अध्यात्मप्रसार

सांप्रत काळी साधनेच्या अभावी समाजाची सात्त्विकता खूपच घसरल्याने सर्वत्र भ्रष्टाचार, खून, दंगली इत्यादींनी परिसीमा गाठली आहे. समाजाची सात्त्विकता वाढविण्यासाठी हजारो साधक आज संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तन, मन, धन यांचा त्याग करून समाजामध्ये अध्यात्मशास्त्राचा प्रसार करीत आहेत.

अ. संस्थेचे आध्यात्मिक उपक्रम आणि अध्यात्मप्रसाराची माध्यमे

हा प्रसार प्रवचने, सत्संग आणि बालसंस्कारवर्ग इत्यादी माध्यमांतून केला जातो.

१. प्रवचने

भारतात आणि विदेशांत ठिकठिकाणी प्रवचनांतून आनंदी जीवनासाठी साधना, तणावमुक्तीसाठी साधना, गुरुकृपायोगानुसार साधना, देवतांची माहिती उदा. शिव, दत्त इत्यादी, सण आणि धार्मिक उत्सव कसे साजरे करावेत या विषयांबद्दल मार्गदर्शन करण्यात येते.

नैतिक मूल्यांच्या संवर्धनाविषयी प्रवचने

ढासळती नैतिक मूल्ये, हा सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. नैतिक मूल्यांचे संवर्धन, म्हणजेच त्यांचे जतन आणि जोपासना अध्यात्मशास्त्राच्या माध्यमातून सुलभतेने होऊ शकते. संस्थेतर्फे `नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर शाळा, महाविद्यालये, शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरे यांमधून विनामूल्य प्रवचने केली जातात. साधनेद्वारे आपल्या व्यक्तिमत्त्वात तसेच विचारसरणीत कसा बदल होऊ शकतो, हेही या प्रवचनांतून शिकविण्यात येते.

२. साप्ताहिक सत्संग

– ७ देशांत आणि १२ भाषांत धर्मशिक्षण देणारे १३०० हून अधिक सत्संग

– सांप्रदायिक शिक्षणाचा नव्हे, तर व्यापक धर्मशिक्षणाचा प्रसार

– सुखी जीवनासाठी आणि साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन कसे करावे आणि भावजागृती यांविषयी मार्गदर्शन

साधना वाढीस लागण्यासाठी आणि योग्य प्रकारे होत रहाण्यासाठी केवळ प्रवचनांतून करण्यात येणारे मार्गदर्शन पुरेसे नसते. त्यासाठी नियमित सत्संगाची आवश्यकता असते. संस्थेतर्फे १३०० हून अधिक ठिकाणी मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, इंग्रजी, मल्याळम्, तेलुगु इत्यादि भाषांतून विनामूल्य साप्ताहिक सत्संग घेतले जातात. सत्संगात प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार नामजप कसा करावा आणि गुरुकृपायोगानुसार साधनेतील पुढचे टप्पे कसे गाठायचे, यांची तात्त्विक माहिती देण्याबरोबरच हे टप्पे प्रत्यक्षात आचरणात आणण्याविषयीही मार्गदर्शन करण्यात येते. साधना करतांना येणार्‍या अनुभूतींचा अर्थ, अध्यात्मविषयक लिखाणांचा भावार्थ सत्संगातून समजाविण्यात येतो, तसेच साधकांच्या अध्यात्म आणि साधनाविषयक विविध शंकांचे निरसनदेखील करण्यात येते. साधना करतांना येणार्‍या अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने येथे साधकांना मार्गदर्शन करण्यात येते. जलदगतीने आध्यात्मिक उन्नति करून गुरुप्राप्ति व्हावी यासाठी अध्यात्मप्रसाराच्या माध्यमातून सत्सेवेच्या विविध संधी साधकांना उपलब्ध करून देण्यात येतात. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या अंतर्गत विविध जनजागरण मोहिमा राबवल्या जातात.

३. बालसंस्कारवर्ग

पाश्चात्त्य नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार आचरण, स्वभावदोष-निर्मूलन अन् गुणसंवर्धन इत्यादींविषयी मार्गदर्शन !

लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार झाले, तर त्यातून पुढे चांगले व्यक्तिमत्त्व तयार होते. साधनेमुळे मुलांवर चांगले संस्कार होण्यास मदत होते. संस्थेतर्फे ५०० हून अधिक ठिकाणी बालसंस्कारवर्ग घेण्यात येतात. बालसंस्कारवर्गांतून मुलांना साध्यासोप्या भाषेत साधनेचे महत्त्व सांगितले जाते. तसेच लहान मुलांवर सुसंस्कार व्हावेत; म्हणून ठिकठिकाणी बालसंस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

४. अभ्यासवर्ग

अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणार्‍या जिज्ञासु साधकांसाठी, तसेच सत्संग घेणार्‍या साधकांसाठी संस्थेतर्फे अभ्यासवर्गांचे आयोजन केले जाते. चार ते पाच तासांचा अवधि असणार्‍या या अभ्यासवर्गांतून अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांची तात्त्विक माहिती विस्ताराने शिकविण्यात येते. येथे साधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच सत्संगात शिकविण्याच्या पुढच्या पुढच्या विषयांच्या दृष्टीने त्यांची तयारीही करून घेण्यात येते.

५. सत्संग-सोहळे

निरनिराळया सत्संगांतील साधक एकत्र यावेत, तसेच आजूबाजूच्या इतर लोकांना साधनेविषयी अधिक माहिती मिळावी, या उद्देशाने तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी सत्संग-सोहळा आयोजित करण्यात येतो. या सत्संग-सोहळयात साधनेसंबंधी मार्गदर्शनपर प्रवचन असते. साधकांचा परस्परपरिचय व्हावा, जवळीक वाढावी, कार्याfवस्ताराच्या दृष्टिकोनातून ते करीत असलेले प्रयत्न आणि विविध स्तरांवरील नियोजन यांची एकमेकांना माहिती व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी, या दृष्टीने साधकांत गटचर्चा केली जाते. याशिवाय याप्रसंगी साधकांचे अनुभूतिकथनही होते.

६. गुरुपौर्णिमा महोत्सव

हिंदूंच्या `गुरु-शिष्य परंपरेचे’ जतन करण्याबरोबरच साधना आणि राष्ट्ररक्षण यांविषयी मार्गदर्शनपर प्रवचनांचे आयोजन !

साधकांच्या जीवनात गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. या महोत्सवाच्या कार्यात सहभागी होणार्‍यांना नेहमीच्या साधनेच्या तुलनेत खूप अधिक पटीने फायदा होतो. गुरुपौर्णिमा आणि साधना यांचे जीवनातील महत्त्व कळण्यासाठी संस्थेतर्फे उत्सवाच्या दिवशी मार्गदर्शनपर प्रवचने ठेवण्यात येतात. देश अन् विदेशांतील साधक आपापल्या भागात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात.

७. निवासी शिबिरे

क्रियाशील साधकांना साधनेच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक शिकता यावे, संस्थेचे कार्य अधिक परिणामकारक अन् नियोजन कौशल्यपूर्ण रीतीने करता यावे यासाठी संस्थेतर्फे निवासी शिबिरांचे आयोजन काही राज्यांतून करण्यात येते. निरनिराळया राज्यांतील साधक या शिबिरांमध्ये सहभागी होतात.

८. वेदपाठशाळा

कर्मकांडांतर्गत धार्मिक विधी साधना म्हणून करणारे साधक-पुरोहित निर्माण करणारी कार्यशाळा ! या कार्यशाळेत आचार-विचार-विहार अशा धर्मसंहितेतून प्रत्यक्ष समाजाला धर्माचरण करण्यास उद्युक्त करणारे पुरोहित सिद्ध होतात. ते समाजाला ईश्वरप्राप्तीची योग्य दिशा दाखवणारे असतील.

९. प्रसारफेर्‍या

साधनेविषयी जनजागृती करण्यासाठी अन् हिंदूंमध्ये धर्मजागृती करण्याच्या दृष्टीने प्रसारफेर्‍यांचे आयोजन करण्यात येते. हिंदूंवर होणारे आघात, हिंदूंच्या विरोधातील षड्यंत्रे, हिंदूंच्या समोरील आव्हाने, यांविषयी माहिती प्रसारित केल्याने हिंदु जनता सतर्क व्हायला साहाय्य होते.

१०. पथनाट्ये

सध्याच्या बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे वास्तव चित्रण निरनिराळया देखाव्यांतून उभे करून सर्वसामान्यांनी या परिस्थितीतून नेमका मार्ग कसा काढावा याविषयीचे दिशानिर्देशन संस्थेतर्फे सादर करण्यात येणार्‍या पथनाट्यांद्वारे करण्यात येते.

११. `केबल’ अन् चलत् चित्रदर्शक यंत्रे यांच्या माध्यमातून धर्मप्रबोधन

चलत् चित्रदर्शक यंत्राच्या माध्यमातून सत्संग, धर्मसत्संग, वाचक मेळावे, पत्रकार परिषद यांत, तसेच केबल-जोडणी यांच्या माध्यमातून ध्वनीचित्र-तबकड्यांच्या प्रसारणाद्वारे धर्मशिक्षण आणि धर्मप्रबोधन !

१२. फलकप्रसिद्धी आणि धर्मशिक्षण देणारे `फ्लेक्स’ फलक यांच्या माध्यमातून धर्मप्रबोधन

धर्मशिक्षण देणारे सनातनचे `फ्लेक्स’ फलक म्हणजे सातत्याने धर्मप्रसारात सहभागी असणारे एक खंदे धर्मवीरच आज समाजातील सात्त्विकता कमी झाल्याने समाजाची नैतिकता खालच्या स्तराला गेली झाली आहे. समाजाची सात्त्विकता केवळ धर्माचरण करूनच वाढीस लागू शकते. परंतु आज हिंदूंची स्थिती पाहता हिंदूंना देवळे किंवा अन्यत्र कोठेही धर्मशिक्षण दिले जात नाही; तसेच पाश्चात्य पद्धतीचे अंधानुकरणामुळे आज हिंदूंना हिंदु संस्कृतीचा विसर पडलेला आहे. हिंदूंना सहजरीतीने धर्मशिक्षण घेता यावे, यासाठी सनातन संस्थेतर्फे वेगवेगळया आध्यात्मिक कृती आणि त्यामागील शास्त्र अशा विविध विषयांवर धर्मशिक्षण देणारे `फ्लेक्स’ फलकांचे संच तयार करण्यात आले आहेत. उदा. देवळात दर्शन कसे घ्यावे, नामजपाचे महत्त्व, गणपति, शिव, नवरात्र, विवाह, मृत्योत्तर क्रियाकर्म, श्राद्ध इत्यादी विषयांवर धर्मशिक्षण देणारे हे `फ्लेक्स’ फलकांचे संच मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड यांसारख्या विविध भाषांमध्ये उपलब्ध असून ते मंदिरे, मंगल कार्यालये, स्मशाने इत्यादी ठिकाणी कायमस्वरूपी लावले जातात.

दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रतिदिन फलकप्रसिध्दी फलकासाठी मजकूर उपलब्ध करण्यात येतो. पुढील मार्गिकेवर फलकासाठी मजकूर उपलब्ध आहे : sanatanprabhat.org

स्थानिक पातळीवर फलक लिहून आपणही या धर्मकार्यात सहभागी होऊ शकता !

Leave a Comment