निर्माण होणे

वर्ष १९९४ मध्ये सनातन संस्थेशी माझा पहिल्यांदा संपर्क झाला. कारवार येथे दोन ठिकाणी विजयादिवशीच्या निमित्ताने सनातन संस्थेची प्रवचने झाली. या दोन्ही प्रवचनांना मी उपस्थित होतो. नंतर कारवारमध्ये पाक्षिक (१५ दिवसांनी एकदा) सत्संग चालू झाले. तेथे येणार्‍या साधकांच्या माध्यमातून देवाने देह, मन आणि बुद्धी यांमध्ये साधनेची आवड निर्माण केली.

५ आ. व्यवसाय करत असतांना ‘मला सर्व काही समजते’, या तीव्र अहंमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणे आणि याच काळात श्री गुरूंनी सनातन संस्थेच्या संपर्कात आणणे

सनातन संस्थेचे मार्गदर्शन, तसेच माझे मन, बुद्धी आणि देह यांची साधना झाली नसती, तर आज मी वेड्यांच्या इस्पितळात असतो किंवा मी मृत्यू पावलो असतो. व्यवसाय करत असतांना ‘मला सर्वकाही समजते, मला काही जाणून घेण्याची आवश्यकता नाही’, या तीव्र अहंमुळे माझे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. याच वेळी श्री गुरूंनी मला सनातन संस्थेच्या संपर्कात आणले.

मी वर्ष १९८० मध्ये १० जणांशी भागीदारी करून मोठा व्यवसाय चालू केला; पण त्यात पुष्कळ हानी झाल्याने गुरुदेवांनी (गुरुतत्त्वाने) मला अध्यात्माकडे वळवले. प.पू. गुरुदेवांनी ‘प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथात एक वाक्य दिले आहे, ‘गुरुकृपा झाली आणि दवाखान्यात येणारे रुग्ण कमी झाले.’ अध्यात्मात प्रगती व्हायची असेल, तर व्यवहारात अडचणी येऊ शकतात.

५ इ. १९९६ या वर्षी सनातनची सांगली येथील गुरुपौर्णिमा अनुभवल्यानंतर सेवेला प्रारंभ होणे

वर्ष १९९४ – १९९५ या काळात केवळ श्रोता म्हणून मी प्रत्येक सत्संगाला उपस्थित रहात होतो. वर्ष १९९६ मध्ये सांगली येथे मी सनातनची पहिली गुरुपौर्णिमा अनुभवली आणि तेव्हापासून मी क्रियाशील होऊन सेवेला आरंभ केला. उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रवचनाचा प्रसार करणे, गुरुपौर्णिमेचा प्रचार, संपर्क, सनातन प्रभात वितरण, नूतनीकरण करणे, तसेच नवीन वर्गणीदार बनवणे इत्यादी सेवा मी केल्या. उत्तर कन्नड आणि अन्य जिल्हे या ठिकाणी सत्संग, अभ्यासवर्ग, वाचक मेळावा, गुरुपौर्णिमा पूजाविधी, तसेच प्रवचन करणे, ग्रंथ प्रदर्शन, विज्ञापन संकलन इत्यादी माध्यमांतून माझी सेवा झाली. याचसमवेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांत रेल्वेचा, तसेच बसचा प्रवास करतांना ६ वर्षे ग्रंथ वितरणाची सेवा केली.

६. जीवनात आलेले मृत्यूचे प्रसंग आणि गुरुदेवांनी दिलेले जीवनदान !

अ. एकदा मी समुद्रस्नान करण्यासाठी गेल्यावर माझी बुडून मरण्याची वेळ आली होती; पण मला गुरुदेवांनी वाचवले.

आ. एकदा मला विजेचा झटका बसून मी १५ मिनिटे बेशुद्धावस्थेत होतो.

इ. एकदा मी बसलेली ऑटोरिक्शा दरीत कोसळल्यामुळे ३ घंटे ‘कोमा’त (अर्धबेशुद्धावस्थेत) होतोे.

अशा सर्व प्रसंगांतून प.पू. गुरुदेवांनी मला वाचवले आणि जीवदान दिले. या सगळ्याची जाणीव होऊन मला खूप कृतज्ञता वाटते.

७. प.पू. गुरुदेवांच्या कृपेची येत असलेली प्रचीती !

वर्ष १९९७ मध्ये प.पू. गुरुदेव कारवार येथे आले असतांना मला म्हणाले होते, ‘‘तुमची प्रकृती चांगली राहील !’’ त्यांच्या याच कृपेमुळे माझ्या जन्मपत्रिकेत २०००-२००२ या वर्षी असणारा महामृत्यूयोग टळला असून आजपर्यंत चांगले आरोग्य राहिले आहे. प.पू. गुरुदेवांनी आरोग्य ही धनसंपत्ती दिली आहे.

८. स्वतःमध्ये झालेले पालट !

प.पू. गुरुदेव आणि सनातन संस्था यांच्या संपर्कात आल्यापासून माझ्यात पुष्कळ पालट झाले आहेत.

अ. माझ्या ‘राग येणे’ या स्वभावदोषात कल्पनातीत पालट झाला आहे.

आ. इतरांचे ऐकून घेणे, इतरांचा विचार करणे, तसेच स्वीकारणे यांमध्ये पुष्कळ वाढ झाली आहे.

इ. माझे असमाधानी असलेलेे मन आता समाधानी झाले आहे. माझे दिशाहीनपणे भरकटत असलेले मन स्थिर होऊन खर्‍या स्वहिताचा विचार करत आहे.

ई. कर्तेपणाचा विचार आणि आत्मकेंद्रितपणा न्यून होऊन ‘ईश्‍वरकेंद्रित’पणा वाढत आहे.

उ. माझी ‘प्रपंचाकडे असणारी आसक्ती ही आता परमेश्‍वराकडे ओढणारी प्रीती’, अशी होत आहे !

९. स्थुलातून आणि सूक्ष्मातून लाभणारा परात्पर गुरुदेवांचा सत्संग !

मला स्थुलातून आणि सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांचा सत्संग सतत अनुभवता येतो. त्यांची प्रीती अवर्णनीय आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी गुणवृद्धी अन् दोषनिर्मूलन यांसाठी आवश्यक ती सूत्रे मिळत असतात. ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्रफिती आदी माध्यमांतून त्यांच्या प्रीतीचा अमृतवर्षाव सतत अनुभवता येतो. शरणागती, अपराधी भाव, तसेच कृतज्ञता हे सर्व चित्ताने अनुभवायचे विषय आहेत. त्यांना शब्दांत गोवणे, म्हणजे जे अतर्क्य आहे, त्याला तर्काने जाणण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

१०. ‘कर्तेपणा’ या अहंच्या पैलूविषयी झालेली जाणीव !

१० अ. कर्तेपणाचे विचार आले की, सेवा न होणे आणि असे विचार नसतांना सेवा होणे, यातून ‘प.पू. गुरुदेवांना कार्य नको, तर साधकांची साधना होणे अपेक्षित आहे’, याची जाणीव होणे

‘देवाला ‘कर्तेपणा’ सहन होत नाही’, या संदर्भात मला पुढील अनुभूती आली. वर्ष २००४ ते २००७ या चार वर्षांमध्ये मी मराठी आणि कन्नड या भाषांतील ‘सनातन प्रभात’चे वितरण करायचो. सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये अथवा जत्रेमध्ये अंक वितरण करत असतांना ‘इथे बरेच लोक आहेत. मी ५ ते १० अंक सहज वितरण करीन’, असा विचार माझ्या मनात यायचा. असा विचार आला की, त्या वेळी वितरण होत नसे; पण ‘देवा, तूच काय ते करून घे’, असा विचार असला की, पुष्कळ अंकांचे वितरण व्हायचे. यातून ‘प.पू. गुरुदेवांना कार्य नको, तर साधकांची साधना होणे अपेक्षित आहे’, हे मला शिकायला मिळाले. त्याचबरोबर ‘साधकांतील ‘कर्तेपणा’ हा अहंचा पैलू देवाला आवडत नाही’, याची मला जाणीव झाली.

१० आ. कर्तेपण अल्प होणे

६० टक्के आध्यात्मिक पातळीपासून ७० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीत कर्तेपणा न्यून होऊ लागला. ‘कोणीतरी माझ्याकडून हे सर्व करून घेत आहे’, असे मला जाणवायचे. आहार न घेता १६ ते १८ घंटे सेवा करूनही माझा उत्साह टिकून असे. त्यामुळे मला अनुभवायला यायचे की, कर्ता मी नसून ‘भगवंत’ आहेे. मधून मधून शक्ती, तसेच आकाश या तत्त्वांची अनुभूती यायची.

कर्ता आणि करविता एकच असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण !’

– (पू.) श्री. विनायक कर्वे, मंगळुरू सेवाकेंद्र, कर्नाटक (१०.७.२०१८)

Leave a Comment