‘निरपेक्ष प्रेम’ हा स्थायी भाव असल्याने ‘सनातनच्या साधकांची आई’ झालेल्या सनातनच्या ४९ व्या संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई, ठाणे

कवीने आईचे वर्णन ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई ।’, असे केले आहे. मला कळायला लागल्यापासून आईचे हे स्वरूप मी अनुभवत आहे. शाळा-महाविद्यालयांत असतांना, लग्न झाल्यावर आणि नंतर मुले झाल्यावर, म्हणजे जीवनाच्या वेगवेगळ्या वळणांवर त्या त्या वेळी आवश्यक असणारा आधार तिने मला दिला आहे. आईच्या स्वभावातले मला जाणवलेले वेगवेगळे पैलू पुढीलप्रमाणे आहेत.

 

१. धार्मिक वृत्ती

पूर्वीपासूनच आई हिंदु संस्कृतीप्रमाणे सर्व व्रतवैकल्ये, पूजा-अर्चा आदी करायची आणि याला नामस्मरण, तसेच आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन याची जोडही अगोदरपासूनच होती. ती पूज्य कलावती आईंनी सांगितलेली साधना करत होती.

२. वडील अत्यंत कडक शिस्तीचे
असल्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय कठोर
वाटणे आणि आईने त्यामागील विचार नीट समजावून सांगणे

माझे वडील अत्यंत कडक शिस्तीचे होते. त्यांच्या मताशी पूर्णपणे एकरूप होणे आणि त्यांचे संपूर्ण आज्ञापालन करणे, अशा प्रकारचे आईचे आचरण होते. बाबांनी आमच्या बाबतीत घेतलेले निर्णय (आमच्या भल्यासाठी घेतलेले असले, तरीही) अनेकदा आम्हाला कठोर वाटायचे; परंतु आई त्यामागील विचार आम्हाला नीट समजावून सांगायची.

३. बाबांच्या सहवासात आई पूर्णपणे
अहंकारशून्य होणे आणि वर्ष २०१५ च्या
गुरुपौर्णिमेला तिला ‘सनातनचे संतपद’ मिळणे

साधनेमध्ये सर्वांत मोठा अडथळा अहंकाराचा असतो. तिच्यातील ‘मी’पणा, ‘मी-माझे’ हे सर्व बाबांच्या सहवासात असतांना नाहीसे झाल्यामुळे ती अहंकारशून्य झाली. त्यामुळेच बाबा गेल्यानंतर तिची आध्यात्मिक प्रगती प्रारंभी ६० टक्के आणि त्यानंतर ७० टक्के अशी झपाट्याने झाली. वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला तिला ‘सनातनचे संतपद’ मिळाल्याची घोषणा झाल्यावर आम्हाला अत्यंत आनंद झाला.

 

४. संसारातून अलिप्तता

४ अ. पू. आईला सांसारिक गप्पागोष्टी, तसेच अती बडबड करणारी माणसे न आवडणे

सांसारिक गोष्टींविषयीच्या गप्पा, तसेच इतरांच्या गुण-दोषांचे वर्णन यांची तिला आता आवड राहिलेली नाही. अशा प्रकारच्या गप्पा चालू असलेल्या ठिकाणी ती फार काळ थांबत नाही. त्याचप्रमाणे अती बडबड करणारी माणसेही तिला फारशी आवडत नाहीत. सात्त्विकता वाढल्यामुळे तिला अती बोलण्याचा त्रास होतो.

४ आ. पू. आईला पैसा, दागिने आदींचा
मोह नसणे आणि ‘आपल्यासह श्रीकृष्ण अन्
परात्पर गुरु असतांना धनाची काय आवश्यकता ?’, असे वाटणे

श्री. रवींद्र वामन प्रभुदेसाई

अनेकांना पैसा, दागिने आणि साड्या अशा विषयांचा मोह सुटत नाही; मात्र आईजवळ कोणत्याही प्रकारचा बडेजाव नाही. तिच्याकडे असलेले सर्व दागिने तिने सौ. मेधा (मोठी मुलगी), सौ. मीनल (धाकटी मुलगी) आणि सौ. वृषाली (सून) यांना देऊन टाकले आहेत. बाबांच्या नावे अधिकोषात असलेल्या सर्व पैशांचा व्यवहार सौ. मेधा पहाते. त्यातून मिळणारी रक्कम ती सनातनच्या कार्यासाठी अर्पण करते. ‘आपल्या समवेत श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले असतांना या पैशांची काय आवश्यकता ?’, अशी तिची भावना असते.

 

५. ‘निरपेक्ष प्रेम’ हा पू. आईचा स्थायी भाव

५ अ. नातवंडांशी अतिशय प्रेमाने वागणे

आमच्या लहानपणी आई कठोर होती. आम्हा भावंडांमध्ये सतत होणार्‍या भांडणांमुळे ती आम्हाला मारकुटीसुद्धा वाटायची; पण आता नातवंडे, म्हणजेच कु. परीक्षित, कु. प्रियांका, कु. गायत्री आणि चि. कुशल यांच्याशी ती अतिशय प्रेमाने वागते. ही सर्व नातवंडे तिच्या खोलीत जाऊन तिच्याशी गप्पा मारत बसतात. आईची खोली ही सर्वांकरता हक्काची खोली आहे. पू. आईचे केस लांबसडक आहेत. प्रियांका अनेकदा त्या केसांशी खेळते; पण आई मात्र तिला कधीच ओरडत नाही. नातवंडांना कामे सांगणे, हेही तिच्या स्वभावात नाही. ‘निरपेक्ष प्रेम’, हाच तिचा स्थायी भाव आहे.

५ आ. साधकांना ‘साधना करा, म्हणजे सगळे नीट होईल’, असे सांगणे

नातवंडांप्रमाणेच आमच्या घरी येणारे सनातनचे साधकसुद्धा तिच्या खोलीत जाऊन तिच्याशी गप्पा मारत बसतात. त्यांना साधनेत येणार्‍या अडचणींविषयी तिला सांगतात. आई त्यांना साधनेचे महत्त्व सांगते; मात्र सांसारिक समस्यांविषयी ती ऐकून घेत नाही. ‘साधना करा, म्हणजे सगळे नीट होईल’, असे तिचे सांगणे असते.

 

६. वयाच्या ८२ व्या वर्षी चालू असलेला पू. आईचा दिनक्रम !

६ अ. ठराविक जागी बसून नामस्मरण करणे,
तसेच दैनिक सनातन प्रभात आणि अन्य आध्यात्मिक ग्रंथ यांचे वाचन करणे

आई सकाळी ६.३० वाजता उठते. नैमित्तिक कर्मे झाल्यावर विष्णु सहस्रनाम, नामस्मरण इत्यादी करते. ती स्वतःच तिचे कपडे धुलाई यंत्रात (वॉशिंग मशीनमध्ये’) धुऊन वाळत घालते. नंतर थोडासा आहार किंवा दूध घेऊन पुन्हा आमच्या ‘हॉल’मधल्या झोपाळ्याजवळ असलेल्या कट्ट्यावर ती नामस्मरण करायला बसते. तिची नामस्मरणाला बसायची जागा ठरलेली आहे. तेथून समोर येणारी-जाणारी मंडळी तिला दिसत असतात. आई दिसली नाही, तर अनेक जण आमच्याजवळ तिची चौकशी करतात. त्यानंतर दुपारी ११ च्या सुमारास ती थोडी विश्रांती घेते आणि त्यानंतर दैनिक सनातन प्रभात, तसेच अन्य आध्यात्मिक ग्रंथ यांचे वाचन करते.

६ आ. दिवसातला सर्वाधिक काळ नामस्मरणातच जाणे

सकाळी दूध प्यायच्या वेळी तिची आणि माझी भेट झालीच, तर ‘चहा झाला का ?’, असे म्हणून ती चौकशी करते. चहा झाला नसेल, तर करूनही देते; परंतु ती स्वयंपाकघरात फारसा हस्तक्षेप करत नाही. दुपारी जेवण झाल्यावर वामकुक्षी घेऊन पुन्हा वाचन आणि नामस्मरण करते. संध्याकाळी सौ. मेधा आणि मुले घरात आल्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारते. नातेवाइकांची चौकशी करते. दूरचित्रवाणीवर काही निवडक मालिका पहाते. रात्री पुन्हा नामस्मरण करते. आज वयाच्या ८२ व्या वर्षीही तिची दृष्टी उत्तम आहे. तिचा दिवसातला सर्वाधिक काळ नामस्मरणातच जातो.

 

७. सोशिक स्वभाव

कधी कधी तिला बारीक आजार, चक्कर येणे इत्यादी त्रास होतात; पण ती त्याविषयी कोणाला सांगत नाही. आम्हाला जाणवले, तर आम्हीच त्याची चौकशी करतो.

 

८. आजवर वेगवेगळ्या रूपांत भेटलेली आई
आता मात्र परमेश्‍वराशी पूर्णपणे एकरूप झालेली असणे

प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी आमच्या दुसर्‍या सदनिकेमध्ये सत्संग होतो. तिथे पू. आईला जेवढा वेळ बसवेल, तेवढा वेळ ती अवश्य उपस्थित रहाते. सनातन संस्थेकडून वेळोवेळी सांगितल्या जाणार्‍या नामजपाचे ती तंतोतंत पालन करते. आजवर वेगवेगळ्या रूपांत आम्हाला भेटलेली आई आता मात्र परमेश्‍वराशी पूर्णपणे एकरूप झाली आहे. सनातनची संत झाल्यावर आमची आई ही ‘सनातनच्या सर्वच साधकांची आई’ झाली आहे.

तिची आध्यात्मिक प्रगती अशीच होत राहो आणि परात्पर गुरुदेवांच्या आशीर्वादाने तिला यापुढचे गुरुपदही मिळो, तसेच तिच्या साधनेचा अन् अस्तित्वाचा आम्हाला लाभ होत राहो, हीच परमेश्‍वर अन् गुरुचरणी प्रार्थना !’

– श्री. रवींद्र वामन प्रभुदेसाई (मुलगा), ठाणे (७.७.२०१८)

Leave a Comment