राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राजकीय नेतृत्व नव्हे, तर आध्यात्मिक नेतृत्व आवश्यक !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’
आणि ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘राष्ट्राचा खरा उत्कर्ष कसा होऊ शकतो ? केवळ भौतिक विकास म्हणजे खरा उत्कर्ष असू शकत नाही. राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राजकीय नेतृत्वाची नव्हे, तर आध्यात्मिक नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे. राष्ट्र आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम झाले, तर त्याचा प्रत्येक क्षेत्रात उत्कर्ष साधेल. ‘राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राजकीय नेतृत्व नव्हे, तर आध्यात्मिक नेतृत्व आवश्यक का ठरते ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २१.१.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका पटलावर (टेबलावर) चाचणीसाठी ठेवायच्या छायाचित्राला आधार देण्यासाठी पांढरा ठोकळा ठेवून वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळ नोंद’ होय. त्यानंतर एका देशाच्या हुकूमशहा राष्ट्राध्यक्षाचे छायाचित्र, एका लोकशाही राष्ट्राच्या राजकीय प्रमुखाचे छायाचित्र आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र अशी एकूण ३ छायाचित्रे (टीप) एकेक करून पटलावर ठेवून त्यांची ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘तिन्ही छायाचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे समजले.

टीप – ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जिथे ‘रूप’ आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात. यानुसार एखाद्या व्यक्तीच्या छायाचित्रामध्ये त्या व्यक्तीची स्पंदने विद्यमान असतात. त्यामुळे चाचणीतील व्यक्तींची छायाचित्रे अभ्यासासाठी निवडण्यात आली.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे goo.gl/tVR7Pw या दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. मूळ नोंद – मूळ नोंदीच्या प्रभावळीत (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीत) ४३ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने आणि ५७ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने होती.

पुढे दिलेल्या निरीक्षणांत चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.

२ आ. एका देशाच्या हुकूमशहा राष्ट्राध्यक्षाच्या छायाचित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या ‘चैतन्या’च्या स्पंदनांचे प्रमाण अल्प होणे

या छायाचित्राच्या प्रभावळीत एकूण नकारात्मक स्पंदने ४५ टक्के होती आणि सकारात्मक स्पंदने ५५ टक्के होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या छायाचित्राच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने २ टक्क्यांनी घटली होती. ही घट चैतन्याचा पिवळा रंग घटल्याने झाली होती. ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत एका देशाच्या हुकूमशहा राष्ट्राध्यक्षाच्या छायाचित्रामुळे वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण थोडे घटले, असे यावरून लक्षात येते.

२ इ. एका लोकशाही राष्ट्राच्या राजकीय प्रमुखाच्या छायाचित्रामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण थोडे वाढणे

या छायाचित्राच्या प्रभावळीत एकूण नकारात्मक स्पंदने ३६ टक्के होती आणि सकारात्मक स्पंदने ६४ टक्के होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या छायाचित्राच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने ७ टक्क्यांनी वाढली होती. ही वाढ चैतन्याचा पिवळा रंग वाढल्याने झाली होती. ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत एका लोकशाही राष्ट्राच्या राजकीय प्रमुखाच्या छायाचित्रामुळे वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण थोडे वाढले, असे यावरून लक्षात येते.

२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित होणे, तेथील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ७९ टक्के सकारात्मक स्पंदने आणि २१ टक्के नकारात्मक स्पंदने होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या छायाचित्राच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने २२ टक्क्यांनी वाढली होती.

२. चैतन्याचा पिवळा रंग ५१ टक्के होता, म्हणजे ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (२७ टक्क्यांच्या) तुलनेत तो पुष्कळ अधिक होता.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंग (८ टक्के) दिसत होता.

थोडक्यात, ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामुळे वातावरणातील चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले, असे लक्षात येते.

३. ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे
केलेल्या चाचणीतील निष्कर्ष ‘पिप’ चाचणीतील निष्कर्षांप्रमाणेच असणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने २०.१.२०१८ या दिवशी वरील तिन्ही छायाचित्रांची यू.टी. स्कॅनरने चाचणी करण्यात आली. तिन्ही छायाचित्रांच्या केलेल्या मोजणीच्या नोंदींतून त्यांच्यातील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जांच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात आली.

अ. एका देशाच्या हुकूमशहा राष्ट्राध्यक्षाच्या छायाचित्रात ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होत्या. त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे १.७४ मीटर आणि २ मीटर होत्या. या छायाचित्रामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. या छायाचित्राची एकूण प्रभावळ १.१२ मीटर होती.

आ. एका लोकशाही राष्ट्राच्या राजकीय प्रमुखाच्या छायाचित्रात नकारात्मक ऊर्जा नव्हती. त्या छायाचित्रामध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. तेव्हा यू.टी. स्कॅनरने ९० अंशाचा कोन केला. (यू.टी. स्कॅनरच्या भुजा १८० अंश कोनात उघडल्या, तरच प्रभावळ मोजता येते.) या छायाचित्राची एकूण प्रभावळ २ मीटर होती.

इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. त्या छायाचित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. तेव्हा यू.टी. स्कॅनरच्या भुजा १८० अंश कोनात उघडल्या. त्या ऊर्जेची प्रभावळ ३.४५ मीटर होती. या छायाचित्राची एकूण प्रभावळ ४.२४ मीटर होती.

थोडक्यात सांगायचे, तर तिन्ही छायाचित्रांसाठी केलेल्या ‘यू.टी.एस्.’ आणि ‘पिप’ या दोन्ही चाचण्यांचे निष्कर्ष सारखेच होते.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

४. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. एका देशाच्या हुकूमशहा राष्ट्राध्यक्षाच्या छायाचित्रातून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारण

तीव्र अहंभाव असणार्‍या व्यक्तीमध्ये अहंचे अनेक पैलू असतात, उदा. इतरांच्या मतांचा आदर न करणे, इतरांना हीन लेखणे, वर्चस्व गाजवणे, स्वतःच्या मतावर ठाम रहाणे, मनाने करणे, स्वतःचेच खरे करणे आदी. अशी व्यक्ती एखाद्या राष्ट्राची प्रमुख असल्यास इतरांचे मत विचारात न घेता प्रत्येक निर्णय हुकूमशाही पद्धतीने स्वतःच घेते. अशी व्यक्ती तिच्यातील तीव्र अहंभावामुळे वाईट शक्तींच्या त्रासाला सहज बळी पडू शकते. ‘पिप’ चाचणीतील एका देशाच्या हुकूमशहा राष्ट्राध्यक्षाच्या छायाचित्रातून प्रक्षेपित झालेली नकारात्मक स्पंदने, तसेच ‘यू.टी.एस्.’ चाचणीत त्या छायाचित्राच्या भोवती ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांची प्रभावळ आढळणे, हेच दर्शवते. त्यामुळे ‘या राष्ट्राध्यक्षाच्या माध्यमातून वाईट शक्तीच देशाचा कारभार चालवत आहे’, असे म्हणता येईल. त्यामुळे ‘त्या देशाचे भवितव्य काय असेल ?’, याची कल्पना येऊ शकते.

४ आ. एका लोकशाही राष्ट्राच्या राजकीय प्रमुखाच्या छायाचित्रातून थोड्या काही प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारण

एका लोकशाही राष्ट्राचे राजकीय प्रमुख त्या राष्ट्राचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यामध्ये राष्ट्राभिमान असून त्यांचे नेतृत्वही चांगले आहे. त्यांची थोडीफार साधनाही आहे; परंतु ते राष्ट्राचा उत्कर्ष केवळ भौतिक विकासाच्या आधारे करू पहात आहेत. त्यांची थोडीफार साधना आणि त्यांच्यातील राष्ट्राभिमान अन् राष्ट्राच्या उत्कर्षासाठी केले जाणारे प्रमाणिक प्रयत्न यांमुळे त्यांच्यामध्ये थोड्या काही प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळली; परंतु खर्‍या अर्थाने राष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी द्रष्टेपणा आवश्यक असतो. तो उच्च आध्यात्मिक पातळीनेच साध्य होऊ शकतो. त्यांनी साधना म्हणून आध्यात्मिक गुरूंच्या मागदर्शनाखाली राष्ट्राचे नेतृत्व केले, तर त्यांच्या प्रयत्नांना आध्यात्मिक बळ प्राप्त होऊन त्यांना पुष्कळ प्रमाणात यश मिळू शकते.

४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित होणे आणि तेथील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे, यांमागील कारण 

परात्पर गुरु डॉ. आठवले हे जागतिक कीर्तीचे संमोहन उपचार तज्ञ होते. विज्ञानाच्या मर्यादा लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः साधनेला आरंभ केला. त्यांचे गुरु संत भक्तराज महाराज यांच्या आज्ञेने त्यांनी देश-विदेशात अध्यात्माचा प्रसार केला. ‘समाज सत्त्वगुणी झाला, तरच खर्‍या अर्थाने राष्ट्राचा सर्वांगीण विकास होऊ शकतो’, हे त्यांनी जाणले. त्यामुळे गत २० वर्षांहून अधिक काळ ते समाजाला साधना आणि धर्माचरण शिकवण्यासाठी अखंड कार्यरत आहेत. हिंदु राष्ट्र, म्हणजे सत्त्वगुणी लोकांचे कल्याणकारी ईश्‍वरी राज्य आणायचे असेल, तर त्यासाठी प्रथम समाज सात्त्विक होणे आवश्यक आहे. त्यांनी धर्म आणि राष्ट्र यांच्या जागृतीचे अनमोल कार्य करून आणि पुष्कळ कष्ट घेऊन सहस्रो सेवाभावी साधकांना घडवले आहे. आज देशविदेशातून अनेक लोक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधनारत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मातील ‘परात्पर गुरु’ पदावर आहेत; पण याचा त्यांना काडीमात्रही अहं नाही. त्यांच्याकडून चालू असलेल्या कार्याला खिळ बसावी, यासाठी अनिष्ट शक्ती त्यांच्यावर जीवघेणी आक्रमणे करतात; पण केवळ साधना आणि ईश्‍वर, गुरु अन् संत यांची असलेली अपार कृपा यांमुळे ते अनिष्ट शक्तींची आक्रमणे यशस्वीपणे परतवून लावू शकत आहेत. ते गत अनेक वर्षांपासून सूक्ष्म जगताविषयी वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक संशोधनही करत आहेत. त्यामुळे विश्‍वाला सूक्ष्म जगताविषयीचे अमूल्य ज्ञान मिळत आहे. थोडक्यात सांगायचे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या छायाचित्रातून वातावरणात उच्च प्रतीची सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. तसेच ते उच्च आध्यात्मिक स्तरामुळे विकारविरहित असल्याने त्यांच्याकडून शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित झाली. अशा थोर संतविभूतीचे आध्यात्मिक नेतृत्वच खर्‍या अर्थाने राष्ट्राचा सर्वांगीण उत्कर्ष साधू शकते !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२०.५.२०१८)

ई-मेल : [email protected]

सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट  इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २, ३ आणि ४  यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र  क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच छायाचित्रे यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सूचना २ : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात